ओल्या काजूगरांची परतून भाजी (कोरडी)

Submitted by वावे on 10 March, 2021 - 04:43
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

ओले काजू - अंदाजे दीडशे ते दोनशे नग
बटाटा -१
हिरवी मिरची -१
फोडणीचं साहित्य,
कढीलिंब, कोथिंबीर, ओला नारळ वगैरे.

क्रमवार पाककृती: 

ओले काजूगर म्हणजे काजूच्या ओल्या/हिरव्या बिया सोलून आतले काढलेले गर. हे ताजे याच सीझनमध्ये मिळतात. कोकणात मिळतातच. पण मला यावर्षी चक्क बंगळूरला मिळाले. दापोलीहून थेट पार्सल! ते वाळवलेले आणि त्यामुळे टिकाऊ आहेत. पण तरीही धीर न निघाल्यामुळे आज पार्सल मिळाल्यामिळाल्या लग्गेच भाजी केली.
त्यांनी पाकिटाबरोबर दिलेल्या सूचनांनुसार उकळत्या पाण्यात ते काजूगर अर्धापाऊण तास भिजवून ठेवले. जरी ताजे, ओले असतील तरी गरम पाण्यात घालून ठेवणं अत्यंत आवश्यक आहे कारण त्यांना चीक असतो, तो निघाला पाहिजे.
भिजलेले काजूगर सोलून घेतले.
IMG-20210310-WA0001.jpg
बटाट्याच्या काचऱ्या चिरून घेतल्या.
फोडणी करून त्यात कढीलिंब, हिरवी मिरची घातली आणि आधी बटाट्याच्या फोडी घातल्या. त्या परतून शिजत आल्यावर काजूगर घातले. थोडा वेळ परतून झाकण ठेवून एक वाफ काढली, मीठ घातलं. झाली भाजी. खूप शिजवायची नाही. वरून सढळ हस्ते ओला नारळ 'मस्ट' आहे. कोथिंबीर असल्यास तीही घालावी.
ही भाजी पोळीबरोबर, ताकभाताबरोबर छान लागते. नुसतीही खायला छान लागते. नुसते सोललेले काजूगरही तसेच खायला छान लागतात. सोलता सोलता एकीकडे खाल्ले जातातच.

वाढणी/प्रमाण: 
चौघांना पुरते
माहितीचा स्रोत: 
आई
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नवीन रेसिपी माझ्या साठी.. पाहिले नाहीत आणि खाल्लेही नाहीत....रेसिपी छान आहे..फोटो पण एकदम तोंपासु Happy

भारीच.
चीक हाताला लागू नये म्हणून काय करावे?

नवीन रेसिपी माझ्या साठी.. पाहिले नाहीत आणि खाल्लेही नाहीत....रेसिपी छान आहे..फोटो पण एकदम तोंपासु >>>>>+११११

वावे, झकास दिसतीय डिश.

काजू बी फोडून त्यातून काजू गर काढताना चीक उडतो, बोटांना लागतो, चेहेऱ्यावर ही उडतो, काजू बीशी शरीराचा स्पर्श झालेल्या प्रत्येक ठिकाणी उततो. पण एकदा गर काढून वेगळे केले की ते हाताळताना चीक लागत नाही फारसा आणि उतण्याचा धोकाही उरत नाही. गरम पाण्यात थोडा वेळ घालून ठेवावेत आणि मग साले काढावीत. इकडे विकायला येतात ते बहुतेक वेळी कोवळे गर सुकवून ठेवलेले असतात. विकायला आणताना आधी भिजवून ठेवतात. हिरवी बी फोडून नुकतेच काढलेले ताजे कोवळे सोललेले गर किंचित पोपटी दिसतात. आणि डिंकामुळे कडांना काळसर दिसतात.

सगळ्यांना धन्यवाद!
देवकीताई, दीपशीला फार्म्स, गिम्हवणे, दापोली असा पत्ता आहे! स्पीडपोस्टने पार्सल पाठवतात. इथे एक काकू आहेत त्यांच्याकडे मराठी पदार्थ मिळतात, त्यांच्यातर्फे मागवले.

हीरा+१ हाताला फारसा चीक नाही लागत. गरम पाण्यात मात्र नक्की घालून ठेवायचे थोडी वेळ.
VB, चिवचिवीत हा शब्द पहिल्यांदाच ऐकला Lol
मला मऊ उसळीपेक्षा ही भाजी आवडते, पण त्यापेक्षा जास्त म्हणजे नुसत्या बिया कच्च्या खायला आवडतात. Wink

हर्पेन, Happy
किल्ली, नाही, मी दोन पाकिटं मागवली. एक शिल्लक आहे. Wink
मृणाली, हा बघ न सोललेल्या काजूगरांचा फोटो. हे वाळवलेले आहेत. भाजलेले नेहमीचे सालासकटचे काजूगर दिसतात, तसेच दिसतात जवळजवळ.
IMG-20210310-WA0006.jpg

वावे , गावाकडचा शब्द आहे हा रस्सा भाजीला ☺️
भाजी कोरडी करायची नाही अन खूप पातळ पण नको असेल तेव्हा थोडी चिवचिवीत करायची म्हणतात.

गावी काजूबागेतून फिरत मुरटे खाऊन बिया चुलीत टाकायचो मग ती फोडून आतला गर खायचा हा प्रकार लहानपणी केलाय. कोवळा गर नुसताच खाल्ला की पोटात दुखते म्हणून खाऊ द्यायचे नाहीत कोणी

आमच्या घरी काजू सोलणार्या माणसावर लक्ष ठेवायला अजून एक माणूस गुंतवून ठेवला तरच उसळ मिळेल अशी गत असायची इतके ते काजू नुसतेच संपायचे!
मे महिन्यात आईकडे गेलं की पहिल्या जेवणातच आमरस, उकडगरे, ओल्या काजूची उसळ, वर्षभरात मुरलेले पण खाऊन संपत आलेलं आंब्याचं लोणचं असा जोरदार थाट!

छान रेसिपी ...!
भाजीचा फोटो मस्तच दिसतोयं..!

वावे,
मस्त, आमच्याकडे सेम अशीच करतात. या वेळेस मात्र आणणार कुठुन आणि कोण त्यामुळे होणार नाही भाजी असं वाटतंय.
मी ओले काजुगर फ्रीझर ला न सोलता ठेवते. २-३ महिने तरी नक्की टिकतात.

वावे मस्त रेसिपी..
आमच्याकडे गोडा मसाल्याचे वाटण आणि बटाटा टाकून थोडी रस्सा असलेली भाजी बनवतात ओल्या काजूची.. आता या रेसिपी ने पण ट्राय करू..

भारी !
जुईने लिहिलेय तशी भाजी आमच्याकडेही करतात .या रेसिपीने एकदा करून बघितलं पाहिजे

सगळ्यांना धन्यवाद!
झंपी, अशी करून बघते एकदा.
देवकीताई, असा गोड प्रकार कधीच खाल्ला नाही!
प्रज्ञा, VB, साक्षी, Happy
ओले काजूगर हवे असतील तर दापोलीच्या बाजूला कुणी ओळखीचं असेल तर मी वर दिलेल्या नावाची चौकशी करून पहा किंवा मला संपर्कातून मेल करा, मी फोन नंबर देईन त्यांचा. मला आवडली त्यांची सर्व्हिस. Packing पण व्यवस्थित होतं.

मी फोन नंबर देईन त्यांचा.>> इथेच तुमच्या पोस्टच्या खाली त्यांचे नाव आणि नंबर द्या ना...... बहुतेक चालावे. अ‍ॅडमीन ना एकदा विचारुन बघा......

रेसिपी छान आहे, काजूचे गोड पण छान लागते.

काल सावंतवाडीच्या बाजारात 3 रुपयाला एक ओला काजू हा भाव होता. रेसिपीत दीडशे ते दोनशे काजू वाचून धस्स झाले Lol

काजूगर नसतील तर नुसतेच काजू वापरावेत का...
काजू मटार खोबरं उसळ करते..हे नवीन आहे. शिवाय खूप स्निग्ध होते का?? छान रेसिपी .

काजूगर नसतील तर नुसतेच काजू वापरावेत का...>>>

सुकलेले नेहमीचे काजू भिजवून करता येते उसळ. हे म्हणजे दुधाची तहान ताकावर..

Pages