प्रतिबिंब

Submitted by रूपाली विशे - पाटील on 23 March, 2021 - 09:38

प्रतिबिंब....!!
_________________________________________

घरासमोरच्या बागेत फुललेल्या टपोऱ्या लाल गुलाबाच्या फुलाला पाहून हरिताला प्रसन्न वाटलं. नुकत्याच उगवलेल्या सूर्याची कोवळी किरणं जमिनीचे चरणस्पर्श करू पाहत होती. सकाळचं प्रसन्न, आल्हाददायक वातावरण पाहून हरिताच्या मुखातून आपसूकपणे हळुवार भावगीताचे स्वर उमटू लागले.

हरिता आणि विकास दोघे पती- पत्नी..! विकास शहरातला नावाजलेला मोठा कंत्राटदार होता. मोठ-मोठाले सरकारी रस्ते, सरकारी पूल बांधण्याची कंत्राटे तो घेत असे. घरावर लक्ष्मीचा वरदहस्त होता. कुठेही कसलीचं कमी नव्हती. उभयतांना एक मुलगी होती दिव्या तिचं नाव..! दिव्या दुसऱ्या शहरात हॉस्टेलमधे राहून उच्चशिक्षण घेत होती. हरिताच्या आयुष्यात आनंदी-आनंद होता. घराच्या चारही कोपऱ्यात अगदी मोद भरलेला..!! सगळं काही सुरळीत चाललेलं ; पण हरिताला कधी- कधी खूप एकाकीपणा जाणवत असे. दिव्या बाहेरगावी आणि विकास त्याच्या कामाच्या व्यापात गुंतलेला..! आपल्याकडे आनंद, सुख सारं काही आहे ; आणि त्यासोबत हाताशी फावला वेळसुद्धा, मग तो वेळ आपण सत्कारणी लावण्यास काय हरकत आहे? हरिता विचार करत असे.

हाताशी असलेला फावला वेळ चांगला जावा, मन कुठेतरी रमावं म्हणून हरिता कॉलनीतल्या महिला मंडळाची सदस्य झाली होती; विकासच्या आग्रहास्तव ..!! पण तिथे तिचं मन कधीच रमत नसे. नेहमीच्या कॉकटेल पार्ट्या, सहली.. नुसती भंपकता, बडेजावपणा ओसंडून वाहत असे तिथे...!! एकमेकींचे भरजरी कपडे पाहून नाक मुरडणं, एकमेकींची उणीदुणी काढणं, आपापसांत होणारे हेवेदावे, मुखवटे लावून होणारा वावर ह्या अश्या वातावरणात स्वच्छ , निर्मळ मनाच्या हरिताची घुसमट होत होती. महिला मंडळाच्या स्त्रियांनी एकत्र येऊन एखादा समाजपयोगी उपक्रम राबवावा; जो गरीब, वंचित , तळागाळातील लोकांसाठी फायद्याचा ठरेल ; असं तिला नेहमी वाटत असे. खरंतर शाळेपासूनच समाजशास्त्र हा तिचा आवडता विषय होता. तिच्या आजोबांना समाजसेवेची आवड..! ती आवड हरिताच्या रक्तात आपोआप उतरलेली.... ! मनुष्य प्राण्यात फक्त शारिरीक व्याधीच जडत नाहीत अनुवंशिकतेने.. संस्काराचे बीजही रक्तात आपोआप पेरले जाते अनुवंशिकतेने...!!

मधु दंडवते, मृणाल गोरे, गोदूताई परुळेकर, जॉर्ज फर्नाडिंस, अनुताई वाघ , ताराबाई मोडक अश्या समाजसेवेचा वसा घेतलेल्या समाजवादी नेत्यांच्या विचारांचा पगडा तिच्या आजोबांवर होता. त्यांच्या विचारांनी प्रभावित झालेले तिचे आजोबा तिला तिच्या बालपणी त्यांच्या सामाजिक कार्याची महती सांगत असत. हळूहळू त्या विचारांचे बीज तिच्या मनात रुजत गेले. पुढे शिक्षण, लग्न, घर- संसार ह्या चक्रात अडकल्याने तिला तिची समाजसेवेची आवड काही जोपासता आली नाही. त्याचं शल्य तिच्या मनाला कायम बोचत होतं. समाजातील दुबळ्या, दुःखी असलेल्या घटकांच्या वेदना आपण जाणून घेऊन, त्यांना आपल्या परीने मदत करून, त्यांच्यामध्ये निखळ आनंद पेरावा असे चांगुलपणाचे विचार तिच्या डोक्यात नेहमीच पिंगा घालत असत.

एके दिवशी तिने महिला मंडळाच्या सभेमध्ये आपले समाजसेवा करण्याबाबत असलेले उदात्त विचार मांडायला सुरुवात केली. त्या मागचा तिचा हेतू अतिशय निर्मळ होता. पण नेहमी मौजमजा, आयुष्याचा विलासी उपभोग घेण्याची सवय लागलेल्या त्या महिला मंडळातील काही स्त्रियांनी तिच्या उदात्त विचारांची अक्षरशः खिल्ली उडवली. रागिणी स्नेहाच्या कानात कुजबुज करू लागली.

"आलीयं मोठी समाजसेवा करणारी..! नवरा आहे हिचा तालेवार.. घेतो मोठी - मोठी सरकारी कंत्राटे..! म्हणे, वर्गणी काढू आणि समाजसेवा करू ...!! घरात येतोयं ना काळा पैसा ढीगभर .. वापर की मग त्यातलाच थोडा... तेवढंच पुण्य पडायचं पदरात..!" असं म्हणत दोघी फिदीफिदी हसू लागल्या.

