"ती खूप आरडाओरडा करतेय. घरी घेऊन जाऊ शकाल का तिला?" हे शब्द ऐकले आणि काळजीत पडलेले आम्ही हसायलाच लागलो. नवर्याने फोन ठेवला,
"डॉक्टर म्हणतायत, ’त्सुनामी इज व्हेरी व्होकल.’ ती जवळ येऊ देत नाही कुणाला. घरी घेऊन जा. तुमच्या हातून नाही खाल्लं तरच परत आणा."  ’त्सुनामी’ हो, खरंच आमच्या मांजराचं नाव  त्सुनामी आहे. 
प्रत्येकाने हातातली कामं टाकली आणि एरवी आवरायला तास न तास लागणारी (मी सोडून) आमच्या घरातली मंडळी अक्षरश: दहाव्या मिनिटाला हॉस्पिटलसमोर उभे होतो. कोविडच्या काळातच बाईंनी केलेले उद्योग नडले होते. आत जायला परवानगी नव्हती. अर्धातास बाहेर वाट बघत उभे होतो. त्सुनामीला पिंजर्यातून बाहेर आणलं आणि बराच वेळ पंधरा दिवस त्सुनामीची काळजी कशी घ्यायला लागेल ते ऐकत होतो. त्सुनामीही पिंजर्यात निपचीत पडून होती. मी काहीतरी प्रश्न विचारला आणि  पिंजर्यात गडबड उडाली. त्सुनामीने आतमधून धडका द्यायला सुरुवात केली. वाघाची मावशी तेवढ्याशा जागेत सैरभैर होऊन गुरकावत होती.
"आपला आवाज आत्ता ऐकला तिने. आता नाही राहणार ती. चला, निघूया." आम्ही भरधाव वेगाने घरी पोचलो. कधी एकदा त्सुनामीची सुटका करतोय, तिला खाऊ घालतोय, जवळ घेतो असं झालं होतं. पिंजर्याचं दार उघडलं आणि बिचारीला तिच्या गळ्याभोवती बांधलेल्या नरसाळ्यामुळे पटकन आमच्याकडे येताही येईना. लेकीने भरून आलेल्या डोळ्यांनी आपला तळवा पुढे केला. तिच्या तळव्यावरचं खाणं हावरटासारखं क्षणार्धात त्सुनामीने गट्टही केलं.
’शी इज नॉट लेटींग अस टच हर ॲड नॉट इटींग’, ’शी इज व्हेरी व्होकल.’ आम्ही सगळेच डॉक्टरांची वाक्य जशीच्यातशी म्हणून त्सुनामीने त्यांना कसं नको जीव करून सोडलं असेल याची कल्पना करत होतो, हसत होतो. एक दिवसही ती आम्हाला सोडून राहू शकत नाही, घरी आल्याआल्या कसं पटकन खाल्लं हे परत परत एकमेकांना सांगत होतो. तिच्या पुन्हा प्रेमात पडण्याच्या हा क्षण अवर्णनीय आहे. त्सुनामीच्या आमच्यावरच्या प्रेमाचा साक्षात्कार नव्याने झाल्यामुळे पुन्हा पुन्हा तिला जवळ घ्यायचा प्रयत्न करत होतो. तिला दोन आठवडे फिरण्याची, उड्या मारण्याची परवानगी नव्हती पण आम्हाला मात्र घरभर आनंदाने फिरावं, उड्या माराव्यात असं उत्कटतेने वाटत होतं. त्सुनामीला या सगळ्यातून का जावं लागलं हे सांगण्याआधी त्सुनामीचं आगमन आमच्याकडे कसं झालं ते सांगते.
"आणायचाच तर कुत्रा आणू तो माणसांवर प्रेम करतो. मांजरं फक्त  घरावर करतात." लहानपणापासून मांजरांना घर धार्जिणं हे ऐकलेलं.
"मांजरं स्वच्छ असतात. कुत्रे घाणेरडे." मुलीने पेचात टाकलं.
