उदंड झाले पक्षी (भाषांतर)

Submitted by स्मिताके on 24 March, 2021 - 19:25

मूळ कथा: The Birds in the Letter Box
Original French Author : René Bazin , English translation : Francis J. Reynolds
मूळ फ्रेंच लेखक René Bazin (१८५३-१९३२) हे सुप्रसिद्ध फ्रेंच कादंबरीकार होते. त्यांचं लिखाण अगदी निर्मळ, बाळबोध असे. ते खुशाल कोणालाही निर्धोक वाचायला द्यावं असं म्हटलं जाई. समकालीन लेखकांवर त्यांचा मोठा प्रभाव होता. ते कायद्याचे प्राध्यापक होते. पॅरिसला जाऊन कायद्याचं शिक्षण घेतल्यानंतर शांत आयुष्याच्या ओढीने ते आपल्या छोट्या शहरात परतले. त्यांच्या लिखाणात त्यांचा आवडता निसर्ग, शेतकरी, कष्टकरी यांचं वर्णन येतं. सुमारे एका शतकापूर्वीच्या, आधुनिकीकरणाचा स्पर्श न झालेल्या एका फ्रेंच खेडेगावातल्या कथेचं हे भाषांतर.
पूर्वप्रसिद्धी: मिसळपाव डॉट कॉम
-----------------------
उदंड झाले पक्षी
-----------------------

सेंट फिलोमॉन चर्च. आहा.. गावाच्या अगदी टोकाला, दूर कोपऱ्यावर बांधलेलं ते छोटंसं, सुरेख रेखीव चर्च पाहताक्षणी मनाला शांत, प्रसन्न वाटू लागे. चर्चच्या मागच्या बाजूला नदीपर्यंत जाणाऱ्या उतारावर होतं हिरवंगार कुरण. पहाटेचा सूर्याचा पहिला किरण खास या कुरणासाठीच राखलेला असे, तसाच संध्याकाळचा शेवटचा किरणही. उन्हाळ्यात फुलणाऱ्या फुलांच्या सुगंधाने आणि त्यामागोमाग पक्ष्यांच्या मधुर किलबिलाटाने आसमंत भरून जाई. चर्चच्या मागच्या आवारात, कुरणाजवळच्या छोट्याशा बागेत फळझाडं होती. ठरावीक मोसमात चर्चच्या कुंपणाबाहेरून अगदी शंभर फुटांवरून चालत गेलं, तरी चेरी, द्राक्षं, कलिंगडं यांचे सुवास मन भरून टाकल्याशिवाय राहत नसत.

फादर रॉबर्ट गेली तीस वर्षं चर्च सांभाळत होते. भोवतालच्या माणसांसारखी तिथल्या झाडांवर, फुलापानांवर, पक्ष्यांवर मायेची पखरण घालत होते. आता त्यांचं वय झालं होतं. खांदे पार वाकले होते. चेहऱ्यावर सुरकुत्यांनी जाळं विणलं होतं. एक डोळा आणि एक कान अधू झाले होते. त्यांच्याशी बोलणाऱ्याला, आपण त्यांच्या ऐकू येणाऱ्या कानाच्या जवळ उभे आहोत, अशी खातरी करून घेऊन बोलावं लागे.

बागेतली बरीचशी फळं फादर गावातल्या मुलांना देऊन टाकत, पण त्याहून जास्त फळं मिळत ती पक्ष्यांना! वर्षभर तिथेच राहणारे ब्लॅकबर्ड्स या फळांवर ताव मारत, आणि त्या बदल्यात भरपूर गाणी ऐकवत. उन्हाळ्यात स्थलांतर करणारे सुंदर ओरिओल पक्षी येऊन आपला वाटा उचलत. झालंच तर चिमण्या आणि सर्व जातींचे वॉर्ब्लर्स, टॉमटीट्स तर झुंडीने येत. हाताच्या बोटांएवढी जाड पिसं त्यांची. ते फांद्यांवर लटकत, द्राक्षांवर चोची मारत, नासपती ओरबाडत. चणीने लहान, पण भूक मोठी होती त्यांची. पोट भरल्यावर करवतीच्या आवाजासारखी एक कर्कश शीळ वाजवली,की झालं त्यांचं आभारप्रदर्शन. फादरचं पिकलेलं मन उदारपणे पक्ष्यांना माफ करत असे. ते म्हणत, "पक्षीच ते. फळं खाणं हा स्वभाव आहे त्यांचा. स्वभाव बदलत नाहीत म्हणून रागावलो त्यांच्यावर, तर मग चर्चमध्ये येणाऱ्या किती गावकऱ्यांवर रागवावं लागेल मला!"

