आभास

Submitted by Kavita Datar on 23 March, 2021 - 03:42
Suspense Thriller Story

रात्रीचे दोन वाजलेले. अवनी त्या निर्मनुष्य जंगलातील पायवाटेने एकटीच चालत होती. सभोवताली दाट झाडी. त्यातून रातकिडय़ांचा आवाज. क्वचित कुठे तरी दूर जंगली श्वापदाची डरकाळी ऐकू येत होती. सगळं वातावरण भयप्रद भासत होतं. अर्धा तास असंच चालत राहिल्यावर दूरूनच तीला ती छोटी टुमदार बंगली नजरेस पडली. तिने चालण्याचा वेग वाढवला. फाटक उघडून ती बंगलीच्या प्रवेशद्वाराजवळ आली. तिची वाटच पाहात असल्याप्रमाणे ते प्रवेशद्वार उघडले. "अालीस अवनी. . केव्हाची तुझी वाट पाहात होतो." एक पुरुषी आवाज तिच्या कानी पडला. तिने सभोवार नजर फिरवली. पण बंगलीत मिट्ट काळोख असल्याने कोणीच तिच्या दृष्टीस पडले नाही. "अवनी ये . . मी तुझीच वाट पाहत आहे." परत तोच आवाज.

अवनी भीतीने दचकून जागी झाली. तिचे सर्वांग घामाने भिजले होते. बेडजवळच्या साईड टेबलवरची पाण्याची बाटली उचलून तिने तोंडाला लावली. आणि एका दमात रिकामी केली. या आठवड्यात दुसऱ्यांदा तिला ते स्वप्न पडले होते. अजूनही कानात तोच आवाज घुमत होता. "अवनी. . . अवनी". तिला तो आवाज खूप ओळखीचा वाटला.

अवनी आणि आदित्यच्या लग्नाला तीन महिने झालेले. कन्स्ट्रक्शन बिझनेसचा व्याप खूप मोठा असल्याने आदित्य आणि त्याच्या वडिलांना बऱ्याचदा बाहेरगावी जावं लागे. नाशिकला एका हॉलिडे होम रिसॉर्टच्या साईटचे काम चालू असल्याने कालच ती दोघं तिथं गेली होती. पुण्यातील त्यांच्या मोठ्या बंगल्यात अवनी आणि आदित्यची आई मालती दोघी एकटय़ाच होत्या. मालतीबाईंना गुडघेदुखी असल्याने त्यांची बेडरुम खालच्या मजल्यावर होती. बंगल्याच्या वरच्या मजल्यावर अवनी तिच्या बेडरुममध्ये एकटीच होती. एवढ्या मोठ्या घराची अवनीला अजून सवय झाली नव्हती. लग्नाआधी माहेरी ती, आई, बाबा आणि लहान भावाबरोबर सदाशिव पेठेतल्या दोन बेडरूमच्या छोट्या फ्लॅटमध्ये राहात होती.

पाहता क्षणी कोणाचीही नजर खिळवून ठेवेल अशी अवनी सुंदर. गोरा रंग, मध्यम उंची, लांब केस, किंचित उभट चेहरा आणि निळे डोळे. . एसपी कॉलेजला, एम.ए. सायकॉलॉजीच्या दुसऱ्या वर्षाला असतानाच नात्यातील एका लग्नात आदित्यने अवनीला पाहिले आणि त्याच्या घरच्यांना सांगून रीतसर मागणी घातली. सर्वसाधारण परिस्थितीत वाढलेल्या अवनीला शान, शौकी, ऐषआराम या सगळ्याचे फार आकर्षण होते. म्हणूनच आदित्य सारख्या श्रीमंत मुलाचे स्थळ चालून आल्यावर तिला स्वर्ग दोन बोटे उरला. या सगळ्यांत ती आकाश ला साफ विसरली.

