बीज फाल्गुनाची येता

Submitted by पुरंदरे शशांक on 30 March, 2021 - 02:54

येता फाल्गुनाचा मास
डोह इंद्रायणी तीरी
रुख पिंपुरणी उभा
नवी पालवी मिरवी

गेले कितिक फाल्गुन
ओढ अजून तीरास
केव्हा येतील तुकोबा
आर्त भिडे गगनास

रुख सळसळ वाजे
डोहा मधून थरार
टाळ चिपळ्यांचा नाद
मंद वीणेचा झंकार

बीज फाल्गुनाची येता
रुख जाई थरारून
नाद विठ्ठल विठ्ठल
डोही तरंग भरुन

विश्वात्मक तुकयाचा
स्पर्श आगळा अजून
डोह, रुख आसमंत
जाई भक्तीत भिजून

जय जय विठ्ठल
जय हरी विठ्ठल

श्री तुकाराम महाराजांचरणी प्रेमपूर्वक दंडवत
...........................................................................
रुख... वृक्ष (पिंपुरणी)

रुख जाई थरारून .... फाल्गुन वद्य द्वितीयेला/ बीजेला म्हणजेच तुकाराम बीजेला देहू गावात इंद्रायणी डोहाच्या बाजूला असलेला पिंपुरणी हा पुरातन वृक्ष अजूनही थरारतो/डोलतो अशी भाविकांची श्रद्धा आहे. तुकोबा या वृक्षाच्या छायेत बसले असताना अचानक नाहीसे झाले असेही काहीजण मानतात. (काहींच्यामते कीर्तन करीत असताना ते अचानक गुप्त झाले.)
( तुकोबा सदेह वैकुंठाला गेले अशीही भाविकांची श्रद्धा आहे )

Group content visibility: 
Public - accessible to all site users