महिला दिनानिमित्त - आजीबाई बनारसे (लंडनच्या आजीबाई)

Submitted by आस्वाद on 9 March, 2021 - 01:07

**स्पॉइलेर अलर्ट **

गेल्या वीकेंडला शेवटी शकुंतलादेवी पाहिलाच. सिनेमा ठीकठाक. शकुंतलादेवींचं आयुष्य बटबटीतपणे दाखवलंय, असं वाटलं. खूपच बॉलीवूड स्टाईल आहे. शिवाय विद्याची ओव्हर acting! असो. पण त्या निमित्ताने मला एका आदरणीय व्यक्तिमत्वाची आठवण करून दिली.

तर... शकुंतला देवी पहिल्यांदा लंडनला गेल्या तेव्हा त्या अगदी शाळकरी वयाच्या होत्या.त्यावेळी त्या रहायला होत्या आजीबाई बनारसे यांच्या बोर्डिंग मध्ये. सिनेमा मध्ये एक ताराबाई नावाचं पात्र आहे लंडनच्या घर मालकिणीचं. ताराबाई म्हणजेच आजीबाई बनारसे, असं मला वाटतंय. आता या मराठमोळ्या आजीबाई लंडनला कशा पोहचल्या, याची ही थोडक्यात सुरस कहाणी.

साधारण १९१० च्या आसपासचा काळ. यवतमाळ जवळच्या चौंडी नावाच्या गावी राधाबाईचा जन्म झाला. शे- दोनशे लोकांची वस्ती असलेलं चौंडी राधाबाईंच्या आजोबांनी वसवलं होतं. वस्तीवरचे सगळे त्यांचेच जातभाई. इतकं दुर्गम आणि लहान गाव की शाळा, दवाखाना इ काहीच नव्हतं. शिवाय गरिबी पाचवीला पुजलेली. सगळेच शेतकरी, कास्तकरी. १९१८ कॉलराची साथ आली. लहानशा चौंडीवरही पसरली आणि थोडेच दिवसात अर्धी वस्ती घेऊन गेली. राधाबाईचे आई-वडील दोघंही दगावले. राधाबाई मोठी. पाठच्या भावंडांना सांभाळण्याची जबाबदारी लहानग्या राधाबाईवर पडली. मोठा आणि पाठचा भाऊ शेतावर जाऊ लागले आणि राधाबाई घर सांभाळू लागली. त्याकाळी ८-९ वर्षांच्या मुलींची सर्रास लग्न होत. घरात कोणीच वडीलधारे नसल्याने राधाबाईचं लग्न लांबणीवर पडलं. २-३ वर्षांनी साथीतून वस्ती सावरू लागली तशी वस्तीवरच राहणाऱ्या प्रेमळ आत्या राधाबाईचं लग्न ठरवायला घराबाहेर पडली.

१२-१३ वर्षांच्या राधीला तिन्ही स्थळांकडून होकार आला. पण त्याही वेळेस पुढाकार घेऊन न लाजता राधाबाईने तिला कोणतं स्थळ पटलंय, ते आत्याला अक्ख्या वस्ती समोर सांगितलं. राधाबाईला यवतमाळच्या तुळशीराम डेहणकर आणि त्यांच्या आईने भुरळ पाडली. तुळशीराम डेहणकर हे पस्तीशीचे विधुर. आणि त्यांची आई म्हणजे त्याकाळी भाजीमार्केटमध्ये स्वतःचे फुलांचे दुकान चालवणारी 'फुलवाली बुढी'. ही फुलवाली बुढी एका हाती सगळा व्यवसाय, वावर, घर सगळं सांभाळायची. स्वभावाने अतिशय कजाग. पण मोठी कर्तबगार. आपल्या स्वतःच्या घोडागाडीतून स्वतः मार्केटमध्ये ये-जा करायची. नवरा आणि दोन्ही मुलं तिच्या आज्ञेत होते. तुळशीरामांचं लग्न होऊन बायको वारली होती. तिला कोणीच मुलबाळ झालं नव्हतं. आजूबाजूचे लोक म्हणायचे, सासूनेच मारलं सुनेला पोरंबाळं होत नव्हते म्हणून तर कोणी म्हणायचं सासूच्या जाचाने तिने आत्महत्या केली. त्यामुळे सधन असले तरी अशा सांगोवांगीच्या अफवांमुळे राधाबाईच्या आत्याला मात्र ते स्थळ मुळीच पसंत नव्हतं. पण राधाबाईने हट्टाने तिथेच लग्न करायचा निर्णय जाहीर केला. शेवटी राधाबाईच्या हट्टासमोर आत्याने आणि वस्तीवरच्या वडिलधाऱ्यांने नमते घेत तिचं लग्न लावून दिलं.

