नवी मालिका - स्वाभिमान

Submitted by मोरपिस on 21 February, 2021 - 01:56

छोट्या पडद्यावर उद्यापासून एक नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या नव्या मालिकेचं नाव आहे ‘स्वाभिमान’. अस्तित्वाचा शोध घेऊ पहाणाऱ्या हरहुन्नरी पल्लवीची गोष्ट या मालिकेतून पाहायला मिळेल. एका छोट्या गावात वाढलेल्या पल्लवीचं शिक्षिका बनण्याचं स्वप्न आहे. स्वप्नांचा पाठलाग करत ती तिचं ध्येयं कशा पद्धतीने गाठते याची रंजक गोष्ट स्वाभिमान मालिकेतून उलगडेल. पूजा बिरारी ही गुणी अभिनेत्री पल्लवी ही व्यक्तिरेखा साकारत असून स्वाभिमान या मालिकेतून ती टेलिव्हिजन विश्वात पदार्पण करत आहे. यासोबतच सर्वांचा लाडका अभिनेता अक्षर कोठारी, आसावरी जोशी, अशोक शिंदे, सुरेखा कुडची, प्रसाद पंडित अशी दमदार कलाकारांची फौज मालिकेत पाहायला मिळेल.

स्वाभिमान मालिकेचं वेगळेपण सांगताना स्टार प्रवाहचे कार्यक्रम प्रमुख सतीश राजवाडे म्हणाले, ‘स्वाभिमान हा एका मुलीच्या, बाईच्या आयुष्यातला दागिना आहे जो तिने अभिमानाने मिरवायला हवा. स्वाभिमान हे तिचं अस्तित्व आहे आणि कोणत्याही परिस्थितीत ते कधीही हरवता कामा नये हे या मालिकेतून रसिकांना पाहायला मिळेल. माणसाने स्वाभिमानी असावं ती त्याची ओळख असते.’

स्टार प्रवाह प्रस्तुत ‘स्वाभिमान’ या मालिकेची निर्मिती फ्रेम्स प्रोडक्शनने केली असून कल्पेश कुंभार दिग्दर्शनाची धुरा सांभाळणार आहेत. येत्या 22 फेब्रुवारीपासून सायंकाळी 6.30 वाजता स्टार प्रवाह वाहिनीवर ‘स्वाभिमान’ ही मालिका प्रसारित होणार आहे.

Group content visibility: 
Use group defaults

काही नवीन विषय नाहीयेत आता यांच्याकडे पण. तेच तेच दळण वाटतंय. निदान ती रंग माझा वेगळा च्या जागी तरी लावायची. तीही पाणी घालून बोर करताय.

तो अक्षर कोठारी अजून यंग दिसतो यात. पहिला भाग बघेन म्हणतेय disney hotstar वर.

मुलीची आई भाची आहे माझी, विठुमाऊलीनंतर ती खूप महिन्यांनी सिरीयल करतेय. कोरोनामुळे ती काम करत नव्हती, ती पुण्यात रहाते. आता खूप दिवसांनी करतेय तर कोरोनाने पण डोकं वर काढलंय.

मी मूळ हिंदी बघितली नाहीये, ही सिरीयल जितकी झेपेल तितकीच बघेन.

@ मोरपिस: पुजा बिरारीची 'स्वाभिमान' ही पहीली मालिका नव्हे तर ती झी युवावरील 'साजणा (की रांझणा???)' मध्ये मुख्य भूमिकेत होती. त्यानंतर अगदी अलीकडेपर्यंत झी युवावरीलच 'ऑलमोस्ट सफळ संपूर्ण' मध्येही होती. तिला नवीन मालिका मिळाल्याने कदाचित तिचा ट्रॅक संपवला असावा. आणि हो, स्वाभिमान मालिकेची पार्श्वभूमी दापोली असल्याचं वाचलयं. पण प्रोमोंत ज्या समुद्रकिनारी पुजा बिरारी सायकल चालवतांना दिसते तो दापोलीच्या आसपासचाही वाटत नाही. तसेच जश्या मोठ्या मोठ्या ईमारती दिसतात, तश्या मला तरी दापोलीत दिसल्या नाहीत. त्यामुळे निसर्गरम्य दापोलीचे नाव उगीचचं घुसाळल्या सारखं वाटतयं.

@ अन्जूताई: माधवी सोमण? त्यांचे पती योगेश सोमण झी मराठीवर 'नांदा सौख्य भरे' मध्ये स्वानंदीच्या (ऋजुता बागवे, सध्या कलर्स मराठीवरील चंद्र आहे साक्षीला मधली स्वाती) वडीलांच्या भूमिकेत होते. ह्याशिवायही, आणखी काही मालिकेंत असावेत. मला तरी हीच आठवते.

मी खरे तर हिंदी-मराठी कोणतीही मालिका बघत नाही, सगळ्या एकाच माळेच्या मणी असतात. पण सोशल मिडीया व वृत्तपत्रांद्वारे बहुतेक मालिकांमधल्या ताज्या घडामोडी समजत असतात. आमच्याकडे केबलचे बाय डिफाॅल्ट चॅनल सब टिव्ही व सोनी मराठी आहेत. सबवर दिवसभर 'तारक मेहता का उलटा चष्मा' चे जुने भाग दाखवतात. वेळ घालवायला कधीतरी बघितले जातात. काही तेचते भाग तर सतत बघितल्याने त्यांची तर आपसूकच पारायणे होतात, तरीही मजा येते. उलट ह्यामुळे TMKOC चा रात्री 8.30 ला येणारा नवीन भाग बघितल्या जात नाही. दिवसभर सतत दाखवल्याने त्यांची एकसंघता असते, तशी नवीन भागांत नसते. पण ह्यात सगळ्यात सबटिव्हीवर नवीनच सुरू झालेली 'वागळे की दुनिया' बघितली जाते. Episodic असल्याने बरी वाटते.

कधीतरी बाय डिफाॅल्ट सोनी मराठी लागतं, आणि त्यावर बर्याचदा 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' सतत सुरू असत, पण अलिकडे दर्जा खूप खालावतोय. तेचते रटाळवाणे, दुसर्यांवर टिंगल करणारे किंवा स्वतःचाच अपमान करवणारे विनोदी प्रहसन दाखवतात. कुणास ठाऊक ती सई ताम्हणकर व तो प्रसाद ओक परीक्षकाच्या भूमिकेत हे सगळं कसे सहन करतात. चेहर्यावर कुठलेही कंटाळवाणे हावभाव न प्रकट करता प्रहसनांचा आनंद घेत असल्याचा उत्तम अभिनय करतात.

हो राहुल, बरोबर माधवी सोमण. योगेश सोमण अजून काही मालिकांत होते. एकीचं नाव आठवत नाही, झी मराठीवर होती. नंतर एक फार चालली नाही ती इ tv वर होती त्याचं नाव मेंदीच्या पानावर, त्यात तो झी वरचा बबड्या हिरो होता. नंतर ही नांदा सौख्य भरे, त्यानंतर स्टार प्रवाह वर स्पेशल 5 मध्ये होते. हिंदी क्राईम पेट्रोलमध्ये होते पूर्वी.

@ अन्जूताई : अगदी बरोबर. मला माधवी सोमण घाडगे अँड सूनमध्ये मुख्य भूमिकेतील भाग्यश्री लिमये (मालिकेत अमृता) ची आई असल्याचे आठवतेयं. घा & सू मध्ये नायक-नायिकेचे लग्न झाल्यावर कदाचित त्यांच्या भूमिकेची गरज संपल्याने त्या दिसणे बंद झाले. त्यामुळे त्यांनी विठूमाऊली मालिका स्वीकारली असावी. पुढे कधीतरी घा & सू मध्ये परत अमृताच्या आईवडीलांचा ट्रॅक सुरू झाल्यावर आईच्या भूमिकेत दुसरीच अभिनेत्री होती.

आणि तोंडदेखले नव्हेतर मला मनापासून त्या आवडतात. त्यांना अगदीच ठसा उमठवणार्या भूमिकेत अजूनतरी बघण्याचा योग आला नसला तरी प्रेमळ, मायाळु व काहीश्या भाबड्या आईच्या भूमिका उत्तम करतात. मला तरी त्यांचा आश्वासक, मायेने भरलेला व धीर देणारा आवाज आवडतो. म्हणुनच त्या जरी विविध मालिकांतून छोट्या छोट्या भूमिकेत अधूनमधून येत असल्या तरी, मला त्या आवर्जून स्मरणात आहेत.

ऑलरेडी हि मालिका 'शौर्य और अनोखी कि कहानी' नावाने स्टार वर चालू आहे आपल्या अंकुश चौधरी ची बायको दीपा परब त्यात हिरोची आई दाखवली आहे. हिरो तिचा मुलगा म्हणून अजिबात शोभत नाही खुपच मोठा वाटतो।
हिरोची आई डिव्होर्सी आहे आणि तो आईचा राग करतो ती प्रोफेसर दाखवली आहे नवराही प्रोफेसर.
हिरोईन ऑनलाईन ऍडमिशन घेते हिरोच्या कॉलेजात पण हा तिला हाकलून देतो.

@ मोरपिस : मी सहजच लिहिलेलं.

सध्या स्टारच्या प्रादेशिक वाहिन्यांवरील लोकप्रिय मालिका स्टारच्या इतर वाहिन्यांवर दाखवण्याचे पेवच फुटले आहे. आई कुठे काय करते, फुलाला सुगंध मातीचा, सुख म्हणजे नक्की काय असतं आणि आता स्वाभिमान वै. नशीब झी ने असा उपद्व्याप अजून सुरु केला नाही, नाहीतर कुमकुम व कुंडली भाग्यचे मराठी अवतरण बघावी लागतील.

तसेही सतीश राजवाडे स्टार प्रवाहचे कार्यक्रम प्रमुख झाल्यापासून TRP मध्ये आघाडीचे स्थान पटकावण्याची जो काही नवीन मालिकांचा धडाका लावला आहे, तो म्हणजे काहींच्या काहीच आहे. सध्या स्टार प्रवाह वर संध्याकाळी ५.३० ते ११.०० पर्यंत जवळपास ८ मालिका दाखवल्या जातात.

राहुल धन्यवाद, सांगेन तिला.

सतीश राजवाडे यांनी स्टार प्रवाहला खरोखर पुढे नेलं. मी फक्त सुख म्हणजे बघते, आता भाची काम करते म्हणून ही बघेन बहुतेक, आजचा बघितला नाहीये अजून.

चेहर्यावर कुठलेही कंटाळवाणे हावभाव न प्रकट करता प्रहसनांचा आनंद घेत असल्याचा उत्तम अभिनय करतात.>> त्याचीच तर बिदागी मिळते त्यांना.

योगेश सोमण अजून काही मालिकांत होते. >>> कथाकथी नावाच्या मालिकेत होते. तसेच 'दिल्या घरी तू सुखी रहा' नावाच्या एका मालिकेत होते. दृश्यम सिनेमात पण होते.

कथाकथी खूप जुनी अल्फा मराठीवरची, लिहीणार होते खरंतर. वेगवेगळ्या कथा छान असायच्या त्यातल्या.

तसेच 'दिल्या घरी तू सुखी रहा' नावाच्या एका मालिकेत होते. >>> नाव हेच आठवत नव्हतं, थँक यु. दृश्यम सिनेमात पण होते. >>> हो आणि उरीत पण होते मनोहर पर्रीकर यांच्या रोलमधे. आनंदी गोपाळ मधेही होते.

हिरोच्या आईचं तितकसे समजलं नाही मला. त्याच्या बाबांच्या मनात रिस्पेक्ट असतो बायकोबद्दल. मुलाच्या मनात प्रचंड राग. करियर करण्यासाठी तिला घर सोडावं लागतं का. नवरा तर चांगला वाटला. काहीतरी स्टोरी असेल, पुढे दाखवतील. तिच्याबद्दल अफवा पण पसरवल्या असतील कोणीतरी कारण नायिकेचे बाबा तिच्याबद्दल राग ठेऊन असतात.

पहिल्या भागात हिरोच्या घरात ते काका बटाटेवडे ताट घेऊन बसलेले असतात आणि एकटेच खातात, मला त्यातले उचलून खावेसे वाटत होते, पण त्यांच्या घरातल्या इतरांना तसं वाटलं नाही Lol

नायिकेचे बाबा जमदग्नीचा अवतार दाखवलेत, चांगलं काम केलं त्यांनी. आजीला फार काम नाही. मोठी मुलगी घाबरलेली, माहेरी आलेली. आई जमदग्नी नवरा आणि मुली या दोघांत मध्यम मार्ग काढणारी वाटली.

@ अन्जुताई: राहुल धन्यवाद, सांगेन तिला. ----- आवर्जून सांगा आणि माधवीताईंपर्यंत शुभेच्छा पोहोचवल्याबद्दल तुमचेही धन्यवाद!

माधवी सोमण उंच माझा झोका मध्ये रमाबाईंच्या विधवा आत्या(भागीरथीबाई) झाल्या होत्या. त्यांचा अभिनय छान आहे.
योगेश सोमण हुबेहूब मनोहर पर्रिकर यांच्यासारखे दिसतात. ते नांदा सौख्य भरे मध्ये होते.

ही सिरीयल ज्यावरून घेतली आहे (स्टार प्रवाहवर कमेंट्समध्ये वाचलेलं, इथेही समजलं अजनबी यांनी लिहिलं आहे ) त्या हिंदी शौर्य और अनोखीकी कहानीचे तीस तीस सेकंदाचे दोन तीन प्रोमोज बघितले. त्यातला हिरो कसला handsome आहे, सही आहे एकदम, मला जाम आवडला, अभिनयपण भारी. तसा मला अक्षर कोठारी आवडतो पण आता याला बघितल्यावर, तो कमी आवडेल बहुतेक. ती नायिका मात्र एवढी नाही आवडली, बुटकी वाटते त्याच्यापुढे. मग जोडी म्हणावी तर अक्षर आणि पुजाची जास्त छान वाटते.

त्या हिरोसाठी हिंदी बघावी का विचार करतेय, मराठीही बघणार आहे सध्यातरी.

आज हिंदी एक शॉट बघितला त्यात दीपा परब आजारी असते वगैरे होतं. ती खरंच आई म्हणून शोभत नाही, तो हिरो आवडला मला पण तसा पोरगेलासा नसल्याने त्याची आई म्हणून कोणी वेगळी actress हवी होती. दीपा ताई वाटते त्याची, ती पण काही वर्षाने मोठी.

अक्षर कोठारी मात्र तसा लहान वाटतो (पोरगेला नाही पण हिंदीतल्या हिरोपेक्षा लहान वाटतो), त्याने भूमिकेसाठी वजन वगैरे अजून कमी केलं असावं. यात आसावरी जोशी त्याची आई म्हणून एकदम फिट्ट.

मी बघतेय पण मला काही गोष्टीत तोचतोचपणा वाटतोय, पल्लवीवर वाटेल ते खालच्या दर्जाचे आरोप होतात आणि तिने प्रूफ दिल्याशिवाय शांतनू विश्वास ठेवत नाही, परत नवीन आरोप होणार आहे आता, परत पुरावे द्यायचे. Charactorless म्हणून झालं आता कॉपीप्रकरण आरोप होईल, एवढी हुशार मुलगी कॉपी का करेल.

मला दोघांचा अभिनय आवडतो. आता माझ्या भाचीची reentry होणार आहे, ती शुटिंगसाठी येणार आहे मुंबईत.

आता माझ्या भाचीची reentry होणार आहे, ती शुटिंगसाठी येणार आहे मुंबईत

>>>> मालिकेतील कुठलं कॅरॅक्टर ?

अरे वा, इंद्रायणी , छान अभिनय असतो त्यांचा, संयत..

शांतनूला sorry म्हणणं किती अवघड वाटत असतं, ते दाखवणारे प्रसंग चांगले होते

शांतनूची वहिनी एवढी बिचारी का दाखवलीये..?माहेरचा उल्लेख मी मिसला की काय..? नवरा अमेरिकेत तर ती इथे स्वयंपाक करायला आहे फक्त ...

धन्यवाद तेजो.

शांतनूची वहिनी गरीब घरातून आलेली आहे. असं वागवायचे होते तर लग्न करून का आणायचं तिला, एक पगारी नोकर ठेवायचा. फुकट नोकर मिळाला म्हणा त्यांना.

सगळ्यात विचित्र हे आहे या मालिकेत की, काय झाल्यामुळे सख्खी आई सोडुन गेली, हे शंतनुला जाणुनच घ्यायचेच नाहीये. Sad

त्याच्यावर काका काकूंचा पगडा आहे आणि तेव्हा बाबांनी त्याला वेळ द्यायला हवा होता तो दिला नाही म्हणून तो काकूच्या कह्यात गेला, त्यांनी बरोबर आईविषयी विष कालवलं.

तो शांतनु कानाने आणि डोळ्याने हलका आहे. कॉपीचिटचं आणि पल्लवीचं अक्षर न तपासता पल्लवीवर ठपका ठेऊन कॉलेजातून काढून टाकतात.

मराठी मालिकांमध्ये दोन टोक पाहायला मिळतात एक बावळटपणा आणि दुसरे आतातायीपणा। मधलं काहीच नसत। त्यांच्या हिरोना आणि हिरोईनला अजिबात लॉजिकल विचार करता येत नाही। आणि म्हणून २/३ वर्षे चालेल असे पाणीघालू लिखाणामुळे सिरियल्स अजरामर होत असतात

Pages