महिला मंडळातल्या ह्या प्रसंगानंतर मात्र आपल्या बौद्धिक आणि वैचारिक पातळीच्या दिवाळखोरीचं जाहीर प्रदर्शन मांडणाऱ्या स्त्रियांच्या कार्यक्रमांना, त्यांच्या पार्ट्यानां जाणं हळूहळू हरिताने बंद केलं. निस्वार्थीपणा, सेवाभाव खरंच खूप महाग झालायं या जगात..! आता चांगुलपणाचं जे कार्य करायचं ते आपण आपल्या परीने करायला हवं; हे तिने पक्कं मनोमन ठरविलं.... 'एकला चलो रे' च्या धर्तीवर..!!

मे महिन्याच्या सुट्ट्या लागल्या आणि बाहेरगावी शिक्षण घेणारी दिव्या घरी आली. लाडक्या लेकीचं घरी येणं म्हणजे रखरखत्या वाळवंटात हिरवंगार जंगल फुलल्यासारखं जाणवत असे हरिताला...!! आपल्या एकुलत्या एक लेकीला बाहेरगावी शिक्षणासाठी ठेवणं खरंतर हरिताच्या खूपच जीवावर आलेलं; पण मुळातचं हुशार आणि महत्वाकांक्षी लेकीच्या मार्गात आड यायचं नाही; हे विकास आणि हरिताने ठरवून टाकलेलं होतं. कुठल्याही गोष्टीत आनंद कशाप्रकारे लुटता येईल, त्यातून समाधान प्राप्ती कशी होईल ह्याचा विचार हरिता नेहमीच करत असे. दिव्या सुट्टीत घरी आली की, दोघी मायलेकी अगदी पक्क्या मैत्रिणी बनत. एकत्र फिरणे, हॉटेलिंग, गप्पा-टप्पा ..!! दिवसाचे चोवीस तास कमी पडत दोघींना..!!. अश्याच एका संध्याकाळी दोघींचा बेत ठरला.. हॉटेलमध्ये जेवण्याचा..! ड्रायव्हरने कार काढली आणि नवीनच बनवलेल्या त्या रस्त्यावरून त्यांची कार भरधाव धावू लागली.

" दिव्या, हा डांबरी रस्ता तुझ्या बाबांनी बनवलायं बरं..!! बघ, किती छान धावते ना गाडी ह्या रस्त्यावरून..!'" हरिताला विकासच्या कामाचे नेहमीच अपार कौतुक वाटत असे.

" हं"

"अगं , नुसतं ' हं' काय?"

" मग काय म्हणू ? पुढच्या महिन्यात जोरदार पाऊस येऊ दे, मग ह्या रस्त्याची अवस्था बघ आणि नंतर कर बाबांचं कौतुक !" दिव्याने उत्तर दिलं.

"म्हणजे?" अगदी निरागसतेने हरिता उद्‌गारली.

" अगं, रस्त्याची खरी अवस्था पावसाळ्यात दिसून येते. रस्ता बांधताना किती दर्जेदार माल वापरलाय ते समजतं आणि रस्ता बांधण्याच्या कामात किती भ्रष्टाचार झाला आहे तोही समजतो ...बरं का?" दिव्या शेवटच्या वाक्यावर जोर देत म्हणाली.

"तुला तुझ्या बाबांवर विश्वास नाही का दिव्या? तुझे बाबा लबाड, भ्रष्टाचारी आहेत हेच सुचित करायचे आहे का तुला?" विकासबद्दल कोणतेही नकारात्मक उद्‌गार ऐकण्याची तिची मानसिक तयारी नव्हती.

" आई, गैरसमज होतोयं तुझा .!! माझे बाबा लबाड, अप्रामाणिक नाहीत गं..! पण त्यांच्यामध्ये असणारा एक पक्का व्यावसायिक लबाड असू शकतो आणि तो भ्रष्टाचार करू शकतो.!" दिव्या ठामपणे म्हणाली.

लेकीच्या स्पष्ट आणि सडेतोड बोलण्याने हरिता शांत बसली.

" शांत का झालीस आई ? तू खूप चांगली आहेस गं...
चांगुलपणा ओतपोत भरलायं तुझ्या ठायी .. पण जग प्रामाणिकपणा वर नाही चालत. ह्या जगात प्रामाणिक माणसं हाताच्या बोटावर मोजण्या इतपतचं उरली असतील. आता हेच बघ, आपण ज्या हॉटेलमध्ये आज जेवणार, त्या जेवणावर आपण सरकारला कर देणार; प्रत्येक वस्तूला, सेवेला सरकार कर लावणार, मग एवढा कर घेऊन सुद्धा सरकारची जबाबदारी नाही का नागरिकांना त्यांच्या मूलभूत सोयी उत्कृष्टरित्या पुरवण्याची ? सरकारी कामात होणारा भ्रष्टाचार रोखण्याची..?" दिव्या रोखठोक बोलत होती.

"हो.. गं पटतंय तुझं म्हणणं; पण कर नाही मिळाला तर सरकार, देश कसा चालणार?" हरिताने लेकीला प्रतिप्रश्न केला.

" विरोध कर आकारण्यास नाहीच आहे मुळी; पण जनतेच्या खिश्यातून जाणाऱ्या कराच्या बदल्यात आपल्या देशातल्या जनतेला सोयी-सुविधा प्रामाणिकपणे उपलब्ध करून देणं हे सरकारचं काम नाही का? कुठे भ्रष्टाचार होत असेल तर तो रोखणं हे सरकारचंच काम आहे ना?" दिव्या त्वेषाने बोलत होती.

बेधडकपणे आपली मतं मांडणाऱ्या आपल्या लेकीकडे हरिता अचंबित होत पाहत राहिली. आपल्या लेकीचे विचार ऐकत राहिली. आजची युवा पिढी खरंच वैचारिकदृष्टया प्रगल्भ होतेयं की, फक्त माथा भडकाऊ वेबसिरीज, चित्रपट पाहून बेजबाबदापणे विधानं करतेयं हेचं तिला उमगत नव्हतं. परंतु तिला कौतुक वाटलं ; आपल्या लेकीचं, तिच्या सडतोड बोलण्याचं ..! ती एकटक पहात राहिली आपल्या लेकीकडे..! आपलीचं दृष्ट तर लागणार नाही ना आपल्या लेकीला ? ...ती स्वतःशीच हसली... प्रसन्नपणे..!

