हेटीची गोष्ट

Submitted by सीमंतिनी on 17 March, 2020 - 22:22
Hetty Green

“आता काही विकायची गरज नाही.भाव वाढल्यावर बघू” हेटी शांतपणे म्हणाली.

तिच्याकडे बघून कुणाला वाटले नसते तिने नुकतेच ५-७ लाख डॉलरचे नुकसान झेलले असेल. तिच्या शांतपणाचे कारण थोडी तिची श्रीमंती, थोडा तिचा द्रष्टेपणा आणि पुष्कळसा आर्थिक उलाढालींचा अभ्यास.

हेटीने शाळेत कमी आणि घरीच जास्त अभ्यास केला. हेटीचे आजोबा आणि बाबा यांची कंपनी होती. ते व्हेल माश्यांची मासेमारी करत. त्या काळात म्हणजे सन १८४० च्या सुमारास मॅसॅच्युसेट्स मध्ये ह्या व्यवसायाला बरकत होती. आजोबांची नजर साथ देत नसे आणि आई सतत आजारी म्हणून हेटीची रवानगी आजोबांना मदत करायला व्हायची. चिमुरडी हेटी आजोबांना वर्तमानपत्र, बँकेची कागदपत्रं, कंत्राटे, पावत्या वगैरे वाचून दाखवायची. आजोबाही न कंटाळता तिला शिकवत रहायचे. आजोबांच्या मदतीने आठ वर्षांची चिमुरडी हेटी एक दिवस बँकेत जाऊन खाते उघडून आली. वयाच्या १३ व्या वर्षी ती कंपनीची हिशेबनीसच झाली जणू. आता तिचा व्यापारातील अनुभव वाढू लागला. सुरू केल्यापासून कंपनीची आता जवळजवळ वीसपट वाढ झाली होती. रॉबिन्सन कुटूंब लक्षाधीश होते.

हेटीला गुंतवणूकीची गोडी लागली होती. दरमहा मिळणारा ‘पॉकेटमनी’ ती गुंतवू लागली. ती विवाहयोग्य झाली आहे आणि अनुरूप तरुणांचे लक्ष जावं म्हणून तत्कालीन प्रथेनुसार बाबांनी तिच्यासाठी खर्च करून हजारो डॉलर्सचे गाऊन विकत घेतले. पण हेटीने ते दुसऱ्याच दिवशी विकून टाकले आणि त्या पैशांची बॉण्ड्स मध्ये गुंतवणूक केली. तिच्या बाबांनी कायम तिला कुणाचे कधी काही उधार ठेवू नये, अगदी उपकारही असे शिकवलं होते. त्यामुळे तिचे काटकसर (की कंजूषपणा?) आणि आर्थिक नियोजन याकडे जास्त लक्ष राहायचे.

काही वर्षातच हेटीची आई वारली. बाबांनी मासेमारीची कंपनी बंद करून शिपिंग कंपनीत गुंतवणूक सुरू केली. त्या कंपनीचे कामही चांगले चालू होते. ह्या काळातच हेटीची भेट एडवर्ड ग्रीन बरोबर झाली. तोही शेयर्सची उलाढाल करत असे. दोघांची मैत्री झाली. लवकरच हेटीचे वडीलही वारले. वर्ष दोन वर्षात हेटीने एडवर्ड बरोबर लग्न करायचे ठरवले. ज्या काळात स्त्री ही पुरुषाची संपत्ती मानली जायची त्या काळात हेटीने ‘माझे आर्थिक व्यवहार आणि संपत्ती माझी राहतील’ अशी अट घातली. एडवर्डची आर्थिक परिस्थिती तिच्या इतकी उत्तम नसली तरी सधन असल्याने तो ही राजी झाला.

अमेरिकेत यादवी युद्ध (civil war) सुरू झालं. त्याकाळात सरकारी चलन असे नव्हते. प्रत्येक बँक आपल्या आपल्या नोटा द्यायची. सरकारी नोटा प्रायोगिक तत्त्वावर होत्या. सरकारी नोटांना सोने-चांदी ह्याचे ‘बॅकींग’ (तारण) असणे गरजेचं. युद्धास आवश्यक निधी हवा म्हणून सरकारने केवळ आपल्या शब्दावर (तारणाशिवाय) चलन छापले. ह्या चलनाचा इतर बँकेच्या नोटांप्रमाणे १०० सोन्याच्या नाण्याला १०० नोटा असा भाव होता. नोटांच्या रंगामुळे त्यांना ‘ग्रीनबॅक’ असे नाव पडले. अर्थात युद्ध संपल्यावर आता ह्या चलनाचे काय होणार किंवा एकूणच आर्थिक परिस्थिती मुळे ग्रीनबॅकचा भाव पडला. हेटी ह्या काळात दोन मुलांची आई झाली होती, इंग्लडला राहत होती. तरीही आपला अमेरिका देश नव्याने घडतो आहे, त्यातील आर्थिक व्यवहार ह्याचे भान ठेवून होती. तिने इतर गुंतवणूकदारांप्रमाणे जवळचे ग्रीनबॅक आणि इतर अमेरिकन बॉण्ड्स विकले नाहीतच उलट जास्त विकत घेतले. गुंतवणूकी मागचे तिचे तत्त्व साधे होते - किंमत कमी असतांना वस्तू (बॉंड इ) विकत घ्यावी व किंमत जास्त झाल्यावर विकावी. आज ही पद्धत ‘व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग’ (मूल्याधिष्ठ गुंतवणूक) म्हणून ओळखली जाते. (हो, वॉरन बफेट ही ह्या पद्धतीचे पुरस्कर्ते आहेत.)

हेटी पुढे अमेरिकेत परत आली आणि रेल्वे, शिपिंग इ अनेक जागी तिने यशस्वी गुंतवणूक केली. (त्याचेही किस्से सुरस आहेत पण त्यावर नंतर कधी बोलू). वडीलांकडून मिळालेल्या ६ मिलियन डॉलर्सचे तिने तिच्या निधनापर्यंत जवळ जवळ १०० मिलियन डॉलर्स मध्ये रूपांतर केले होते. बाकी जमीन-जुमला वेगळा. ह्यात तिला पतीची फार साथ मिळाली नाही. त्याच्या आर्थिक व्यवहारांची पद्धत बघता दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. मात्र आपली कबर त्याच्याच शेजारी असावी म्हणून हेटीने आपला क्वेकर पंथ सोडून एपिस्कोपल पंथ स्वीकारला. प्रेम आणि व्यवहार ह्यात गल्लत न करणाऱ्या हेटीला अनेक लोकापवादास सामोरे जावे लागले. तिच्या कंजूषपणाचे, अस्वच्छ राहणीचे, तुसडेपणाचे किस्से चघळले गेले. त्यांचा खरेखोटेपणा न तपासता. त्या सगळ्या किश्श्यात थोडा दोष तिचा, थोडा तिच्या वैभवाचा आणि बराचसा काळाचा. ती काळाच्या फार पुढे होती. आज मात्र तिची ओळख काहीशी आदराने ‘वॉल स्ट्रीटची चेटकीण’ (The Witch of the Wall Street) म्हणून आहे.

सध्याच्या आर्थिक खळबळीत हेटीच थोडंसं चेटूक सगळ्यांवर होऊ दे!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान, रोचक आणि सध्याच्या शेअरमार्केटच्या पडत्या काळात समर्पक माहिती...
Let there be Many Such Witches n Wizards...

आवडलं

मस्त लेख! हेटी बद्दल अजून वाचायला आवडेल.
सी, काही लिंक्स, पुस्तकं माहिती असतील तर नक्की शेअर कर.

हेटी ची ओळख आवडली

.......सध्याच्या आर्थिक खळबळीत हेटीच थोडंसं चेटूक सगळ्यांवर होऊ दे...... तथास्तु !

किंमत कमी असतांना वस्तू (बॉंड इ) विकत घ्यावी व किंमत जास्त झाल्यावर विकावी.
१०० % सत्य.
२००८ च्या मंदीत विकत घेतलेले समभाग मला सर्वात जास्त नफा देणारे ठरले.
आता सुद्धा चांगले समभाग घेण्यासाठी उत्तम काळ आहे.

सर्व आयडी: धन्यवाद, हेटी आणि तिची रेल्वे गुंतवणूक याबद्दल लिहीणार आहे. ती गोष्ट तशी गुंतागुंतीची असल्याने स्वतंत्र १००० शब्द देणे उचित.

जि: हेटीची गोष्ट लिहीण्याच्या निमित्ताने मी दोन पुस्तके आणि काही लेख वाचले. त्याच्या लिंक्स 'हेटी व रेल्वे' लिहून झाल्यावर देते. ह्या लेखाची कल्पना (जर्म) जिथून सुचले ती लिंक .

काय मस्त ओळख आहे.
>>>>>>>>काहीशी आदराने ‘वॉल स्ट्रीटची चेटकीण’ (The Witch of the Wall Street) म्हणून आहे.>>>> भन्नाट आहे.

Pages