यावर तोडगा म्हणून ते बागेत जाताना मोठमोठ्याने टाळ्या वाजवत जात. म्हणजे फळांची चोरी निदान आपल्या दृष्टीला फारशी पडत नाही, याचंच समाधान! टाळ्या ऐकल्या की काही क्षणांपुरते का होईना, पक्षी उडून जात. जणू काही जोराच्या वाऱ्याने वेडीबागडी फुलं तोडून भिरकावून द्यावी, तसे पांढरे, पिवळे, करडे, ठिपकेदार पक्षी भर्रकन उडताना दिसत. पानांची सळसळ होई, आणि काही क्षण सगळं शांत वाटे. पण ते तेवढे निःशब्द क्षणसुद्धा असह्य होत. कल्पना करा, गावात एकही कारखाना नाही. विणकर नाही, लोहारही नाही. गुरं आणि घोडे घेऊन जाणाऱ्या माणसांचा आवाज दूर पठारावर पसरून, वाऱ्यावर विरून गेला आहे. त्याकाळी गिरण्या तर नव्हत्याच. रस्त्यावरची रहदारी अगदी तुरळक. आगगाड्या होत्या, पण त्या गावापासून फार दूर. अशात त्या पक्ष्यांचीच काय ती वर्दळ! टाळ्या ऐकून अपराधी भावनेने तेही गायब झाले असते, तर? शांतता असह्य होऊन फादरना झोप लागली असती! हातातल्या बायबलवर डोकं टेकून ते तिथेच झोपले असते.

सुदैवाने तशी वेळ येत नसे. भर्रकन एखादी चिमणी परत येई आणि तिच्यामागून बघता बघता सगळा थवा परतून आपल्या कामाला लागे. त्यांच्याकडे पाहत फादर येरझारे घालू लागत. बायबलची उघडमीट करत पुटपुटत, "नतद्रष्ट कुठले! या वर्षी धड एक फळसुद्धा हाती लागू देणार नाहीतसं दिसतंय." पण त्यांचं ऐकत कोण होतं? पक्षी ढिम्म हलत नसत. आपलं भक्ष्य, ती फळं सोडत नसत. आपल्या समोर फादर चालताहेत की एखादं शंकूच्या आकाराचं, जाड पानांचं नासपतीचं झाड पायाखालच्या खडीवरून तोल सावरत येतंय याची त्यांना कुठली पर्वा? पण 'गर्जेल तो वर्षेल काय?' हे पक्ष्यांनाही ठाऊक असावं. दर वर्षी ते चर्चभोवती मोठ्या संख्येने घरटी बांधत. इतकी घरटी आणखी कुठेच सापडली नसती. सगळ्या सुरक्षित जागा भराभर पटकावल्या जात. झाडांच्या ढोलीत, भिंतींमधल्या खबदाडींत, सफरचंदाच्या आणि एल्मच्या झाडांच्या बेचक्यांत पटापट घरटी उगवत. छपरांच्या वाशांमधून वाळलेलं गवत डोकावू लागे आणि त्यातून मातकट रंगाच्या तलवारीच्या टोकासारख्या चोची बाहेर येत.

एका वर्षी एका टॉमटीट पक्षिणीची पंचाईत झाली. सगळ्या जागा भरून गेल्या. काय करावं ते न सुचून तिने चर्चच्या दाराच्या उजवीकडे असलेली टपालपेटी हेरली आणि चक्क तिच्या फटीतून आत शिरली. "वा, वा, किती सुंदर जागा शोधली आपण! शिवाय डोक्यावर छप्पर.." तिला फार समाधान वाटलं. "घरटं कसं ऊबदार राहायला हवं.” म्हणत ती तयारीला लागली. काही म्हणता काही सोडलं नाही. पिसं, घोड्याचे केस, लोकर, अगदी शेवाळसुद्धा आणलं.

एके दिवशी सकाळी चर्चमधली मदतनीस फिलोमिना तावातावाने ओरडत आली.
"बघा बघा, फादर, लॉरेलच्या झुडपाखाली हा कागद सापडला आज. आणि किती मळवला आहे मेल्यांनी. चांगला उद्योग चालवला आहे."
"फिलोमिना, काय झालं? कोणाचा उद्योग?"
"तुमचे ते दुष्ट पक्षी! इथे राहू देता ना तुम्ही त्यांना? बघा, बघा, एक दिवस तुमच्या सूपच्या तुरीन भांड्यातसुद्धा घरटी बांधतील ते!"
"अग, पण माझ्याजवळ कुठायत तसली भांडीकुंडी?"
"हं.. लुच्चे मेले! पोस्टाच्या पेटीत घरटं बांधायचं यांना सुचलंच कसं म्हणते मी! पोस्टमनने दार वाजवलं, म्हणून गेले पेटी उघडायला. नाहीतर मी कशाला उघडू ती? कधीतरी सठीसहामाशी यायचं एखादं पत्र! तर काय दिसलं असेल म्हणता मला पेटीत? गवताच्या काड्या, घोड्याचे केस, कोळ्याची जाळी, आणि पिसं किती? एखादी गोधडी होईल त्यांची! या सगळ्या गचपणात बसला होता तो दुष्ट पक्षी. मला तर दिसलाच नाही, पण सापासारखा जोरात फुत्कारला एकदम!"

नातवंडांच्या खोड्या ऐकून आजोबा हसावेत, तसे फादर हसू लागले.
"ओ हो हो.. हे नक्की टॉमटीटचं काम. इतका चतुर पक्षी दुसरा कोण असणार? असू दे फिलोमिना. त्या घरट्याला आता हात लावू नकोस बरं."
"काळजीच नको. मी कशाला जाईन त्या गचाळ घरट्याला हात लावायला?"

फिलोमिनाचा निरोप ऐकल्यावर फादर घाईघाईने उठले. मागची बाग, त्यांच्या राहत्या खोल्या पार करून पुढच्या अंगणात आले. शतावरीची झुडपं ओलांडून चर्चच्या आवाराच्या रस्त्यालगतच्या भिंतीपाशी आले. तिथे होती चर्चची टपालपेटी. इतकी मोठी की फादरचीच काय, सगळ्या गावकऱ्यांची वर्षभराची सगळी पत्रं तिच्यात सहज मावली असती. तशी त्या आडगावात पत्रं येत होती कुठं म्हणा? पोस्टमन रोज फेरी मारायचा बापडा, पण करायला काही नसल्याने घरोघरी जाऊन गप्पाटप्पा, चहापाणी हाच त्याचा उद्योग. एखाद्या वेळी मात्र एखादं पत्र येई. गावातल्या तरुणांना सरकारी हुकमावरून सैन्यात जावं लागे, त्यातलं कोणी घरी पत्र लिहीत असे. किंवा मग कोणा शेतकऱ्याला आलेली कर भरण्याची नोटिस.

फादरनी हलकेच ती भलीमोठी टपालपेटी उघडली आणि वाकून आत पाहिलं. घरट्याचा शंकूसारखा आकार, त्याचा रंग, पोत आणि आत लावलेलं अस्तर.. टॉमटीट. नक्कीच. आपला अंदाज अगदी अचूक ठरलेला पाहून त्यांना खुद्कन हसू फुटलं. आत एक पक्षिणी आपल्या अंड्यांवर बसली होती. ते हळूच तिला म्हणाले, "हे बघ पोरी, आरामात राहा बरं का! मला ठाऊक आहे. अंडी उबवायला एकवीस दिवस. आणि मग पिल्लं वाढवायला तीन आठवडे. हो ना? आनंदाने राहा तितके दिवस. ही बघ, मी ही पेटीची किल्ली घेऊन जातो. म्हणजे ही पेटी उघडून तुला कोणी त्रास देणार नाही."