सुट्टी संपली आणि दिव्या हॉस्टेल वर परतली. हरिता पुन्हा एकदा एकटी पडली. विकास त्याच्या कामात नेहमीप्रमाणे गुंतून पडलेला राही. ज्या दिवशी त्याला कामातून फुरसत मिळे, तेव्हा दोघे बाहेर फिरायला जात असत. असंच एके दिवशी घरी परतत असताना गाडीत बसलेल्या हरिताचं लक्ष उड्डाणपुलाखाली उभ्या असणाऱ्या एका व्यक्तीवर गेलं. ती चमकली. पुन्हा एकदा नजर फिरवून तिने गाडीच्या बंद काचेतून पाहिलं. चेहऱ्यावर रंग-रंगोटी केलेला एक तृतीयपंथी होता तो..! येणाऱ्या- जाणाऱ्या गाड्यांना हात दाखवित .. अचकट - विचकट चाळे करत उभा होता रस्त्यावर..!!

"काय पाहतेस त्याला? देहविक्री करण्यासाठी उभा आहे तो तिथे?" विकास नाक मुरडत म्हणाला.

शहरातल्या त्या उड्डाणपुलाच्या शेजारची वस्ती बदनाम होती. गर्दुले, भुरटे चोर, भिकारी, तृतीयपंथी तसंच देहविक्री करणाऱ्या स्त्रियांची वस्ती होती ती..! हरिताच्या डोक्यात विचार फिरू लागले. दरिद्री आयुष्य जगणार्‍या लोकांसाठी काहीतरी करायला हवं, जेणेकरून त्यांच्या चेहऱ्यावर आपल्याला आनंद फुलवता येईल. त्यांचं दुःख आपल्याला कमी करता येईल. पण असं काय करता येईल बरं आपल्याला? ती विचारात पडली. तिची समाजकार्याची आवड तिला घरी स्वस्थ बसू देत नव्हती. रोजंच तेच कंटाळवाणं आयुष्य, खायला उठणारा एकाकीपणा ह्या सगळ्यांना ती वैतागली होती. समाजाने ठरवून दिलेल्या नैतिकता- अनैतिकतेच्या दुष्टचक्रात अडकलेल्या लोकांसाठी, त्यांच्या भल्यासाठी काही तरी करायला हवं; अशी साद तिच्या अंतर्मनातून येऊ लागली. तिने त्या बदनाम वस्तीत जायचं ठरविलं. त्यादिवशी विकास कामानिमित्ताने बाहेरगावी होता. तिने विकास घरी नसल्याची संधी साधली ; कारण त्याने तिला त्या बदनाम वस्तीजवळ जाण्यास मज्जाव केला असता, म्हणून ती कुणालाही काही न सांगता संध्याकाळी साधारण सहा वाजताच्या सुमारास घरातून निघाली. तिने स्कूटर काढली. तिने आज मुद्दामहून कार घेतली नव्हती. ती त्या बदनाम वस्तीच्या जवळ पोहचली. परंतु समाजाने ठरवून दिलेले संस्कार आणि नैतिकता यांच्या चौकटीत वाढलेल्या आणि तसेच संस्कार अंगी बाणवलेल्या हरिताची त्या बदनाम वस्तीत पुढे पाऊल टाकण्याची हिंमत काही झाली नाही. त्या उड्डाणपुलाखाली ती निरर्थकपणे रेंगाळत राहिली. समाजसेवेचा उदात्त हेतू ठेवून समाजकार्य करण्याची आडवाट चोखाळायची असेल; तर आपल्याला पुढचा जन्मंच घ्यावा लागेल असं तिला वाटू लागलं. ती हतबल झाली.

तिने दूरवर वस्तीवर नजर फिरवली. दरिद्री जीवन, घाणीत बरबटलेलं राहणीमान, गलिच्छपणा अगदी ओसंडून वाहत होता तिथे...तिला जाणीव झाली, तिथल्या वास्तवाची..!! आनंद, प्रसन्नता, चैतन्य खरंच वास्तव्य करत असतील का बरं ह्या वस्तीत? ती विचारांच्या तंद्रीतच स्कूटर वर बसून राहिली. खरंतर तिचं तिथे तसं असणं धोकादायक होतं. तिला पाहणाऱ्याचा गैरसमज होऊ शकला असता.. ती स्कूटर वरून उतरली. तिने चार पावले पुढे टाकली असतीलच, तेवढ्यात बाजूलाच असलेल्या झाडाखाली एक तरुणी हातात काचेची बाटली घेऊन बसलेली तिच्या दृष्टीस पडली. ती तरुणी दिसायला चांगल्या घरातली वाटत होती. हरिता तिच्या जवळ गेली. हरिताने उगाचंच आपणहून तिची विचारपूस केली; पण त्या तरुणीने जणू मौनव्रत धारण केलेले. कुठेतरी शून्यात नजर लावून बसली होती ती... ! काय बरं दुःख असेल ह्या तरुणीला? आपण कश्याप्रकारे मदत करू शकतो तिला? असा विचार करत हरिताने पुन्हा एकदा तिची मोठ्या आपुलकीने विचारपूस करायला सुरुवात केली.

" नाव काय तुझं? मी तुझी काही मदत करू शकते का ?" हरिताने त्या तरुणीला विचारलं. ती तरुणी हरिताच्या चेहऱ्याकडे मख्खपणे पाहत राहिली .

"मदत? माझी काय मदत करणार तुम्ही ...मॅडम?" ती तरुणी अडखळत्या आवाजात म्हणाली.

त्या तरुणीची भाषा, तिचे उच्चार सुशिक्षित वाटत होते .. पण तिच्या तोंडातून दारूचा भपकारा मारत होता. हरिताने तिच्या डोळ्यात पाहिलं, कधीकाळी स्वप्नाळू असणारे ते डोळे दिव्यातल्या विझलेल्या ज्योतीसारखे भासले तिला..! आजवर एवढे दु:खी डोळे तिला कधी दिसलेचं नव्हते.

" तू चांगल्या घरातली दिसतेस.. इथे असं रस्त्यावर बसून दारू पिणं शोभत नाही तुला? मला सांग, तुला काय मदत करू मी?" हरिताच्या चेहऱ्यावर मुळातच असणारे चांगुलपणाचे भाव अजूनच तळपू लागले.

"चांगल्या घरातली ???? ..हं....!!" ती तरुणी विषण्णपणे हसली.

" कुठे राहतेस तू? तुला बरं वाटत नाहीये का?" हरिता तिची आस्थेवाईकपणे चौकशी करत होती.

" माझ्याबद्दल जाणून घेऊन काय करणार मॅडम तुम्ही? पण एवढ्या आपुलकीने विचारतायं तर सांगते तुम्हाला.. ऐका तर मग ..धंदा करते मी धंदा....!! इथे रस्त्यावर उभी राहून गिर्हाइकं शोधते मी .. ! देह विक्रेय करणारी स्त्री आहे मी..! कसं वाटतंय ऐकायला तुम्हाला..???" ती तरुणी अजूनच विषण्णपणे हसली.

हरिता तिच्या बोलण्याने गांगरली. तिच्या चेहऱ्यावर नेहमीचं तरळणारं गोड हास्य आज तरळलं नाही. तिला त्या तरुणीच्या प्रश्नावर काय बोलावं तेचं सुचेना.

"आणि .....हे सगळं मला कुणी करायला भाग पाडलंय ठाऊक आहे तुम्हांला? तुम्ही कल्पना पण नाही करू शकणार मॅडम... तरी पण तुम्हांला सांगते; कारण मी न सांगितल्याने सत्य काही बदलणार नाही... माझ्या सख्ख्या बापाने आणि रक्ताच्या भावाने लोटलंय ह्या गटारात मला..! ऐतखाऊ , xxx... साले..!! " तिने बाप आणि भावाच्या नावाने दोन- चार शिव्या हासडल्या.

"पोटच्या पोरीची आणि पाठच्या बहिणीची इज्जत विकून पोटातली आग विझवतात .. हरामखोर..! भर बाजारात उभं करून नरक बनवलंय माझ्या आयुष्याचं त्यांनी .!'" ती तरुणी अचानक हमसाहमशी रडू लागली. हरिताला तिची कर्मकहाणी ऐकून प्रचंड धक्का बसला. तिचं संवेदनशील मन जागं झालं. त्या रडणाऱ्या तरुणीच्या पाठीवर तिने मोठ्या आपुलकीने हात फिरवला. हरिताच्या प्रेमळ , विश्वासाच्या स्पर्शाने ही तरुणी उन्मळून पडली.

" स्वतः कष्ट करून कॉलेज शिकत होती मी; पण माझं शिक्षण बंद करून धंद्याला लावलं मला रक्ताच्या माणसांनी. मॅडम, खूप शिकायचं होतं हो मला पुढे ... पण सगळं संपलं आता...!! ही बाटली आहे ना माझ्या हातात..ती माझी जीवलग सखी आहे.... तिच्या मैत्रीची नशा माझं दुःख ,वेदना सारं काही उमगून घेते .! ही दारू पोटात जाते ना, तेव्हाच मी धंदा करू शकते. आपलं शरीर दुसऱ्याच्या स्वाधीन करू शकते. पण तुम्हांला सांगते मॅडम, तेव्हा ना माझं मन मेलेलं असतं.. जिवंत असतं फक्त पुतळा बनलेलं हे शरीर..! किळस .. किळस वाटते मला ह्या सगळ्याची..! " हातातली दारूची बाटली हरिता समोर धरत ती आपली व्यथा मांडू लागली.

"नाव काय तुझं ?" हरिताने जड आवाजात विचारलं.

"नाव- गाव सगळं पुसलं गेलंय माझं ..! आता निशा म्हणून ओळखतात मला इथे सगळे... ! तुम्ही जा मॅडम इथून, आता धंद्याची वेळ झालीयं .. इथे वर्दळ वाढेल आता शौकिनांची..! तुमच्यासाठी चांगली नाही हि जागा.. .. जा तुम्ही... पण एक सांगू मॅडम तुम्हांला, कुणीतरी आज पहिल्यांदा प्रयत्न केला माझं दुःख जाणून घ्यायचं ...बरं वाटलं..! " डोळे पुसत, आपला तोल सावरत ती तिथून उठली.

हरिता जड अंतःकरणाने माघारी फिरली. तिच्या बाजूने आलेला एक ट्रक करकचून ब्रेक लागून रस्त्यावर थांबला. त्या आवाजाने ती भानावर आली. रस्त्याच्या कडेला अश्लील हावभाव करत उभा असलेला एक तृतीयपंथी त्या ट्रकमध्ये बसला. ट्रक तिच्या बाजूने वेगाने निघून गेला. मघास पासून कडेवर दिड-दोन वर्षाचं लेकरू घेऊन उभी असलेली ती पोरगेलशी स्त्री कोपऱ्यात एका पुरुषाशी कुजबूज करत होती. लांबून पोलिसांची गाडी येताना दिसली.. आणि आजूबाजूला उभ्या असलेल्या देहविक्रेय करणाऱ्या त्या स्त्रिया जीव घेऊन रस्त्याच्या कडेने असणाऱ्या शेतात धावत सुटल्या..मावळतीच्या सूर्यप्रकाशात... तोंड लपविण्यासाठी ... !! त्यांच्या आयुष्यात पहाटेचा सोनेरी किरणांचा सूर्य कधीच उगवणार नव्हता...!!