आकाश. . . तिच्याच वर्गात शिकणारा, तिच्या सारखाच सर्वसाधारण परिस्थितील, अत्यंत हुशार मुलगा. लहानपणीच वडिलांना गमावलेला आकाश एकट्या आईसोबत राहात होता. अवनीवर त्याचे जीवापाड प्रेम. गेली चार वर्षे अवनी आणि आकाश कॉलेजच्या आणि अभ्यासाच्या निमित्ताने रोज भेटत. आकाशने अवनी जवळ त्याच्या प्रेमाची कबुली दिल्यावर अवनीने लगेच त्याला होकार दिला होता. त्यामागे आकाश वरील प्रेमापेक्षा त्याच्या देखण्या रूपाचे आकर्षण आणि इतर मैत्रिणींना आहे म्हणून आपल्यालाही एक बॉयफ्रेंड असावा हे कारण होते. तिच्या उथळ स्वभावानुसार हल्ली आकाशशी असलेल्या संबंधांचा तिला कंटाळा आला होता. याला कारण म्हणजे कायम अभ्यासात किंवा वाचनात बुडालेला आकाश तिला इतर मुलींच्या बॉयफ्रेंड्स प्रमाणे महागडे गिफ्ट्स, शॉपिंग, आऊटिंग वगैरेचे सुख देऊ शकत नव्हता. म्हणूनच आदित्यचे भारी स्थळ आल्यापासून ती त्याला टाळू लागली होती. लग्नाची तारीख ठरल्यावर आकाशच्या मनाचा काहीएक विचार न करता, त्याला कुठलेही स्पष्टीकरण न देता अवनीने लग्नपत्रिका त्याच्या हातात ठेवली.

अवनी लगबगीने मॉलमध्ये शिरली. येत्या आठवड्यात आदित्य चा वाढदिवस. त्यासाठी तिला भरपूर शॉपिंग करायची होती. बटन दाबून ती लिफ्टची वाट पाहू लागली.
लिफ्टमध्ये प्रवेश करताना तिला भास झाला की कोणीतरी तिच्यावर नजर ठेवून आहे. खरंतर लिफ्टमध्ये ती एकटी होती. पण कोणी तरी आहे आणि तिच्या अगदी जवळ येऊन उभे आहे, असे तिला वाटले. तोच आवाज परत तिच्या कानात कुजबुजला, "अवनी. . . अवनी. ." आणि पटकन कोणीतरी तिचा हात पकडला. अवनी प्रचंड घाबरली. जोरात ओरडावे असे वाटत असूनही भीतीने तिच्या तोंडून शब्द फुटत नव्हता. हात सोडवून घेण्यासाठी ती केविलवाणी धडपड करू लागली. पण तिच्या हातावरची पकड अधिकच घट्ट झाली. अात्यंतिक भीतीने भोवळ येऊन ती लिफ्टमध्येच कोसळली. अवनी शुद्धीवर आली तेव्हा तिच्या बेडरूममध्ये होती. तिच्या उशाशी आदित्य चिंतातूर मुद्रेने बसलेला तिला दिसला. "काय झालं तुला अवनी? मॉलमधल्या लोकांनी तुला लिफ्टमध्ये पडलेली पाहून तुझ्या पर्समधल्या माझ्या व्हिजिटिंग कार्डवरचा नंबर घेऊन मला कॉल केला आणि मी तुला घरी घेऊन आलो."
"काही नाही रे. . काल झोप न झाल्याने जरा चक्कर आली इतकंच. . "
"आता बरं वाटतंय ना? तु आराम कर. अॉफीस मध्ये एक महत्त्वाची मीटिंग आहे ती अटेंड करून तास दीड तासात मी परत येतो."
"तु जा ऑफिसला. . माझी काळजी करू नकोस. मी ठीक आहे."
आदित्य गेल्यावर अवनी विचार करू लागली नेमके काय झाले आपल्याला ? कदाचित भास असेल. पण ती चिरपरिचित हाक ?? "अवनी. .अवनी. ."
तिची विचारशक्ती खुंटली. अती श्रमाने तिने डोळे मिटले.

दुसऱ्या दिवशी संध्याकाळी अवनी आणि मालतीबाई बंगल्याच्या लॉनमध्ये कॉफी घेत बसल्या असताना अवनीला तिच्या खुर्चीमागे कोणी उभे असल्याचा भास झाला. तिने पटकन वळून पाहिले कुणीही नव्हते. ती मालतीबाईंशी बोलण्यात गुंतली. पाच दहा मिनिटांनी तिचे मोकळे केस कोणीतरी कुरवाळत आहे, असे तिला वाटले. पाठोपाठ तीच कुजबुजती हाक "अवनी. .अवनी." भीतीची एक लहर तिच्या सर्वांगभर पसरली. पटकन ती उठली आणि पळतच घरात गेली. मालतीबाई तिच्याकडे विचित्र नजरेने पाहात राहिल्या.

