कुलक्की सरबत / kulukki Sarbath

Submitted by जाई. on 22 March, 2021 - 03:15
Kulukki sarbat
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

२चमचे सब्जा ,
एक ग्लास थंड पाणी जितकं सोसेल तितके,
१ लिंबू ,
१ हिरवी मिरची (ऊभी चिरलेली ) ,
बर्फाचे तुकडे ,
चवीनुसार मीठ , साखर , पुदीना

क्रमवार पाककृती: 

शरीरातील उष्णतेवर सब्जा हा रामबाण उपाय आहे. विशेषतः उन्हाळ्यात तलखीने जीव हैराण होत असताना सब्जा घालून पाणी प्यायलं की गार वाटतं.

केरळमध्ये सब्जा घालून कुलक्की सरबत ( kulukki Sarbath ) करतात. तिथलं हे लोकप्रिय पेय आहे. कुलक्की सरबत हे एक प्रकारचं shaken lemonade म्हणता येईल. मल्याळममध्ये कुलक्की या शब्दाचा अर्थ घुसळणे असा होतो. त्यावरून या पेयाला कुलक्की हे नाव पडलं. हे सरबत तयार करताना जितकं जोरात घुसळल / वर खाली हलवलं जाईल तितकी याची चव खुलते. ह्या पेयाच secret ingredient म्हणाल तर तेच आहे.

कृती : 2 चमचे सब्जा पाण्यात भिजवत ठेवा. सब्जा भिजेपर्यत एका ग्लासात लिंबाचा एक स्लाइस , एक उभी चिरलेली मिरची , पुदिना, चवीनुसार मीठ, साखर टाका. ह्यात आल्याचे बारीक तुकडे पण घालू शकता (ऑप्शनल). त्यानंतर त्यात लिंबाचा रस घाला. बर्फाचे तुकडे टाका.

ह्यावेळेपर्यत सब्जा पुरेसा भिजलेला असेल. तो ही या मिश्रणात टाकून मिश्रण हलकेसे हलवून घ्या. आता ग्लासात दोन बोट राहतील इथपर्यंतच पाणी ओता. लक्षात घ्या ग्लास पूर्णपणे भरायचा नाही . नाहीतर घुसळताना पाणी बाहेर पडेल. आता दुसरा एक ग्लास घेऊन तो मिश्रणाच्या ग्लासावर ठेवून अर्धा मिनिटं वर खाली चांगलं हलवून घ्या.पण जरा दमान कारण जोरात घुसळताना पाणी बाहेर पडायचे १०० % चान्सेस असतात. तुमच्याकडे Shaker असेल तर हे काम अगदी सोपं होतं.

तर आपलं साधं सोपं आंबटसर , गोडूस, तिखट अशी मिक्स चव असलेलं कुलुक्की सरबत तयार आहे. हे सरबत थंडगार प्यायला छान वाटत. हवं असल्यास थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवून नंतर पिऊ शकता.

हे मी केलेलं कुलक्की सरबत / kulukki sarbat

वाढणी/प्रमाण: 
१ माणसासाठी
अधिक टिपा: 

मिरची ऊभी कापल्याने तितकेसे तिखट्सर लागत नाही. खूपजणांसाठी शेकरमध्ये / फ्रीज बॉटल्समध्ये करणार असाल तर मिरच्या वगळता बाकीच साहित्य आधी घुसळून मिरच्या शेवटी टाकून चार पाच वेळा शेक केलं तर अजून चांगलं लागेल. Happy

माहितीचा स्रोत: 
पारंपारिक केरळ पाकृ आणि हेमा सुब्रमण्यम
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान आहे .
लेकाला सब्जा घातलेलं पाणी आवडत प्ययला , खिडकीतला ताजा पुदिना आहे .
उन्हाळ्याचा तडाखा जाणवतो आहे . थोडक्यात काय . करून बघण्यात येइल Happy

सरबत एकदम मस्त दिसतेय...रेसिपी पण सोपी.
सरबतात मिरचीची चव कशी लागत असेल पण? सौम्य चव येते का?
करूनच बघेन Happy

छान रेसिपी ...करून पाहायलाच हवं... कोईम्बतुर मध्ये थोडंफार अशाच प्रकारे बनवलेलं टोमॅटो च सरबत प्यायलेले ..त्याची आठवण आली ....

छान!
लस्सीसारखं किंवा फिल्टर कॉफीसारखं उंचावरून ओतून मिक्स केलं तर चवीत फरक पडेल का? (सांडण्याची शक्यता कमी होईल)

धन्यवाद सर्वाना Happy

रानभुली, मृणाली मिरची शक्यतो टाळू नका. अजिबातच तिखट लागत नाही. आंबट, गोड, तिखट अश्या चवी मिसळून आल्याने मस्त टँगी फ्लेवर येतो सरबताला. मिरचीच्या झणक्याने छान चव खुलते.