हरिता सुन्न झाली. एक दाहक वास्तव नजरे समोर आल्याने हरिताच्या चेहऱ्यावर नेहमीचं असणारं गोड हसू गायब झालं होतं. ह्या जगात चांगुलपणा खरंच अस्तित्वात नाहीये का? विचारांच्या तंद्रीतच ती घरी आली. आज तिला अन्न गोड लागलं नाही. कसेबसे दोन घास पोटात ढकलून ती अंथरुणावर पहुडली. त्या रात्री तिला झोप लागली नाही. थोड्या वेळासाठी तिचा डोळा लागला, तेव्हा तिच्या स्वप्नातं रस्त्यावरची ती दुर्बल माणसंच येत राहिली.

__________________ XXX____________________

"विकास , जगात खरंच प्रामाणिकपणा , चांगुलपणा नावाला तरी अस्तित्वात आहे का रे? रक्ताची नाती सुद्धा लबाड असतात का बरं? " संध्याकाळी चहा घेत झोपाळ्यावर बसलेल्या विकासला गंभीर चेहऱ्याने हरिताने विचारलं.

"का बरं तुला असे प्रश्न नेहमी पडतात?" तिच्याकडे न पाहता एका हातात असलेल्या मोबाईलमध्ये लक्ष घालत विकास उद्‌गारला.

" मला सांग, सरकारी कंत्राटे मिळवायला किती टक्के कमिशन लाच म्हणून तुला द्यावी लागते? लाच घेणं आणि देणं चुकीचंच नाहीये का?" हरिताने अचानक बॉम्ब फेकावा तसा प्रश्न विकासला केला. अनपेक्षितपणे आलेल्या हरिताच्या प्रश्नाने विकास चमकला. आपल्या मोकळेपणाचा फायदा घेतेयं का बरं हि..? तो तिच्या प्रश्नाने अस्वस्थ झाला. त्याने मान वर केली. हरिताकडे पाहत कठोरपणे म्हणाला, " ज्यातलं आपल्याला कळतं ना तेच बोलावं माणसाने, उगाच न कळणाऱ्या विषयात नाक खुपसू नये!".

विकासच्या बोलण्याचं तिला वाईट वाटलं; त्याच्या
बोलण्याने तिच्या ओठांवरचं हसू क्षणात मावळलं.. पण फक्त क्षणभरच; कारण तिला मुळी रागावता येत नव्हतं कधीच कुणावरही.... चांगुलपणाची साक्षात आदर्श देवता होती ती...!!

" बरं बाबा, मी सहज विचारलं; एवढा राग का यावा बरं नाकावर? " तिच्या चेहर्‍यावर पुन्हा एकदा गोड हास्य झळकू लागलं. ती हळुवारपणे विकासच्या जवळ जाऊन झोपाळ्यावर बसली. त्याचवेळी घरात पाळलेल्या कुत्र्याचं पिल्लू येऊन विकासचे पाय प्रेमानं चाटू लागलं. विकासने त्या पिल्लाला उचललं. मोठ्या प्रेमाने लाड करत, त्या पिल्लाला छातीशी कुरवाळत तो उठून घरासमोरच्या बागेत गेला. हरिताच्या चेहऱ्यावरचं गोड हास्य हळूहळू मावळू लागलं. तिला क्षणभर त्या कुत्र्याच्या पिल्लाचा हेवा वाटला. विकास आपल्यापासून दूर दूर जातोय का बरं? जेव्हा तो आपल्याला हवाहवासा वाटतो तेव्हाच...!! एका मुक्या प्राण्याला तो एवढी माया करतोयं; पण त्याच्यावर जीव लावून बसलेल्या मला, माझ्या भावनांना लाथाडतोयं का बरं? माझ्या भावना खरंच समजत नाहीयेतं त्याला की, जाणूनबूजून मला टाळतोयं तो? आता आपला मेनोपॉज जवळ येत चाललायं, आपल्यात शारीरिक, मानसिक स्थित्यंतरे घडत आहेत ... हे त्याने जाणून घ्यावं, आपल्याला समजून घ्यावं असं मनाला वाटणं, त्याच्या सोबत निकोप सहजीवनाची अभिलाषा बाळगणं खरंच गैर आहे का? ती विचार करू लागली ; पण दुबळ्या व्यथेत बुडून राहणं हा तिचा स्वभाव नव्हताचं मुळी...! आपल्या घरासाठी ... आपल्यासाठी ...... दिव्यासाठी करतोय ना तो हे सगळं...!! शून्यातून उभं केलयं हे सारं सुख.. आपण त्याला समजून घ्यायला हवं ..! विचार करता करता तिच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा गोड हास्य पसरलं.

एके संध्याकाळी हरिता घराच्या बाल्कनीत पुस्तक वाचत बसली होती. अनपेक्षितपणे मागून येऊन विकासने हळुवारपणे तिच्या गळ्यात हात टाकले. विकासच्या त्या प्रेमळ स्पर्शाने ती पुलकित झाली. तिच्या तना-मनावर रोमांच फुलले. विकासच्या प्रेमाच्या मिठीतून कधीच आपली सुटका होऊ नये असं तिला वाटू लागलं. तिच्या चेहऱ्यावर गोड हास्य फुललं.

"हरिता, ऐक..! उद्या आपल्यातर्फे हॉटेल अप्सरामध्ये पार्टी आयोजित केली आहे मी. सरकारी खात्याचे बडे- बडे अधिकारी येणार आहेत पार्टीत.. तर यजमानपदी आपण दोघे असल्याने पार्टीत रंगत आणायचं काम आपलं..! येणाऱ्या सगळ्या पाहुण्यांची छानपैकी खातिरदारी करावी लागेल आपल्याला.. आलं तुझ्या लक्षात ?" विकास रंगात येत म्हणाला.

" अरे, पण माझं काय काम तिथे? तूच बघ ना पार्टीचं..!" हरिताच्या चेहर्‍यावर भलं मोठं प्रश्नचिन्ह आलं.

" हरिता, पार्टी आपण आयोजित करतोय ना, मग तू तिथे असायला नको का ? आपली उद्याची पार्टी यशस्वी झाली पाहिजे .. चल ऊठ , उद्याच्या तयारीला लाग बरं..! " हरिताला हाताला धरून उठवत विकास म्हणाला.
हरिताच्या चेहऱ्यावर नेहमीप्रमाणे गोड हास्य लकाकू लागलं. ती उठली .. उद्याच्या तयारीसाठी..!

हॉटेल अप्सराचा तो पार्टी हॉल.. तिथलं वातावरण अगदी धुंद झालेलं.. मंद वाजणारं संगीत ... त्या संगीताच्या ठेक्यावर भरले जाणारे महागड्या विदेशी मदिरेचे ग्लास ...
एकमेकांच्या ग्लासला चिअर्स करत पोटात जाणारी ती महागडी मदिरा .... आणि पोटातल्या मदिरेने येणारी नशा... बेधुंदपणा... सर्वत्र भरून राहिलेला..!! त्या धुंद झालेल्या वातावरणात हरिताचा जीव गुदमरत होता. तिला खरोखरंच वीट आलेला ह्या सगळ्या गोष्टींचा. तिच्या डोळ्यांसमोर तरळत होती रस्त्यावरची देह विक्रेय करणारी निशा, तिचे स्वप्नं विझलेले डोळे, तिच्या हातातली दारूची बाटली, ट्रकमध्ये चढणारा तृतीयपंथी, निष्पाप चेहऱ्याची लेकुरवाळी स्त्री, पोलिसांना पाहून अंधारात धावणाऱ्या हतबल चेहऱ्याच्या स्त्रिया..! हे सगळं आठवून तीचं मन सुन्न झालं. ह्या जगात चांगुलपणा काडीमात्र शिल्लक नाही. ह्या दुनियेतली माणसं दोन गटात विभागली गेली आहेत. एक गट जो इथे विलासी जीवन जगतोयं अन् दुसरा गट जो रस्त्यावर वणवण भटकतोयं कपाळावर दरिद्री जीवनाची भळभळती जखम घेऊन .. अश्वस्थामासारखा! तिचं मन तिथे बिल्कुल रमत नव्हतं. ती हे सारं विकासासाठी सहन करत राहिली ... ती पार्टीचं यजमानपद भूषवत होती.. चेहऱ्यावर खोटा मुखवटा लावून..!

"हरिता, इथे ये..! हे मिस्टर किणी.. मोठे सरकारी अधिकारी आहेत हे..! आपली सगळी मोठी टेंडर तेच पास करतात... त्यांच्या हातातंच आहे ते काम बरं!" विकासने हरिताची ओळख मिस्टर किणींशी करून दिली.

हरिता मिस्टर किणींकडे पाहून गोड हसली. चेहऱ्यावरचा मुखवटा बाजूला सारत तिने त्यांची मोठ्या आस्थेवाईकपणे विचारपूस केली. पण त्यांच्याशी बोलताना तिला जाणवलं की, किणी दिसतायेतं तेवढे सभ्य गृहस्थ नसावेत. याबाबतीत निसर्गाने स्त्रियांना तिसरा डोळा प्रदान केला आहे. विकासने ओळख करून दिल्यावर किणी लोचटपणे हरिताच्या मागे पुढे फिरू लागला. विकास दुसऱ्या पाहुण्यांसोबत गप्पागोष्टी करण्यात मश्गुल होता. पण त्याचं पूर्ण लक्ष हरिता आणि मिस्टर किणींकडेचं होतं.

" तुम्ही खूप सुंदर आहात मिसेस हरिता..!" मि. किणी उगाचच हरिताशी लगट करू लागला.

हरिताच्या चेहर्‍यावरचं गोड हास्य आता मावळू लागलेलं.
हळुवार वाजणारं संगीत आणि त्या संगीता सोबत पोटात जाणारी मदिरा ... मदिरा पोटात गेल्यावर येणारी जी नशा असते, ती आता मि. किणींवर चढू लागलेली. त्याची जीभ जडावू लागली. नशा माणसातल्या दानवाला बाहेर काढते, गैरकृत्य करण्यास भाग पाडते असं म्हणतात. नशेचा अंमल चढलेल्या मि. किणीची नजर हरिताच्या अंग-प्रत्यंगावरून फिरू लागली. तो नखशिखान्त तिला न्याहाळू लागला. ह्या लंपट लांडग्याच्या तावडीतून कसं सुटता येईल ह्याचा विचार हरिता करू लागली. पण मि. किणी एक नंबरचा स्त्रीलंपट होता. तो हरिताचा पिच्छा सोडण्यास बिल्कुल तयार नव्हता. 'आधीच मर्कट त्यात मद्य प्याला' अशी त्याची अवस्था झालेली. हरिता तिथून सटकायचा मार्ग शोधत होती. ती नजरेने विकासाचा शोध घेत होती; पण विकास दुसर्‍या पाहुण्यांची सरबराई करण्यात गुंग होता. मंद संगीताच्या तालावर किणी डोलू लागला . तो हरिताला आपल्या सोबत नाचण्यास आग्रह करू लागला. ती त्याला नकार देत असूनही अचानक किणीने तिच्या कमरेला हाताने विळखा घातला आणि तिला आपल्या जवळ ओढलं. किणीच्या ह्या गैरवर्तनाने हरिता संतापली. एखादया क्रियेवर प्रतिक्षिप्त क्रिया घडावी तसा तिचा हात उठला आणि एक सणसणीत चपराक किणीच्या गालावर बसली. किणीला एक दोन क्षण कळलंच नाही की, नक्की काय घडलयं ते..! किणीच्या हाताला जोरदार हिसका देत ती तिथून तडक निघाली आणि विकास जवळ पोहचली. नशेचा अंमल चढलेल्या डोळ्यांनी किणी तिच्याकडे मख्खपणे पाहत रहिला. आजूबाजूचे सगळे नशिल्या वातावरणात धुंद होते. त्यामुळे काय घडतयं हे कुणाच्याही लक्षात आलं नाही.

"विकास, काय तमाशा लावलायं इथे ? मी आत्ताच्या आत्ता इथून घरी चालले. तो किणी, स्त्री लंपट कुठला..! माझ्याशी गैरवर्तन करतोय. " हरिताच्या डोळ्यात अश्रू जमा झाले. तिचा नाजूक चेहरा सात्विक संतापाने लालबुंद झाला होता.

मघास पासून हरिता आणि किणीवर बारीक लक्ष ठेवून असलेला विकास तिच्याकडे खाऊ कि गिळू ह्या नजरेने पाहत ; तिच्या दंडाला पकडत तिला हॉलच्या कोपऱ्यात घेऊन गेला. तिच्या अंगावर खेकसत म्हणाला,

"मूर्ख स्त्री कुठली ? काय गरज होती तुला त्या किणीला थप्पड मारायची? तुझ्या मूर्खपणामुळे एवढं मोठं कॉन्ट्रॅक्ट आता हातचं जाणार. त्याला खुश करण्यासाठी पार्टी आयोजित केली होती मी; पण तुझ्या मूर्खपणामुळे पाणी फिरलं त्यावर ...!" विकास प्रचंड भडकला होता.

"अरे , तो माझ्याशी लगट करत होता ..!" तिला आता आपलं रडू रोखता येत नव्हतं.

"काय फरक पडणार होता तुला त्याने? कोट्यावधी रुपयाचं कॉन्ट्रॅक्ट मिळवण्यासाठी तुला त्याच्या गळ्यात पडायला काय धाड भरली होती ? थोडं त्याच्या कलानं घेऊ शकत नव्हतीसं का तू?" विकासच्या बोलण्याने हरिता स्तंभित झाली. त्याचं बोलणं ऐकून आपल्या शरीरावर असंख्य विषारी विंचू डंख मारत आहेत असा भास तिला होऊ लागला. तिची वाचा अचानक बंद झाली. तिच्या तोंडून शब्दच फुटेना. ती भरल्या डोळ्यांनी विकासकडे पाहू लागली. त्या डोळ्यांत विकासाबद्दल विलक्षण द्वेष, तिरस्कार भरला होता. तिच्या कल्पनेतल्या चांगुलपणाच्या जगावर जणू आभाळ कोसळलं होतं. या जगातली सगळीचं माणसं प्रामाणिक नाहीत. हे जग स्वार्थी, मतलबी भावनेने पछाडलेले आहे. तिला आता आपल्या चांगुलपणाची कीव वाटू लागली.

"काय रोखून पाहतेस माझ्याकडे? माझ्या पैशावर मजा मारतेस, तेव्हा विचार करतेस का , कुठून येतो हा पैसा? काय -काय करावं लागतं त्यासाठी मला? एक काम पार पाडू शकली नाहीस नवऱ्याच्या कंपनीसाठी..! माझी सगळी मेहनत पाण्यात घालवली..!" विकास बडबडू लागला. पण हे सारं ऐकायला हरिता होती कुठे तिथे ? विकासला जोरदार धक्का देत, त्याच्या हातून आपला दंड सोडवित ती त्या हॉलमधून वेगाने धावत सुटली... स्वार्थी, मतलबी विकासपासून, स्त्री लंपट किणीपासून, अप्रामाणिक जगापासून... दूर - दूर पळू लागली.

" ओ मॅडम, थांबा जरा ...!" ओळखीच्या आवाजाने क्षणभर दचकून ती जागीच थांबली.

"काय झालं मॅडम? एवढ्या रात्री का अश्या पळतायेतं?" अचानक समोर आलेल्या निशाने तिची आपुलकीने चौकशी केली. ती त्या हॉटेलच्या आसपासच्या परिसरात आपल्या गिऱ्हाइकांची वाट पाहत उभी होती.

आज हरिता तिच्यासमोर उभी होती ... पुतळ्यासारखी..!! आज मौनव्रत धारण करण्याची तिची पाळी होती. हरिताच्या डोळ्यांत अश्रु तरळले. हे जग लबाड , स्वार्थी लोकांनी भरलयं...! ह्या लबाड, मतलबी जगावर, विकासवर, मि. किणींवर , निशाच्या भाऊ-बापावर .. अणुबॉम्बचा वर्षाव करावा.. बेचिराख करावं त्या साऱ्यांना .. असे आक्रमक विचार तिच्या डोक्यात थैमान घालू लागले. तिने निशाच्या स्वप्नं विझलेल्या डोळ्यांत खोलवर नजर घालून पाहिलं... आणि तिच्या अश्रुभरल्या धूसर नजरेला दिसू लागलं..आपलं .. स्वतःचं..'प्रतिबिंब"!. त्या डोळ्यांत दिसणारं आपलं 'प्रतिबिंब' पाहून ती नखशिखान्त शहारली. ती निशापासून दूर पळू लागली. वेगाने धावणाऱ्या पाठमोऱ्या हरिताला पाहून निशा जे समजायचं ते समजून गेली. ती हसली स्वतःशीच .... विषण्णपणे..!!