लग्न झाल्यावर राधाबाईला लगेचच मुलगी झाली. सासूला सून आणि नात कुठे ठेऊ आणि कुठे नाही, असं वाटू लागलं. नातीच्या जन्माने लोकांची तोंडं बंद झाली होती. धाकट्या मुलासाठी तालेवार मुली सांगून येऊ लागल्या. राधाबाईही आनंदात होती. माहेरच्या, भावंडांच्या आठवणीने ती व्याकुळ होई, पण सासू कितीही कौतुक करत असली तरी माहेरच्या लोकांशी मात्र संबंध ठेऊ देत नव्हती. भावांना आल्या पावली परत पाठवी. त्यात राधाबाईला लागोपाठ ५ मुली झाल्या आणि धाकट्या जावेला २ मुलं. मग तर सासूला गरीब घरची, फटकळ राधाबाई अगदीच नकोशी झाली. या सगळ्याने तुळशीरामांची तब्येत खालावली आणि त्यातच त्यांनी राम म्हटला. राधाबाईवर ५ मुलींची सगळी जबाबदारी पडली. पैकी मोठ्या लेकीचं लग्न सासूने ती ५ वर्षाची असतानाच लावून दिलं होतं. आता ४ मुलींना कसं पोसायचं, या विचाराने राधाबाई हवालदिल झाली. जवळ ना पैसा, ना अडका, ना शिक्षण, ना कुठला आधार. नवर्याच्या आजारात सगळा पैसा ओतला होता. पुढेमागे ४ मुलींची जबाबदारी आपल्यावर येईल हे ओळखून दीर सरळ त्यांना घराबाहेर काढायला निघाला. राधाबाई पडेल ते काम करून आला दिवस ढकलू लागली. कधी चार घास मिळायचे तर कधी ते हि नाही.

पण मुलींची वयं वाढत होती. कायदे करून परिस्थिती काही सुधारली नव्हती. राधाबाईने भावांच्या मदतीने गुपचूप दिराला पत्ता न लागू देता दोघींची लग्न उरकली. सासरी उपाशी तरी मरणार नाही, एवढीच किमान अपेक्षा ठेऊन. जवळ असलेलं किडूकमिडूक खर्च करून आणि डोक्यावर कर्जाचा बोजा वाढवून. आता लहानग्या दोघी आणि ती स्वतः कशाही राहू, असा विचार करून. पण राधाबाईच्या अपार कष्टाला फळ येत नव्हतं. कर्ज तर सोडाच दोन वेळेचं जेवण देखील मिळत नव्हतं. अशात राधाबाईच्या ओळखीत असलेल्या कुटुंबात (मानलेला भाऊ) एक गृहस्थ आले. पार लंडनहुन! आबासाहेब बनारसे. आबासाहेबांचे तिन्ही मुलं लंडनला स्थायिक होते. आबासाहेब देखील मुलांकडे राहत असत. पण बरेच वर्षांनी ते भारतात यात्रेला जाण्यासाठी परतले. मग यात्रा झाल्यावर आपल्या जुन्या गणगोतात भेटी देत फिरत होते. फिरत फिरत ते यवतमाळला आले आणि त्यांच्या परम मित्राकडे राहू लागले. बोलता बोलता मित्राला आणि वहिनीला त्यांनी पुनर्विवाह करण्याचा त्यांचा मानस बोलून दाखवला. त्यांच्या मित्राला आपली अभागी, कष्टाळू मानलेली बहीण राधाबाई आठवली. आबासाहेबांना राधाबाईबद्दल सगळं सांगून तिला त्यांनी भेटून यावं, असं सुचवलं. आबासाहेब राधाबाईच्या घरी प्रसाद देण्याच्या निमित्ताने मित्रासोबत जाऊन आले. पस्तिशीची राधाबाई आबासाहेबांना पसंत पडली.आबासाहेबांचं वय होत साठीच्या आसपास. सर्वात मोठी अडचण होती ती राधाबाईचा होकार मिळवण्याची. या आधीही राधाबाईला अनेकदा 'पाट लावण्याबद्दल' जवळच्या लोकांनी सुचवून पाहिलं होतं. पण राधाबाई नुसत्या विचारानेच चवताळून उठायची. आता ३ जावई आल्यावर, २ नातवंड झाल्यावर फक्त पोट भरण्यासाठी दुसरं लग्न करू का, या स्वाभिमानी राधाबाईच्या प्रश्नापुढे कोणाची बोलायची टाप नव्हती. राधाबाई आणि तुळशीरामांचा संसार उणापुरा १५ वर्षांचा. या १५ वर्षांत तुळशीरामांनी कधीच शब्दानेही राधाबाईला दुखावलं नव्हतं. सासूपासून लपून छपून त्यांनी आणि सासर्यांनी राधाबाईचे जमेल तितके कोडकौतुकच केलं. सासू राधाबाईला माहेरच्यांना भेटू देत नसे तरी तुळशीराम बाहेरच्या बाहेर मेव्हण्यांना भेटून, गोड बोलून "बहिणीची काळजी करू नका", असं सांगत. त्यामुळे राधाबाईला पुन्हा विवाह करण्याचा विचारसुद्धा नको वाटत असे.

असेच राधाबाईचे कोणाकडे धुणी-भांडी कर, कुठे भाजीच नेऊन विक, असे चालू होते. मुली देखील बोरं- जांभळं असं काहीबाही विकायला शाळेच्या रस्त्यावर बसत. त्यातून काही मिळालं तर चुरमुरे फुटाणे घेऊन खात आणि आईच्या येण्याची वाट बघत बसत. हळू हळू आबा राधाबाईकडे रोजच येऊ लागले. लहान कला-कमला साठी काहीबाही खाऊ घेऊन येत. राधाबाईलाही वारकरी, कुटुंबवत्सल आबांच्या येण्याबद्दल संशय येण्याचं कारण नव्हतं. मुलींना आबांचा लळा लागला. त्यातच राधाबाईच्या दिराने तिच्याविरुद्ध खटला चालू केला. दोन मुलींची लग्न तिने गुपचूप लावून दिल्याने त्याला लग्नात खोड काढता आली नाही, त्यामुळे तो राधाबाईवर डूख धरून होता. त्यात लग्नासाठी कर्ज मिळावं म्हणून राधाबाईने तिच्या वाटचं घर गहाण टाकल्याचं त्याला कळलं. मग त्याने राधाबाईच्या भागात विहीर असल्याने जर तिचं घर गेलं तर आमची पाण्याची गैरसोय होईल, असा दावा केला कोर्टात. आधीच गरिबीने भंजाळलेली राधाबाई खटल्याने अगदीच व्याकुळ झाली. आतापर्यंत घर तरी होतं. उद्या खटला हरलो तर घर पण जाईल, या विचाराने ती अस्वस्थ झाली. कुठूनच आशेचा किरण दिसेना. बोलता बोलता तिच्या मानलेल्या भाऊ-वाहिनीने पुन्हा एकदा पाट लावण्याबद्दल सुचवून पहिले. यावेळेस मात्र राधाबाई काहीच न बोलता विचार करू लागली. भावाने आबांचं स्थळ सुचवलं. कपाळावर गंध लावणाऱ्या, तोंडात कायम विठ्ठलाचं नाव असणाऱ्या आबांबद्दल तिला आदर होता. त्यांचा देवभोळा स्वभाव, परोपकारी आणि दिलखुलास वृत्ती तिला आवडली होती. मुलींना देखील लळा लागला होता. आबा चांगले गर्भश्रीमंत होते. त्यांचे तिन्ही मुलं आणि मुलांचं कुटुंब लंडन मध्ये अनेक वर्षांपासून स्थायिक होते. शिवाय इतकी वर्षं लंडनला राहूनही आबा शुद्ध शाकाहारी आणि देवभोळे होते. राधाबाई स्वतः विलक्षण देवभोळी होती. कितीही संकटं आली तरी देव आपल्याला मार्ग दाखवेलच, असा दुर्दम्य आशावाद होता तिच्यात. ती देखील प्रचंड परोपकारी होती. स्वतःला भाकरीची भ्रांत असली तरी आपल्यातली अर्धी भाकरी ती दुसऱ्याला देई. कितीतरी वर्षं एक वेडी बाई रोज राधाबाईकडे दुपारी येऊन तिच्या वाटची कोरभर भाकर खाऊन जात असे. त्याबद्दल हटकलं तर 'वेडी आहे म्हणून काय तिला भूक नाही लागत का?" असा तिचा खडा सवाल असे. खूप विचार करून शेवटी मुलींची जबाबदारी घ्यायला ते तयार असले, तर आबांशी विवाह करायला ती तयार झाली. त्याकाळी असं दुसरं लग्न रात्री लागत असे मंदिरांत. सवाष्णी अशा लग्नाला जात नसत. तेव्हा राधाबाईच्या दोन भावांच्या उपस्थितीत राधाबाई आणि आबांचं लग्न लागलं. यालाच 'पाट लावणे' म्हणत.

