बागकाम अमेरिका २०२१

Submitted by मेधा on 17 March, 2021 - 10:49

मने, उठ ! मार्च चा पहिला पंधरवडा उलटून गेला. नेहेमीच्या शिरस्त्याप्रमाणे तुमच्याइथला जगप्रसिद्ध फ्लावर शो संपल्यालाही आठ दिवस झाले असते. यंदा मार्चच्या पहिल्या आठवड्यात फ्लावर शो नाही. आसपास सगळीकडे फेब्रुवारीच्या अखेरीस झालेल्या हिम वर्षावाचे ढीग दिवसेंदिवस तसेच पडून होते. पण म्हणून हेलेबोअर्स आणि क्रोकसेस फुलायचे थांबले नाहीत. बर्फ वितळला तसे या फुलांच्या बरोबरीने अर्ली स्प्रिंग वीड्स जोमाने हजेरी लावू लागलेत. डॅफोडिलचे कंद माना वर काढतायत. ब्लू बर्ड्स आणि रॉबिन्स दिसायला लागलेत.
सेंट पॅट्रिक डे च्या मुहुर्तावर वाटाणे, बटाटे, कॉलिफ्लॉवर , स्प्रिंग सॅलडस लावायचे असतात. भाज्यांचे वाफे साफसूफ करणे , कुंपणाची डागडूजी करणे अशी कामे लवकर हातावेगळी करायची आहेत. बी- बियाणांचा पेटारा उघडून इन्डोअर सीड स्टार्टिंग ची तयारी करायला हवी.

तुमचे काय यंदाचे काय प्लान्स? नवीन काय ट्राय करणार ? बागकामाशी संबंधित कुठले इंस्टाग्राम अकाउंट / पॉडकास्ट आवडते आहेत ?
लिहा पटापट

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जे जे आपणासी ठावे ... चर्चा नेहमीप्रमाणेच छान !
इथे वाचून मटार लावायचा मोह होतोय. घरी नेहमी फ्रोझन आणते.
आता एक भा. किंवा अ. प्रश्न ! Happy
इं . ग्रो. दुकानांत जे हिरवे वाटाणे कडधान्य म्हणून मिळतात ते भिजवून रुजले आणि रोपाला दाणे आले (च) तर ते मटार असतील का ?
की घरचे मटार खाण्यासाठी बिया विकत घ्याव्या लागतील ? कृपया मार्गदर्शन करावे Happy

यावर्षी मार्चच्या शेवटच्या आठवड्यापासून हळूहळू बागकाम सुरु केले. सध्या खालील प्रमाणे पेरणी केली आहे.
वाफा १ - ३ ' x३': रेनबो चार्ड, साधा चार्ड आणि लेट्यूस. यात नंतर लेट्युसच्या जागी फरसबी
वाफा २- ३ ' x३' : लाल कांदे सेट्स आणि शेपू
वाफा ३- ३ ' x३' : स्ट्रॉबेरीज, लाल कांदे सेट्स
वाफा ४ - ४' x ४' : नेहमीचे मटार (अर्ली फ्रॉस्टी) आणि शुगर स्नॅप (ड्वर्फ ग्रे शुगर) , जोडीला लाल मुळा आणि पार्सली, यातच दोन काकडीची रोपे नंतर लावायला जागा मोकळी ठेवली आहे. मटार संपले की तिथे बटरनट स्क्वाश आणि झुकिनी लावेन.
वाफा ५ - ४' x 4' : केल, लाल मुळा, पालक , लेट्यूस

काल मास्टर गार्डनर्सच्या डेमो गार्डनची पाहणी अन साफ सफाई केली दोनेक तास. ते गार्डन चालवणारी बाई व्हरमाँटला चालली या महिन्याच्या शेवटी. तिला इतकं दु:ख होत होतं त्या गार्डन्चे प्लान्स आणि सामान सुमान दुसर्‍यांच्या हातात सोपवताना.

गेली दोन तीन वर्षे मी तिथल्या एडिबल लँडस्केप आणि हर्ब्स सेक्शन मधे काम करत होते.
एडिबल मधे स्ट्रॉबेरी , ब्लू बेरी, ब्लॅक बेरी चांगल्या स्थितीत आहे. र्‍हुबार्ब चं काही खरं दिसत नाही. केल एकदम जोमाने वाढत आहे.
पुढच्या आठवड्यात लेट्यूस, वाटाणे लावणार.
हर्ब गार्डन मधे पण रोझमेरी, लॅव्हेंडर, दोन तीन प्रकारचे मिंट , सेज आणि थाइम तग धरून आहेत. बाकीच्या गोष्टी परत लावाव्या लागणार.

घरच्या बागेसाठी नाही नाही म्हणता टॉमेटो, मिरच्या, कार्ले, दोडके, दुधी, भेंडी आणि अंबाडीच्या बिया घरातल्या घरात रुजवायला लावल्या . चार्डच्या बिया आणायच्या राहिल्यात.

येत्या आठवड्यात अंगणातच चार्ड, पालक, मुळा, अरुगुला लावीन म्हणतेय.

हेलेबोअर एकदम मस्त दिसताहेत. विशलिस्टवर आहे हे झाड आता.

धन्यवाद , स्वाती 2!
बघते बिया मिळतात का Lowes / Home Depot मध्ये ..
तुमचा प्लॅन तर एकदम मस्त आहे ! मेधा यांचाही!
मी बिया लावायचा प्रयत्नही करत नाही! नेहमीची यशस्वी तयार रोपं आणून लावते - रोमा , sweet 100 टोमॅटो , भोपळी मिरची , काकडी आणि वांगी !
यंदा पहिल्यांदाच फारसबीच्या बिया सूचनेबरहुकूम पेरल्या आहेत. २ दिवस झालेत. त्यांना अजून जाग आलेली नाही. तरी अजून आशेला वाव आहे Happy

@चंद्रा, हो ग्रोसरीतून हिरवे वाटाणे आणून ते भिजवून मोड आले कि पेरायचे, चांगले येतात.
एकदा आले कि मग त्यातलेच काही मटार झाडावर सुकू द्यायचे आणि पुढच्या वर्षी रोपांसाठी बिया म्हणून वापरु शकता. Happy

ग्रोसरीतून हिरवे वाटाणे आणून ते भिजवून मोड आले कि पेरायचे>>
अरे वा ! हे पण भारी आहे ! धन्यवाद मी पुणेकर !!
काल ऑर्डर करायला जमले नाही आणि घराबाहेर पडायचाही आळस केला. आज थोडे वाटणे भिजवून मोड आले की पेरीन.
फरसबीला कोंब आलेले दिसल्यामुळे उत्साह दुणावला आहे !
पुन्हा मटार लावण्यासाठी झाडावर सुकवायची टीप नोंद करून ठेवली आहे. फरसबीसाठीही वापरीन. Happy

मागच्या वर्षी काकड्या कमी आल्या आणि आल्या त्या बर्‍याच कडू निघाल्या.
म्हणून यावर्षी pahtenocarpic काकड्या ठरवल्या. याला फक्त मादी फुले येतात.
आता फुले भरपूर येत आहेत. पण फळ त्यामानाने कमी धरते आहे.
कुन्ड्या किचनच्या खिडकीत आहेत. भरपूर ऊन मिळते (आत्ता स्नो चालू आहे मात्र), कुंड्यांत potting soil आणि शेणखत आहे.
काय केलं तर जास्त फळे धरतील?

बनाना स्मुदी द्या रोपट्याला Happy केळ्याची साल २ दिवस पाण्यात ठेवून मग ते पाणी डायल्युट करून झाडाला घाला. केळ्याची साल तशीच पुरलीत एका बाजूला तरी चालेल.