रात्रीच्या भयाण काळोखात हरिता पायाखालचा रस्ता बेभानपणे तुडवू लागली... पण कुठे जावं... काय करावं.. हेचं तिला समजत नव्हतं.. तिला मार्ग सापडत नव्हता... ती फक्त पळत होती... सगळ्यांपासून दूर..!!!

समाप्त..!!

धन्यवाद..!!

रुपाली विशे- पाटील
rupalivishepatil@gmail.com

_________________ XXX_________________

(टिप - सदर कथा पूर्णतः काल्पनिक असून कथेद्वारे कुणाच्याही भावना दुखविणे हा कथा लेखिकेचा उद्देश नाही. कथेतल्या नावाशी साधर्म्य आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा. कथेत लिहलेल्या कुठल्याही अंमली पदार्थ सेवनाचे कथा लेखिका समर्थन करत नाही.)

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

जाई, अज्ञातवासी, रानभुली, मृणाली..!!
खूप धन्यवाद तुम्हाला कथेवरच्या प्रतिसादासाठी..!!

लावण्या, भाग्यश्री..!!
खूप आभार तुमचे ... कथेवरच्या प्रतिसादासाठी..!!

प्रामाणिक व्यक्तीचा विवाह अप्रामाणिक व्यक्तीशी झाल्यास असे घडू शकत असेल. काही मुद्दे हे नॉन-निगोशिएबल असतात. पैकी आपलय पार्टनरने पूर्ण स्वच्छ असणे हा मुद्दा त्यापैकीच एक. अगदी सुंदर आहे ही कथा. हरिताने स्वतःला सशक्त बनवून त्या घरातून बाहेर पडावे.

गौरी, शितल, वीरुजी, बिपिनजी, सामो....!

खूप धन्यवाद तुम्हांला कथेवरच्या प्रतिसादासाठी आणि प्रोत्साहनासाठी..!!!

@ बिपिनजी - तुमच्या कथा वाचून बरचंस शिकायला मिळालयं मला.. !! माझ्या लेखनात कुठे काही चूक असेल तर अवश्य दाखवून द्या.. तुमचं मार्गदर्शन आवडेल मला.!!

@ सामो - किती खोलवर विचार करतेस तू..! तुझे प्रतिसाद नेहमी विचार करायला भाग पाडतात. तुझ्या नेहमीच्या प्रोत्साहनासाठी खूप आभार तुझे..!

सुंदर कथा. शीर्षक वाचून कथेचा अंदाज येत नव्हता. शेवटी उलगडा झाला. स्त्रीची तगमग सहजपणे छान मांडली आहे. कथेतील विविध प्रासंगिक बारकावे छान लिहिले आहेत. पुढील कथा लवकरात लवकर येऊद्या.

धन्यवाद किशोरजी..!!
तुमचा प्रतिसाद मनापासून आवडला..!
प्रोत्साहन आणि शुभेच्छांसाठी धन्यवाद..!!

छान आहे कथा. खरे तर गरीबीत जगणारी स्त्री असो वा बेगड्या श्रीमंतीत जगणारी स्त्री असो, दोघींची दु:खे ही कदाचीत एकसारखी किंवा समांतर असु शकतात. आपलेच ओठ आणी आपलेच दात अशी अवस्था असल्यास जगणे खरच असह्य होते.

स्वातीताई, वर्णिता, रश्मीजी, सनव..!!
खूप आभार तुमचे कथेवरच्या प्रतिसाद आणि प्रोत्साहनासाठी...!

@ रश्मीजी - तुमचा वास्तववादी प्रतिसाद पटला.

छान कथा. हरिताच्या मनाला किती यातना झाल्या असतील याची कल्पना करवत नाही.वरून एकदम छान सुखवस्तू दिसणाऱ्या कुटुंबाची एक दाहक वास्तविकता समोर आली.

धन्यवाद राणी..!!
कथेवरचा तुझा संवेदनशील प्रतिसाद मनाला भावला.

Sad घरचेच असे असले की बाहेरच्यांना काय बोल लावायचा!
छान लिहीली आहे!!!!

रूपालीजी
तुमची प्रतिक्रिया मी नम्रपणे स्वीकारतो .
पण दोन गोष्टी
एक - मी चर्चा करू शकतो पण कसं लिहावं हे सांगण्याइतका माझा अधिकार नाही .
दोन- माझ्या कथांमधून तुम्हाला काय घ्यावंसं वाटलं , मुळात हे मला जाणून घ्यायला आवडेल
आभार

माझ्या कथांमधून तुम्हाला काय घ्यावंसं वाटलं , मुळात हे मला जाणून घ्यायला आवडेल
आभार>>>

धन्यवाद बिपिनजी..!

तुमची कथा लेखनशैली आणि भाषाशैली उत्कृष्ट आहे. कथा लिहिताना कथा बीज जरी डोक्यात असलं तरीही कथेत वाक्यरचना करताना कधीतरी अडचण येते. त्यावेळी मी मायबोली वरील प्रसिद्ध कथा लेखकांच्या कथा परत एकदा नजरेखालून घालते. त्यात तुमच्याही कथा असतात. त्याचा फायदा मला कथा लेखन करताना नक्की होतो.

कथा लेखनाचा चांगलाच अनुभव तुमच्या गाठीशी आहे. त्या अनुभवा नुसार लेखनात काही उणीव असेल आणि ती जर कधी दाखवून दिलीत तर पुढच्या लेखनात सुधारणा करता येईल.. आणि अशी अपेक्षा मी सर्व रसिक वाचकांकडूनही करते.

अवांतर - मला ' रूपालीजी' न म्हणता नुसतं ' रूपाली' म्हटलं तरी आवडेल मला.!

अप्रतिम लिखाण रुपाली.... एखादी दर्जेदार कलाकृती खूप दिवसानंतर वाचायला मिळाली.... पुढील लेखनासाठी शुभेच्छा