वाचन संस्कृतीच्या बैलाला …

Submitted by pkarandikar50 on 31 March, 2021 - 06:43

वाचन संस्कृतीच्या बैलाला …

मायमराठीच्या भवितव्याविषयी चिंतातूर असलेल्या सहोदरांची संख्या दिवसेंदिवस वाढतेय. साहजिकच या विषयावर सातत्यानं बरंच काही लिहून येतंय आणि विविध व्यासपीठावरून उच्चरवात बोललंही जातंय. यावरून आपण असा निष्कर्ष काढू शकतो की ही समस्या खरोखरच बिकटअसली पाहिजे आणि गेल्या दिवसागणिक ती अधिकाधिक गंभीर होत जात चालली असावी. या ढासळत्या स्थितीची कारणं (आणि साहजिकच उपाय योजनाही) प्रत्येक जण आपापल्यापरीनं सुचवतोय. त्या कारण मीमांसेत ‘वाचन संस्कृतीचा ऱ्हास’ या मुद्द्यावर बराच भर दिलेला दिसतो. त्यामुळे असं वाटायला लागतं की वाचन संस्कृतीचा प्रश्न सोडवला की बऱ्याच प्रमाणात मराठी भाषेला नक्की चांगले दिवस येतील.

संस्कृत म्हणजे सातत्यानं सुधारत (संस्कारित होत) जाणारी भाषा पण तिचा ऱ्हास मराठीपेक्षाही अधिक झाल्याचं लक्षात येतं. कारणांमध्ये न शिरता, असं म्हणता येईल का की जे संस्कृतचं झालं तेच मराठीचं होणार आहे? प्रश्न काय तो ही प्रक्रिया किती झपाट्यानं हे घडणार एव्हढाच आहे? त्याबाबत मला तरी वाटतं की संस्कृत आणि मराठी यांची तुलना थोडीशी अव्यवहार्य होईल. याचं एक कारण म्हणजे प्रत्येक भाषेला (मराठी, बंगाली, पंजाबी वगैरे) जसा एक भक्कम भौगोलिक संदर्भ आहे, तसा संस्कृत भाषेला नाही. दुसरं असं की भाषा सुधारत जाण्याची (संस्कारित होण्याची) प्रक्रिया संस्कृत भाषेच्या बाबतीत थंडावत गेल्यामुळे हळू हळू त्या भाषेचा जनाश्रय घटत गेला असावा. म्हणजेच, मराठी भाषेनं जर ही जाणीव ठेवली तर तिचा ऱ्हास होणे थांबू (किमान पक्षी मंदावू) शकेल का?

गेल्या एक हजारभर वर्षांचा इतिहास पाहिला तर असं दिसतं की मराठीनं या बाबतीत खूपच लवचिकपणा दाखवला आहे. मुळात आपली भाषा हीच संस्कृत, कन्नड, तेलगू अशा अनेक भाषांच्या मिश्रणातून घडली. दुसरं म्हणजे ती आधी एक बोलीभाषा म्हणून उदयाला आली आणि स्थिरावली. हळू हळू तिचं स्वतंत्र व्याकरण आकाराला आलं. ग्रंथरचना आणि राजाश्रय या दोन महत्वाच्या कारणामुळे तिचं संवर्धन झालं. इतर अनेक भाषामधले शब्द आणि विभक्ती-प्रत्यय तिने स्वीकारले. राजकीय कारणांमुळे असेल पण फारसीतले अनेक शब्द तिने आत्मसात केले. त्यामुळे प्रशासनात आणि कोर्ट-कचेरीच्या कामात बरीच सुलभता आली. पुढे इंग्रजीच्या बाबतीतही हेच घडलं. याशिवाय राज्याच्या विविध भागातल्या बोली उपभाषा मराठीनं आपल्याशा केल्या, त्यांना सामावून घेतलं. ही प्रक्रिया अजूनही सुरू आहे. या गोष्टीचं आपण स्वागत करायला हवं. ‘प्रमाणित’ भाषेचं महत्व मी अमान्य करत नाही पण त्याचं अवास्तव स्तोम माजवलं जाऊ नये इतकंच. जिथे (विशेषतः माध्यमांमध्ये) विकृतीकरण आणि विद्रूपीकरण होत असेल तिथे जरूर विरोध करावा.