मग ती किल्ली घेऊन फादर निघाले. त्यांची रोजची सकाळची कामं सुरू झाली. नेहमीप्रमाणे ते गावातल्या आजारी, दुःखी लोकांना भेटले. फळं वेचायला मदतीला येणाऱ्या मुलाला काम समजावून सांगितलं. नुकतीच वादळात चर्चच्या छपरावरची काही कौलं निसटली होती, त्यांची पाहणी करायला छपरावर चढले. अशी कामं उरकल्यावर त्यांना आपल्या टॉमटीट पोरीची आठवण झाली. ती बिचारी तिथे अंडी उबवतेय, पण पेटीच्या फटीतून एखादं पत्र येऊन तिला टोचणार तर नाही ना? त्याबरोबर ते चमकले. त्यांना आठवलं, हा एप्रिल महिना. एकोणतीस एप्रिल हा सेंट रॉबर्ट्स डे. फादरचं नाव सेंट रॉबर्ट्सवरून ठेवलेलं होतं. पूर्वापार कॅथलिक पद्धतीनुसार ज्या संतावरून नाव ठेवलं असेल, त्या संताचा स्मृतिदिन हा जणू दुसरा वाढदिवस म्हणून शुभेच्छा देण्याचा फ्रेंच प्रघात. त्यांच्या जवळचे मित्र म्हणण्यासारखे तिघे जणच आता हयात होते. म्हणजे महिनाअखेरीला तीन पत्रं येणार! अरे बापरे!!

उरलेली कामं पुढे ढकलून फादर लगेच घरी परतले आणि ताबडतोब त्यांनी तीन पत्रं लिहिली.
"प्रिय मित्रा, या वर्षी माझ्या नावाच्या - म्हणजे सेंट रॉबर्ट्स डे या दिवशी कृपया मला शुभेच्छा देऊ नकोस. त्या दिवशी पत्र येणं हे मला जरा गैरसोयीचं होणार आहे. कालांतराने मी सगळं स्पष्ट करून सांगेन. यामागचा माझा विचार तुला आवडेल, अशी मला खातरी आहे."
फादरचं पत्र वाचून त्यांच्या मित्रांना वाटलं की याची दृष्टी जास्तच अधू झाली असावी. म्हणून मग त्या वर्षी त्यांनी शुभेच्छा पत्रं पाठवली नाहीत.

पुढचे तीन आठवडे फादर फार आनंदात होते. चर्चच्या दारातून आत येताना त्या घरट्याचा आणि त्यातल्या त्या गुलाबसर ठिपके असणाऱ्या अंड्यांचा विचार त्यांच्या मनात आला नाही, असा एकही दिवस गेला नसेल. मग एकविसाव्या दिवशी ते टपालपेटीजवळ गेले. त्यांनी खाली वाकून आपला चांगला कान पेटीच्या फटीजवळ नेला आणि अत्यानंदाने ते ओरडले, "फिलोमिना, पिलं बाहेर आली! कशी किलबिल करताहेत, पाहा. मी इथे घरटं राहू दिलं म्हणून जन्मलीत पोरटी. त्यांना नसेल आवडलं, असं पत्रांच्या पेटीतल्या घरट्यात जन्म घेणं. पण त्या बयेला मी सांगितलं नव्हतं, ये गं बाई, इथे घरटं बांध म्हणून! " खरोखर, एखाद्या लहान मुलासारखं निष्पाप हृदय होतं फादरचं.

याच वेळी एका निराळ्या ठिकाणी काही निराळ्या घडामोडी चालल्या होत्या. त्या विभागातल्या प्रमुख शहरात चर्चच्या मुख्य अधिकाऱ्यांनी आपल्या सल्लागारांशी चर्चा करण्यासाठी एक बैठक बोलावली होती. त्यांनी त्या विभागातल्या चर्चेसमधल्या उच्च पदांसाठी काही नेमणुका जाहीर केल्या आणि शेवटी ते म्हणाले, "काउन्सिलमधील सद्गृहस्थहो, आता या शेवटच्या पदासाठी मला सेंट फिलोमॉन चर्चचे फादर योग्य वाटतात. पण त्यांचं वय आणि त्याहीपेक्षा त्यांची नि:स्वार्थी वृत्ती लक्षात घेता, हे पद ते स्वीकारतील असं मला वाटत नाही. तरीसुद्धा, या पदासाठी त्यांची निवड करावी असं मला वाटतं. म्हणजे निदान आपण त्यांच्या गुणांचा आदर केल्यासारखं तरी होईल." बैठकीतल्या सर्व सल्लागारांनी एकमताने आपली सहमती दिली आणि त्याच संध्याकाळी माननीय बिशप यांच्या सहीने एक पत्र फादरना पाठवण्यात आलं. पत्राचा ताजा कलम असा होता, "आदरणीय फादर, कृपया ताबडतोब उत्तर पाठवा. शक्य असल्यास इथे येऊन मला भेटलात तर उत्तम. कारण मला तीन दिवसांच्या आत सर्व नेमणुका सरकारला कळवायच्या आहेत."

