मोगरा

Submitted by Asu on 15 February, 2021 - 03:41

मोगरा

बागबगीचा आठवणींचा
मनात जेव्हा फुलून येतो
मादक गंध प्रेमफुलांचा
दाही दिशांना दरवळतो

जाई जुई चंपा चमेली
गुलाब ही बागेत फुलतो
मनात माझ्या परि एकटा
गंध मोगऱ्याचा दरवळतो

रंगरूपाचा नाही तोरा
सर्वांगी परि शुभ्र गोरा
नाजूकसाजूक सुगंधित
मोगरा मज प्यारा प्यारा

मोगरफुला, मोगरफुला
स्वप्नी तुज बांधीन झुला
पापण्यांच्या झुल्यावरी
आनंदाने झुलविन तुला

नयनी तुज साठवीन फुला
रुजविन तुला माझ्या मना
आठवणींची बाग माझी
दरवळेल ना तुझ्याविना

बागेत माझ्या कधी फुलुनी
जीवन असे गंधून जा
नाही आस अजून कसली
एकदा तरी दरवळून जा

- प्रा.अरुण सु.पाटील (असु)
© सर्व हक्क स्वाधीन
https://www.facebook.com/AsuChyaKavita

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults