यहां पे कोई भी ट्रेन नही रूकती है - एक रहस्यमय रेल्वेस्टेशन (अंतिम भाग)

Submitted by रानभुली on 23 February, 2021 - 13:00
bhutiya railway station

(या आधीच्या भागासाठी कृपया इथे टिचकी मारावी )

Picture7_0.png
मी कोप-यातल्या खांबाला टेकून उभी होते.
त्यामुळे स्टेशनच्या मागचे झाड माझ्या डोळ्यासमोर होते. ते अंधारात दिसले नव्हते.
तसेच नेमके कोणते झाड हे पण नव्हते समजले.

वीज चमकल्यावर हेच ते झाड हे कळले.
आम्ही दोघी एकमेकींना घट्ट मिठी मारून ओरडत होतो. त्याने भीती नव्हती जात.
उलट ती ओरडली की मी ओरडत होते आणि मी ओरडले म्हणून ती.
पार्थोने माझा आणि बंदनाचा खांदा दाबला आणि तोंडावर हात ठेवला. त्या स्पर्शाने सुरक्षित वाटलं आणि मी त्या सिच्युएशन मधून बाहेर आले. अंगाला कंप सुटला होता.
मी शांत झाले नंतर बंदनाही शांत झाली.
Picture14.jpg

पण अंगात कापरं भरलं होतं. दातखीळ बसल्यासारखी अवस्था होती. काही एक नीट सांगता येत नव्हतं.
फक्त बोट दाखवून आम्ही सांगायचा प्रयत्न करत होतो.
पार्थो आणि ऋतू मोबाईलचे टॉर्च घेऊन निघाले.

मी ऋतूचा हात धरून त्याला ओढलं. प्रचंड भीती वाटत होती.
या दोघांचं काही झालं तर ? यापेक्षाही तिथे काही असेल तर यांच्या दु:साहसामुळे सगळेच संकटात सापडू असे वाटले.
अशा काळात खरे तर मुलींनी थांबवणे चुकीचे असते याचे विस्मरण झाले. कारण थांबवले की मग अजून हिरोगिरी करायला हे जाणारच.
तसेच झाले.

Picture6.jpg

दोघेही पाऊस कमी झाल्यावर भिजत झाडाकडे निघाले.
तिथे उभे राहून झाडावर टॉर्च मारत होते. झाड तून टॉर्चचा प्रकाश कधी आरपार जात होता.
कधी कधी मिट्ट काळोख तो प्रकाश गिळून टाकत होता.
त्या प्रकाशात क्षणात सावल्या रूप बदलत होत्या. हालचाली होत होत्या.
निरनिराळे भास होत होते.
पण मघाशी झाडाच्या मागेच लख्ख प्रकाश झालेला क्षणभर.
त्यातच ते ...........
ते दिसले होते.

कसलं भयाण होतं !
त्या एका सेकंदात कित्येक युगं उलटून गेल्यासारखं वाटलं होतं.
काय भावना झालेल्या त्या शद्बात कधीही सांगता येणार नाहीत.

दोघे बराच वेळ टॉर्च मारून आले.

"काहीही नाही तिथे"
"उगीच घाबरलात दोघी "
आम्ही गप्प बसलो.
मी एकटीनेच नव्हतं ना पाहीलेलं.
मी बंदनाकडे बघितलं. तिला गप्प बसायचा इशारा केला.

रात्र चढत होती.
अंधार, पावसाळी वातावरण आणि ढग.
काहीच दिसत नव्हतं.

आता मेणबत्त्याही संपत आलेल्या.
दुसरा पुडा उघडला. त्यातल्या मेणबत्त्या पेटवल्या.
चांगला उजेड झाला. त्याने जरा धीर आला.

आता थर्मासकडे लक्ष गेलं.
जे घडलं त्याने अंगातून त्राण गेल्यासारखं होत होतं.
रात्री अपरात्री काही खायचं नाही, चहा तर अजिबात घ्यायचा नाही हा माझा नियम मोडून मला चहा हवासा वाटत होता.

मुलांना सवय असते आउटिंगची.
बाहेर पडले की एक ज्यादाचा ड्रेस, स्लीपर, शॉर्ट्स. मेणबत्त्या, दोरी , कागदी कप असे सामान घ्यायला ते विसरत नाहीत.
पण घरात त्यांचं डोकं असं चालत नाही. घरात मदत नाहीत करत अजिबात.
आमचे दोघींचेही कपडे ओले झाल्याने थंडी वाजत होती.
मुलांनी टी शर्ट देऊ केले होते.
पण बदलायचं कसं आणि कुठे हा प्रश्नच होता,
तिकीटघर उघडे होते. पण आत्ता तिथे जाऊन (दोघी असल्या तरी एकट्या दोघी) कपडे बदलायची हिंमत आमच्यात नव्हती.
स्टेशनमास्तरच्या केबीनमधे काहीतरी असायचं ना ?
मग इकडे यायला किती वेळ लागणार ?

पण यातलं काहीही बोलून दाखवलं की यांच्यात हिरो संचारणार. त्यापेक्षा गप्प बसा असं ठरवलं.
चहाने छान ऊब आली. तो अर्धा तास खूप छान गेला.
मघाशी एव्हढा प्रकार घडून गेला याचा लवलेशही नव्हता आता.

अंधारात दूरवर काही प्रकाशाचे ठिपके हवेत नाचत होते. वरखाली होत होते.
थोडे मोठे झाल्याप्रमाणे वाटायचे. तर पुन्हा छोटे.
ते कदाचित हळू हळू इकडेच येत असावेत.
पण आता कुणाला सांगायची सोय नव्हती.
नाहीतर पुन्हा काही नाही म्हटल्यावर मग टिंगलीला सुरूवात झाली असती.

धप्प !
शंकाच नाही.
आता फटाक असा आवाज झाला.

मग पाण्यात सपकारे मारल्यासारखा आवाज झाला.
मला तरी येत होता,
हा आवाज मग कधी पाणी हलल्यासारखा येत होता.
पण सातत्याने येत होता.
कसला आवाज ?
कुणीतरी पोहत असल्याचा ?
या वेळी ?

बंदनाकडे पाहीलं. ती ही वेध घेत होती.
मग मुलांकडे पाहीलं.
त्यांनाही निश्चितच आवाज आलेला.
त्या आवाजाबद्दल ऐकलेलं पण विसरलेच होते.
कसले आवाज हे विचारायचं राहून गेलं.
असं कसं राहीलं ?

सगळे स्तब्ध होतो.
आता चंदन उठला. त्याला अडवणे अशक्य होते.
चंदन उठला म्हणून कर्तव्य म्हणून अजून कुणीतरी त्याच्या मागे गेलं .

मग आम्ही सगळेच निघालो.

ती एक जुनी विहीर होती.
आड असतो तशी होती. चांगला कठडा पण होता.
अंधारातही कठडा दिसला होता.

आता सर्वांनी एकत्रच टॉर्च मारून पाहीलं.

प्रकाश आत पोहोचत नव्हता.
चंदनने त्याच्याकडचा टॉर्च काढला. टॉर्चचा प्रकाश मोठा होता.
पाणी काळं दिसत होतं.
टॉर्चचा झोत जसा हलेल तशी दृश्ये दिसत होती.
जणू काही अंधाराला आलेले हजार डोळे प्रकाशाने दिपून मिटून घेतले जाताहेत.
विहीरीतून कुणीतरी आमचा वेध घेत होतं अशी जाणीव होत होती.
आता आवाज येत नव्हता.

जे कुणी होतं ते लपून बसलं होतं का ?
कोण असेल ते ? माणूस ?
पण मग इतक्या रात्री इतक्या लांब का ?
कुणी वेडा वगैरे असेल का ?
पण मग आता कुठेय ?

आवाज तर स्पष्टच होते.
बराच वेळ थांबून काहीही समजले नाही.
मग माघारी आलो.

आता पुन्हा शांतता पसरली होती.
दोन वाजून गेले होते.
अंधार विरघळल्याप्रमाणे वाटत होतं.
आपल्याकडे तीन आणि चारच्या मधे जसे वातावरण असते तसे वाटत होते.
कदाचित चारच्या सुमाराला.

आता खरी गरज न पांगता एकत्र राहण्याची होती.
मी अक्षरशः विनंती केली. त्यामुळे असेल आता थव्याथव्यात बसलेले सगळे एकत्र येऊन बसले.
त्यामुळे जिवात जीव आला.

खूप भीतीच्या वेळी जर असे खूप जण एकत्र असतील तर कसं वाटतं ना ?
फनी बोनला गुदगुल्या होतात तसं किंवा ब-याच दिवसांनी बॅडमिंटन खेळल्यावर शिरांना बोट लागल्यावर कसं दुखरं पण छान वाटतं तसं मनाला वाटत होतं.
जंगलातून मोठ्या बसमधे बसून जाताना असंच वाटतं.

आता सकाळ व्हायची वाट बघूयात.
जे काही आहे ते परीक्षा घेतंय. आपणत्याआला आव्हान नकोच द्यायला.

मी न राहवून पुन्हा त्या कोप-यातल्या खांबाला टेकले.
इथून झाड दिसतं.

ते मघाचे ठिपके लयीत हलत होते. त्या आधी एकाच जागी स्थिर झाले होते बराच वेळ.
रात्रीचे तीन.

पाँ

मोठ्ठा आवाज घुमला.
त्याने दचकायला झालं.
दूर पुलावरून ट्रेन धडधडत येताना दिसली.

--------------------------------------------------------------------------------------

खरं सांगायचं तर इतकं बरं वाटलं.
ट्रेन आहे म्हणजे ड्रायव्हर, गार्ड, प्रवासी.
मानवी अस्तित्व.
ते आमच्याकडे येत होतं. क्षणभर का होईना सोबत होत होती.

ट्रेन धडधडत आली. तशीच जाणार होती ती.
तिचा तो भला मोठा दिवा अंधाराला चिरून स्टेशनात दिवाळी साजरा करत होता.
ट्रेन स्लो झाली.
आणि चक्क थांबली.

आमच्या डोळ्यांवर विश्वास बसेना.
चंदन आणि पार्थो चटकन ट्रेनकडे गेले,

मी पाहीलं ते ठिपके जवळ आले.

त्या ठिपक्यांना अस्तित्व होतं.
आता त्याचे छोटेसे टॉर्च झालेले दिसले.
त्या मागे दोघे जण आले.

त्यातला एक चहावाला होता.
घडीचं टेबल टाकून त्यावर चहाची किटली ठेवली. ग्लास काढले.
ट्रेनचे ड्रायव्हर, गार्ड्स सगळे उतरले. दोघे प्रवासी पण उतरले.
चहापाणी उरकून दोन मिनिटात ट्रेन मार्गस्थ झाली.

--------------------------------------------------------------

आता आमच्या सोबत तो चहावाला आणि त्याचा जोडीदार होता.
इतका वेळ खूप घाबरलेल्या अवस्थेत घालवला. आता स्थानिकांपैकी कुणीतरी होतं.
इतका धीर आला.

लहान असताना आम्ही फलटणला एका लग्नाला गेलेलो. तिथून आई आणि मी एसटीत बसून पुण्याकडे निघालो. पण बाबा दिसत नव्हते. मी अस्वस्थ झाले. मला वाटलं बाबा हरवले. पण ते नीरा इथे बसमधे चढले. त्यांना पाहिल्याबरोबर मी धावतच त्यांच्याकडे गेले आणि कडेवर झेपावले. त्या वेळी जसं आश्वस्त वाटलं होतं तसं आज इथे या परक्या माणसामुळे वाटलं.

आम्ही सगळ्यांनीच त्याच्या भोवती कोंडाळं केलं. चहा तर हवाच होता.
मग गप्पा सुरू झाल्या.
Picture19.jpg
त्यालाही अपेक्षित होतंच बरं का.
स्टेशनवर कसे काय यातून त्याला समजलेच ते.

चहावाला कमी बोलत होता. त्याला बोलतं करावं लागायचं.

त्याला विचारले "इतक्या रात्री का चहा घेऊन येतोस ?"
त्याने सांगितले " रात्र कुठे राहिलीय आता ? "
मी विसरलेच होते.

तरीपण चांगलाच अंधार होता. थोडी रात्र होतीच बाकी.

तीन वाजता एक ट्रेन थांबा नसताना चहासाठी थांबत होती. कारण ट्रेनचा ड्रायव्हर इथल्या एका गावाचा होता.
त्याने कोलकात्यात घेतलेल्या वस्तू चहावाल्याकडे दिल्या की तो त्याच्या घरी पोहोचवत असे. घरी दुकान होतं. घरातले लोक ते चालवत.
शिवाय पुरूलिया सोडल्यानंतर चहा मिळतच नव्हता कुठे.
अजून एक पहाटे चारची ट्रेन आली की चहा संपायचा. मग तो पुन्हा चहा घेऊन सकाळच्या गाडीत चढायचा. पुढच्या स्टेशनवर जाऊन चहा संपला की तिथे चहा बनवायचा असं दिवसभर चालू रहायचं.

बेगुनकोडर चालू असताना त्याचंही बरं चाललं होतं.

पार्थोने थेटच विचारलं " इथे भूत होतं का ?"
त्याने नकारार्थी हात हलवला.
"मग इतक्या लोकांना कसं काय दिसलं ? "
तो हसला.
"लोक खराब असतात. अजूनही इथे काही खराब लोक स्टेशनच्या मागच्या बाजूला येतात. लोक रात्रीचे इथे राहू नयेत म्हणून पळवून लावतात.
आज कुणी तुम्हाला पाहीलं नाही म्हणून "
" पण बाबा या दोघींनी झाडावर काही तरी पाहीलं "
" रात्री झाडात वेगवेगळे आकार दिसतात. तुम्हा शहरी लोकांचा संबंध रानातल्या झाडाशी येत नाही "
" नाही. कपडे दिसले काळे "
" पानांच्या गर्दीतून काहीही दिसू शकतं. तरी पण सकाळी एकदा बघा"
" आणि विहीरीत पोहणारा मनुष्य ? ते तर आम्ही सर्वांनी ऐकलं "
" माणूस नाही. साप आहे चांगला मोठा. त्याच्या सळसळीने चांगला माणूस पोहोतोय असा आवाज होतो. "

ही शक्यताच गृहीत धरली नव्हती आम्ही.

आमची उत्तरं मिळाली होती.
झाड फक्त बघायचं होतं. त्यासाठी उजाडण्य़ाची वाट पहायची होती.

आता एकच प्रश्न सतावत होता.
" बाबा, मध्यंतरी काही लोक आले होते त्यांनी पांढ-या कपड्यातल्या भूताचे फोटो आणि व्हिडीओ पण अपलोड केलेत "
त्याने हात हलवले. हसला.

"त्या दिवशी मी उशिरा आलो. उतरण्यासाठी ड्रायव्हरला सांगून ठेवलं होतं. त्याने अगदी पाच दहा सेकंद गाडी थांबवली. मी उतरलो तर अशीच तुमच्या सारखी मुलं होती. मी पलिकडे आडोशाला थांबलो. तर त्यांच्यातल्याच एका मुलाने मुलीसारखे कपडे केले. वरून पांढरा घुंगट घेतला आणि रात्रीच्या ट्रेनच्या मागे पळत होता. खूप गोंधळ केला. मग गावातल्या लोकांनी येऊन त्यांना हाकलून दिले "

"म्हणजे बाबा, या रेल्वेस्टेशनची उगीचच बदनामी झाली का ?"
" नाही तर काय ?"
" तुम्हाला याचा त्रास होतो का ?"
" त्रास कसला ?"
" तुमचा रोजगार बुडाला "
" चालायचंच. आधी पण नव्हता. आम्हाला थांबून चालत नाही. सहा किमीवर झाल्दा ला ट्रेनमधे चढून चहा विकला मी "

आता एक महत्वाची शंका राहिली होती.
" बाबू मग ट्रेन ड्रायव्हरला दिसलं ते ?"
" बदमाष लोक होते सगळेच. या कुणालाच इथे नोकरी करायची नव्हती. त्यांनी अफवा पसरवली होती. अफवा असेल की अजूनही लोक त्यात भर घालून सांगतात. कुणी म्हणत नाही की ही अफवा आहे. नाही दिसलं तरी लोक दिसलं म्हणतात "
" आणि प्रवाशांना दिसलं ते ?"
" खेड्यात कसं शिक्षण कमी असतं. इथे भूत आहे म्हटल्यावर त्यांना दिसू पण लागतं ते "

शेवटी न राहवून मी विचारायला सांगितलं,
" मोहन बाबू आणि त्यांची पत्नी कसे गेले मग भूत दिसल्याने ? अफवेसाठी कोण जीव देईल ?"
" ते काय आपण नाही सांगू शकत "
चहावाला प्रामाणिकपणे म्हणाला.

खरंच. त्याने कितीतरी प्रश्नांची उत्तरं अशी दिली होती कि इथे का अशा कहाण्या प्रसवल्या आणि त्यांचा प्रसारही झाला याचंच कोडं होतं.

पण मोहन बाबूंबद्दलच्या प्रश्नाचं उत्तर काही मिळालं नाही.
आम्ही खूप उलटसुलट विचार करून पाहिला. मानसशास्त्रीय धक्का एकाला बसेल, दोघांना कसा ?
आणि एकाच दिवशी दोघांचा मृत्यू कसा काय झाला ?
याचं वेगळं काही कारण असेल का ?

ते मग नंतर कधीतरी कोलकात्यात चंदनच्या ओळखीनेच समजणार होतं. आता त्याची एव्हढी गरजही वाटत नव्हती.

चारची ट्रेन आली. चहावाल्याने आपली किटली खाली केली आणि आमचा निरोप घेऊन दुसरी किटली आणायला गेला. सकाळच्या गाडीला त्याला हजर रहायचे होते.

पाच वाजेपर्यंत फटफटायला सुरूवात झाली होती. गावाकडे जाग दिसत होती.
आवाज येत होते. आश्रमातून आणि शिवालयातून घंटांचे , आरत्यांचे आवाज येत होते.

आम्हाला झरनाचा थर्मास परत करायचा होता.
चटकन पुरूलियाला जाऊन ड्रेस घेऊन येऊ आणि देऊयात असे मी सुचवले.
तर पार्थो म्हणाला
"तुम्ही ड्रेस घेऊन माझ्याकडे द्या. मी पुन्हा येईन दुसरी गाडी घेऊन. माझं नंतर पुरूलियात काम पण आहे. ते करून मग कोलकत्यात भेटूयात "

असं बोलत असताना आम्ही झाडाकडे पाहीलं तर

एक मोठा कापडाचा तुकडा झाडाला अडकलेला होता.
वादळी वा-याने रात्री उडून आलेला होता तो. झाडाच्या मागे दूर क्षितिजावर वीज चमकली तेव्हां कुणीतरी हात आणि पाय ताणून उभे आहे असे वाटले होते.

----------------------------------------------------------------------

सकाळ होत आली.
झरनाच्या घराला जाग होती.
तिच्याकडे आम्ही थर्मास दिला. तर तिचा भाऊही आला.

आता चहासाठी पुन्हा आग्रह झाला. आम्हाला आता लाज वाटू लागली होती.

रितेशने रात्र कशी गेली विचारलं
त्याला मग सगळी कथा सांगितली. आमचे भास वगैरे आणि रात्रीच्या चहावाल्याने कसे आमचे भ्रम दूर केले ते साग्रसंगीत सांगितलं.

रीतेश विचारात पडला.
"कोणता चहावाला ?"
" तो नाही का ? रात्री तीनच्या ट्रेनसाठी थांबतो "
मग त्याला फोटो दाखवला.

त्याने तो बुचकळ्यात पडला.
"चारच्या ट्रेनला किटली खाली झाली की पुन्हा गावात येऊन सकाळी हजर होतो तो "
" मी तर याला कधीच पाहिलेला नाही . आणि तुम्ही जे सांगताय ते बाकीचं सगळं अगदी लॉजिकल आहे पण ...
रात को...
यहा पर कोई भी ट्रेन नही रूकती है !"

(समाप्त)

( मनोगत : या धागबरेचले बरेच फोटोग्राफ्स हे ओळखी पाळखीच्या जालकरांकडून घेतले आहेत. काही आमचे आहेत. आमचे स्वतःचे फोटो आमच्यातल्याच एका सदस्याने नंतर देण्यास नकार दिल्याने आम्हाला वापरता आले नाहीत. त्या सर्वांचे सर्वप्रथम धन्यवाद. मायबोली प्रशासन आणि सर्व वाचकांचे मनःपूर्वक धन्यवाद. तुमच्या पाठिंब्यामुळे गप्पाष्टकासारखं खरडता खरडता एक संपूर्ण लेखमालाच तयार झाली. दोष वगैरे असतीलच. नंतर सावकाशीने मला सांगा.)

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान झालीय कथा.

"तो चहावाला खरा होता का भूत?" >>>>
असे विचारणाऱ्यांनो, ते तुमचं तुम्हाला ठरवायचे आहे.
ते लेखिकेने उलगडून सांगितलं तर कथेचा आत्माच हरवेल.
कथेचा आस्वाद लुटा.

>>ते लेखिकेने उलगडून सांगितलं तर कथेचा आत्माच हरवेल.

लेखिकेने भाग ४ च्या एका प्रतिसादात म्हटलं आहे की 'ही सत्यकथा आहे. मी तिथे जाऊन काही काही गोष्टींचा वेध घ्यायचा प्रयत्न केला आहे'. ह्याच अर्थ त्या तिथे गेल्या होत्या.

रितेश, पार्थो, ऋतू, बंदना वगैरे लोकही खरे आहेत, काल्पनिक पात्रं नाहीत कारण भाग ७ च्या प्रतिसादात लेखिका म्हणतात 'आमच्या टीम मधला चंदन नंतर आमच्याशी खूप वाईट वागला. त्याने फोटो, व्हिडीओज दिले नाहीत. नाहीतर स्वतःच्या मोहीमेचे फोटो वापरायला खूप आवडलं असतं'. आणि चंदनचा उल्लेख ह्याच भागात बाकी टीमसोबत आहे.