वाचन संस्कृतीच्या बाबतीतही हेच म्हणता येईल की जिथे सुधारणेची (संस्करणाची) प्रक्रिया मंदावते तिथे ऱ्हास सुरू होतो. त्यामुळे वाचन संस्कृती कशी रुंदावेल आणि सखोल होईल याचा विचार व्हायला हवा.

छापील इतकंच महत्व इथून पुढे डिजिटल माध्यमालाही येणार आहे. त्यामुळे इ-पुस्तकं, इ-नियतकालिकं, इ-वर्तमानपत्रं, ब्लॉग, ध्वनी-पुस्तकं (ऑडियो बुक्स) अशा अनेक माध्यमातून साहित्य उपलब्ध करून द्यावं लागणार आहे. महत्व आहे ते वाचनाला, कोणत्या माध्यमातून वाचन होतंय हे महत्वाचं नाही.

ग्रंथालयांचं योगदानही तितकंच महत्वाचं राहील. संख्येनं पाहू गेलो तर राज्यातल्या अनुदान-पात्र ग्रंथालयांची संख्या काही कमी नाही पण त्यांची अवस्था अगदीच दयनीय वाटते. शासकीय अनुदानाची रक्कम त्यांच्या हाती पडायला पूर्वी काही महिने उशीर व्हायचा पण हल्ली तोच उशीर वर्षात मोजावा लागतो. पुस्तकांच्या खरेदीत होणारा भ्रष्टाचार हाही एक चिंतेचा विषय आहेच. महानगरांचं भौगोलिक क्षेत्र झपाट्यानं विस्तारत आहे. तेथे ग्रंथालयांच्या संख्येत बरीच वाढ व्हायला हवी आणि त्या बाबतीत पालिकांना पुढाकार घ्यावा लागेल पण त्या आघाडीवरही सामसूम दिसते.

वाचनाची आवड निर्माण करण्यात शाळा आणि महाविद्यालयं यांची भूमिका फार महत्वाची परंतु त्याबाबतीतही दुर्लक्ष होताना दिसतं. प्राथमिक शाळातून ग्रंथालयं क्वचितच आढळतात. माध्यमिक शाळांची स्थिती वाईटच म्हणावी लागेल. प्रदीप लोखंडे सारखा एखादा माणूस माध्यमिक शाळांना मराठी पुस्तकं मोफत पुरवण्याचा उपक्रम राबवताना दिसतो पण शाळांना पुस्तकं खरेदीत फारसा रस दिसत नाही. शाळकरी वयात वाचनाची आवड लागावी असे प्रयत्न झाले नाहीत तर पुढे ती आवड कशी उत्पन्न होणार?

मराठी साहित्याला माध्यमातून अगदी अल्प स्थान आहे. वाचनसंस्कृतीच्या ऱ्हासाचं हे एक लक्षण आहे की अनेक कारणांपैकी एक महत्वाचं कारण आहे? याला माध्यमांची अनास्था म्हणावं की अनभिज्ञता म्हणावं ? मराठीत डझनावारी वाहिन्या निघाल्या आहेत, नित्य नव्या वाहिन्यांची भर पडते आहे. त्यातला ‘कन्टेन्ट ‘ वाहून जाण्याच्याच लायकीचा असतो, ते सोडा पण आठवड्यातून निदान एखादा तास तरी मराठी साहित्य-विश्वातल्या घडामोडी आणि आस्वादक समीक्षा यांच्यासाठी द्यावा असं त्यांना का वाटत नसावं? वर्तमानपत्रांचीही तीच गत. मोठ्या अपेक्षेने प्रकाशक आपली नवी पुस्तके त्यांच्याकडे पाठवतात पण समीक्षा सोडाच, साधी पोच सुद्धा प्रसिद्ध करण्याइतका पाचपोच त्यांना नसतो. साहित्य संमेलनांच्या वार्षिक उरुसांच्या निमित्तानं उद्भवणाऱ्या (आणि पूर्णतः दुर्लक्षित करण्याच्या लायकीच्या) वादविवादासाठी मात्र हीच माध्यमं किती तरी वेळ आणि जागा वाया घालवतात. पण माझ्या मते यात आश्चर्य करण्यासारखं फारसं काही नाही; कारण साधं शालेय व्याकरण ज्यांना माहीत नाही अशा अडाणी माणसांकडून अपेक्षा ती किती करावी?