पत्र सेंट फिलोमॉनला पोहोचलं खरं, पण कधी? नेमकं टॉमटीटच्या अंड्यांतून पिल्लं बाहेर आली, त्या दिवशी! पत्रपेटीतल्या फटीतून ते आत सरकावणं जरा कठीणच गेलं पोस्टमनला. पण गेलं एकदाचं ते आत आणि दिसेनासं झालं. गेलं ते गेलं आणि घरट्याच्या तळाशी जाऊन बसलं. अगदी घरट्याची फरसबंदी झाली म्हणा ना!

मग हळूहळू पिल्लांचे चिमुकले पंख पिसांनी भरून गेले. चौदा पिल्लं! सगळी आपल्या इवलाल्या पायांनी लडखडत चालू लागली, किलबिलू लागली. दिवसरात्र चोची उघडून, अगदी डोळे बंद होईपर्यंत चोची ताणून दाणापाणी मिळेल म्हणून वाट बघू लागली. ते खाऊन पचलं, की पुन्हा आणखी मागू लागली. किती निष्पाप, अजाण होती बिचारी! पण पक्षी असे अजाण अवस्थेत फार काळ राहत नाहीत! हळूहळू तिथे घरट्यातच त्यांची भांडणं सुरू झाली. फडफडणाऱ्या पंखांच्या तडाख्यांनी घरटं मोडकळीला आलं. मग पिल्लं त्यातून बाहेर पडली. पत्रपेटीच्या कडेकडेने चालू लागली. पेटीच्या फटीतून त्यांना बाहेरचं जग दिसलं आणि शेवटी ती फटीतून बाहेर पडली.

फादर तिथेच होते. बागेत बसून शेजारच्या एका प्रीस्टशी बातचीत करत होते. तेवढ्यात पत्रपेटीमधून पटापट पिल्लं बाहेर येऊ लागली. एकावेळी दोन, तीन.. आणि भर्रकन उडू लागली. पुन्हा पेटीशी परत येऊ लागली, पुन्हा दूर उडू लागली. पोळ्यातून ये जा करण्याऱ्या मधमाश्याच जणू! ते दृश्य पाहून फादर समाधानाने म्हणाले, "बघा, बघा, बालपण संपवून मोठी झाली ही पिल्लं. चला, एक चांगलं कार्य घडलं म्हणायचं माझ्या हातून. आणि सगळी कशी निरोगी, सुदृढ!"

दुसऱ्या दिवशी रात्रीचं जेवण उरकल्यानंतर निवांतपणे फादर किल्ली घेऊन पत्रपेटीजवळ गेले आणि त्यांनी हलकेच पेटीवर ठकठक करून कानोसा घेतला. आतून कसलाच आवाज आला नाही. "वाटलंच मला." असं म्हणत त्यांनी पेटी उघडली. आतून घरट्याच्या काटक्याकुटक्या आणि कचरा बाहेर पडला. त्याबरोबर थेट त्यांच्या हातात पडलं, एक पत्र!

"अरे देवा!" पत्रावरचं बिशपचं हस्ताक्षर ओळखून ते आश्चर्याने उद्गारले, "बिशपनी लिहिलेलं पत्र! बापरे, काय ही त्याची अवस्था! किती दिवस पडलं आहे हे इथं?" ते जसजसे पत्र वाचू लागले, तसतसा त्यांचा चेहरा फिकट पडू लागला. "फिलोमिना, रॉबिनवर खोगीर चढव लवकर."
"काय झालं, फादर?" फिलोमिना धावत आली.
"गेले तीन आठवडे बिशप माझी वाट बघताहेत!"
"अरेरे! हुकली म्हणायची तुमची संधी." फिलोमिनाने सुस्कारा सोडला. म्हातारीच्या लक्षात सारं काही आलं होतं.