"असं असेल तर दोन्ही नको. इथे नियमपण खूप असतात." कुत्रा, मांजर की काहीच नको यावर बरीच चर्चासत्र झडली, गूगल चाचपणी झाली. लहानपणी आमच्याकडे खूप मांजरं होती, शेजार्यांचे किंवा आजूबाजूचे कुत्रे असायचे पण कायम वस्तीला असल्यासारखा प्राणी कधीच नव्हता. कोणता प्राणी येणार हे अखेर ठरलं. कुणाला तरी नको म्हणून किंवा त्यांचा छळ झाला म्हणून सुटका केलेल्यांपैकीच आणायचा हे मात्र एकमताने ठरलं होतं.  ’हयुमेन सोसायटी’ या संस्थेत शिरल्या शिरल्या कुत्रे आणि मांजरंच जिकडेतिकडे. मला पुन्हा कुत्रा हवासा वाटायला लागला. मांजरं तर काय आमच्याकडे होतीच लहान असताना पण माझ्या मनात हिचिकोचा पुतळा होता. मालकाचं निधन झाल्यावर त्याचा कुत्रा टोकियो स्थानकावर रोज ठरल्यावेळी वाट पाहत थांबायचा. हिचिको वारल्यावर तिथे आता त्याचा पुतळा आहे. मी तिथल्यातिथे मुलीला आणि नवर्याला कोपर्यात घेतलं.
"हे बघा आपण कुत्राच घेऊ."
"का पण? किती पटकन तू तुझी मतं बदलतेस." मुलगी एकदम माझ्या क्षणाक्षणाला बदलणार्या निर्णयांवर घसरली. आत्ता मला कुत्रा हवा होता त्यामुळे मी ते मनावर घेतलं नाही.
"मी मेल्यानंतर माझा पुतळा होण्याची कितपत शक्यता आहे?" मी दोघांच्या हृदयाला हात घातला.  निर्विकारपणे मुलगी म्हणाली.
"शून्य आहे अशी शक्यता. भलत्या आशेवर जगू नकोस."
"आम्हीच उभारू तुझा पुतळा. खूष?" नवरा आधीच मोठ्या मुष्किलीने कुत्र्या, मांजराचा वास सहन करत होता त्याला परिस्थितीतून पटकन सुटका हवी होती.
"ऐका ना. माझा नकोच पण माझ्या कुत्र्याचा पुतळा झाला तर चालेल."
"अच्छा अच्छा हिचिकोसारखं. आई, अगं त्याचा मालकपण किती प्रेमळ होता." घरात मुलगी असण्याचा आनंद पुन्हा नवर्याच्या चेहर्यावर झळकला. माझा कुत्र्याचा आग्रह बाजूला फेकला गेला.
मांजरामागून मांजरं आम्ही बघितली. सगळीच आवडत होती पण घ्यायचं एकच होतं. आम्हाला विल्सन आवडला. तसा अर्ज आम्ही भरला. हो. अर्ज. अगदी उत्पन्नासहित सर्व माहिती त्यात भरणं आवश्यक. आता एकदा का हा अर्ज कार्यकारिणीच्या डोळ्याखालून गेला की आलाच विल्सन आमच्याघरी असं म्हणत आम्ही घरी परत आलो.
"एका दिवसात कळवतो आम्ही." असं त्यांनी सांगितलं आणि आवश्यक गोष्टींची यादी हातात दिली.  तशी गडबडच उडाली. नवजात बालकाच्या आगमनासारखीच ही तयारी होती. डॉलर्सचा आकडा जसा वाढत होता तशी माझी कुरकूरही.
"आमच्याकडे मांजरं खोक्यात राहायची. गोणत्यात घालून आणायचो. दूध, पोळी जे घालू ते खायची. तुम्ही अमेरिकन फारच स्तोम माजवता प्रत्येक गोष्टीचं." माझं अमेरिकनत्व आणि भारतीयत्व मी सोयीप्रमाणे वळवते हा मुद्दा यायच्या आत मी विल्सनच्या गुणगानाला सुरुवात केली. सांगितलेलं सामान धावाधाव करून आणलं. आता प्रतिक्षा सुरू. फोन काही येईना. चौकशीसाठी फोन केला. उडवाउडवीची उत्तरं मिळाली. मोठ्या मुष्किलीने दोन दिवस वाट पाहिली. तिसर्या दिवशी मुलीने बाबाला विल्सनला आणायलाच पाठवून दिलं. बाबा हात हलवत परत आला. "विल्सन कुठे आहे?" एखादा मुलगाच आणायला गेल्यासारखं मला सारखं विल्सन नावामुळे वाटत होतं.
"नाही देत ते विल्सन आपल्याला." बाबा आता त्याचे फक्त हातच हलवत नव्हता, निराशेने मानही उजवीकडून डावीकडे, डावीकडून उजवीकडे वळत होती.
"का पण?" विल्सन आपल्या आयुष्यात येणार नाही या कल्पनेनेच मुलीच्या काळजाचे शतश: तुकडे झाले. "माझ्यामुळे." आता खरंतर मला वाईट वाटायला हवं होतं पण नवर्यामुळे काहीतरी बिघडलं याचा आनंदच झाला. कारणं मरू देत. मुलीच्या हातून आता तो काही सुटत नाही हे तर समोरच दिसत होतं. विल्सनला विसरून जुगलबंदीवर मी लक्ष केंद्रित केलं.
"तू काय केलंस?" मुलीचा स्वर बाबाने नेहमीप्रमाणे काहीतरी घोळ घातला असाच होता.
"मी प्रश्न विचारले होते त्यांना. आठवतंय?" बाबाने लेकीलाच विचारलं.
"काय विचारलं होतंस?"
"मला प्राण्यांच्या वासाने शिंका येतात असं सांगितलं होतं आणि खूप त्रास झाला तर विल्सनला परत आणून दिलं तर चालेल का असा प्रश्न विचारला होता. आठवलं?"
"हो. पण त्यांनी सांगितलं होतं तुमच्या शंका बिनदिक्कत विचारा. तुझी शंका बरोबर होती." मुलीने चक्क बाबाची बाजू घेतली त्यामुळे मलाही त्याचं बरोबर आहे हे पटलं.
"म्हणूनच विल्सन येणार नाही." तो पडेल स्वरात म्हणाला.
"तू भांडला नाहीस त्यांच्याशी? आपण किती तयारी केली." मुलीचा चेहरा एवढुसा झाला. आम्ही तिलाच एकदा त्यांच्याशी बोलायला सांगितलं. पंधरा वर्षाच्या मुलीचा आवाज ऐकून बहुतेक त्यांनाही पाझर फुटला. विचार करून उद्या कळवतो असं आश्वासन तिला मिळालं. अस्वस्थ मनाने लेकीने इतर ठिकाणं शोधून काढली. तिचं मन मोडायचं नाही, एवढासा झालेला चेहरा जरा फुलेल म्हणून आम्हीही मांजरं बघायला बाहेर पडलो.
"इथे ’विंडो शॉपिंग’ च करा नाहीतर दोन दोन मांजरं घरी. लगेच देणार नाहीत ना?" विल्सन येईलच घरी असं माझं मन सांगत होतं.
"बोका आणि भाटी अशी जोडी बिलकूल नको. नाहीतर त्यांची बाळंतपणं आणि मग पिल्लाचं काय असा प्रश्न पडतो." मी माझी भूमिका कधी नव्हे ती ठामपणे मांडली.
"पिलं नाही होणार. आधीच ऑपरेशन करतात." मुलीचं दांडगं संशोधन होतं तर.
"आणि लगेच नको आणायला. बघून ठेवू. विल्सनचं समजलं की ठरवू." मी पुन्हा पुन्हा हे सांगून तिच्या मनाची तयारी करत होते.
"तोपर्यंत एखादं मांजर आवडलं आणि  गेलं तर?" मुलीला आता काही झालं तरी मांजर हवंच होतं.
"सगळी सारखीच तर दिसतात. ते गेलं तर दुसरं." या विधानाने काय घोडचूक केली ते लक्षात आलं.  रंग, जाती, वागणं, दिसणं यावर चर्चासत्र झालं आणि त्यानंतरच आम्ही बाहेर पडलो.
या संस्थेत दाराशीच दोन मुली चेहरा पाडून बसल्या होत्या.
"बघ, बहुतेक त्यांच्या आई - बाबांना मांजर हवंय. दोघींना ओढून आणलंय त्यांनी. मला आणलंत तसं. " मी पुटपुटले."त्या मांजर परत करायला आल्यायत." मुलगी कुजबुजली. माझा जीव एकदम भांड्यात पडला. नाही म्हटलं तरी मांजराला आम्ही रुळलो नाही, मांजर आम्हाला रुळलं नाही तर काय ही चिंता होतीच.
"बाबाच्या शिंका वाढल्या तर आपल्याला काळजी नाही." मी निःश्वास टाकून म्हटलं.
"तुम्ही ’एशियन’ घ्यायच्या आधीच परत कसं करता येईल याचा विचार का करता? प्राण्यांना तरी सोडा यातून." यात मला कितीतरी मुद्दे चुकीचे दिसत होते. जसं ती सगळ्या एशियन्सना एकाच पारड्यात टाकत होती.  चायनिजांपेक्षा स्वत:ला उच्च समजणार्या भारतीयांचा घोर अपमान त्यामुळे होत होता. स्वत:ला कट्टर ’अमेरिकन’ समजत होती. मांजर महत्त्वाचं होतं म्हणून मी मांजरांच्या दिशेने तोंड वळवलं. वेगवेगळ्या रंगांची, आकाराची, चेहर्याची मांजरं बघताना प्रेमातच पडायला झालं. आता घरातल्या सर्वांनी एकाच मांजराच्या प्रेमात पडलं तर काही बिघडलं असतं का? लगेचच तिघांना तीन वेगवेगळी मांजरं आवडली.
"दादाला फोन करून दाखवून घे नाहीतर त्याचा पापड मोडेल." मी गुंता आणखी वाढवत होते पण लेकीने लगेच जाहीर केलं.
"तो कुठे आपल्याबरोबर राहतो. मांजर माझं आहे. मी कॉलेजमध्ये जाताना बरोबर घेऊन जाणार."
"आधी मांजर येऊ दे घरी मग कॉलेजमध्ये नेण्याच्या गोष्टी." लेकीच्या उत्साहाला आवर घालत आवडलेलं मांजर त्यांच्या पिंजर्यातून काढण्याचा, त्यांनी आम्हाला बोचकारण्याचा, म्याव करून रागारागाने बघण्याचा कार्यक्रम पार पाडला.
"हेच, हेच मांजरांचं मला आवडत नाही. फारच फिस्कारतात." मी अगदीच नाराज झाले.
"म्हटलं की करा प्रेम अशी नसतात ती कुत्र्यांसारखी. स्वत:चं मत असतं त्यांना." लेकीने मांजरांचं समर्थन केलं.
"मांजरांना? मला वाटलं फक्त तुलाच असतं स्वत:चं मत." मी हळूच पुटपुटले. तिने लगेच तिचं मत जोरात व्यक्त केलं.
"असायलाच हवं आणि ते मांडताही आलं पाहिजे. सापांनासुद्धा स्वत:चं मत असेल." मी बघतच राहिले.
"साप कुठे आला आता यात? मांजरं पुरे की." प्राण्यांचा मित्रमेळावा जमेल की काय थोड्याच दिवसात या कल्पनेनेच धास्तावले मी.
"मांजर अडवतं सापाला असं तू सांगतेस ना नेहमी म्हणून साप आठवला. तोही मांजराला विरोध करतच असेल ना?"
"मला नाही बाई माहीत. मी कधी त्याला बोलावलं नाही मुद्दाम हे तपासायला." माझ्या निरागस वक्तव्यावर ’मूर्ख कुठली’ असा तिने चेहरा केला आणि मांजराला जवळ ओढलं. फोटाफोटी झाली, दादाला फोटो पाठवून त्याला आवडेल ते मांजर घ्यायचा निर्णय झाला.
"इथपर्यंत यायचं आपण, बघायची आपण आणि फोटोवरून ठरवणार तो?" हा अन्याय होता पण लोकशाहीत मतदानाने जिंकता येतं त्यामुळे त्या एका मतावर तीन मांजरांचं भविष्य अवलंबून होतं.
"हनीबनी" लेकाने शिक्कामोर्तब केलं. मी मनातल्या मनात आनंदाने उड्या मारल्या. वरवर म्हणाले,
"हनीबनी काय किंवा तुम्हाला आवडलेली मांजरं काय. शेवटी एका प्राण्याला घर मिळणं महत्त्वाचं."
"खोटारडी." लेक पुटपुटली तरी ते ऐकू न आल्यासारखं केलं.
"उद्याशिवाय मिळणार नाही ना? अर्ज भरायचा असेल ना? विल्सनचंही समजेल तोपर्यंत." मी खात्री करणार त्याआधीच हे प्रश्न विचारायला लेक गेली आणि आली ती उड्या मारतच.
"लगेच देतायत."
"नको, नको. लगेच नाही नेता येणार आपल्याला. विल्सनलापण आणायचं झालं तर?" तीन माणसांच्या घरात दोन मांजरांचा धुमाकूळ मला  दिसायला लागला.
"ते बघू नंतर." हनीबनीला आता घरी न्यायचं हेच लेकीने ठरवलं. बोका आणि भाटी घरात येणार या धास्तीत मी असतानाच हनीबनी तिच्या परडीत विसावलीही. एवढुशी. चार महिन्यांची. कागदपत्र भरत असतानाच दिडशे डॉलर्स देऊ ना असं विचारत नवर्याने  पैसे भरलेही.
"मला वाटलं फुकट आहे."
"तुला सगळंच फुकट पाहिजे असतं." मुलीने हटकलं.
"कुणालातरी नको म्हणून आपण घेऊन जातोय ना." दिडशे डॉलर्स माझ्या डोळ्यासमोर नाचत होते.
"आपल्याला हवी आहे हनीबनी म्हणून आपण घेऊन जातोय ना." लेकीने खडसावलं.
"दिडशे काय, तीनशे दे. माझ्या बापाचं काय जातंय." मी म्हटलं. नवरा लगेच पुढे झाला,
"तुझ्या बापाचं गेलं तर तिला काही फरक पडत नाही." त्याने लेकीला समजावलं.
"बाप म्हणजे काय?" लेकीने शांतपणे विचारलं. उत्तर देण्यातला फोलपणा लक्षात आला आणि हनीबनीला घेऊन आम्ही निघालो.
घरी येऊन हनीबनीच्या कौतुकात आम्ही मग्न होतोय तेवढ्यात विल्सनच्या घरून फोन खणखणला. माझ्या काळजाचा ठोकाच चुकला.
"आता?" मी धसकून विचारलं.
"आधी बघा तर काय म्हणतायत." तेवढ्यात व्हिडिओ कॉलवरून हनीबनीचं कौतुक करण्यात मग्न असलेले पुत्ररत्न म्हणाले.
"न्या म्हणत असतील तर आणूया विल्सनलाही. एखाद्याच्या तोंडचा घास नको हिरावून घ्यायला." मांजरच नको म्हणणारी मी विल्सनलाही आणायला तयार झाले. मुलीला दोन- दोन मांजरं घरात येणार म्हणून अपरिमित आनंद झाला. तिनेच फोन घेतला. काय बोलणं चालू आहे हे तिच्या चेहर्यावरुन लक्षात येत होतंच.
"जाऊ दे. आपल्याकडे हनीबनी आहे ना." त्यांचा नकार तिला पचवता यावा म्हणून आम्ही म्हटलं आणि हनीबनीचं बारसं करू, नाव बदलू असंही सुचवलं. तिच्या मित्रमैत्रिणींना म्हणायला सोपं पाहिजे म्हणून मराठी नको हे जसं ठरलं तसं इंग्रजी नको हेही. नावाचा शोध सुरू झाला आणि अचानक  कधीतरी  त्सुनामी ठरलंही. पाहता पाहता त्सुनामी आम्हाला रुळली आणि आम्ही तिला. कुत्रा, मांजर कुणाच्या घरी पाहिल्यावरही नाकं मुरडणारे आम्ही त्सुनामीच्या प्रेमात पडलो. त्सुनामीच्या फिस्कारण्याचं, शेपटी हलवण्याचं, मागे मागे फिरण्याचं घरातल्या लहान मुलासारखं कोडकौतुक व्हायला लागलं. त्सुनामी लाडाने बिघडली आहे असं म्हणत एकमेकांकडे बोटही दाखवायला लागलो. कुत्रा आणि मांजर यांची तुलना अधूनमधून होत राहिली तरी ती उगाच एकमेकांना चिडवायला. त्सुनामीचं घरभर हैदोस घालत धावणं, तिच्या झाडावर सरसर चढणं, उंटासारखी पाठ करत आम्हाला तिच्याशी खेळायला लावणं यात रमून गेलो. पाहता पाहता वर्ष झालंही त्सुनामी आमच्या घरात येऊन.
