अ‍ॅडम-ईव्ह

Submitted by मुग्धमानसी on 12 March, 2021 - 08:44

किती विस्तिर्ण प्रदेश आपण पार करून आलोय बघ!
थोडी नजर खाली घे. थोडं जरा मागे बघ.

ते जे सारं दिसतंय ना... तो स्वर्ग होता!
हे हे इथं ठसलंय ना... तो स्वर्ग आहे!
माझ्या तुझ्यात विरला ना... तो स्वर्ग होता!
तुझ्या माझ्यात हसतंय ना.... तो स्वर्ग आहे!

इथं तिथं ही सुगंधाची नाचरी गोजिरी फुलं आहेत...
तू मी इथं तिथं... कित्येकदा धोधो हसलो होतो!
मधूनच कोवळ्या पालवीची लाजरी बुजरी वेलं आहेत...
मी तू कितीदा तरी... चोरट्या वाटांत फिरलो होतो!
ती तिथं करपट जाळी... तुझ्या माझ्या करवादण्यांची...
ही बघ इथं नुस्तीच खाई... खोल गहिर्‍या भांडणांची...
ते बघ तिकडे उगवले आहे अबोल्याचे घनदाट झाड!
आणि इथं... स्पर्शांच्या वटवृक्षाचा घेरदार घाट!

किती काही जमवलंय आपण! ताठ हो... थोपट जीव!
आपण विश्वाचे निर्माते... आपण आपले अ‍ॅडम-ईव्ह!

या विश्वाच्या सीमेवरती लावू मन्बंधाचे दार...
खुलेल जे माझ्या नी तुझिया आतूर ओल्या डोळ्यांआड....
येशील तू अन् मीही येईन... भेटू येथे भासांतून...
तू माझ्या स्वप्नांतून येशील... अन् मी अलगद श्वासांतून...

पण आता चल निघू इथून हे विश्व खरेतर मायाजाल
ओलांडून जाई तो पोचे दूर स्वत:शी... स्वत:पल्याड!

प्रवास झाला दैवी सुंदर.. अंत नको हा असा हताश
चल गाऊ ते अल्लड गाणे, फेकून देऊ सगळे ’काश’!

तुला मला मी, मला तुला तू ओलांडून जाताना पार...
बघ तर अपुली उंची आता भेदत जाते गगनापार!
आपुल्यापासून अपुल्यामधले अपुले सारे टिपताना
अपुल्यामधूनी निघून आपण अपुल्यापल्याड जाताना...
सुंदर झालो आहो आपण! आणि खूपसे मनस्वीही!
पुढच्या वाटांवरती पेरू समृद्धीचे ओजसही!

निघू अता हे अमृत घेऊन शहाण्या अथांग वाटांनी
पत्रे लिहीन मीही तुला आतूर अनावर लाटांनी...

त्या उंच माणसांच्या विश्वाने तुला खरोखर उचलावे
तुला मनोरम बघताना मी पुन्हा स्वत:ला विसरावे!

जो प्रवास केला... तो माझ्या हृदयाशी अथांग जपताना
मी म्हणेन माझे जगणे झाले दैवी... अखेर निजताना!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

अतिशय सुंदर लिहिता तुम्ही! वेगळीच उंची आणि तितकच खोल! अनेक धन्यवाद आणि शुभेच्छा!
पुढील लिखाणाच्या प्रतीक्षेत _/\_

अशक्यप्राय सुंदर शब्दरचना आहे.

आपुल्यापासून अपुल्यामधले अपुले सारे टिपताना
अपुल्यामधूनी निघून आपण अपुल्यापल्याड जाताना...
सुंदर झालो आहो आपण! आणि खूपसे मनस्वीही!
पुढच्या वाटांवरती पेरू समृद्धीचे ओजसही!

अगदी कल्पनेपलिकडचे लिखाण. नावाप्रमाणेच मंत्रमुग्ध करणारे.

काय तरल कविता आहे. खूप सकारात्मक. खरं तर नादमाधुर्य आहे तिला. मोठ्यांदी (हा शब्द बरोबर आहे का?) वाचावी अशी.