फादर परतून येईपर्यंत दुसऱ्या दिवसाची संध्याकाळ उजाडली. ते अगदी शांत दिसत होते. पण काही वेळा अशा शांततेसाठी पुष्कळ प्रयत्न करावे लागतात, आणि ती टिकवण्यासाठी मनाची घालमेल सहन करावी लागते. त्यांनी रॉबिनला मोकळं केलं आणि त्याच्यासमोर थोडं गवत टाकलं. आपला पायघोळ कॅसॉक पोषाख उतरवला. प्रवासात सोबत नेलेली ट्रंक उघडून त्यांनी डझनभर तरी छोटीछोटी पुडकी बाहेर काढली. शहरात केलेली खरेदी! तितक्यात आजूबाजूच्या झाडाफांद्यांवर पक्षी गोळा झाले. चिवचिवाट करून आपल्या दिवसभराच्या कहाण्या एकमेकांना ऐकवू लागले. पाऊस पडून गेला होता. रात्रीसाठी आसरा शोधणाऱ्या पक्ष्यांनी फांद्या हलवल्यामुळे पानांवरच्या थेंबांचा वर्षाव सुरू झाला. फादर परत आलेले पाहून पक्षी किलबिलत त्यांच्याजवळ झेपावू लागले. अजून पंख पुरते न फुटलेली ती चौदा पिल्लं नासपतीच्या झाडांभोवती गिरक्या घेण्याचे पहिलेवहिले प्रयत्न करू लागली. मोकळ्या हवेत पहिल्यांदाच मोठ्याने ललकाऱ्या मारू लागली. फादर त्यांना मायेने पाहत होते. पण त्यांच्या मृदू नजरेत एक दुखावलेपण होतं. एखाद्या वस्तूची फार मोठी किंमत मोजावी लागली की आपण तिच्याकडे जशा नजरेने पाहू, तसं. "पोरांनो, माझ्यामुळेच तुम्ही या जगात आहात, बरं का. तुम्ही सगळे नसलात, तर इथे मी पार एकटा पडेन, म्हणून राहू दिलं तुम्हाला. पण इतका मोठा गोंधळ करून माझे आभार मानले पाहिजेत असं काही नाही." शेवटी न राहवून, टाळ्या वाजवून त्यांनी पक्ष्यांना पांगवलं.

तसं पाहायला गेलं तर फादरना कधीच फार मोठी महत्त्वाकांक्षा नव्हती. त्याही क्षणी ते खरं तेच बोलून गेले होते.

दुसऱ्या दिवशी सकाळी फादर फिलोमिनाला म्हणाले, "फिलोमिना, पुढच्या वर्षी ती टॉमटीट बया परत आली ना, तर वेळीच सांग मला. चांगलीच गैरसोय करून ठेवते पोरटी!"

पण ना पुन्हा कधी ती टॉमटीट मादी तिकडे फिरकली, ना पुन्हा बिशपचं पत्र!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

नितांत सुंदर!
लिखाणात गुंतायला झालं
पक्षी आवडतात त्यामुळे अधिकच

सुंदर कथेचे तितकेच सुंदर भाषांतर! खूप धन्यवाद या कथेसाठी. माझ्या दिवसाची सुरुवात छान झाली.

हर्पेन, @गौरी, किल्ली, वावे, स्वाती२, mrunali.samad, जाई., rmd, धनि, सीमंतिनी, जिज्ञासा, आसा., धनवन्ती

आवर्जून प्रतिसाद दिल्याबद्दल आभारी आहे.

छान, वेगळी कथा वाचायला मिळाली
भाषांतर कुठे कृत्रिम वाटले नाही
माबोवर या आधी आपले लिखाण कधी वाचल्याचे आठवत नाही. अजून वाचायला आवडेल Happy

सामो, मनिम्याऊ, ऋन्मेऽऽष, अमितव

प्रतिसादाबद्दल आभारी आहे.

ऋन्मेऽऽष, फार फार पूर्वी मी जुन्या मायबोलीवर थोडंफार लिहिलं होतं. त्यानंतर बऱ्याच काळाने आता लिहिते आहे.