मराठी साहित्यामध्ये अन्य भाषांचा वापर.

Submitted by वीरु on 22 March, 2021 - 02:21

माझ्यासारखे अनेक मराठी वाचक मराठी वाचनासाठी मायबोली या संकेतस्थळाला भेट देत असतील. आणि मायबोलीवर लिहिणाऱ्या अनेक मान्यवर लेखकांच्या कसदार लिखाणामुळे कधी निराश व्हावे लागत नाही. पण सध्या कथा/ लेखांमध्ये हिंदी इंग्रजी या भाषांचा मोठ्या प्रमाणावर वापर दिसुन आला. कथेची गरज म्हणुन काही प्रसंगी अन्य भाषा वापरणे आणि १० टक्क्याहुन अधीक लिखाण अन्य भाषेत करणे यामध्ये फरक असावा. याबद्दल आपले मत जाणुन घ्यायला आवडेल.
तसेच अन्य भाषेतील लिखाणामध्ये मराठीचा थोडाफार वापर होतो का यावरही जाणकारांनी प्रकाश टाकला तर उत्तम होईल.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

जसे जसे आपण शहराकडे जातो तशी तशी भाषेची खिचडी बनत जाते.
शहरातल्या लोकांना "व्हेजिटेबल" शब्द वापरणे जास्त प्रतिष्ठेचे वाटत असावे.
[यात दोन प्रकारचे लोक आहेत १)प्रतिष्ठेसाठी बोलणारे आणि २) पहिल्या प्रकारच्या लोकांचे ऐकून बोलणारे)]

हे लोण शहरालगतच्या गावात हळू हळू पसरते.

आणि शहरापासून दूरच्या गावात दूरदर्शन आणि समाज माध्यमांमधून पसरते.

व्हेज फ्राईड राईस ही डिश आहे. व्हेज बिर्याणी सुद्धा.
पण म्हणुन व्हेजिटेबल शब्द सगळीकडे वापरत नाही कुणी.
वरच्या पोस्टमध्येच लिहिलं आहे. आज जेवायला वांग्याची व्हेजिटेबल आहे.. बाहेर जाते आहेस तर थोड्या व्हेजिटेबल्स घेऊन ये असे बोलताना मी तरी नाही ऐकले कुठल्याही शहरात.

भाजी हा सहज उपलब्ध, सहज डोक्यात येणारा आणि सर्वत्र वापरला जाणारा शब्द आहे.

या उलट डिशच्या बाबतीत कुणी व्हेज फ्राईडरास ऐवजी भाज्यांचा फ्राईडरराईस, भाज्यांची बिर्याणी असे म्हटले तर ऑड वाटेल.

आज जेवायला वांग्याची व्हेजिटेबल आहे..
>>> चुकतंय तुमचे... मराठीत भाजी( कच्ची) आणि शिजवलेली दोघांना भाजी म्हणतात..
आज जेवायला वांग्याची व्हेजिटेबल नाही म्हणणार कोणी पण वांग्याची करी आहे नक्की म्हणतात लोक..

आणि येस.. बाहेर जातोय तर थोडे व्हेजिटेबल्स घेऊन ये हे खूप जन म्हणतात.... बाहेर चालला आहेस तर थोडे व्हेजिटेबल , मिल्क आणि ब्रेड घेऊन ये...

ऐकायला तर मी "माझे हेअर एवढे फॉल होतात ना, फ्लोअरभर हेअरच हेअर होतात कोंब केले की" असे ऐकले आहे. पण ते क्वचित कुठेतरी. यावरून ही शहरातली बोली भाषा आहे असे म्हणता येणार नाही.

भाषेत बदल ओघाने होतात, असे शब्द कोंबून नाही.
यालाच मी मुद्दाम केलेली खिचडी म्हणतो.

-------
बाहेर चालला आहेस तर थोडे व्हेजिटेबल , मिल्क आणि ब्रेड घेऊन ये>>> या वाक्यातही व्हेजिटेबल आणि मिल्क हे कोंबलेले शब्द वाटतात.

मानव, सर्वनाम आणि क्रियापद सोडून बाकी बहुतेक सगळे इंग्रजी शब्द असलेली मराठी भाषा माझ्या कानवळणी पडली आहे. विशेषतः इंग्रजी माध्यमातले पाल्य आणि पालक असतील तिथे पाल्याशी बोलताना. अगदी आजी आजोबा पण अशीच भाषा वापरतात.