सकाळी उठल्या उठल्या तिचं पायात येणं इतक्या सवयीचं झालं की ज्या दिवशी ती तशी आली नाही तेव्हा अगदीच अस्वस्थ व्हायला झालं. वाटलं, काहीतरी खाल्लं असेल, पोट बिघडलेलं दिसतंय. नंतर मात्र ती बसल्या जागेवरून उठेना. घाबरल्यावर प्रतिकारासाठी अंग फुलवतात तसं संपूर्ण शरीर फुललेलं. काय करावं कळेना. आम्ही डॉक्टरांकडे धावलो. एक्सरेतून तिने काय खाल्लं असेल ते काही कळेना. औषधं देऊन एक दिवस वाट पाहायचं ठरलं. रात्री आम्हाला उगाचच थोडं खातेय, बरी दिसतेय असं वाटत होतं. बहुतेक आमच्या मनाचं समाधान. तिने काहीतरी खाल्लं आहे हे नक्की होतं त्यामुळे ते काय या विचाराने हैराण झालो. ती पडलेलं काही खाईल अशी शक्यताच वाटत नव्हती कारण तसं आमच्या घरात प्रत्येकजण नीटनेटका असल्याने पसारा असा नसतोच. मग खालं काय, कुठे आणि कधी? उत्तर सापडत नव्हतं. दुसर्या दिवशी पुन्हा डॉक्टर. एका रात्रीत त्सुनामी इतकी हवालदिल झाली होती. हात लावू देत नव्हती, आवाज फुटत नव्हता. सकाळी माझ्या पायाशी येऊन बसलीच. डोळ्यात पाणी. आमचा जीव अगदी तुटला. अपराधीही वाटत होतं. आपल्या हलगर्जीपणामुळे तिच्या पोटात काहीतरी अडकलं ही भावना फार वेदनादायी. आता डॉक्टरांनी वाट पाहू असं सांगितलं तरी आम्हाला थांबवेना. आमच्या डॉक्टरनी हॉस्पिटलमध्ये न्यायला सांगितलं. कोविड१९ मुळे अर्थातच आम्हाला आत प्रवेश नव्हता.
एकदा तिला आत सोडल्यावर रात्री बारा वाजता नर्सकडून; शस्त्रक्रिया झाली आणि फोमचा तुकडा पोटातून काढला हे कळलं. हा फोमचा तुकडा कुठे होता या विचाराने आम्ही हैराण. विचार करकरूनही लक्षात येईना. त्सुनामीबरोबर जेव्हा तो तुकडाही आला तेव्हा सारा उलगडा झाला. अधूनमधून ती कोट, स्वेटरच्या क्लॉजेटमध्ये जायची. तिथे मायक्रोव्हेव कार्टच्या मागे फोमची चटई होती. त्सुनामी जेव्हा जेव्हा तिथे जाई तेव्हा ती चटई कुरतडत असणार. आम्हाला त्याचा पत्ताच नव्हता. मोठा तुकडा गेल्यावर कोणत्याच मार्गाने तो बाहेर पडेना. क्षकिरणांनीही (X - ray) काय खाल्लं ते कळलं नव्हतं. अखेर शस्त्रक्रिया हाच शेवटचा मार्ग होता. शस्त्रक्रियेचा खर्च ऐकताना क्षणभर मन द्विधा झालं होतं पण खर्चापेक्षा तिचा जीव वाचणं महत्त्वाचं होतं, वेदनामुक्त होणं आवश्यक होतं. विमा न घेतल्याचा पश्चात्ताप झाला. भारतातल्या मांजरांच्या अनुभवांवरून आम्हाला तशी गरजच वाटली नव्हती. तिथली मांजरं दिवसभर घरात नसायची हे आम्ही विसरलोच होतो.
"तिला घेऊन जा घरी. शी इज व्हेरी व्होकल ॲड नॉट लेटिंग अस टच." या वाक्याने आम्ही गहिवरलो तेवढ्यात पुढच्या
"तिने काहीतरी खाणं आवश्यक आहे. तुमच्या हातून खाईल. नाहीच खाल्लं तर परत आणा." या शब्दांनी आपल्या हातून नाही खाल्लं तर अशी भितीही वाटायला लागली. तिला परत आणतानाही तेच मनात होतं.
