डेस्टिनेशन ∞

Submitted by अनन्त्_यात्री on 6 March, 2021 - 11:19

अनंताच्या यात्रेसाठी
जय्यत तयारी केली आहे

चांदणचुर्‍याचे भूकलाडू
हिमनगांचे तहानलाडू
(तहानभूक हरपू दे पण)
रसद टकाटक तयार आहे

प्रकाशवर्षी मोजपट्टी
डार्कमॅटरचा भव्य फळा
धूमकेतूचा खडूतुकडा
होल्डाॅलमध्ये भरला आहे

दिशा कोन ढळून जातील
घड्याळ काटे उलटे फिरतील
उद्याच्या बातम्या काल कळतील
याची तयारी ठेवली आहे

मुक्कामाला पोचलो तर
दृृृष्ट तिथे काढतील माझी
त्यासाठी मी कृृृष्णविवरछाप
काजळडब्बी घेतली आहे

आता फक्त यान कुठचे
इंधन साठवायला कॅन कुठचे
उकडले तर फॅन कुठचे
ह्या प्रश्नांशी लढतो आहे

अनंताच्या यात्रेसाठी
फक्त निघायचं बाकी आहे

Group content visibility: 
Use group defaults

छान!