मग रितेशने 'असा चहावाला नाहीच' असं म्हटल्यावर ही भानगड काय आहे ते शोधायला गेलेल्या ह्या ग्रूपने किमान गावात इतर ठिकाणी त्या चहावाल्याचा शोध घ्याय्ला हवा होता. नाहीतर त्या शोधमोहिमेला काही अर्थच रहात नाही. आणि रितेशने उगाच थाप मारली असेल असंच वाटतं. कारण फोटोतला चहावाला आपल्या सगळ्यांना दिसतोय. थोडक्यात काय तर, जर ही काल्पनिक कथा नाही तर तो चहावाला माणूस होता का भूत ह्या प्रश्नाचं स्पष्ट उत्तर मिळत नाही आणि वाचक म्हणून निराशा पदरी येते.

फक्त हा शेवटचा ट्विस्ट काल्पनिक असेल तरीही वाचक म्हणून फसवणूक झाल्यासारखं निदान मला तरी वाटलं.
पूर्ण कथाच काल्पनिक असेल आणि खरी असल्याचं भासवलं असेल तर लिखाणाचं कौतुक आहे. मग ह्या प्रश्नाचं उत्तर ज्याने त्याने शोधावं हेही ठीक आहे. पण मग लेखिकेच्या प्रतिसादांची टोटल लागत नाही.

स्वप्ना जी तुमच्या मताचा संपूर्ण आदर करते. जर तुम्हाला फसवणूक झाली असे वाटत असेल तर तुमच्या मताचा आदर आहेच.

पहिल्या भागाच्या सुरुवातीला यात नाट्य असेल असे जाहीर केले होते. हा माझा पहिलाच प्रयत्न आहे ही सबब मी सांगणार नाही. पण वाचकांशी हा माझा करार झाला आहे असे मला वाटते.

या रेल्वे स्थानकाबाबत अशी कोणतीही गोष्ट अशी नाही जी जालावर नाही. अगदी रितेशचा व्ह्लॉग पण सापडेल. तो वयस्कर मनुष्य सापडेल.

त्यामुळे नवीन काय आहे यात? काहीच नाही. जी उकल केली आहे ती सुद्धा कदाचित आमच्या पूर्वी किंवा आम्ही जाऊन आल्यानंतर ते आता मी इथे लिहीपर्यंत कुणी ना कुणी जालावर आणलीच असेल. मला सापडली नसेल कदाचित अन्य कुणाला लगेच सापडेल.

आम्ही तयारीने गेलो नव्हतो हे पण मी सांगितले होते. तसेच यातले जाणकार ही नाहीत. आम्ही एक अनुभव घेतला.
शेवट प्रत्येकाला हवा तसा घेता येईल. यात फसवणूक हा हेतू नाही. काही खुलासे ही कथा मीच लिहिली असल्याने करणे मला योग्य वाटत नाही. नाहीतर वाचकाच्या बुद्धीवर शेवट सोडून देण्यातली गंमत नाहिशी होईल असे मला वाटते.
. तुमच्या मताचा पूर्ण आदर आहे. फसवणूक झाली असे वाटत असेल तर माझ्या साठी ही खेदाची बाब आहे. मी दिलगीर आहे. मला पण यावर विचार करता येईल.
सर्व वाचकांचे मनःपूर्वक आभार.
मोबाईलवरून लिहीत असल्याने थोडक्यात आटोपते. कृपया गैस नसावा.

यात दोन गोष्टी आहेत. एक ते रेल्वे स्टेशन आणि त्याची स्वतःची कहाणी.
दुसरे आमची स्वतःची कहाणी. आम्ही घेतलेला अनुभव. इतरांच्या अनुभवातून न सांगता आमच्या अनुभवातून सांगणे.
या दोन गोष्टी समांतर सांगत गेले. पण दुसरी कहाणी कंटाळवाणी वाटणे स्वाभाविक आहे. ती दिलीच नसती तर शेवटी या अनुभवाचा साक्षीदार होणे वाचकांना कठीण झाले असते.
एखाद्या अशा प्रवाद असलेल्या जागेची माहिती थोडे स्वातंत्र्य घेत रंजक करण्याची पद्धत आहेच.
भानगढ किंवा कुलधरा असा सर्च करून बघा. कुलधरा इथे घरच्यांसोबत जाउन आले त्यात सांगण्यासारखे काहीच नाही. म्हणजे गावाबद्दलच्या कहाण्या रंजक आहेत. पण माझा अनुभव म्हणजे आईवडील नेतील तिकडे जाणे, ज्या गाडीत बसतील त्यात बसणे. यात कुणाला इंटरेस्ट असेल ?
भानगडची मूळ कथा आता इतकी प्रसिद्ध आहे कि तिकडे जाऊन आलो हे सांगण्यात आणि ऐकण्यात कुणालाच रूची नसेल. फार तर अनुभवात असेल, पण भानगडची गोष्ट सर्वांना तोंडपाठ आहे. ती सांगितली तर कंटाळवाणे होईल. इथे मला स्टेशनबद्दलही सांगणे क्रमप्राप्त होतं.

