यहां पे कोई भी ट्रेन नही रूकती है - एक रहस्यमय रेल्वेस्टेशन ( ४ )

Submitted by रानभुली on 14 February, 2021 - 10:04
bhutiya railway station

(या आधीच्या भागासाठी कृपया इथे टिचकी मारावी )

बाबू मंडल फक्त सरकारी कहाणी लिहीत होते.
जी सर्व नियमांमधे बसेल. यात हाताखालच्या कर्मचा-यांचीही काळजी ते घेत होते. त्यांच्या तोंडी असे कोणतेही वक्तव्य ते देत नव्हते ज्यामुळे पुढे त्यांना खाकी डोक्याच्या चौकशी अधिका-याला तोंड द्यावे लागेल. एकदा काळ्याचं पांढरं झालं की मग ते नाकारणे सुद्धा मुश्कील होते.

तोंड दाबून बुक्क्यांचा मार म्हणजे काय हे मंडल यांना चांगलेच कळत होते. अर्थात ही मराठी म्हण त्यांना माहीत असणे शक्यच नव्हते. त्यांनी आजच्या कामगिरीवर आधारीत गाववाल्यांचे म्हणणे मांडले. पुरावा म्हणून मीटींगचा कागद जोडला. शिवाय रेल्वे कर्मचा-यांशी बोलून आणि चौकशी करून पुढचा रिपोर्ट लवकरच पाठवू असे आश्वासन द्यायला ते विसरले नाहीत.

हळूहळू त्यांना आपल्याला कसे बकरा बनवले जात आहे याचा उलगडा होत चालला होता.
मंडलचा उच्चार मोंडल होतो. त्यांचे नाव बाबू होते. पण लोक त्यांना मोंडल बाबू म्हणत. ते अत्यंत सज्जन गृहस्थ होते. कुणाचंही वाईट होऊ नये अशा बेताने त्यांनी आजवर अधिकाराच्या जागेवर काम केले होते. वेळप्रसंगी प्रशासनाच्या अडचणी ओळखून अगदी दुर्गम ठिकाणी कामही केले होते. झारखंड रांची मार्गावर जेव्हां प्रॉब्लेम्स होते तेव्हांही त्यांनी तिथे काम केले होते.

इथेही प्रशासनाने त्यांना प्रॉब्लेम सांगितला असता तर ते नाही म्हणालेच नसते. पण त्यांची फसवणूक झाली आहे असे त्यांना वाटत होते.
त्यांच्या आधीचा जो स्टेशनमास्तर होता तो पळून गेला होता. त्याने मी राजीनामा देईन पण इथे काम करणार नाही असे सांगितलेले होते. त्याच्यासोबतच्या स्टाफनेही आमची पोस्टींग होत नाही तोवर आम्ही सुटीवर जाऊ पण कामावर येणार नाही असे सांगितले होते. भारतात कुठेही टाका आम्ही जाऊ पण इथे नको असे निवेदन सर्वांनी दिले होते.

मोंडल बाबू अशा बातम्या काढण्याइतके चलाख नव्हते. निवांत पणा मिळतोय म्हणून ते ही आले होते. जवळच एक आश्रम होता. एक शिवालय होते आणि गावात एक नवस करण्यासाठी प्रसिद्ध एक मशीद पण होती. मोंडल बाबू तर खूप खूष झाले होते. त्यांचा जरा देवाधर्माकडे ओढा होता. पण आपल्या पोस्टींगमागचा हेतू चांगला नाही हे त्यांना समजले होते. अर्थात रेल्वे प्रशासनाला कुणाला तरी पाठवावेच लागणार होते. मोंडल बाबूंना वाटले फक्त एक शब्दाने सांगायचे होते की ही पोस्टींग प्रॉब्लेम असल्याने आहे. त्यांनी हसत हसत स्विकारले असते.

आधीचा स्टेशन मास्तर देखील असाच आलेला.
पण त्याला लवकरच आधीच्या स्टेशनमास्तरबद्दल समजले.

