कोविड-19 लसीकरण

Submitted by राहुल बावणकुळे on 6 March, 2021 - 06:42

कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण कार्यक्रमाच्या दुसर्या टप्प्यात 1 मार्चपासून ज्येष्ठ नागरीकांसाठी लसीकरण सुरू झाले. त्यात 3 मार्चला माझ्या आई (66 वर्षे) व बाबांनी (71 वर्षे) लस घेतली. लसीकरणावेळी दोघांनाही काहीच त्रास जाणवला नाही, वा मग नित्यक्रमात काहीही अडथळा आला नाही. दुसर्या दिवशी आईला लस दिलेल्या जागी एक-दोन तास हलकेसे दुखत होत, नंतर आपोआपच बंद झालं. त्यामुळे औषध घ्यायची गरज भासली नाही.

माहितीसाठी
1. cowin.gov.in ह्या संकेतस्थळावर आपला मोबाईल क्रमांक वापरून नावनोंदणी करावी लागते. प्रत्येक वेळी लॉग इन करतांना नव्याने OTP येत असल्याने पासवर्डची भानगड नाही.

2. एका खात्यावर जास्तीत जास्त 4 व्यक्तींची नोंदणी करता येते, संबधीत व्यक्तींचे आधारकार्ड, पॅनकार्ड, ड्रायव्हिंग लायसंस, वोटरकार्ड, पासपोर्ट, पेंशन पासबूक वा NPR कार्ड ह्यापैकी कोणतेही ओळखपत्र लागते आणि मग तेच लसीकरण केंद्रावरही न्यायचे असते (मी नावनोंदणी करतांना आईचे पॅनकार्ड तर बाबांचे आधारकार्ड वापरले होते तर लसीकरणकेंद्रावर पडताळणीसाठी अनुक्रमे तीच कार्डे दाखवावी लागली).

3. नावनोंदणी झाल्यावर आपल्या जिल्ह्यातील लसीकरण केंद्रांची यादी झळकते. सर्वच सरकारी व काही खाजगी केंद्रांवर लस मोफत दिली जाते तर ईतर खाजगी केंद्रांवर प्रती डोज रू. 250 आकारले जातात. त्यामुळे यादीतील केंद्राच्या नावासमोर मोफत वा सशुल्क असे ठळकपणे दर्शवले असते. त्यातून आपल्या सोयीचे केंद्र, दिवस व वेळ निवडू शकतो.

4. सर्वच केद्रांवर ज्यांना दुसरा डोज घ्यायचा आहे त्यांना प्रथम प्राधान्य दिले जाते. त्यामुळे तुम्ही दुपारच्या सत्रातील वेळ निवडली तरी सकाळी 11 वाजताच जावे. अनेकदा दुपारच्या सत्रात लसींचा साठा संपला किंवा पडताळणीदरम्यान सर्वर डाऊन आहे अशी कारणे सांगून परत पाठवतात. ह्यामुळे तुम्ही नोंदणी करून वेळ घेतली असली तरी बर्याचदा दुसर्या दिवशी यायला सांगतात.

5. लसीकरणावेळी आधी आपली व ओळखपत्राची पडताळणी होते, मगच लस दिली जाते. तसेच एखाद्या व्यक्तीस क्वचित प्रसंगी लसीमुळे reaction येऊ शकते म्हणून सर्वांना अर्धा तास निरीक्षणासाठी थांबवतात. त्यादरम्यान काहीही न झाल्यास घरी जाण्याची मुभा असते.

6. बर्याच ठिकाणी (नागपूरला) तुम्ही ऑनलाईन नाव नोंदवले असले तरी आदल्याच दिवशी सकाळी केंद्रावर जाऊन परत ऑफलाईनही नोंदणी करून ऑनलाईन नोंदणी केलेल्या दिवसाचे टोकनही आणावे लागते. बहुतेक केंद्रावर दिवसभरातील दोन्ही सत्रे मिळून सरासरी 100 लसींचाच साठा असतो.

7. पहीला डोज घेतल्यावर 28 दिवसांनी दुसरा डोज घ्यावा लागतो, तथापि त्यासाठी परत नावनोंदणी वा टोकन घ्यायची गरज नसते. पहीला डोज घेतलेल्या केंद्रावर ओळखपत्र घेवून थेट जाता येते, पण सकाळच्याच सत्रात जाणे ईष्ट आहे.

8. तसेच दुसरा डोज कोणत्याही केंद्रात घेता येतो पण काही केंद्रात Covaxin तर काही ठिकाणी Covishield देत असल्याने पहीला डोज घेतलेल्या ठिकाणीच जाणे योग्य आहे. कारण तुमचा पहीला डोज Covaxin चा असेल तर दुसराही तोच घ्यावा लागतो, अदलाबदल चालत नाही.

9. सध्यातरी 60 वर्षावरील सर्वच व्यक्तींसाठी लसीकरण सुरू झाले असले (त्यांना सहव्याधी असो वा नसो) तरी 45 ते 59 ह्या वयोगटातील व्यक्तींना मधुमेह, उच्चरक्तदाब ह्यासारख्या सहव्याधी असतील (नावनोंदणी करतांना 45 ते 59 दरम्यान वय असल्यास लगेच 20 सहव्याधींची यादी झळकते) तर त्यांनाही लस घेता येते.
ह्यासाठी संकेतस्थळावर दिलेल्या ठरावीक फॉर्मेटमधीलच वैद्यकीय दाखल्याची प्रत डाऊनलोड करून त्यांना सहव्याधी (यादीत दिलेल्या 20 सहव्याधींपैकीच) असल्याचे MBBS वा त्यावरच्या डॉक्टरांच्या सही व शिक्क्यानिशी प्रमाणित करून लसीकरण केंद्रावर न्यावे लागते.

10. लसीकरण केंद्रांवरील गर्दी कमी करण्याच्या हेतूने देशभरातील सर्वच केंद्रांवर 24 तास लसीकरणासाठी केंद्र सरकारने परवानगी दिली असली तरी बहुतेक केंद्रांवर पुरेश्या साधनसामुग्रीअभावी अद्याप 24 तास लसीकरण सुरू झाले नाही. तथापि काही केंद्रांवर पूर्वीची सकाळी 9 ते संध्याकाळी 5 ही वेळ रात्री 10 पर्यंत वाढवली आहे.

त्यामुळे आपल्या घरातील व परिचयातील ज्येष्ठ नागरीक कोणतीही भिती न बाळगता लसीकरणाचा लाभ घेतील हीच सदीच्छा!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users