भांड्याना कल ssss य (कल्हई )

Submitted by मनीमोहोर on 10 March, 2021 - 03:41

काल माझ्या मैत्रिणीने ठाण्याला नौपड्यात कल्हई वाला कुठे बसतो ह्याची चौकशी केली आणि माझे मन नकळतच त्या दिवसात पोचले.

आमच्या लहानपणी घरोघरी पितळ्याची भांडी, ताटं वाट्या वैगेरे वापरात असत. रोज रोज पत्रावळी लावायला नकोत, चुकून तिची चोय घशात अडकू नये म्हणून काळजी घ्यायला नको. द्रव पदार्थ जमिनीवर वहात जाण्याची ही भीती नाही , घासलं की स्वच्छ असे अनेक फायदे लक्षात येऊन गावाला जेव्हा आम्ही पितळ्याची ताट वाट्या घेतल्या तेव्हा फार श्रीमंत झाल्याचं फीलिंग आलं होतं म्हणे. त्याकाळी स्टील एवढे सहज उपलब्ध ही नव्हते. स्टीलची फुलपात्र लग्ना मुंजीत आहेर म्हणून येत असत आणि त्याच तेव्हा अप्रूप ही वाटत असे. पितळ्याच्या भांडयांचा एक तोटा म्हणजे आंबट पदार्थ त्यात शिजवले तर कळकत असत आणि खाण्याच्या उपयोगी रहात नसत . भांड्याना कल्हई करून घेणे हाच एकमेव उपाय होता त्यावर .

भांड्याना कल sss य अशी जोरदार आरोळी ऐकली की आम्ही मुलं फारच उत्साहित होत असू. आमचा मुक्काम तिथेच असे. एकदा आला कल्हईवाला की त्याला दिवसभर काम पुरेल एवढं गिऱ्हाईक एकाच ठिकाणी मिळत असे कारण सगळ्यांकडेच पितळ्याची भांडीच असत वापरात. दुपारचं जेवण ही तिथेच होत असे त्यांचं. आमची आई देत असे जनरली त्याना जेवण. कमीत कमी दोन तरी माणसं लागतातच ह्या साठी .एक भट्टी फुलती ठेवायला, दुसरा मुख्य काम करायला. बहुदा नवरा बायको चीच जोडी असे , त्यांची मुलं ही असत बरोबर ... ती भांडी आणण्या पोचवण्याच्या लिंबू टिम्बु कामावर ...

पहिल्यांदा एक अगदी छोटासा खड्डा जमिनीत खणून त्यात भट्टी बसवली जाई. त्यावर कोळश्याची खर घालत असत. एका बादलीत पाणी, छोट्या डबीत नवसागरची पूड, एक फडकं, कल्हईची म्हणजे कथलाची कांब अशी पूर्व तयारी झाली की भट्टी पेटवून मुख्य कामाला सुरुवात होई. भट्टीवर पातेलं ठेवून ते चांगलं सणसणीत ( योकू च्या सणसणीत तापलेल्या लोखंडी कढई ची आठवण येणं अपरिहार्य आहे ) तापलं की थोडं स्वच्छ केलं जाई, काळे डाग घालवले जात आणि मग त्यावर नावसागराची पूड टाकली जाई . ती टाकता क्षणी भांडे धुराने भरून जाई. लगबगीने त्यावर अगदी थोडी कथलाची कांब फिरवून मग फडक्याने तिचं कोटिंग सगळ्या पातेल्यावर चढवत आणि शेवटी ते पातेलं पाण्यात बुचकळून गार केलं की झालं तयार पातेलं कल्हई लावून. लगेच दुसरं पातेलं हातात... आम्ही मुलं अक्खा दिवस तेच बघण्यात घालवत असू. दिवसाच्या शेवटी हिशोब ठिशोब होऊन दोन पैसे पदरात पडत असत त्यांच्या.

काळ पुढे सरकत होता. स्टील स्वस्त आणि मुबलक मिळू लागल्यावर कल्हई करण्याची गरज नसलेली तीच भांडी पुढे सोयीची वाटू लागली. नंतरच्या काळात मग नॉनस्टिक, कॉपर बॉटम, हार्ड अनोडाईज्ड , मायक्रोवेव्ह सेफ काचेची , अशी अनेक तऱ्हेची भांडी बाजारात आली . सण समारंभासाठी घरात अन्न शिजवणे मागे पडून बाहेरून अन्न मागवणे सर्रास रूढ झाले आणि घरोघरची पितळ्याची भांडी माळ्यावर तरी जाऊन बसली नाहीतर मोडीत तरी गेली.

आता कल्हई ला मागणीच नाही तर ते पिढीजात कल्हईचा व्यवसाय करणारे काय करत असतील ? कसा करत असतील आपला उदरनिर्वाह ? व्यवसायाची लाईन बदलली असेल का त्यानी ? हातात दुसरे स्किल नसताना नवीन व्यवसायात कसे रुजले असतील ते अश्या अनेक विचारांनी माझ्या मनात गर्दी केली.

माझा मुक्काम सध्या सातारला आहे आणि मी रहाते ती लेन अगदीच छोटी , वर्दळ नसलेली अशी आहे. पण काय योगायोग पहा .. कल्हईची भांडी आहेत का , असली तर काढा , पलीकडे भट्टी लावलीय म्हणून एक बाई मला गेटवर उभी राहून सांगत होती. माझ्या मनात कल्हई चा विचार येतो काय आणि दारात कल्हई वाली उभी ! मी फारच थिर्ल्ड झाले. क्षणाचा ही विलंब न लावता सध्या माझ्याकडे असलेल एकुलत एक पितळी तसराळ घेऊन मी तिथे गेले. तेवढ्यात व्हिडिओ ची कल्पना सुचल्याने धावत येऊन फोन घेतला. सगळी प्रोसेस व्हिडिओत कैद केली. बघता बघता माझं तसराळ चांदीचं असल्या सारखं चमकू लागलं. ती आणि मी दोघी ही खुश झालो.

ठरल्या पेक्षा दोन पैसे मी तिला जरी अधिक दिले तरी तिने मला दिलेला आनन्द त्या पेक्षा किती तरी पटीने मोठा आहे ह्यात शंका नाही.

व्हिडीओ खूप छान आहे पण अपलोड होत नाहीये तेव्हा फेसबुक ची लिंक देऊ का इथे ? चालेल का ते ?

ही लिंक फेसबुकची
https://m.facebook.com/story.php?story_fbid=4023409081032164&id=10000089...

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आमच्या घरी "कल्हई मारणे" याला वेगळा अर्थ होता.
एखादा खाद्यपदार्थ खूप स्वादिष्ट झाला तर ज्या भांड्यात तो केला जायचा ते देखील चाटून पुसून स्वछ होत असे. Happy

त्यामुळे मी कल्हई मारतो असे म्हटले तर तो खाद्य पदार्थ खूप आवडला अशी आईला पोच पावती मिळायची.

Pages