"काळजी करू नकोस आई. खाईल ती घरी आली की." लेकीने आश्वासन दिलं. घरी पोचलो. पिंजर्याचं दार उघडलं. त्सुनामीला तिच्या गळ्याभोवती बांधलेल्या नरसाळ्यामुळे पटकन आमच्याकडे येताही येईना. लेकीने भरून आलेल्या डोळ्यांनी आपला तळवा पुढे केला. तिच्या तळव्यावरचं खाणं हावरटासारखं क्षणार्धात त्सुनामीने गट्टही केलं आणि लेकीला, आम्हाला ती पुन्हापुन्हा चाटत राहिली. त्सुनामीच्या आणि आमच्या नात्यातले बंध नव्याने आम्हाला कळले आणि त्याक्षणी हजाराच्या आकड्यात केलेला तिच्या शस्त्रक्रियेचा खर्च अगदी क्षुल्लक वाटून गेला.
आमच्या त्सुनामीला इथे पाहा - https://mohanaprabhudesai.blogspot.com/
 
 
काय भारी आहे त्सुनामी ! मी
काय भारी आहे त्सुनामी ! मी बाहेर आत्ता एका छोट्या पगुला बघुन् आले. पग शांत असतात, पण मला मांजरी पण आवडतात. त्सुनामी देखणी आहे.
मोहना मॅडम, तुमच्या
मोहना मॅडम, तुमच्या नेहमीच्याच शैलीतलं खुमासदार लेखन अनुभवायला मिळालं..! वाचताना हसू फुटत होतं पण त्सुनामीची वेदना वाचून ते आपोआप विरलं. पण आता त्सुनानी ठीक आहे हे वाचल्यावर बरं वाटलं. फोटोतली त्सुनामी तर लेख वाचून झाल्यावर पाहिली परंतु ती हुबेहुब तशीच वाटली जेव्हा हा लेख वाचता वाचताच डोळ्यासमोर उभा राहिली होती
 पण आता त्सुनानी ठीक आहे हे वाचल्यावर बरं वाटलं. फोटोतली त्सुनामी तर लेख वाचून झाल्यावर पाहिली परंतु ती हुबेहुब तशीच वाटली जेव्हा हा लेख वाचता वाचताच डोळ्यासमोर उभा राहिली होती 
मस्त लिहिलंय!
मस्त लिहिलंय!
त्सुनामी गोड आहे.
मस्त खुसखुशीत लेख.... खूप
मस्त खुसखुशीत लेख.... खूप आवडला.
त्सुनामीला बघितले, आवडली सुद्धा. पण ती दिसतेय मात्र एशियनच 
   
   तिच्यासारख्या काळ्या पांढऱ्या मांजरी इथेपण दिसतात. मला उगीचच वाटत होते की अमेरिकन मांजरे वेगळी दिसत असतील...  आता वेगळी म्हणजे नक्की कशी देवाला ठाऊक, पण उगीचच वाटले होते खरे...
   तिच्यासारख्या काळ्या पांढऱ्या मांजरी इथेपण दिसतात. मला उगीचच वाटत होते की अमेरिकन मांजरे वेगळी दिसत असतील...  आता वेगळी म्हणजे नक्की कशी देवाला ठाऊक, पण उगीचच वाटले होते खरे...
कुत्रा, मांजर कुणाच्या घरी पाहिल्यावरही नाकं मुरडणारे आम्ही त्सुनामीच्या प्रेमात पडलो
मांजरे भुलीचा मंत्र टाकतात माणसांवर आणि गुलाम करतात. मी तर मांजर हेटर क्लबमध्ये होते, आता गेली काही वर्षे मांजरांनी मला पाळलेय...
रश्मी, DJ, देवकी, साधना
रश्मी, DJ, देवकी, साधना धन्यवाद. माझ्या मुलांना तर मी फक्त आता त्सुनामीच्याच प्रेमात आहे असं वाटतं.
 माझ्या मुलांना तर मी फक्त आता त्सुनामीच्याच प्रेमात आहे असं वाटतं.
रश्मी, पग म्हणजे कोण?
DJ - किती छान अभिप्राय आहे तुमचा.
साधना, मला पण इकडची मांजरं वेगळी असतील असं वाटायचं :-). माणसांना मांजरं गुलाम करतात, मंत्र टाकतात हे अगदी खरं
मस्त खुसखुशीत लिहिलेय .
मस्त खुसखुशीत लिहिलेय . त्सुनामी गोड आहे
सुंदर आहे त्सुनामी माऊ.
सुंदर आहे त्सुनामी माऊ. )तुम्ही लोक मावांना इतक्या पांढरेशुभ्र मेंटेन कसे करता? बाहेर धुळीत मळत नाहीत का?)
mi_anu, आमच्या इकडची बहुतांशी
mi_anu, आमच्या इकडची बहुतांशी मांजरं घरातच असतात त्यामुळे राहतो त्यांचा रंग टिकून.
अरे वा... मस्तच लिहिलंय..
अरे वा... मस्तच लिहिलंय..
त्सुनामी पण छान दिसतेय...
मांजरांवरचं लिखाण माझ्या एकदमच आवडीचं...
मस्त लिहिलंय. माऊ बघून आले.
मस्त लिहिलंय. माऊ बघून आले. क्युट आहे एकदम. मला छोटी पिल्लू वाटली होती वाचताना. अमेरिकेत मांजर आणायचं तर एवढे सोपस्कार असतात वाचून गम्मत वाटली. इकडे बरं असतं . शेजारी पाजारी पिल्लं झाली की सांगतात येऊन हवं ते घेऊन जा. लहानपणी मी कितीतरी पिल्लं घरी न सांगताच आणायचे आणि ती छान अंगणात ,शेजारी पाजारी आपोआप वाढायची. शेवटची मांजर आठवतेय तीच आणि माझं बाळंतपण एकाच दिवशी झालेलं.
मस्त लिहिले आहे...
मस्त लिहिले आहे...
अनु ऐकून आश्चर्य वाटेल की अमेरिकेत कॅट्स इंडोर फॉर लाईफटाईम असतात... किंबहुना, कॅट adopt करताना तो महत्वाचा क्लोझ असतो...
फॉर्म मध्ये तुम्ही लिहिले की आउट डोर नेणार आहोत कॅट ला तर अँप्लिकेशन रिजेक्त देखील होतात....
ओह, हे नवेच ऐकतेय
ओह, हे नवेच ऐकतेय
पण आमच्या सोसायटीच्या मांजरी तर कायम बाहेरच भटकत असतात
त्यांना अंगणात गेलेली चालत असेल ना माऊ?
<>>>तुम्ही लोक मावांना इतक्या
<>>>तुम्ही लोक मावांना इतक्या पांढरेशुभ्र मेंटेन कसे करता? बाहेर धुळीत मळत नाहीत का?)>>> mi_anu नी अगदी माझ्या मनातला प्रश्न विचारला आहे. लहानपणी उंबरठ्याच्या बाहेर न जाणारा आमचा स्नोई आता फूल्ल टू मातीत लोळून मळून येतो... मी विचारणारच होते की तुमचे माऊ इतके साफ कसे ???
आम्हाला तरी असं काही सांगितलं
आम्हाला तरी असं काही सांगितलं नव्हतं की घरातच ठेवा किंवा बाहेर सोडू शकत नाही पण माझी मुलगी बाहेर सोडायला तयार नव्हती. तेव्हा मी खात्री करून घेतली की घरातच राहिली तर चालतात का. बाहेर जात असतील तर त्यांना काही रोग होऊ नये म्हणून वेगळी औषधं मात्र वापरावी लागतात. इकडे मागे पुढे अंगण मोठं असतं आणि त्यातल्या हिरवळीवर रासायनिक घटकांचा वापर असतो म्हणून.
आपण नेहमी असं म्हणतो की मांजर घर विसरत नाही पण इकडे कितीतरी ठिकाणी मांजर हरवलं आहे अशी पत्रकं लावलेली दिसतात.
वर्णिता, लेखामध्ये
वर्णिता, लेखामध्ये गेल्यावर्षी तिला आणल्यानंतर झालेल्या
घटना आहेत आणि छायाचित्र हल्लीची अशी गफलत झाली आहे. तुम्ही लिहिलेलं वाचल्यावरच हे लक्षात आलं.