अगदी आजी आजोबा पण अशीच भाषा वापरतात.>> यात पुढच्या पिढीला दोष तरी कसा द्यावा. ज्यांनी भाषेचा ठेवा पुढच्या पिढीकडे सोपवायचा त्यांनीच ते काम केले नाही. याच प्रकारामुळे बोलीभाषांचा पण ऱ्हास झाला असावा.

यात पुढच्या पिढीला दोष तरी कसा द्यावा. ज्यांनी भाषेचा ठेवा पुढच्या पिढीकडे सोपवायचा त्यांनीच ते काम केले नाही. याच प्रकारामुळे बोलीभाषांचा पण ऱ्हास झाला असावा.
--
नवीन Submitted by वीरु on 24 March, 2021 - 09:37
>>>>
सहमत.

भरत, मी ही अशी भाषा ऐकली होती पण अगदीच थोडकी उदाहरणे होती. त्याचे प्रमाण एवढे आहे याची खरंच कल्पना नव्हती.

गावी आमच्याशेजारी एक काकू होत्या. त्या काही फार शिकल्या होत्या, इंग्रजी माध्यमातून शिकल्या होत्या अशातला भाग नाही, त्यांना इंग्रजी बोलताही यायचं नाही, पण त्यांना जेवढे इंग्लिश शब्द माहीत आहेत ते मराठीत, हिंदीत, मारवाडीत वापरायची सवय होती. म्हणजे पावसाची चिन्हे दिसली तरी, रेन येणार आहे वाटतं असे बोलणार.

तुम्ही म्हणताय तशी भाषा ही इंग्रजी माध्यमातून शिकल्याने पर्यायी मराठी शब्द माहीत नसल्याने/पटकन सुचत नसल्याने (उदा. रंग, फुलं, जनावरं, पक्षी यांची नावे, अवजारांची नावे इत्यादि) झालीय की वरील काकूंच्या उदाहरणाप्रमाणे घरात पालकांना जास्तीत जास्त इंग्रजी शब्द वापरण्याची हौस, अथवा पाल्य इंग्रजी माध्यमातून शिकतोय तर आपण त्याच्याशी जास्तीतजास्त इंग्रजी बोलायला हवे म्हणुन तशी भाषा वापरणे यामुळे झालीय हे सांगणे अवघड.
कारण बऱ्याच इंग्रजी माध्यमातून शिकलेल्या घरातून सुद्धा एवढ्या जास्त प्रमाणात मराठीत/हिंदीत इंग्रजी शब्दांचा वापर नसतो.

हाच प्रॉब्लेम पूर्वी फारसी शब्द मराठीत आले तेव्हा झालाच असेल की! शिवाजी महाराजांनी तर राज्यव्यवहार कोष बनवून घेतला, तरी अनेक फारसी शब्द मराठीतून गेले नाहीत. आजही आपण त्यांना मराठी समजूनच बोलतो. आणखी शंभर वर्षांनी असेच अनेक इंग्रजी शब्द मराठीत असतील आणि चिनी भाषेचं आपल्या भाषेत मिश्रण होऊ नये असा धागा myबोलीवर निघेल. तेव्हा इंग्रजी शब्दांचं कुणाला काही वाटणार नाही, जसं आत्ता फारसी शब्दांचं वाटत नाही.

हरचंद राज्य व्यवहार कोष बनवून घेतला म्हणजे आधी हे शब्द मराठीत नव्हते, त्या फारसी शब्दांकरता मराठी शब्द बनवल्या गेले असे ना? म्हणजे फारसी शब्द वापरात येऊ लागले आणि मग त्याला पर्यायी मराठी शब्द बनवून देण्यात आले. पण त्या शब्दांचा वापर सुरू झालेला असल्याने लोकांनी नंतर दिल्या गेलेले पर्यायी मराठी शब्द वापरले नाहीत. (हे बरोबर का?).

मला वाटते आपण बोलत आहोत ती परिस्थिती जरा वेगळी आहे. मराठी शब्द केवळ अस्तित्वात आहेत असे नाही तर सर्रासपणे वापरात / प्रचलीत आहेत, सहज कानी पडत असतात, ते डावलून इंग्रजी शब्द वापरणे, याबद्दल आपण बोलत आहोत.

अर्थात काही शब्द प्रचलीत असतानाही दुसऱ्या भाषेतील शब्द भारदस्त वाटत असल्याने / छोटे / सोपे असल्याने त्याठिकाणी घेतल्या जातात, पण त्यातही भाषेची एवढी खिचडी झालेली नसते.

मला वाटते आपले सर्वांचे बोलतानाचे मराठी वेगळे असते आणि लेख, कथा वगैरे साहित्य लिहितानाचे मराठी वेगळे असते. हे आपसूक घडते. जसे की त्याने कानोसा घेतला, तो अकस्मात आला, विस्मयचकीत झाला, जागीच थिजला, क्षणार्धात पलटला, भावनाविवश झाला, तो चित्रपट खरेच उत्कंठावर्धक होता, भयावह होता, ते दृश्य तो नजारा विलोभनीय होते... कित्येक शब्द असतील जे मी माझ्या मायबोलीवरच्या लेखात वापरतो पण ते प्रत्यक्ष बोलताना वापरत नाही. जेव्हा नवीनच लिहायला लागलेलो तेव्हा काही पुस्तकी शब्द बोलतानाही तोंडात येऊ लागलेले. पण मित्र त्यावरूनही खेचू लागले. कारण अचानक ते नाटकी बोलणे वाटू लागले.

असो. सांगायचा मुद्दा हा की कोणी आपल्या घरी वेजीटेबल, मिल्क आणि ब्रेड घेऊन ये बोलत असेल तर बोलू द्या ना. ईथल्या लोकांना त्यावर आक्षेप घ्यायचे काही कारण नाही असे मला वाटते. ईथे लेखात तसे शब्द वापरू लागले तरच तो आक्षेप असावा.

तरी लोकांची बोलीभाषा ईंग्रजाळलेली होतेय अशी चर्चा करायला हरकत नाही. पण त्याचवेळी हे सुद्धा लक्षात घ्यावे की आपणही मुलांना क कमळातलाच्या आधी ए फॉर ॲप्पल शिकवू लागलो आहोत. जांभळा करडा नारिंगीच्या जागी पर्पल ग्रे आणि ऑरेंज अशी रंगांची ओळख करून देऊ लागलो आहोत. चांगल्या वाईट सवयींना गूड हॅबिटस बॅड हॅबिटस बनवत कदाचित पुढची पिढी आपणच अमराठी घडवत आहोत आणि ईथे मराठीच्या नावाने गळे काढत आहोत.

त्यामुळे सर्वात आधी हे चेक करायला हवे की ज्यावर आपण आक्षेप घेतोय ते थोड्या प्रमाणात आपणही करत आहोत. फक्त जे जास्त प्रमाणात करत आहेत त्यांच्यावर ठपका ठेवत आहोत. पण आज नाही तर उद्या आपली पुढची पिढीही त्याच वळणावर जाणार आहे.

ईथे मराठीच्या नावाने गळे काढत आहोत.>>
खुपच गुळगुळीत झालेले वाक्य आहे हे.. अन्य भाषिकांच्या पण त्यांच्या मातृभाषेबद्दल अशा भावना असतील का??

सरसकट सगळे अन्यभाषिक माहीत नाही, पण बंगलोरमध्ये कन्नड खूप इंग्रजी-मिश्रित झाली आहे. तिथे पण म्हैसूरचे लोक बंगलोरवाल्यांना हसतात.

..भाषेचं फक्त महत्व म्हणजे कम्युनिकेशन...
समोरच्याला समजतंय ना.. मग बस की...

ही सवय फक्त मराठी भाषिकांचीच असते.. बाकी भाषेत लोक इतके लोड घेत नसावेत...
मारवाडी, हिंदी आणि तेलगू बद्धल नक्कीच माहीत आहे की असले प्रकार तिथे लोक करत नाहीत.. की शुद्ध बोला, हे इतर प्रांतीय शब्द नका वापरू वगैरे...
मराठी माणसांना फारच अभिमान असतो भाषेचा..
फक्त आंतरजालावर वाद घालण्यासाठी ...
मराठी नाटक, चित्रपट बघायला जाताना हा अभिमान कुठे जातो काय माहीत...
तेंव्हा यांना हिंदी चित्रपट किंवा साऊथ चे चित्रपट हवे असतात...

अन्य भाषिकांच्या पण त्यांच्या मातृभाषेबद्दल अशा भावना असतील का??
>>>>
मुळात मातृभाषा कश्याला म्हणावी?
ज्या मातृभुमीत म्हणजे राज्यात आपला जन्म झाला त्या भाषेला?
की आपल्याला जन्म दिलेल्या आईवडिलांच्या भाषेला? त्यातही आईवडील वेगळ्या भाषेचे असल्यास पुन्हा घोळ..
म्हणजे माझी आई मराठी आणि बाबा हिंदीभाषिक नॉर्थ ईंडियन असतील तर मी घरी बोलताना कुठल्या भाषेचा वापर जास्त करावा? आणि हे मीच ठरवावे की हा निर्णय माझ्यावतीने माझे आईबाबा घेतील?

मराठी माणसांना फारच अभिमान असतो भाषेचा..
>>>>
जे आपल्याकडे जन्मजात वा वडिलोपार्जित आहे त्याचा अभिमान बाळगणे सोपे पडते. फार श्रम करून कमवा आणि मग त्याचा अभिमान बाळगा असा उपद्व्याप करावा लागत नाही. ज्याचा अभिमान बाळगावा असे आयते मिळाले तर ते कोणाला नको असणार Happy
म्हणून मी त्या पुण्याच्या धाग्यावर लिहिलेले की मला हा अभिमान शब्दच मुळात फारसा आवडत नाही.

भाषेचं फक्त महत्व म्हणजे कम्युनिकेशन...
समोरच्याला समजतंय ना.. मग बस की...>>
इतकंच असतं का भाषेचं महत्व?
मग भाषेचा इतिहास, भाषेतील साहित्य, सीमाभागातल्या मराठी बांधवांचा महाराष्ट्रात येण्यासाठी चाललेला लढा, मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणुन चाललेले प्रयत्न... याला काहीच अर्थ नाही??

भाषेचं फक्त महत्व म्हणजे कम्युनिकेशन...
समोरच्याला समजतंय ना.. मग बस की...>
>>
अगदी अगदी. जस जेवायचं महत्व म्हणजे पोट भरणे, खाणाऱ्याला आरोग्यास हवे ते घटक मिळताहेत ना, मग बस की.
कशाला हवाय आस्वाद, पदार्थांचे छान सादरीकरण वगैरे.

कशाला हवाय आस्वाद, पदार्थांचे छान सादरीकरण वगैरे. >>> हे दुसर्‍या संस्कृतीच्या पाकशास्त्रातून घेतले तर मग तो गुन्हा ठरावा का? मला पुरणपोळीपेक्षा फ्रँकी जास्त आवडू लागली तर मी पुरणपोळीचाच वारसा जपावा असा हट्ट धरणे योग्य आहे का?

किंबहुना हे उदाहरण म्हणून वर आले आहे, ते सोडा.. पण भाषेप्रमाणे आपली खाद्यसंस्कृतीसुद्धा अभिमानाने जपली जावी का? आणि का?

जर उद्देश फक्त कम्युनिकेशन आहे तर आस्वादाचा प्रश्नच कुठे येतो?
तेव्हा ते आधी ठरवा काय ते.

तुम्ही फक्त मराठीचा आस्वाद घ्या, हिंदी, इंग्रजी, फ्रेंच, मल्याळम, उर्दुचा घेऊ नका असं ईथे कोणी म्हणत नाहीय.

बाकी तुम्ही पिझ्झा वरणात बुडवून खा, किंवा पुरणपोळी कॅबेज सुपात बुडबून खा आमचं काही म्हणणं नाही.

फक्त मराठी साहित्य जिथे अपेक्षित आहे तिथे तेवढं हे करू नका असं म्हणणं आहे.

बाकी तुम्ही पिझ्झा वरणात बुडवून खा, किंवा पुरणपोळी कॅबेज सुपात बुडबून खा आमचं काही म्हणणं नाही.
>>>
हाच तर सूर वाटतोय मला लोकांचा. हे असले खाणे चालणार नाही.

फक्त मराठी साहित्य जिथे अपेक्षित आहे तिथे तेवढं हे करू नका असं म्हणणं आहे.
>>>>
ईथे कुठले साहित्य अपेक्षित आहे हे ठरवायचा अधिकार ज्याला आहे ते बघून घेतील, आपण का लोड घ्यावा Happy
मला वाटले लोकं इथे मराठी भाषा कशी टिकवावी, जतन करावी, त्यासाठी काय गरजेचे आहे काय नाही वगैरे चर्चा करताहेत म्हणून मी त्या अनुषंगाने लिहितोय.

काल प्रभाकर पाध्यांन्चे तोकोनोमा पुस्तक वाचत होते. कितव्यांदा तरी . हे रूढ अर्थाने प्रवास वर्णन नाही. जपान बद्दलची इंप्रेशन्स, अनु भव असे आहेत. पण काय सुरेख भा षा. परिच्छेदामागून परिच्छेद कसदार लयदार मराठी. मन अगदी आनंदाने भरून येते. किती लेखकांनी मराठीच्या वेगवेग ळ्या रुपां मध्ये उत्तम लेखन व कला निर्मिती केली आहे. एकच भा षा अनेकानेक रुपांनी अनुभवता येते. ही संधी मला मिळते आहे ह्या बद्दल मी कृतज्ञ आहे.

जालप्रसिद्ध लेखक कवीं च्या कामाचे गुणात्मक मूल्यांकन व्हायला हवे. नाहीतर आहेच अर्धे हळकुंड.

>>ईथे कुठले साहित्य अपेक्षित आहे हे ठरवायचा अधिकार ज्याला आहे ते बघून घेतील, आपण का लोड घ्यावा>>
मायबोलीचा वाचकवर्ग म्हणून इथे आपल्याला काय अपेक्षित आहे सांगणे हे मायबोलीबद्दल वाटणार्‍या आपुलकीतून होते. हल्ली सगळे मराठी-इंग्रजी-हिंदी भेसळच बोलतात, समाजाचे प्रतिबिंब वगैरे स्पष्टीकरणं होणार असतील तर ज्यांना मायबोलीवर चांगली मराठी हवी आहे त्यांनी ते मांडणेही तितकेच गरजेचे. कुसुमाग्रज, बोरकर, माडगुळकर, पुल, तेंडुलकर यांची समृद्ध मराठी. ती मराठी भाषिक म्हणून आपणच सांभाळायची. त्यासाठी प्रयत्न करणे म्हणजे लोड घेणे कसे?
भाषेचे महत्व हे संवादासाठी. पण गप्पांच्या पानावर होतो तो संवाद आणि कथा, कादंबरी, कविता, ललित हे झाले लेखन. मायबोली ज्या उद्देशाने सुरु झाली ते बघता हे लेखन मराठीत असावे एवढीच अपेक्षा आहे.
इथे खाद्य पदार्थांबद्दल परकीय आहेत म्हणून कुणी आक्षेप घेतल्याचे मला तरी आठवत नाही. परक्या पाकृची ओळख इथे मराठीतून करुन दिली जाते तेव्हा नविनच माहिती/पदार्थ म्हणून कौतुकच होते.
सामवून घेणे वेगळे आणि समोरची व्यक्ती जाणून बुजून आक्रमक होत असताना ते सहन करत रहाणे हे वेगळे. दुसर्‍या भाषेतील काही शब्द, एखादे वाक्य हे सामावून घेणे झाले. ज्या लेखाबद्दल वाद सुरु झाला तिथे लेखनाच्या ओघात असते तशी सहजता नव्हती तर जाणून बुजून केलेला आक्रमकपणा होता.

>>> पण मराठी साइट वर मुद्दाम इंग्रजी तसेच हिंदी लिहण्यात काय मतलब आहे?!<<<
>>>मराठी( असे आमुचि मायबोली) साइट वर इंग्रजी/ हिंदी कंटें ट वाचायला येत नाही.<<<
>>बेअर मिनिमम शुद्धलेखन असावे. कंटेंट क्वालिटी चांगली अभिरुची संपन्न असावी इतकी अपेक्षा असते मात्र.<<<
>>>घ्यायला आवडते. एस्प. उगीचच हिंदी इंग्रजी झाडणार्‍या पब्लिकची. पण ते मजेतच. दुराग्रह नव्हे.<<<<<

हा प्रतिसाद अतिशय विनोदी आहे. मराठी लिहिताना, उगाच घुसडलेले ईंग्रजी व हिंदी शब्द याचा नमुना म्हणून खपेल.

लेख लिहिताना, लेखकाने जाणून बुजून केलेला आक्रमकपणा’च’ होता ह्या सिद्धांतावर कसे काय पोहोचले?
असे लेखकावर आरोप का?
ते हि, फक्त लेख वाचून का त्याने दिलेल्या प्रतिसादावरून?

Pages