मोहन बाबू नाव त्यांचे !!

१९६६ साली मोहन बाबू इथे आले.
रात्रीच्या येणा-या जाणा-या ट्रेन्स आणि त्यातून उतरणारे चढणारे प्रवासी, सामान यांची व्यवस्था नीट आहे का हे बघण्यासाठी ते संध्याकाळी देखील थांबत होते. स्टेशन तसं नवीन होतं. व्यवस्था लागेपर्यंत तरी रात्रीचं थांबणं गरजेचं होतं. नंतर मग असिस्टंट वर सोपवणे शक्य होते. कित्येकदा रात्रीच्या वेळी स्टेशनमास्तर स्टेशनवर नसतातच. बुकींग क्लर्क किंवा टीसी यापैकी जो सीनीअर असेल तो अडीअडचणीच्या समस्या बघतो.

काही ठिकाणी विशिष्ट वेळेनंतर तिकीट विंडो सुद्धा बंद होते.
अशा ठिकाणी गार्ड / सिग्नलमन असे लोक असतात. गरज लागलीच तर स्टेशनमास्तरांना उठवून आणायचे असा रिवाज असतो.

मोहन बाबूं च्या कानी संध्याकाळ नंतर रेल्वे स्टेशनवर प्रॉब्लेम आहे अशा तक्रारी आल्या होत्या. पण त्या खूपच मोघम होत्या. नीट काय ते कुणी सांगत नव्हते. त्यामुळेही असेल ते थांबत असतम.

एक दिवस रात्रीच्या वेळी ते केबीन बाहेर बसले असताना त्यांना विचित्र वाटू लागले.
एक चहाची टपरी होती. ती बंद झाली होती. सिग्नलला असलेले दोघेही प्लॅटफॉर्मपासून दूर उभे होते. ते एकटेच होते.
अंधाराने रेल्वे स्टेशनचा परीसर गिळला होता. ४० वॅटचे दिवे अंधाराशी उगीचच क्षीण लढाई करत होते.

इमारतीजवळचं झाड त्यामागून येणा-या अंधारलाटांमुळे सावली होऊन इमारतीवर झुलत होतं.
त्यांच्या ऑफीसच्या खिडकीतून छायाप्रकाशाचा हा खेळ चालू होता.

मोहनबाबूंना असे वाटले की कुणीतरी इथे वावरतेय.
हा भास त्यांना खूप वेळ होत होता. त्यांना दरदरून घाम फुटला. आजूबाजूला कुणीच नाही म्हणून ते ऑफीस मधून बाहेर प्लॅटफॉर्मवर आले.
दूर दोघे बिड्या ओढत उभे होते. त्यांना आवाज देणार इतक्यात एक विचित्र प्रकार त्यांना पहायला मिळाला.

पलिकडच्या बाजूने एक मुलगी ट्रेनच्या मागे पळत जाताना त्यांना दिसली. खेडेगावात असं होऊ शकतं. ट्रेनच्या मागे एखादी मुलगी पळत पण जाऊ शकते. पण तिचा धावण्याचा वेग त्यांना जरा जास्तच वाटला. तरीही त्यांनी दुर्लक्ष केले.
मोहनबाबूंना बघून दोघे जण जवळ आले. त्यांची अवस्था ठीक वाटत नव्हती. मग दोघांनी मिळून याच इमारतीत मागच्या बाजूला असलेल्या त्यांच्या क्वार्टरमधे त्यांना नेलं. पाणी पाजलं.

सकाळी मोहनबाबूंनी आपल्या सर्व कर्मचा-यांना बोलवलं. आपला अनुभव त्यांच्याशी शेअर केला. पण सगळेच म्हणू लागले की हा त्यांचा भास असेल. मग मोहनबाबूंनी पण हा विचार झटकून टाकला. पण उत्सुकता होतीच.

