रंगणे कळले

Submitted by किमयागार on 17 March, 2021 - 03:10

*रंगणे कळले*

प्रवासातून जगण्याच्या जगाचे  वागणे कळले
कुणाची वीण होताना कुणाचे उसवणे कळले

जगाशी बोलल्यानंतर जगाची मौन ही भाषा
जरासे व्यक्त होताना जगाचे मागणे कळले

कधी गुर्मीत मीही तुडवली होती फुले त्याची
मला प्राजक्त झाल्यावर मुक्याने सांडणे कळले

तिथे त्या दूरच्या शिखरावरी झाला उगम माझा
दिले झोकून मी तेव्हा नदीचे वाहणे कळले

तुला माहीत नाही... जन्मतः रंगांध होतो मी
तुला मी पाहिले तेव्हा मलाही रंगणे कळले.

---- ©मयुरेश परांजपे ----
     

Group content visibility: 
Use group defaults