त्या मानाने बेगुनकोडर बद्द्ल आपल्याकडे माहिती का नाही असे वाटल्याने मी इथे लिहिले.
ही सगळी गोष्ट काल्पनिक कथा आहे असे जाहीर करणे ही मात्र फसवणूक झाली असती. कारण ते माझे ब्रेनचाईल्ड नाही.
चंदनने वाद झाल्यावर संबंध तोडले. त्याच्यावर फोटोग्राफीची जबाबदारी होती. त्यामुळे आम्ही बेसावध राहून जास्त फोटो काढले नाहीत. ही माझी अडचण मी सांगितली. त्यामुळे नाईलाजाने उसणवार करावी लागली. नाहीतर अजून प्रभावी झाले असतै.
त्याच्याशी काय भांडण झाले हे महत्वाचे नाही.

छान लिहिलाय शेवट. पूर्ण सिरीज आवडली. पण सत्यकथा असल्याने शेवटी खरं खोटं काय केलं हे अपेक्षित होतं. त्या अनुषंगाने मी तरी कथेत गुंतत गेले होते.

रानभुली लेखमालिका मायबोलीच्या मुख्य पानावर आलीय . मस्तच .
मला हि आवडला शेवट......पण खरच असच झालेल का? (पुन्हा तेच :-))
कदचित कथेत खुपच गुंत ल्यामूळे असे होत असेल Wink

रानभुली, मला आवडली तुमची कथा आणि शेवटचा ट्वीस्ट. मस्त मज्जा आली वाचताना.

तो भावी पंतप्रधान होता >> प्रचंड हसले...अजुन हसतेय.... Happy

बोकलत - आभार. तुमचे अधून मधून आलेले विनोदी प्रतिसाद मस्तंच Lol
वीरूजी - आभार
किल्ली , आरएमडी - आभार
धनवन्ती - मस्तं प्रतिसाद दिलाय. खूप आवडला . आभार.
अनु, भोचकभवानी आभारी आहे.
अनामिका धन्यवाद. माझ्या एका टीचरचे नाव आहे हे. Happy

शुगोल, वावे , कविन - मनापासून आभार. नक्कीच लिहीन पुढेही.

मृणाली, अस्मिता - तुमच्या सततच्या प्रोत्साहनामुळे जमलं. नाहीतर खरडतच होते सुरूवातीला.

बादशहा - धन्यवाद

हर्पेन सर - मनापासून आभार. नक्कीच लिहीन.
__/\__
च्यवनप्राश आणि प्राचीन - आभारी आहे.
प्राचीन तुम्ही हुरूप दिलात. धन्यवाद

हरचंद पालव - लव्हस्टोरी अशी सगळ्यांना सांगू ? :इश्शः Proud
देवकीजी - धन्यवाद

स्वप्ना राज - खूप खूप आभार तुमचे. स्पष्ट अभिप्रायामुळे सुधारणाच होईल. ट्रेन थांबण्याचे टायमिंग आणि माणसाला उतरायला लागणारा वेळ इतकं बारकाईने वाचलं जातं हे लक्षात आलं. मी जे ऐकलं ते लिहीलं. पुढच्या वेळी त्यावर विचारही करीन.

सामी - होय. पण शेवट वाचकांनी ठरवायचाय. Happy आभारी आहे.

नरेन, एसएसजे - धन्यवाद

जिज्ञासा, कुमार सर - मन:पूर्वक आभार

मानव सर - खूप खूप आभार. अगदी हेच म्हणायचे होते पण मला सुचत नव्हते.

नौटंकी, विवेक - मनापासून आभार.

वर्णिता - मन:पूर्वक आभार
निर्झरा - धन्यवाद
मैत्रेयीजी - पहिल्यापासून दिलेल्या प्रोत्साहनाबद्दल आभार.
स्वप्निल - धन्यवाद
सतिश म्हेत्रे - आभार

स्मिता श्रीपाद - खूप छान वाटलं. मनापासून आभार. Happy

हेहे Happy
आधी मला वाटलं मलाच भोचक भवानी म्हटलंय (तशी मी आहे पण, पण स्वतःचा मूळ स्वभाव कंट्रोल करायचा प्रयत्न करत असते)
मग मागे जाऊन वाचलं तर वेगळा आयडी आहे.

अय्या, असं झालंय खरंच की. सॉरी हं.
मी घ्यायला पाहीजे होता हा आयडी. मला जास्त सूट झाला असता Lol

छान लिहिले आहेत सगळे भाग रानभुली.

ऋतुपर्ण (परंम्ब्रत चटर्जी) बद्दल पण एक लेख होउन जाऊ देत.

मस्त कथा... एकदम O Henry style चा ट्विस्ट.

ऋतूपर्ण चे उपकथानक चालू ठेवायला हरकत नाही...आखीर वो भी तो स्टेशन रहा है आपकी सफर का...!!!

सगळे भाग वाचले. गूढ शेवट आवडला. त्यामुळे हि कथा खरी कि काल्पनिक हे वाचकानीं ठरवावे असा संदेश त्यात असावा (असे माझे मत)

>> तिचा तो भला मोठा दिवा अंधाराला चिरून स्टेशनात दिवाळी साजरा करत होता.

खूप छान लिखाण शैली. अशी जी वाक्ये जी आहेत त्यामुळे वाचताना मजा आली.
का कुणास ठावूक पण वाचून झाल्यावर मला The Blair Witch Project आठवत राहिला.
असो. पण जे काही आहे ते उत्तम सादरीकरण Happy

गाण्यांसंदर्भात जी चर्चा आहे ती खूपच रोचक वाटली. विशेषतः एकाच चालीची अनेक गाणी. हे माहित नव्हते.
बंगालचे वातावरण, लोक, तिथले राहणीमान, त्यांचे स्वभाव, खाणे, आवडीनिवडी अशी भरपूर माहिती या लेखमालेत आहे. ती आवडली.

लिहित राहा. वाचत राहू.

खूपच छान शेवटचा भाग...परिस्थितीमूळे निर्माण झालेले मनाचे भास आणि वास्तविकता याची उकल मस्त केली आहे. असेच छान लिहीत राहा. तुझे लिखाण वाचायला आवडेल.

मजा आली ranbhuli..

मंडळी - या वर्षीचे गटग बेगुणकोडोर ला करायचे का?

@ रानभुली,

लेखमाला झकास झाली. एक भूतकथा आणि सोबत स्वतःचा प्रवास-मित्र-अनुभव असे वैयक्तिक कथन हा दुपेडी फॉरमॅट फार आवडला मला.

उर्दू कथाकथनांत 'किस्सागोई' प्रकार असतो, आधीच माहिती असेलेली कथा जरी असेल उदा. लैला मजनूची सर्वांना माहिती असलेली कथा - किस्सागो कसा सांगतो/ते त्यात खरी मजा. तुम्ही 'किस्सागो' ची भूमिका झकास वठवली आहे. ब्रावो !

आणि हो,
स्वतः पांढरे कडे घालून रात्रीचे गाणे म्हणत फिरण्याची इच्छा ...झूम झूम ढलती रात वगैरे, फुलांच्या रानात भान विसरणे, भुताला घाबरून दातखीळ बसणे, स्वतःला 'शेखचिल्लीण' म्हणणे, मित्रांनी गाण्याच्या भेंड्या आणि एका ट्यूनची विविध भाषांमधली अनेक गाणी म्हणणे हे सगळे फार क्यूट,

जियो !

<<<स्वतः पांढरे कडे घालून रात्रीचे गाणे म्हणत फिरण्याची इच्छा >>> इच्छा असे नाही तरी माझा एक असा किस्सा झालाय गावी दोन वर्षांपूर्वी.

आमचे गावचे घर, गावात जाताना पहिलेच घर आहे अन समोर जिथवर नजर जाईल तिथवर उसाची शेती मध्ये मध्ये आंबा फणसाची झाडे.
तर झाले असे की मी रात्री उशिरा माझा पांढरा नाईट सूट घालून फोनवर गप्पा मारत पहिल्या मजल्यावर बाल्कनीच्या कोपऱ्यात बसले होते अन माझा चुलत भाऊ घरी येताना मला पाहून जोरात किंचाळला होता. कारण बाकीची मंडळी गावच्या आतल्या घरी राहत अन हे घर बंद असायचे, त्यात त्याला माहित नव्हते की आम्ही आलोय.

Pages