गेले वर्षभर मी घरातल्या केळ्यांच्या साली गुलाबाच्या रोपांच्या मुळाशी टाकते आहे. त्यामुळे (च की काय) गुलाबाची रोपे यंदा जास्त हिरवीगार दिसत आहेत वगैरे विचार करत होते. पण वीकेंडला इकडे तिकडे फिरताना वावा , गॅस स्टेशन , छोटे मोठे स्ट्रिप मॉल सगळ्यांचे गुलाब एकदम फुलांनी डवरलेले दिसले. बहुतेक त्या झाडांना निगलेक्ट अँड एक्झॉस्ट ( लव्ह अ‍ॅण्ड फ्रेश एअर च्या चालीवर) जास्त मानवत असणार Sad

या वीकेंडला भरपूर बागकाम झालं - स्पायडर वोर्ट , ब्लॅक आय सूझन , डे लिलीज लावले. दुधी, दोडके, अंबाडी यांच्या बिया घरात रुजवल्या होत्या त्या काही उगल्या नव्हत्या . आता थेट अंगणातच काही बिया लावल्या. घरातली मोगरा कढीपत्ता अबोली जास्वंद मंडळी डेकवर आणायची होती पण दोन्ही दिवस ८५-९० डि फॅ होतं तापमान . त्यामुळे ते काम आज करणार संध्याकाळी

हो ना, मला पण झाडं बाहेर घ्यायची होती पण कायच्या काय टेम्परेचर होतं.

मी यंदा वेगळा बेड बनवून अ‍ॅस्परेगस लावलेत ते भारीपैकी उगवलेत, त्यात वीकेन्डला आपली ती ही मिळाली त्यामुळे आता आयुष्यात अचिव करण्यासाठी काही उरलंच नाही असं वाटतंय Proud

सूझन काकी ऐसपैस पसरतात बर्का. आयरिस पण किती भराभरा पसरतात, मला आता रोपं काढून वाटून टाकावी लागणारेत.

तीन महिने होत आले , काहीच अपडेट्स नाहीत Happy
यंदा टॉमेटोचं काही खरं नाही आमचाकडे. सान मार्झानो चं नाव बदलून मुरझानो करणारे. अगदी बारकी बारकी आणि वजनाला हलकी फळं येत आहेत. Shishito peppers ना पण दृष्ट लागली बहुतेक . गेली दोन वर्षे अगदी मस्त मिरच्या मिळत होत्या. यंदा एकच रोप उगवलंय अन त्यात पण एखादीच मिरची लागतेय.
दुधी, कारली, काकडी संगनमताने एकाच वेळी भरभरून फळं धरताहेत. आणि झुकिनी दिन दुनी रात चौगुनी न्यायाने वाढताहेत. इतक्या नेमाने आसपास वाटावे लागतात की आमचे शेजारी पाजारी आम्हाला टाळायला लागतील अशी शंका आहे.
ढोबळी मिरच्या मस्त उगवत आहेत. रायतं, पीठ पेरून भाजी असं आलटून पालटून चालू आहे .

माझ्याकडे शेजारणीने दिलेली जेटस्टार टॉमॅटोची २ झाडं कुंडीत लावलेली आहेत. ५ फुटांहून जास्त उंच झाली आहेत. अगदी गजरा करता यावा इतकी फुलं रोज येताहेत. पण एकही टॉमॅटो लागला नाहीये अद्याप Sad

टोमॅटोचं झाड हलक्या हातानं हलवत जा, पॉलिनेशनमध्ये मदत होते. ओळखितले एक जण सांगत होते टोमॅटोला खत दिलंच पाहिजे. मी पहिल्यांदाच रोपं मिळाली म्हणून २-३ लावलीत. टोमॅटो स्पेशल फर्टिलायझर आणायचा विचार आहे कारण फार काही टोमॅटो लागले नाहीत.

टोमॅटोचं झाड हलक्या हातानं हलवत जा, पॉलिनेशनमध्ये मदत होते >>> लगेच करून पाहिलं आहे. सीझन संपत आला असला तरीही टॉमॅटो आले तर चालतील मला. खत म्हणजे मिरॅकल ग्रो घालते त्याला नियमित. म्हणूनच बहुतेक फोफावली इतकी.

Pages