रात्री गाढ झोपेत असलेल्या अवनीला झोपेतच केसांवर, गालांवर, ओठांवर तोच चिरपरिचित स्पर्श जाणवला. "झोपू दे ना आदित्य. . खूप थकलेय मी. ." झोपाळू स्वरात ती म्हणाली. तरी त्याचे तिच्या सर्वांगावर फिरणारे हात थांबले नाहीत. तिने डोळे उघडले आणि ताडकन उठून बसली. आदित्य तिच्या बाजूलाच गाढ झोपला होता. मग तो स्पर्श ??? भीतीने ती घामाघूम झाली. काय प्रकार आहे हा ? या घरात तर काही नसेल ना ?? कुणाला सांगावे का ?? पण कोणी आपल्यावर विश्वास ठेवणार नाही. विचार करून तिचे डोके जड झाले. आता तर झोपायची सुद्धा तिला भीती वाटू लागली.

आज आदित्यच्या वाढदिवसाची पार्टी होती. काही जवळचे नातेवाईक, मित्र हॉलमध्ये जमले होते. हलक्या गुलाबी रंगाची सोनेरी बॉर्डर असलेली सिल्कची साडी आणि त्यावर नाजूकसा डायमंड सेट घालून अवनी पायऱ्या उतरून हॉलमध्ये आली. तिचे लक्ष हॉलच्या एका बाजुला गेले. तिथे कोपर्‍यात एका खुर्चीवर आकाश बसला होता. तिला वाटले, "हा इथं का आला असावा ? आपल्या दोघांबद्दल याने आदित्यला काही सांगितले नसेल ना ?" लगबगीने ती आकाश जिथे बसला होता तिथे गेली. पण जवळ जाऊन पाहते तर तिथं कोणीच नव्हतं. "कुठे गायब झाला हा ?" असा विचार करत असतानाच अवनीला आदित्यने हाक मारली.

आज खूप दिवसांनंतर अवनी माहेरी आली होती. अवनीच्या आईला तिला कुठे ठेवू अन् कुठे नको असे झाले होते. उत्साहाने त्या तिच्या आवडीचे पदार्थ करण्यात गुंतल्या. अवनीला भेटायला म्हणून तिची खास वर्गमैत्रिण स्नेहा आली होती. बोलता बोलता सहज अवनीने तिला आकाशबद्दल विचारले. स्नेहा एकदम गप्प झाली.
"काय झालं स्नेहा ? बोलत का नाहीस ?"
"अवनी तुला आकाश बद्दल काहीच माहित नाही ?"
"नाही. . काय झालं ?"
"अगं. .तुझं लग्न झालं त्यानंतर महिनाभर तो डिप्रेशनमध्ये होता. त्याचभरात त्याने गळफास लावून आत्महत्या केली."
अवनी भीतीने आणि दुःखाने निःशब्द होऊन, डोळे फाडून स्नेहा कडे बघत राहिली.

तिच्या आई बाबांना कळत नव्हते की अवनीला काय झाले आहे ? कसले दुःख आहे ? धड खात पीत नाही. झोपेतही घाबरून, ओरडत उठते. त्यांनी तिला खूपदा विचारूनही तिचे जणू काही शब्दच हरवले होते. आठवडाभरात अवनी खंगल्यासारखी दिसायला लागली. तिच्या डोळ्याखाली काळी वर्तुळं आली.

एके रात्री आईजवळ झोपलेल्या अवनीला जाग आली. पुन्हा तीच चिरपरिचित हाक. ती उठून बसली. आई गाढ झोपेत होती. आणि. . .दरवाजा जवळ तिला आकाश उभा असलेला दिसला. भारावल्यासारखी ती त्याच्या दिशेने चालू लागली. चालत ती बिल्डिंगच्या गच्चीवर आली. कुठल्या तरी अनामिक ओढीने ती गच्चीच्या कठडय़ावर चढली आणि तिने स्वतःला खाली झोकून दिले.

काय असेल हे ? अवनीच्या सुप्त मनातील अपराधी भावना ?? की आकाशच्या तिच्यावरच्या निरातिशय प्रेमातून निर्माण झालेली आसक्ती, जी त्याच्या मृत्युनंतर सुद्धा अस्तित्वात होती ???

**************************************************************************************************************************************************

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults