हेटी आणि हंटींग्टन

Submitted by Barcelona on 7 March, 2021 - 21:54

हेटी आणि हंटींग्टन

(हेटीची गोष्ट हा पहिला भाग आधी वाचला तर बरं पडेल.)

पन्नासावा वाढदिवस झाला आणि हेटीच्या आयुष्याला एक वेगळीच कलाटणी मिळाली. हेटी आणि तिचा नवरा एडवर्ड दोघे सिस्को बँकेचे खातेदार होते. (नाही, सध्याची प्रसिद्ध सिस्को कंपनी आणि ह्या सिस्को बँकेचा काही संबंध नाही.) ही बँक जॉन सिस्को यांनी सुरू केली होती. सिस्को व हेटी दोघे तसे शिस्तबद्ध होत आणि म्हणूनच हेटीने विश्वासाने विविध कंपन्यांचे 25 दशलक्ष (मिलीयन) डॉलर किमतीचे बॉण्ड व बरीच रोख रक्कम बँकेत जमा केली होती. त्या काळात शेयर्स व बॉण्ड्स कागदी असल्याने सुरक्षित जागी ठेवायचे म्हणून बँकेत ठेवायला लागायचे. वडील वारल्यावर तेच नाव - जॉन सिस्को ज्युनियर- असलेला त्यांचा मुलगा ती बँक चालवू लागला. व्यवहाराला जॉन सिस्को ज्युनियर मात्र वडिलांसारखा नव्हता.

या दरम्यान पश्चिम किनाऱ्यावर कॅलिफोर्नियात कॉलीस हंटींग्टनचा रेलरोड व्यापारी म्हणून जम बसू लागला होता. त्यांनी “ह्यूस्टन अँड टेक्सस सेंट्रल रोड” ह्या नव्या कंपनीची स्थापना केली. त्या कंपनीचे व्यवहार सिस्को बँकेद्वारे होऊ लागले. जॉन सिस्को ज्युनियरने बँकेचे पैसे ह्या कंपनीत गुंतवले. मात्र जेव्हा बॉण्डचे पैसे परत करायची वेळ आली तेव्हा हंटींग्टनने ते परत केले नाहीत (डिफॉल्ट) आणि अचानक त्या बॉण्ड्सचा भाव घसरला. सिस्को बँक मोठ्या अडचणीत आली ही बातमी वाऱ्यासारखी सर्वत्र पसरली. हेटीने आपले खाते दुसऱ्या बँकेत हलवायचा निर्णय घेतला. हेटी जॉन किंवा इतरांवर विश्वासून न राहाता अभ्यास करून मग गुंतवणूक करायची. म्हणून तिची रक्कम सुरक्षित होती. तिने ती रक्कम केमिकल नॅशनल बँकेत हलवावी असे पत्र लिहिले.

मात्र त्यादिवशी तिला कळाले की ती बँकेची सर्वात मोठी खातेदार होती तर तिचा नवरा एडवर्ड सर्वात मोठा कर्जदार!

राहते घर एडवर्डने बँकेकडे गहाण टाकले होते. एकूण तो बँकेला सात लाख डॉलर व घर देणे लागत होता. हेटीने नवऱ्यापासून आपले आर्थिक व्यवहार स्वतंत्र ठेवले होते आणि वडील सिस्को यांनी त्याचा मान ठेवून व्यवहार केले होते. मात्र बँक अडचणीत आल्याने मुलगा ऐकेना. पतीचे कर्ज पत्नीने फेडलेच पाहिजे कारण तसा कायदाच होता. सिस्को बँकेने तिचे 25 दशलक्षचे बॉण्ड्स ओलिस ठेवले जणू. सात लाख दिल्याशिवाय बँक बॉण्ड्स देणार नव्हती. हेटी रोज बँकेत जाई. पण जॉन सिस्कोचे साथीदार व तिच्यात रोज वादावादी चालत असे. शेवटी सात लाख देऊन हेटीने बॉण्ड्स परत मिळवले. खरं तर कॉलीस हंटींग्टन व जॉन सिस्कोने बँकेला अडचणीत आणले पण वर्तमानपत्रांनी ‘हेटीने दुसऱ्या बँकेत मोठी रक्कम जमा केली म्हणून सिस्को बँक बुडीत गेली’ असं छापलं.

ह्या प्रकरणात झालेली मानहानी हेटीच्या मनाला लागली. एडवर्डने त्याचे पैसे उडवले होतेच पण आता तिच्या पैशाला ही वाटा फुटल्या. ती एडवर्ड पासून विभक्त झाली. ‘मिसेस ग्रीन’ अशी ओळख मागे पडून हेटीला नावानिशी सर्व ओळखू लागले. कॉलीस हंटींग्टन व जॉन सिस्को दोघांवर ती अतिशय चिडली होती. हल्लीच्या काळात कायदे असल्याने कंपन्या व बँका असे व्यवहार करू शकत नाहीत. पण तेव्हा जॉन सिस्कोविरुद्ध हेटीला कोर्टाचा दरवाजा ठोठवावा लागला. अर्थात स्त्रीला स्वतंत्र व्यवहार करण्याची परवानगी नसल्याने तिचे पैसे नवऱ्याचेच असा निकाल लागला.

हेटीने सावधपणे पावले उचलायला सुरुवात केली. नंतरच्या दोन वर्षात तिने हळूहळू जवळजवळ बारा लाखाचे “ह्यूस्टन अँड टेक्सस सेंट्रल रोड” बॉण्ड विकत घेतले. ती डोईजड ठरणार अशी चिन्हे दिसू लागता हंटींग्टनने पुनर्व्यवस्थापनाचा (reorganization) घाट घातला. इतर बॉंडधारकांना अतिशय कमी किंमत देऊन त्याने बॉण्ड्स विकत घेतले. मात्र त्या आमिषांना हेटी बधली नाही. ती कधी पुनर्व्यवस्थापनाला पाठिंबा दाखवायची तर कधी विरोध. बॉण्ड्सचे भाव तिच्या मर्जीनुसार चढत उतरत राहिले. अकरा महिन्यानंतर जेव्हा भरभक्कम रक्कम हाती आली तेव्हाच हेटीने बॉण्ड्स हंटींग्टनला विकले. खरं तर इथे हेटीने थांबायला हरकत नव्हती पण झालेल्या अपमानाचा बदला पैशात मोजता येण्याजोगा नव्हता. समाजात गेलेली पत पुन्हा मिळवल्याशिवाय ती थांबणार नव्हती.

टेक्ससमधील वेको गावातून जाणारा एक चौपन्न मैलाचा रेल्वेमार्ग अगदी मोक्याचा होता. तो मार्ग ज्याच्या ताब्यात त्याला रेल्वे व्यवसायात बराच फायदा होणार होता. ह्या मार्गाच्या लिलावाच्या दिवशी हेटीने आपल्या मुलाला - नेडला तिथे पाठवलं. नेडला लहानपणी पायाला इजा झाली होती आणि हेटीने सरकारी दवाखान्यात इलाज करायचा हट्ट केला. त्या गोंधळात त्याचा पाय कापावा लागला. त्याला लाकडी पाय बसवला होता. ह्या घटनेवरून हेटीची आई म्हणून हेटाळणी होत असे पण नेडवर तिची फार माया होती. त्याने उत्तम रेलरोड व्यावसायिक व्हावे म्हणून तिने त्याला कनेटिकट, ओहायो, मिसीसिप्पी अशा अनेक जागी अप्रेंटीस म्हणून पाठवले होते. आता तो ह्या वेकोतील मार्गावर रेल्वे व्यवसाय उभा करायला अगदी तयार होता. लिलावाच्या दिवशी हंटींग्टनच्या बोलीपेक्षा अधिक बोली लावून नेडने वेकोमधील रेलरोड तेरा लाख डॉलरला जिंकला.

हंटींग्टन चिडला. त्याने सरकार दरबारी वजन वापरून लिलाव जिंकला तरी रेलरोडची जमीन सरकारची आहे अशी नोटीस हेटीला पाठवली. जमीन आपली नसेल तर तिथे रेल्वे बांधण्यात काय अर्थ आहे म्हणून हेटीने रेलरोडची पूर्ण रक्कम भरायला नकार दिला व लिलावाच्या दिवशी भरलेलं डिपॉझिट परत करा अशी विनंती केली. उलट हेटीने पूर्ण रक्कम भरली पाहीजे म्हणून हंटींग्टनने तिच्यावर खटला भरला. मात्र आता जनमत हळूहळू तिच्या बाजूने वळू लागले होते. कॅलिफोर्नियात हंटींग्टनने शेतकऱ्यांच्या जमीनी बळकावल्या होत्या. हेटीच्या रूपात त्यांना देवदूतच दिसू लागला होता. त्यांनी तिला एक सुरेखसे पिस्तूल व गोळ्या आणि सुरेखसे चामडी कव्हर (होल्स्टर) भेट म्हणून पाठवले. "हजरो लोक तुम्हाला भेटायला इच्छुक आहेत, कॅलिफोर्नियाला या" असे प्रेमाने पत्रही पाठवले. हेटी सुखावली. आता खरा तिचा बदला पूर्ण झाला होता. पण…

खटला जोरदार चालू असतांना एके दिवशी हंटींग्टन तिच्या न्यूयॉर्क मधील ऑफीसमध्ये आला. नेड तेव्हा टेक्ससमध्ये कामकाज बघत असे. हंटींग्टनने तिला खटला मागे घे नाहीतर नेडला टेक्ससच्या तुरुंगात खितपत ठेवेन अशी धमकी दिली. त्यावर हेटीने उत्तर दिले ‘आजवर तू हेटी ह्या बिझनेसवुमनशी लढत होतास. पण आता तू हेटी आईच्या वाटे जातो आहेस. नेडच्या केसाला जरी धक्का लावलास तर हे पिस्तूल तुझ्या छाताडात रिकामं करेन’. तिचा एकूण अवतार बघता हंटींग्टनने तिथून काढता पाय घेतला व पुन्हा तिच्या वाटे गेला नाही.

खटला तीन वर्ष चालला. शेवटी कोर्टाने तिचे डिपॉझीट परत केले व हंटींग्टनला अजून दोन लाख (म्हणजे पंधरा लाखाला) भरून कंत्राट दिले. हेटीने तोवर डॅलस जवळ टेरील येथे एक दुसरा रेलरोड विकत घेतला होता. नेडने तिथे जवळजवळ सोळा वर्ष काढली आणि उत्तम नाव कमावलं.

हेटी आणि हंटींग्टन यांच्या लढाईत कोण जिंकलं असेल तर आपण सगळे. हेटीपूर्वी स्त्रियांनी रेलरोड व्यवसाय किंवा इतर कुठे गुंतवणूक करावी अशी पद्धत नव्हती. (हेटी वारली तेव्हा तिची इस्टेट जे.पी.मॉर्गन इतकी होती, जी तिने स्वतः मॉर्गन सारखीच झटून उभी केली होती). स्त्री गुंतवणूकदार किंवा स्त्रिया गुंतवणूक उत्तमप्रकारे करू शकतात ही संकल्पना या निमित्ताने समाजमान्य झाली.

इन्व्हेस्टिंगसाठी स्त्रियांना प्रोत्साहन देणाऱ्या सर्वांना महिला दिनाच्या शुभेच्छा!!

संदर्भ:
https://avenuemagazine.com/hetty-green-americas-first-female-tycoon/
https://erenow.net/biographies/hetty-genius-madness-americas-first-femal...
https://www.newyorksocialdiary.com/the-woman-who-loved-money/

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

फारच सुरेख!
सीमंतिनी, तुझे वेगळ्या विषयावरचे, खास करून स्त्रियांनी चोखाळलेली वेगळी वाट प्रकाशात आणणारे लेख प्रेरणादायी असतात.

छान लिहिले आहे. Happy
हेटिची गोष्ट वाचली आहे.
महिलादिना निमित्त अगदी समयोचित.
अशा वेगळ्या वाटा निवडणाऱ्या स्त्रीयांविषयी वाचायला आवडेल.

सुंदर लेखन! आवडले !!
जुन्या काळातील, खडतर मार्ग स्वीकारून प्रवाहाच्या उलट दिशेने जाणाऱ्या स्त्रीयांच्या कथा छान लिहितेस !!

खूप आवडले.
जुन्या काळातील, खडतर मार्ग स्वीकारून प्रवाहाच्या उलट दिशेने जाणाऱ्या स्त्रीयांच्या कथा छान लिहितेस+100

सी, छान समयोचित लेख! नुकताच पेटिएम ने प्रायोजित केलेला व्हिडिओ पाहीला ज्यात कमावत्या, करीअरमध्ये यशस्वी स्त्रिया पुरूषांच्या तुलनेत स्वतःच्या आर्थिक व्यवहार आणि गुंतवणूक याविषयी किती अनभिज्ञ असतात हे दाखवलं आहे. त्यामुळे हा लेख अजून भावला.

सुंदर लेख ... हेटीच्या प्रभावशाली व्यक्तीमत्वाची छान ओळख करून दिलीस.!

छान!

>>कमावत्या, करीअरमध्ये यशस्वी स्त्रिया पुरूषांच्या तुलनेत स्वतःच्या आर्थिक व्यवहार आणि गुंतवणूक याविषयी किती अनभिज्ञ असतात

दुर्दैवाने हे खरं आहे बर्‍याच अंशी. बाकी हा आणि आधीचा दोन्ही लेख आवडले.

सुंदर लेख ... हेटीच्या प्रभावशाली व्यक्तीमत्वाची छान ओळख >> +1
दोन्ही लेख आवडले. हेटीबद्दल माहिती नव्हतं.

फारच सुरेख!
सीमंतिनी, तुझे वेगळ्या विषयावरचे, खास करून स्त्रियांनी चोखाळलेली वेगळी वाट प्रकाशात आणणारे लेख प्रेरणादायी असतात.......+1.

Pages