वावे, या पेयात घुसळणे हि क्रिया महत्वाची आहे. फिल्टर कॉफिसारख नुसत मिसळ्ण अपेक्षित नाही. म्हणूनच बहुधा शेकन लेमोनेड म्हणत असावेत . Happy

अच्छा जाई Happy
जंगली महाराज रस्त्यावर लिंबू सरबताच्या गाड्या असतात/ असायच्या ते लोक असे दोन ग्लासांमध्ये घुसळून द्यायचे सरबत.

फोटो तर खूपच मस्त.
फक्त एक शंका आहे ती म्हणजे..जर एकदम चार -पाच ग्लास करायचे झाले तर घुसळावे कसे?

आंगो , माझ्याकडे shaker नाहीये आणि ग्लासाच्या कसरतीबद्दल मला पूर्ण खात्री आहे Happy
मी fridge bottle मध्ये करेन म्हणतेय.

जर एकदम चार -पाच ग्लास करायचे झाले तर घुसळावे कसे? >>>> बाटलीत भरून चालेल वाटते.

सब्जा लिंबू कोकम असली सरबते मी करून पित राहतो उन्हाळ्यात, हा प्रकारही ट्राय करता येईल..
पण ते मिरची कंपलसरी आहे का.. जराशीच बघावी लागेल. नाहीतर उन्हाळ्यात आणखी आग लागायला नको

सर्वांचे मनःपूर्वक आभार ! नक्की करून बघा. मस्त लागते चव.,

आंबट गोड, ४ ते ५ जणांसाठी करायचं झाल्यास स्वस्तिने लिहिलेय तस फ्रीजच्या ज्या अर्ध्या एक लिटरच्या बॉटल्स असतात त्यात करता येईल . झाकण असल्याने सांडलवंड होण्याची भीती राहणार नाही Happy

<<< मिरची फक्त चिर मारून टाकतात, जास्त तिखट होत नाही >>> Exactly ब्लॅककॅट . मिरचीची भीती अनाठायी आहे. काहीही आग वगैरे होत नाही. स्वानुभव आहे . छान झटकेदार पेय तयार होतं. करून पाहा .

आताच करून प्यायलो. छान झालं होतं. मी शेकर मध्ये टाकून शेक केलं. त्यामुळे जरा जास्तच तिखट झालं होतं(साखर विरघळण्यासाठी मी तीन चार मिनिटे शेक करत होतो) मला वाटतय शेकर मध्ये टाकून शेक करणार असाल तर मिरच्या शेवटी टाकून चार पाच वेळा शेक केलं तर अजून चांगलं लागेल.

कविता , बोकलत धन्यवाद .

बोकलत ,नक्की किती मिरच्या टाकल्यात ? तिखट लागलं म्हणताय ते ? Uhoh

मिरची सुद्धा तिखट असू शकते. आणि प्रत्येकाची मिरची झेपवायची कॅपासिटीसुद्धा. मी मिरचीबद्दल शंका व्यक्त केली होती ते वर लिहिल्याप्रमाणे उन्हाळा असल्यामुळे मला तिखटाचा त्रास होतो. त्या दिवशी नाही तर दुसर्‍या दिवशी सकाळी. त्यामुळे मूळचे तिखटाची आवड असली तरी नॉनवेज असेल तरच तिखट खायची रिस्क घेतो अन्यथा उन्हाळ्यात तिखट टाळतोच.
बाकी शेक जास्त केल्यास मिरचीतील रस त्यात उतरण्याची शक्यता जास्त हा बोकलतांचा मुद्दा योग्य आहे.
बेस्ट म्हणजे एकच मिरची उभी कापून जितके ग्लास बनवू त्यात चमच्याने ढवळल्यासारखे फिरवून घ्यावी. जेणेकरून वेज बिर्याणीत सुका बोंबील फिरवल्याने हलकीशी एक्स्ट्रा चव येते तसे होईल.

ओके बोकलत. तुम्ही म्हणताय तसे मग शेकरमध्ये टाकून घुसळल्याने तिखट्सर झाले असावे. तुमची टीप वर अ‍ॅड करते Happy

जबरी प्रकार आहे. नक्की करून पाहणार. खुप जणांनी मिरची स्कीप केली तर चालेल का विचारलं आहे, पण मला तर हाच मुख्य ingredient वाटतो आहे. नॉर्मल लेमोनेडला झटका ट्विस्ट.
(यातच व्होडका घातली की चिली व्होडका तय्यार Wink )

जाई, हे सरबत पाईनॅपल फ्लेवरच केरळला एके ठिकाणी मिळालं होतं तेव्हा फार आवडलं होतं. सध्या घरी सब्जा नाहीये, म्हणून मग त्या ऐवजी चिया सीड्स वापरून असा जुगाडू प्रकार केला. ऊकाड्याची सुरवात झाली आमच्या ईथे, फ्रिज मधलं हे गारेगार सरबत प्यायला छान वाटलं Happy आता सब्जा आणून हे करुन बघेन.

1.jpg2.jpg3.jpg

मस्त पाकृ. सध्या पुदिना मिळणे मुश्किल आहे, 7 दिवस भाजी पण बंद आहे आमच्या इथे. मिळाला की करून बघणार. बाकी सगळं आहे, किंवा कुंडीतली तुळस घालून बघते.