मराठी साहित्याचं प्रकाशन आणि वितरण यांचं अर्थशास्त्र सुद्धा दयनीय आहे. पुन्हा एकदा, वाचन-संस्कृतीच्या ओहोटीचं हे लक्षण आणि कारणही म्हणावं लागतं. नव्या पुस्तकाच्या आवृत्ती फार तर एकेक हजाराच्या असतात आणि त्याही खपायला कित्येक वर्ष लागतात. ज्यांना ‘तडाखेबंद’ खपाची पुस्तकं म्हटलं जातं त्यांच्याही किती हजार प्रती खपतात? त्यातून पुस्तक-विक्रेत्यांना किती नफा होतो आणि प्रकाशकांना काय सुटतं? लेखकांची पाळी त्यानंतरची. आपलं पुस्तक कोण्या प्रकाशकानं काढावं यातच तो बिचारा धन्य होऊन गेलेला असतो. मानधन दूरच राह्यलं. कित्येकदा पुस्तक खपलं तरी त्याच्या तोंडाला पानं पुसली जातात, ते वेगळंच. पुस्तक किक्रेत्यांकडून विक्री खालेल्या पुस्तकांची उधारी वसूल करण्यासाठी प्रकाशकांनाही कोण आटापिटा करावा लागतो. थोडक्यात म्हणजे, ज्याने त्याने, शक्य होईल तसं, कोणा ना कोणाच्या तरी तोंडाला पानं पुसणं हे मराठी प्रकाशन व्यवसायाचं एक प्रमुख लक्षण असावं. तरीही तो व्यवसाय टिकून आहे हे विशेष.

कोणत्याही व्यवहारात मागणी आणि पुरवठा हे अनिवार्य घटक असतात. त्यामुळे वाचन व्यवहारातला एक अत्यंत महत्वाचा घटक म्हणजे लेखक (आणि प्रकाशक). सकस आणि वाचनीय साहित्य निर्माण झालं नाही किंवा अगदी कमी प्रमाणात झालं तर आपण वाचकांच्या उदासीनतेला कशी नावं ठेवणार? एक तर फक्त लेखनावर चरितार्थ चालवणारे लेखक / कवि मराठीत जवळपास नाहीतच. उपजीविकेचं साधन काहीतरी वेगळंच असतं (बहुदा प्राध्यापकी) त्यामुळे मराठीतला लेखक वर्ग मला तरी बराचसा आत्ममग्न आणि अल्पसंतुष्ट वाटतो. त्यांच्या अनुभव विश्वाला खूप मर्यादा आहेत हे तर खरंच पण आपल्या परिसरातल्या समकालीन वास्तवाचं बारीकीनं निरीक्षण करणं, कारण-मीमांसा करणं, त्यातून निष्कर्ष काढणं,आणि त्यांचं कलात्मक वैश्वीकरण (universalization) करणं या गोष्टी फार अभावानं घडताना दिसतात. इंग्रजी पुस्तकांच्या मराठी अनुवादांची संख्या दरसाल शेकड्यात मोजावी लागेल पण मराठीतून इतर भाषांत अनुवादित होणारी पुस्तकं हाताच्या बोटांवर मोजण्याइतकी तरी असतात का? भाषांमध्ये आदान -प्रदान व्हायलाच हवं यात शंका नाही पण मराठीच्या बाबतीत हा व्यवहार एका दिशेनेच का व्हावा? नक्कीच कुठेतरी मराठी साहित्याचा कस कमी पडत असावा.

प्रत्येक नियमाला अपवाद असतातच किंबहुना अपवादानेच नियम सिद्ध होतो असं तर्कशास्त्र सांगतं. हा सिद्धांत मान्य करून पुढे मी म्हणतो की, मराठीत कसदार आणि वाचनीय साहित्य कमी निर्माण होतं त्यामुळे वाचकांचा उदार आश्रय मराठी साहित्याला मिळत नाही. हे विधान पुरेसा अभ्यास न करता केलेलं असेल आणि ते वादग्रस्त ठरू शकतं याची मला पुरेपूर कल्पना आहे, तरीही ते निरीक्षण मी थोड्याशा धाडसानं मांडतो आहे. कदाचित प्रत्येक भाषेतल्या साहित्य निर्मितीला हे विधान थोड्याफार अंशी लागू पडत असेलही पण मी मराठी भाषी, त्यामुळे ते मला मराठीच्या बाबतीत विशेषरित्या जाणवतं. जे जे म्हणून काही प्रकाशित होतं, ते राहू द्या पण ज्या काही साहित्यकृतींचा थोडाफार बोलबाला होतो आणि ज्यांना गावगन्ना (फुटकळ) पुरस्कार मिळतात, त्यापैकी कितीशी पुस्तकं खरंच वाचनीय असतात? माझ्या मते, फारच थोडी. कुठेतरी, कोणीतरी नावाजलं म्हणून उत्साहानं एखादं पुस्तक खरेदी करावं आणि ते पुरतं वाचवूही नये हा अनुभव मी अनेकदा घेतला आहे.

सुप्रसिद्ध अमेरिकन लेखिका टोनी मॉरिसन (पुलित्झर आणि नोबेल पुरस्कार विजेत्या) यांनी म्हटलं आहे, “ तुम्हाला वाचावंसं वाटतं असं पुस्तक लिहिलं जात नसेल तर मग ते तुम्हालाच लिहिणं भाग आहे. ” त्यांचा हा उपदेश शिरोधार्य मानून मी लिहिता झालो. माझं हे विधान कुणाला शिष्टपणाचं वाटेल, कुणी मला अति-शहाणा ठरवेल पण माझ्या पुरतं ते प्रामाणिकपणाचं आहे. साहजिकच, माझी पुस्तकं कितीजणांनी वाचली आणि वाखाणली ह्या बाबी मला अप्रस्तुत वाटतात. तरीही, प्रश्न प्रकाशकांचा उरतोच. माझी पुस्तकं छापून त्यांना तोटा व्हावा हे मात्र मला खुपतं. मी हा मुद्दा त्यांच्याकडे काढला. एकदा नव्हे, अनेकदा. ते म्हणाले, “ प्रकाशन हा एक व्यवसाय आहे, त्यामुळे त्यात चढ-उतार असणार हे आम्हाला गृहीतच धरावं लागतं पण माझ्या बाबतीत म्हणाल तर आधी मी वाचक आहे आणि प्रकाशक नंतर. त्यामुळे मला जे वाचायला आवडतं, ते मी छापतो.” एकंदरीत काय, तर त्यांची जातकुळीही टोनी मॉरिसनचीच. अशा प्रकाशकांच्यामुळेच मराठी वाचन संस्कृती तग धरून राह्यली असावी.
-प्रभाकर (बापू) करन्दीकर .

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

अगदी पटण्यासारखं आहे. मी इतरांचं वाचन कमी असलेलं बघून त्यांना नावं ठेवतो, पण माझंच वाचन गेल्या ७-८ वर्षात अगदी नगण्य आहे हे लक्षात आल्यावर खिन्नता येते.

मराठी मागे पडतेय, मराठी पुस्तकं वाचली जात नाहीत असा गळा काढणे , या दोन्हीत (मराठीचा वापर न करणे आणि मराठी पुस्तकं न वाचणे) सक्रिय सहभागी असलेला शहरी पांढरपेशा मध्यमवर्गीय मराठी माणूस अधूनमधून करीत असतो. ग्रामीण - निमशहरी भागात आम्ही मराठी भाषेचा झेंडा उचलून धरलेला आहे आणि वाचनसंस्कृतीची पालखी खांद्यावर घेतली आहे असं तिथला तरुण सांगताना ऐकलं आहे आणि हे उगाच सांगण्यापुरतं नसतं हेही पाहिलं आहे.

ग्रामीण भागात क्रॉसवर्ड सारख्या चांगल्या चेन निघाल्या, योग्य प्रकारची (मराठी/अनुवादीत सेल्फ डेव्हलपमेंट/ज्यावर सिनेमे मालिका निघाल्या आहेत असे मूळ पुस्तक किंवा इतर भाषेचा अनुवाद, ईंग्लिश लोकप्रिय आणि अगाथा ख्रिस्ती शेरलॉक होम्स ऑस्कर वाइल्ड सारखे क्लासिक्स) आणि मुख्य म्हणजे खूप अवाच्या सवा किंमत नसलेल्या प्रिंट आवृत्ती असे ठेवले तर तिथेही होईल असे वाटते.

>>>> मूळ मराठी लेखनाबद्दल किती ती अनास्था! >>> +७८६

अगदी खरे आहे . इथे लोक एक परिच्छेदभर प्रतिसाद सुद्धा नीट मराठीत लिहीत नाहीत - भरपूर इंग्लिशची भेसळ असते.
या लेखाच्या लेखकासकट कितीतरी जण आपले सदस्यनाव अजूनही रोमन लिपीत बाळगून आहेत !
‘मी वाचलेले पुस्तक’ हे सदर तर इंग्रजी वाचनालय आहे की काय असे अलीकडे वाटते.

हरकत नाही... मराठीच्या नावाने गळे काढत राहू.

भरत यांना अनुमोदन.
‘मी वाचलेले पुस्तक’ हे सदर तर इंग्रजी वाचनालय आहे की काय असे अलीकडे वाटते. >>>+++१

लोकांशी बोलताना त्यांची नवीन मराठी साहित्य वाचायची इच्छा तर आहे पण सध्या कुठलं नवीन साहित्य प्रकाशित झालं आहे, कुठलं वाचनीय, दर्जेदार आहे हे कसे शोधायचे असा त्यांना प्रश्न पडतो.
यासाठी मी अवलंबलेले काही मार्गः
१. दिवाळी अंकात अनेक वेळा नवीन ग्रंथसूची असते.
२. अनेक लेखकांच्या पुस्तकाच्या मागे त्या लेखकाच्या इतर पुस्तकाची माहिती असते.
३. मायबोली आणि इतर मराठी जालावर उपलब्ध असलेली माहिती, नवीन पुस्तकाविषयी अभिप्राय इत्यादी
४. ग्रंथप्रदर्शने, वाचनालये इथून मिळालेली माहिती

तरीही अशी माहिती मिळवण्यासाठी वेळ ज्यांच्याकडे नसतो त्यांच्यासाठी नाशिकच्या कुसुमाग्रज प्रतिष्ठानातर्फे 'ग्रंथ तुमच्या दारी' सारखी अभिनव संकल्पना राबवली जाते, ज्यात ते विविध लेखकांच्या दर्जेदार पुस्तकांची पेटी तुम्हाला घरपोच देतात.

तात्पर्य हे की आपल्यापरीने मराठी वाचक वाढवण्यासाठी आपणच प्रयत्न करायला हवेत Happy

चीकू, हो. दीपावली, मौज, पद्मगंधा इ. दिवाळी अंकांची पुस्तकांच्या व प्रकाशकांच्या जाहिराती असतित.
ललित, मुक्त शब्द यासारखी मासिके.
मराठी प्रकाशकांची संकेतस्थळं, फेसबुक पेज इ. हे आणखी स्रोत

वृत्तपत्रात मराठी पुस्तकांबद्दल त्या मजकुराची जागा कमी झाली आहे का?
लोकसत्तेत रविवारी नव्या मराठी पुस्तकांचा परिचय व जाहिराती असत .लॉकडाउनमुळे नवी पुस्तकं येत नाहीत म्हणून ते पान गायब आहे का ,कल्पना नाही.

सुशिक्षित वर्ग इंग्रजी पुस्तके वाचतो यातच सर्व आले.
याच्या पुढे जाऊन इंग्लंड अमेरिकेत सेटल झालेला अथवा आपल्या पुढच्या पिढीला विदेशात सेटल केलेला निवृत्त उच्चपदस्थ मराठीच्या भवितव्याच्या नावाने गळे काढतो. गळे काढतो हा शब्द कदाचित योग्य नसेल. मात्र यात कुठेच सोल्युशन दिसत नाही.

या मंडळींना मराठी जगवण्याचं ओझं ज्यांना नाईलाजाने मराठीशिवाय दुसरी भाषा बोलता येत नाही त्यांच्यावर टाकायचे आहे. कष्टकरी, शेतकरी, झेडपीच्या मराठी शाळेतून शिकलेले (राज्याचे महासचिव या वर नक्कीच बोलू शकतात) यांना इंग्रजीचा गंध नाही म्हणून ते मराठी वाचतात. त्यांच्या वाट्याला कुठल्या कथा कादंब-या येतात ? ज्यात त्यांचे विश्व नाही त्या. ज्यात बोजड शब्द आहेत अशा. असे लिहीणे म्हणजे मोठ्ठं लिहीणे असा समज काही वर्षांपूर्वी होता. तर मराठीत उत्तम कादंब-या आणाव्यात, लिहाव्यात असं वाटणा-या पहिल्या फळीला शेक्सपीअर आदर्श वाटत होता. त्यातून आपल्याकडे भरजरी भाषा हवी म्हणून संस्कृतोद्भव जडशीळ भाषा आली. हा अट्टाहास होता. शेक्सपीअरने ऐतिहासिक विषयावर लिहीले म्हणून आपल्याकडे भरजरी मराठीत ऐतिहासिक कादंब-याच लिहील्या गेल्या.

विचार करा. त्या काळच्या कारभा-यांचे, उच्चपदस्थांचे मराठी आज आपल्याला पत्रातून समजते. त्या काळी ती बोलीभाषा असावी. पण आपल्याकडे हातापायाच्या काड्या झालेला लेखक दोन फूट बाय तीन फूटाच्या टेबलावर बसून

माधवराव आपल्या कक्षात मंचकावर तख्तपोशीकडे नरज लावून बसले होते. दासी छत्रचामर ढाळत होत्या.
महाराणी कटाक्ष टाकत म्हणाल्या , " भोजनकक्षातून आपण तडक इथे येऊन बसलात. मुखवासासाठी देखील विराम केला नाहीत. लतावेलींनी आच्छादलेल्या विश्रामकक्षाच्या गवाक्षात आपल्या चित्तास शांती मिळते. पण आज तिथेही आपण जाण्याचे केले नाहीत. आपल्या अंतर्मनात असे कोणते द्वंद्व चालले आहे हे माझ्या आकलनापलिकडचे आहे. मी आपल्या चिंतेने व्याकुळ झाले आहे "

हाच संवाद जर
" अहो, आडवा हात मारला ते थेट इथेच येऊन लोळण घेतलीत, काय समजायचं मी ? कमीत कमी खिडकीत तरी बसायचं नेहमीप्रमाणे समोरच्या रखमेला बघत. चालवून घेतलं असतं एकवेळ. ना विडा खाऊन तोंड रंगवलंय ना सोफ खाल्लीय.. ना अडकित्त्यात सुपारी कातरवत बसलेत. काळाजला घरं पडतात अशाने. डोक्यावर परिणाम तर नाही ना झाला हे पहिल्यांदा मनात येतं "

असा संवाद किती नैसर्गिक वाटला असता कि नाही ?
आता दिवसभर शेतीत काम करून किंवा रस्त्याच्या कडेला दगडं फोडलेल्याने छत्रचामर , गवाक्ष, तख्तपोशी म्हणजे काय हे पहायला गुगल करायचं की अंदाजपंचे तख्तपोशी म्हणजे पाठीला आलेला बाक समजायचं ?

इतकं सांस्कृतिक अंतर ?
बरं ते तरी अस्सल आहे का हो ?
नटसम्राट म्हणजे दर्जेदार पण ते किंग लिअरबर आधारीत. अस्सल कथाबीज कुठेय ?
बायकोवरचे विनोद ही तर तत्कालीन ब्रिटीश संस्कृती. महिलांना अधिकार मिळणार म्हणून उपजलेली. तसले विनोद मराठीत आणायचे , ते रूजवायचे आणि तसे वातावरण नसताना त्यावर हसायचे याला अस्सल म्हणायचे आणि तसली पुस्तकं का खपत नाहीत म्हणून चिंताग्रस्त चेह-याने लेख पाडायचे...

याला गळे काढणे असे म्हणणे कदाचित योग्य होत असेल.
बोलू अजून..

मला वाटते रसिकवाले नांदुरकर "साहित्य सूची" नावाचे मासिक आधी प्रकाशित करायचे ज्यात चांगला पुस्तक परिचय असायचा. आता नाही येत बहुतेक .
https://www.facebook.com/groups/193348287363365/about
हे त्यांचे ग्रुप पेज आहे जे बराच काळापासून गारगार आहे. मी सोडले आहे ते आधीच तरी मला तिथे कोणी हुडकू नका Proud

सर्व प्रकारची((ग्रामीण/दलित/अनुवादित/पॉझिटिव्ह मेंटल ऍटीट्यूड/पाककृती/शहरी भाषा/संस्कृत प्रचुर जड ऐतिहासिक भाषा) पुस्तके सर्वाना रास्त प्रमाणात उपलब्ध व्हावीत.ज्याला जे पाहिजे ते निवडू दे.काही जणांना शहरात राहून ग्रामीण बोली शिकायला म्हणून वाचायची असेल.(मी त्या आवाज मधल्या होबासराव आणि तिर्खमभाऊ पात्रे असलेल्या कथा वाचायचे.).काही ग्रामीण बोलीभाषा भागात बी ए अभ्यास किंवा तत्सम कारणाने अवजड मराठी शिकायचे म्हणून वाचायचे असेल.
सध्या मला मुख्य आव्हान '100 पानी पुस्तक वाचण्यापेक्षा त्याचा 5 मिनिटांचा समरी किंवा रिव्ह्यू व्हिडीओ बघतो' असा विचार करणाऱ्या लोकांचं वाटतं.व्हिडिओ माध्यमांशी वाकडं नाही.पण प्रत्यक्ष कागदी किंवा किंडल पुस्तक वाचणं, एक चित्र मनात उभं करणं वेगळं आणि हे चित्र व्हिडीओ रुपात कोणीतरी भाज्यांच्या कॅप्सूल सारखं आयतं पानात वाढून देणं वेगळं.यातली मजा, फरक कळणारे कमी होत चालले आहेत.