लग्न झाल्यावर आबा राधाबाईला आणि कला-कमलाला घेऊन अमरावतीला आले. तिथे एक लहानसं घर भाड्याने राहू लागले. सुरुवातीचे दिवस आनंदात गेले. मुलींना कधी नव्हे ते पोटभर खायला मिळू लागलं. आबा राधाबाईला घेऊन लग्न झालेल्या तिन्ही मुलींकडे जाऊन आले. तिन्ही लेकींना आणि जावयांना चांदीच्या दागिन्यांचा, रोख रकमेचा आहेर करून आले. सगळेजण 'राधाबाईने नशीब काढले', असं म्हणू लागले. राधाबाई मुलींसाठी काही करता आले, या विचाराने आनंदी झाली. पण हळूहळू आबांच्या स्वभावातला तऱ्हेवाईकपणा, संशयीपणा आणि हेकेखोरपणा राधाबाईच्या लक्षात येऊ लागला. मुळात त्यांनी या वयात लग्न केलंच आपली सेवा करवायला हक्काचं माणूस पाहिजे म्हणून. आता त्यांना दोन पोरींचा अडथळा होऊ लागला. शिवाय राधाबाई दिवसभर मुलींच्या मागे असे. आणि ती गुपचूप ऐकून घेणाऱ्यातली तर मुळीच नव्हती. शिवाय आबा जेव्हा भारतात आले, तेव्हा आपण तीर्थयात्रेला जातोय, हे सांगून आले होते. त्यांच्या मनातल्या पुनर्विवाहाची इच्छा मुलं-सुनांना मुळीच माहिती नव्हती. आता लग्न झाल्यावर आबांना परतीचे वेध लागले. आणि आपण आता मुलांना आणि सुनांना कसं तोंड दाखवू, या विचाराने त्यांची झोप उडाली. लग्नहि आपण पस्तिशीच्या ५ मुलींच्या आईशी केलं, हे लंडनचे लोक कसं स्वीकारतील, याची त्यांना चिंता लागली. शेवटी मनाचा हिय्या करून त्यांनी मुलांना पत्र लिहून सगळं कळवलं. अपेक्षेप्रमाणेच मुलं आणि सुना चवताळले. त्यामुळे आबांची मनःशांती अजूनच बिघडली. शेवटी राधाबाईची खूप विनवणी करून पाय धरून त्यांनी मुलींची रवानगी राधाबाईच्या मोठ्या लेकीकडे - शांताबाईकडे- केली. दरमहा खर्चाचे पैसे पाठवायचं कबूल करून. पण त्यामुळे राधाबाई मात्र खूपच नाराज झाली. आपल्याला फसवलं, याची तिला चीड आली.

हळूहळू आबांच्या मुलांचा राग जरा निवळू लागला. आणि आबा परत जाण्याचे प्लॅन्स बनवू लागले. १९४५ साली आबा आणि राधाबाई बोटीनं लंडनला पोचले. राधाबाईने आयुष्यात पहिल्यांदाच इतका लांबचा प्रवास केला. ना बोटीच्या महिन्या-दिड महिन्याच्या प्रवासांत मिळाला इतका निवांतपणा अनुभवला होता. पहिल्यांदा राधाबाईला जगात इतके अठरापगड जाती-धर्माचे, शेकडो भाषा बोलणारे लोक असतात, हे कळले. लहान मुलीसारखे डोळे विस्फारून तिने हे जग पहिले, अनुभवले. लंडनला पोचल्यावर ते सर्वांत मोठ्या मुलाकडे उतरले. सगळे नाराज असले तरीही नातवंडांनी मात्र लगेच राधाबाईला 'आजी' म्हणून आपलंसं केलं. राधाबाईची आजीबाई बनारसे झाली. ती कामाला वाघ असल्याने आल्या आल्या लगेच सुनेला घरात, स्वयंपाकघरात मदत करू लागली. आबांच्या तिन्ही मुलांचे लंडन मध्ये लॉजिंग- बोर्डिंगचा व्यवसाय होता. पेइंग गेस्ट म्हणून तिन्ही घरांत मुलं रहात असत. त्यांना जेवण, नाश्ता सुना बनवून देत. आजीबाईचा सुनांना चांगलाच आधार मिळू लागला. राधाबाई आपल्या नवीन आयुष्यात हळूहळू स्थिरावू लागली.

पण नियतीला हे मान्य नव्हतं. दोन वर्षांतच आबांची तब्येत बिघडली. त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. उणापुरा ४-५ वर्षांचा आबांसोबतचा त्यांचा संसार. आताशा कुठे त्या रुळू लागल्या होत्या लंडनमध्ये. सावत्र मुलांनी तर त्यांना कधीच मनापासून स्वीकारलं नव्हतं. आता पुढे काय वाढून ठेवलंय, हे आजीबाईंना कळेना.

शेवटी मनाचा हिय्या करून आजीबाईने दोघी सुनांना एके दुपारी गळ घातली. माझ्या दोन मुलींना तुम्ही इथे बोलवून घ्या आणि तुमच्याकडे मी काम करत जाइन, असा प्रस्ताव ठेवला. सुनांच्या माहेरहून दरवर्षीच अनेक कुटुंब येत. काही त्यांच्या व्यवसायांत मदत करत तर काही स्वतःचे नोकरी-धंदा करत. एक प्रकारे एक मिनी इंडियाच त्यांनी वसवला होता. त्यात खरं म्हणजे आजीबाई आणि तिच्या दोन लेकी, त्यांना जड नव्हत्या. शिवाय आजीबाईंची त्यांना मदत मिळणार होती. गेल्या २ वर्षांत त्यांनी पार पाडलेल्या जबाबदाऱ्या बघून सुनांचं मत अनुकूल झालं. त्यांनी त्यांच्या नवऱ्यांना सांगून आजीबाईंच्या मुलींना आणायची सोय केली. मुलांनासुद्धा ही कष्टाळू, विश्वासू आणि फुकट मोलकरीण ठेवण्यात फायदाच दिसला. आणि जवळ- जवळ ३-४ वर्षांनी कला-कमला आपल्या आईला पार सातासमुद्रापार भेटल्या. मायलेकींचा आनंद गगनांत मावेना.

एकदा मुली आल्यावर मात्र आजीबाईंनी पैश्यांची जुळवाजुळव चालू केली. आजीबाईंच्या सावत्र मुलाने - विठ्ठलने - एक नवीन घर घेऊन तिथे बोर्डिंग चालू करण्याचं ठरवलं. त्याची सारी जबाबदारी त्याने आजीबाईंवर टाकली. आठवड्याच्या आठवड्याला तो सामान आणून टाकणार होता. पण बाकी सगळी बोर्डिंगची, खाण्यापिण्याची आजीबाईंवर असणार होती. त्याबदल्यात तो त्यांना आठवडी काही रक्कम देणार होता. आजीबाईंना अतिशय आनंद झाला. त्यांनी अल्पावधीतच त्यात यश मिळवलं. सकाळी ४ वाजेपासून त्यांचा दिवस सुरु होई. सकाळी सात ते नऊ मध्ये नाश्ता संपवायचाच, हा त्यांचा नियम होता. त्याआधी त्या शुचिर्भूत होऊन पूजा करून तयार होत. साताला नाश्ता टेबलावर तयार असे.
नाश्ता झाल्यावर घराची, सगळ्या खोल्यांची साफसफाई चाले. दुपारचं जेवण मुलं बाहेर करत. त्यामुळे आजीबाई त्यांच्या मुलींसह जेऊन घेत आणि संध्याकाळच्या स्वयंपाकाला लागत. संध्याकाळी घरात राहणारे मुलं जेवायला असत आणि बाहेरून फक्त जेवायला म्हणून येणारेदेखील खूप लोक असत. अल्पावधीतच आजीबाईंच्या सुग्रणपणाची कीर्ती भारतीयांत पसरली. आजीबाईंकडे सुग्रास जेवण अगदी किफायती दरांत मिळेल, याची शाश्वती होती. घरापासून शिक्षण किंवा नोकरी निमित्त दूर राहणाऱ्या भारतीयांसाठी हि पर्वणीच ठरली. आजीबाईंनी सुनांच्या हाताखाली काम करताना मराठी जेवणाशिवाय साऊथ इंडियन, पंजाबी, गुजराती इ पदार्थ देखील शिकून घेतले. त्यामुळे त्यांच्याकडे येणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत गेली. अर्थात आजीबाईंची कीर्ती वाढल्याने इकडे विठ्ठल आणि पांडुरंगाकडची गर्दी कमी होऊ लागली. त्यामुळे झालं उलटंच.

एक दिवस त्यांचा सावत्र मुलगा रविवारी नेहमीप्रमाणे सामान टाकायला आला तोच एक आठवड्याची त्यांना मुदत द्यायला. एक आठवड्यात हे घर खाली करा, तुमची तिघींचं भारतात जायची तिकिटे काढलीयेत असं सांगू लागला. अचानक काय झालं, आजीबाईंना कळेना. तिथे राहणाऱ्या मुलांनादेखील आपलापली सोय पहा म्हणून सांगून गेला. त्यातली बरीच मराठी मुलं दुसरीकडे सोय पाहू लागली. पण काही गुजराती आणि उत्तरेकडची मुलं होती ती मात्र आजीबाईंच्या पाठीशी उभी राहिली. आजीबाईंनी त्यांना आपल्या मुलांप्रमाणे मायेने खाऊ-पिऊ घातलं होतं. कला-कमलाला त्यांनी राखी बांधली होती नारळीपोर्णिमेला. आपल्या मानलेल्या बहिणींना असं वाऱ्यावर सोडून जाणं काही त्यांना पटेना. त्यांनी तिथेच राहायचा निर्णय घेतला. आठवड्याने सावत्र मुलगा घर खाली करायला आला तेव्हा त्यांनी खूप समजावून पाहिलं. पण तो ठाम होता. उद्यापर्यंत घर खाली करा नाहीतर पोलिसांत जाईन, अशी धमकी देऊन गेला. दुपारभर मुलं, कला आणि कमला चिंताग्रस्त होत्या. आजीबाईंनी तर २ दिवसांपासून खाणं-पिणं सोडलं होतं. त्या साई बाबांच्या तस्विरीसमोर हात जोडून बसून राहिल्या. अचानक दुपारी बेल वाजली. कलाने दार उघडलं तर एक रिअल इस्टेट एजन्ट आपलं कार्ड देऊन गेला. तो काही बोलत होता पण कलाला फारसं काही कळलं नाही. एव्हाना तिला तोडकं मोडकं इंग्रजी येऊ लागलं होतं. आजीबाईंनी तिला विचारताच तिने कार्ड आईच्या हातात दिलं.घर विकणारा होता तो. घर हवंय का असं काही विचारत होता, तिने आईला सांगितलं. आजीबाईंच्या डोळ्यांत चमक आली. 'अगं, मग सांगायचं ना हवंय म्हणून' आजीबाई तिला म्हणाल्या. 'वेड लागलंय का? इथे ब्रेड आणायला पैसे नाहीत, घर काय घेतोय आपण?' तिने रागात म्हटलं. पण आजीबाईंनी मात्र तिला ओढत त्या पत्त्यावर घेऊन जायला भाग पाडलं. सुदैवाने जवळचाच पत्ता होता. दोघी चालत ऑफिस मध्ये पोचल्या तेव्हा तो एजन्ट आणि घरमालक बसले होते. कलाने तिच्या तोडक्या मोडक्या इंग्रजीत दोघांना सगळं समजावलं. घरमालक एक वृद्ध प्रेमळ ज्यू होता. मग एजन्टने अगदी सोप्या सुटसुटीत भाषेत कलाला मॉर्टगेजबद्दल समजावलं. अगदी थोडक्या इंग्रजी मध्ये आणि खिशात पै पण नसतांना आजीबाई २५, हूप लेन या घराच्या मालकीण झाल्या! आजीबाई गहिवरून गेल्या आणि नव्या हुरूपाने आपल्या स्वतःच्या हक्काच्या घरात राहायला गेल्या.

त्यांच्या सावत्र मुलाला जेव्हा दुसऱ्या दिवशी ही गोष्ट कळली तेव्हा त्याचा संताप झाला. पण आता त्याच्या हातात काहीच उरलं नव्हतं. नवीन घरात आल्यावर आजीबाईंनी आपलं स्वतःच बोर्डिंग आणि खानावळ चालू केली.
नवीन घरात आल्यावर आजीबाईंचा व्यवसाय जोमाने चालू लागला. आधीच्या घरातलेच मुलं त्यांच्याकडे राहू लागले.थोड्याच अवधींत आजीबाईंनी नवीन बोर्डिंग पण उत्तमरित्या चालवून स्वतःची ओळख निर्माण केली. खरं तर आजीबाई निरक्षर होत्या. पण मुळात हुशार, हिशोबाला पक्क्या. शिवाय आयुष्यातले टक्के टोणपे खाऊन धीट झाल्या होत्या. लंडन ट्यूबने त्या दूरदूरच्या मार्केट मध्ये जाऊन थोकने सामान आणू लागल्या. इतक्या दूर जायचं तरी लंडन ट्यूबचा नकाशा वगैरे त्यांच्या काहीच कामाचा नव्हता. कारण त्यांना तो वाचता यायचा नाही. शिवाय इंग्रजी बोलता येत नसे. पण त्या हार मानणार नव्हत्या. एकदा कला-कमला सोबत जाऊन कितव्या स्टेशनला उतरायचं, हे बघून ठेवत. सोबत कागद, पेन ठेवत. आणि मग एकट्या जात तेव्हा एक स्टेशन गेलं की एक रेघ ओढत. असं करत बरोब्बर स्टेशनला उतरत. परत येताना तेच. भाजी घेताना, वाण सामान घेताना, अचूक हिशेब ठेवत. वर आणि आपल्या मोडक्या- तोडक्या इंग्रजीमध्ये घासाघीस करून सामान आणत. हे सगळं नऊवारी नेसून बरं का. वर अंगावर कोट आणि हातात छत्री, असा जामानिमा करून. पण त्यांना कोणी अशा अवतारामुळे हसलं नाही. हे सगळं केवळ थोडे जास्त पैसे वाचावेत म्हणून. आजपर्यंतच्या आयुष्याने त्यांना पैश्यांची किंमत चांगलीच दाखवून दिली होती. त्यामुळे शक्य तितके पैसे वाचवून आपल्या इंडियातल्या तिन्ही लेकींना इथे आणायचं, हेच त्यांचं ध्येय होतं. या कष्टाळू आजीबाईंना तिथले दुकानदार देखील प्रेमाने, आपुलकीने वागवत. त्यांना 'मदर' म्हणत आणि शक्य असेल तेव्हा त्यांना सामान उचलण्यातही मदत करत. आजीबाईंनी हळूहळू एक आपलं वर्तुळ तयार केलं. त्यात भारतीय, अभारतीय सगळेच होते.

आजीबाईंनी बोर्डिंग सोबतच फक्त जेवण देणं ही चालू केलं. त्यामुळे संध्याकाळी खूप गर्दी होऊ लागली. रविवारी 'फिस्ट' असे. रविवारी त्यासाठी विशेष गर्दी होई. शिवाय चिवडा, शंकरपाळे, लाडू, चकल्या वगैरे यांची ऑर्डर त्या घेऊ लागल्या. फक्त दिवाळीच नव्हे तर सहज पिकनिकला जाताना वगैरे लोकांना हे पदार्थ हवे असत. त्या ऑर्डर्स वर्षभर चालूच असत. आजीबाई इतक्या लोकांचं जेवण, ऑर्डर्स सगळं स्वतः करत. सोबत फक्त कला आणि कमला. खरं तर त्यांचं शाळेत जाण्याचं वय. पण आजीबाईंना ते परवडणे शक्य नव्हते. तरीही कला काही वर्ष शाळेत जात असे.त्या मानाने कमला बरीच लहान असल्याने तिचं शिक्षण बरंच सुरळीत झालं. या दिवसांत कला आजीबाईंच्या बरोबरीने राबत असे. अपार अपार कष्ट! आजीबाईंना आणि मुलींनाही कष्टांची सवय होतीच. पण आता कष्ट केले तर सुखाने पोटभर जेवता येत होतं. कोणावरही त्या अवलंबून नव्हत्या. कष्टांचं चीज होतं आहे, हे पाहून आजीबाईंना हुरूप येई.
थोड्याच अवधींत आजीबाईंचा व्यवसाय भरभराटीला आला. येणाऱ्या लोकांची संख्या वाढू लागली तशी आजीबाईंना एक एक करत आपल्या तिन्ही मुलींना आणि त्यांच्या कुटुंबाला लंडनला आणलं. कित्तीतरी वर्षांनी आजीबाई आपल्या संपूर्ण कुटुंबासोबत एकत्र आल्या. भारतात झालेली ताटातूट लंडनला संपली. त्यांच्या मुली देखील त्यांच्या सारख्याच कष्टाळू आणि सुग्रण. मोठ्या दीदीने स्वतःचा व्यवसाय थोडेच वर्षांत चालू केला. आजीबाईंचे नातवंड लंडनच्या शाळेत जाऊ लागले. कला आणि कमला देखील लंडनला रुळल्या होत्या. उत्तम इंग्रजी बोलू लागल्या, सफाईने गाडी चालवू लागल्या. आईसोबत व्यवसाय सांभाळू लागल्या. आता आजीबाई देखील स्वतःच्या गाडीने सामान खरेदीला जाऊ लागल्या. मुलींना घरं घेण्यात मदत करू लागल्या. लेकींना आणि स्वतःला देखील दागिन्यांनी मढवले. सुरुवातीपासूनच त्यांना दागिन्यांचा सोस. आता हातात पैसे खेळू लागल्यावर त्यांनी मनमुराद मुलींचे, नातवंडांचे कोड कौतुक केलं. महागड्या दुकानांतून मुलींना खरेदी साठी नेण्यात त्यांना समाधान आणि आनंद मिळू लागला. पण फक्त स्वतःवर आणि स्वतःच्या मुलींवर खर्च करून त्या थांबल्या नाहीत. त्यांनी आपल्या भावांना, भाच्यांना आर्थिक मदत केली. त्यांच्या गावी विहीर बांधून काढली. अनेकांना शिक्षणासाठी मदत केली.

हळूहळू आजीबाई म्हणजेच एक संस्था झाल्या. त्यातूनच लंडनचं 'मराठी मंडळ' उभं राहिलं. मंडळाच्या कार्यकारिणीमध्ये आजीबाई अध्यक्ष झाल्या. त्या निमित्ताने मोठमोठ्या व्यक्तींशी आजीबाईंची ओळख झाली. लंडनला गेल्यावर प्रत्येकजण त्यांच्याकडे जेवायला येऊ लागला. पुलं, अत्रे, हृदयनाथ मंगेशकर, यशवंतराव चव्हाण, शंकराचार्य, विजयालक्ष्मी पंडित, शकुंतलादेवी इ मान्यवर त्यांच्या २५, हूप लेनच्या घरी येऊन गेले. पण एवढ्याने समाधान होईल तर त्या आजीबाई कसल्या. त्यांचा सर्वांत आवडता प्रोजेक्ट म्हणजे लंडन मधील हिंदू मंदिर. १९६५ मध्ये, बऱ्याच विचारांती त्यांनी स्वतःच्या राहत्या घरीच लंडनच्या, किंबहुना यूरोपच्या, पहिल्या वाहिल्या हिंदू मंदिराची स्थापना केली. या मंदिराने लंडनमधील भारतीयांना वेळोवेळी आधार दिला. तिथे मोठ्या निगुतीने सगळे सण साजरे केले जात. गणपती उत्सव साजरा होत असे. उत्सावासाठी दर वर्षी मोठमोठे कलाकार येत. भजन-कीर्तन चाले. महाप्रसादाला आजीबाईंच्या हातचं सुग्रास भोजन असे. आजीबाई म्हणजे एक चालती बोलती संस्था झाली होती. मराठी मंडळाचे नाटकं, त्याच्या तालमी सगळं सगळं आजीबाईंच्या घरी होत असे. आजीबाई समरसून सगळ्यात भाग घेत असत.

१९८३ मध्ये अल्पशा आजाराने आजीबाईंचं निधन झालं. त्यांच्या प्रेतयात्रेमधे लंडनचे मेयर सहभागी झाले. प्रचंड लोक संग्रह असणाऱ्या आजीबाईंचा मृत्यू सगळ्यांसाठीच दुःखद होता. त्यांच्या परिवारालाच नव्हे तर अक्ख्या लंडनच्या भारतीय लोकांना पोरके करून गेला.

(प्रचि इंटरनेट वरून साभार)

सरोजिनी वैद्य यांनी अतिशय सुरसपणे आजीबाईंनी ओळख आणि पूर्ण कथा सांगितली आहे - 'कहाणी लंडनच्या आजीबाईंची'.
मी ९६/९७ मध्ये शाळेत असताना वाचलंय. त्या नंतर कमीतकमी ५-६ वेळेला वाचलंय. पण इथे माझ्याजवळ प्रत नसल्याने कदाचित साल/ तारखा यांत चुका असतील. आश्चर्य म्हणजे इतक्या कर्तबगार व्यक्तीबद्दल इंटरनेटवर काहीच माहिती नाहीये. १-२ ब्लॉग्स सोडले तर. आणि तेही पुस्तक वाचूनच लिहिलीत लोकांनी. असं का, याचं उत्तर नाहीये माझ्याकडे. सध्या लंडन स्थित मायबोलीकर कदाचित यावर प्रकाश टाकू शकतील.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा! काय धडाकेबाज व्यक्तिमत्त्व! शिक्षण , पैसा काहीही हाती नसताना एवढे विश्व निर्माण करणं! कसल्या कमाल असतील आजीबाई!!

त्या काळाचा विचार केला आणि राधाबाईंची, त्यांच्या कुटुंबाची, वाढलेल्या ठिकाणाची पार्श्वभूमी विचारात घेता खरं तर है अलौकिक आहे..
आजीबाईंना दंडवत.... _/\_

प्रचंड आदर वाटला आणि आजूबाजूच्या लोकांनी इतक्या कर्तबगार बाईचे पाय खेचायचा इतका प्रयत्न केलेला वाचून अपार वाईटही वाटलं.

वा! काय धडाकेबाज व्यक्तिमत्त्व! शिक्षण , पैसा काहीही हाती नसताना एवढे विश्व निर्माण करणं! कसल्या कमाल असतील आजीबाई!!
+100

हे आहे माझ्याकडे, वाचलंय. मध्ये बहुदा त्या उषा नाडकर्णीनी ह्यावर बेतलेले नाटक केले होते. ह्या आजीबाईंची कमाल आहे मात्र.

धन्यवाद mi_anu, मनिम्याऊ, सायो, लंपन, निलूदा
mi _anu: हो नं. घरच्याच लोकांनी इतका त्रास दिला की बाकी लोकांचं काय वाटणार त्यांना. त्या ट्यूब ने प्रवास करायच्या तेव्हा कधीकधी गोरे लोक मुद्दाम उठून जात. पण त्यांच्यासाठी असे अपमान काहीच नव्हते
लंपन: हो असं मी वाचलंय

बऱ्याच वेळा आपण स्वतःला underestimate करतो.
आजीबाईंनी हे न करता फक्त मार्ग शोधत राहिल्या आणि निवडलेल्या मार्गांतून एक नवीन महामार्ग तयार केलाय आपणा सर्वांसाठी!