प्रत्येक गोष्टीत लसावि काढून उपयोगाचा नसतो. लेखक स्वतः राज्याचे मुख्य सचिव होते.
सर्व समस्यांचे एकच एक शुभ संचित नसते हे त्यांना ठाऊक असते. एक एक समस्या धरून तिची पिसं काढावी लागतात आणि तोडगेही द्यावे लागतात.

जडशीळ भाषा का वाचली जात नाहीत हा केस स्टडी वेगळा.
दलित आत्मचरीत्रं आता पूर्वीसारखी का खपत नाहीत हा विषय वेगळा.
ग्रामीण पार्श्वभूमी असलेल्या लिखाणाला मागणी का येते ?
सॅबी परेरा सारख्या हलक्या फुलक्या लेखकाचे पुस्तक का हातोहात खपते ?

या सर्वांचे उत्तर एकच एक असू शकत नाही.
बदललेला काळ हे ब-याच समस्यांचे उत्तर असू शकते. त्याचा तोडगा हे काळाबरोबर बदलणे हेच असेल. अट्टाहासाने काळ बदलला तरी थोरवी सांगे कुळाची असे केल्याने नुकसान कशाचे आहे हे सांगण्याची गरज नाही.

असे व्हावे / किंवा वाचन संस्कृतीच्या बैलाला असे खूपच आक्रमक शीर्षक देऊन रडगाणे गायल्याने काही होत नाही.

जे लोक आधीपासून पुस्तकं वाचतात ते असल्या व्हिडियोंचा उपयोग फार तर पुस्तक परिचय म्हणून करतील. मला अशा व्हिडियोवाल्या बाबाची लिंक आली होती. मी स्पष्टपणे नाही म्हणून सांगितलं.
ते व्हिडियो बघून आपण पुस्तक वाचलं असं समजणारे तसेही कधी पुस्तके वाचणार नव्हतेच.

बंगाली चित्रपटांमुळे मला अनेक बंगाली लेखकांची नावे माहीत झाली. बंगाली मला अद्याप वाचता येत नाही. पण जमेल तसे अनुवादीत वाचायचा प्रयत्न करते. मराठीत असे झाले तर हरकत काय आहे ? दुनियादारी चित्रपटानंतर दुनियादारी या कादंबरीला वेटींग होते.

जो मराठी वर्ग जालावर नाही तो बिन धास्त मराठीची अनेक रुपे वापरतो व वाचन कमी प्रमा णात असले तरी स्थानिक वृत्तपत्रे मासिके दिवाळी अंक कादंबर्‍या वाचत असतो. भाषेचे, माहितीचे वापरणे इतर रुपांत होते.

मला ते मेहता प्रकाशन टाइप लोक इंग्रजीतली पुस्तके अनुवादित करून विकतात त्याचा जाम वैताग येतो. ते झाडांच्या प्राण्यांच्या इन्वेजिव स्पेशीज आक्रमण करून स्थानीय इको सिस्टिम खराब करून टाकतात तसे वाट्ते. हे मा वै म. आपल्या मातीतल्या कथा कविता, आपल्या भाषेत जन्मलेले साहित्य गुणात्म क दृ ष्ट्या फार वरचे आहे ते वाचावे किंवा इतर रुपांनी ग्र्हण करावे हे शक्य आहे. व करणा रे करतातही.

रच्याकने न्युज लाँड्री नावाची साइट आहे त्यांना मरा ठी साहित्य व सांस्कृतिक क्षेत्रातील नव्या घडामोडींवर सातत्याने लिहिणारे कोणीतरी हवे आहे. चांगली संधी आहे. साइट वर चौकशी करा किंवा त्यांना मेल टाका.

कोसला मध्ये पांडबा म्हणतो तसे गावाकडच्या वह्या काय वाइट आहेत मनोरंजना साठी. अश्या वह्या जास्त प्रकाशात यावयास हव्या.

इंग्रजी पुस्तकांच्या मराठी अनुवादांची संख्या दरसाल शेकड्यात मोजावी लागेल पण मराठीतून इतर भाषांत अनुवादित होणारी पुस्तकं हाताच्या बोटांवर मोजण्याइतकी तरी असतात का? >>>>> मागच्या महिन्यात यावर लोकसत्ताच्या बुकमार्कमध्ये समीक्षा नेटके यांचा लेख आला होता.
मेहता प्रकाशन टाइप लोक > +१
झिल्लामिल्ला > +१
म्हणूनच मला आणि बरेच जणांना लौकिकार्थाने अशिक्षित आणि चिरागनगरच्या झोपडपट्टीत बसून कमी काळात उत्तम दर्जाचे विपुल लेखन करणारे अण्णाभाऊ साठे मराठीतील सर्वश्रेष्ठ लेखकांपैकी एक वाटतात. त्यांचे लेखन आज बऱ्याच भाषांमध्ये अनुवादित झाले आहे ही त्यांच्या श्रेष्ठत्वाची पावतीच आहे.

ते व्हिडियो बघून आपण पुस्तक वाचलं असं समजणारे तसेही कधी पुस्तके वाचणार नव्हते > +++१
मला स्वतःला किंडल/ऑनलाईन पुस्तकांपेक्षा हातात पुस्तक धरून वाचायला जास्त आवडते, जेव्हा शक्य तेव्हा Happy

इंग्रजी पुस्तकांच्या मराठी अनुवादांची संख्या दरसाल शेकड्यात मोजावी लागेल पण मराठीतून इतर भाषांत अनुवादित होणारी पुस्तकं हाताच्या बोटांवर मोजण्याइतकी तरी असतात का?>>
लेखनाचा दर्जा उत्तम असला तर बहुतेक वेळा अनुवाद होतात. वरती जिद्दु यांनी दिलेले अण्णाभाऊ साठे यांचे उदाहरण. बलुतं, उचल्या यांचेही मला वाटतं इन्ग्रजीत अनुवाद झाले आहेत. श्यामची आईचा जपानीमधे अनुवाद झाला आहे. मृत्युंजयचा हिंदीमधे बहुतेक. अजूनही अनेक असतील जे मला माहीत नाहीत. अर्थात अनुवादामधे मूळ भाषेतील शाब्दिक विनोद, कसरती चपखलपणे येत नाहीत तेही मान्य आहे.

बंगाली चित्रपटांमुळे मला अनेक बंगाली लेखकांची नावे माहीत झाली. बंगाली मला अद्याप वाचता येत नाही. पण जमेल तसे अनुवादीत वाचायचा प्रयत्न करते. मराठीत असे झाले तर हरकत काय आहे ? >> तसे झाले तर उत्तमच आहे. बाजीराव मस्तानी चित्रपट बघून माझ्या हिंदीभाषिक मित्राने राऊ पुस्तकाचा हिंदी अनुवाद आहे का विचारले होते Happy आनंदी गोपाळ चित्रपट बघून श्री. ज. जोशींच्या कादंबरीचा अनुवाद आहे का अशीही विचारणा अन्यभाषिकांकडून होते आहे ही चांगलीच बाब आहे.

‘मी वाचलेले पुस्तक’ हे सदर तर इंग्रजी वाचनालय आहे की काय असे अलीकडे वाटते. >>>

इथल्या लोकांपैकी जे भरपूर वाचणारे आहेत ते दोन्ही भाषांतील पुस्तके वाचतात. मला आवडते तेथील इंग्रजी पुस्तकांची माहिती व त्या पोस्ट्स. आपण जसे हिंदी सिनेमा/सिरीज बद्दल लिहीतो तसेच आहे ते.

मी गेल्या काही दिवसांत नव्याने काही मराठी पुस्तके वाचायचा प्रयत्न केला पण नेटाने पुढे वाचू शकलो नाही अजून. ही बरीच पुस्तके गेल्या ५-१० वर्षातील आहेत. इंग्रजीही वाचलेली नाहीत इतक्यात. मोबाईलवरच्या आळशी वाचनाने व स्क्रोलिंगने ती पुस्तक वाचनाची आवड खाल्ली आहे सध्या.