संध्याकाळ झाली.
आज मोहनबाबू प्लॅटफॉर्मवरच होते. कालचा अनुभव किती खरा हे त्यांनाच ठाऊक होते.
पलिकडच्या बाजूला एक मुलगी त्यांना दिसली. ती रूळ ओलांडून स्टेशन वर आली. ती जशी काही आपल्याच नादात असल्याप्रमाणे नाचत होती.
इतक्यात रांची कडे जाणारी एक ट्रेन येताना दिसली. त्याबरोबर ती नाचायची थांबली.

या ट्रेनला इथे थांबा नव्हता. ती धाडधाड करत स्टेशनमधून जाऊ लागली. तिच्यामागे ही मुलगी पळत सुटली.
काल मोहनबाबूंनी दुर्लक्ष केले होते. पण आज त्यांना विचित्र वाटत होते. कारण,
ती मुलगी ट्रेनच्या मागून तिच्या पुढे धावत होती !!

मोहनबाबू आपल्या ऑफीस मधे जाऊन बसले. तेव्हां त्यांना पुन्हा कालचा भास झाला.
त्या खोलीत त्यांच्या व्यतिरिक्त काही तरी होते. कधी श्वास सोडल्यासारखा भास होत होता. कधी कुणीतरी चालतंय असा भास होत होता.
ते पुन्हा घामाने निथळत बाहेर आले.

आज कुणाला काही न सांगता ते क्वार्टर मधे गेले. झोपायचा प्रयत्न करत त्यांनी रात्र काढली.

दुस-या दिवशी सकाळी न राहवून पुन्हा कर्मचा-यांना रात्री काही दिसले का अशी विचारणा केली. कुणालाच काही दिसले नव्हते.
मोहनबाबूंनी सकाळी कामावर आलेल्या कर्मचा-यांना पण रात्री थोडा वेळ चक्कर मारून जा अशी विनंती केली.

संध्याकाळ झाली. रेल्वे स्टेशनवर पुन्हा ती तरूणी दिसू लागली.
हे बरंचचं विचित्र होतं.
Picture2_0.jpg

एखादे दिवशी होऊ शकतं. दुस-या दिवशी पण होईल. पण सलग तिस-या दिवशी ?
ती नाचत होती.

सर्वांना ती दिसत होती. यात मोहनबाबूंना काय खटकतंय हे समजत नव्हतं. कदाचित तिच्या डोक्यावर परिणाम झालेला असू शकतो. पण पुढचा भाग मोहनबाबूंनी त्यांना सांगितलेला नव्हता. आज प्रात्यक्षिकच दाखवूयात म्हणून त्यांनि सर्वांना एकाच वेळी हजर राहण्याची विनंती केली होती.

रांची कडे जाणारी विनाथांबा गाडी स्टेशनमधून बाहेर पडली. तशी ती नाचायचे थांबून ट्रेनच्या मागे पळत सुटली.
आता मात्र सगळ्यांचेच डोळे विस्फारले गेले. कारण तिने ट्रेनच्या पुढे जाऊन रूळातून धावायला सुरूवात केली होती. थोड्याच वेळात ती ट्रेनला मागे टाकून दिसेनाशी झाली.

मोहन बाबूंनी कर्मचा-यांशी आता चर्चा नको म्हणून त्यांना घरी जायची सूचना केली. सकाळी पुन्हा एकदा रात्रीच्या कर्मचा-यांनाही थोडा वेळ येऊन जायची विनंती केली.

सगळं नीट आवरून ऑफीस आवरायला ते आत गेले.
मोहनबाबूंना तिथे काय दिसले हे कधीच नंतर समजले नाही. कारण ते खूप मोठ्याने ओरडून बेशुद्ध पडले होते.
अजून कुणी स्टेशन सोडलं नसल्याने ज्यांची ड्युटी नव्हती त्यांनी मोहनबाबूंना जवळच्या डॉक्टरकडे नेले. त्यांनी घाईघाईत इंजेक्शन दिलं. काही गोळ्या दिल्या. आणि उद्या बघू असे सांगितले.

मोहनबाबू त्यानंतर खूप आजारी झाले.
त्यांची तब्येत नंतर कधीच सुधारली नाही. त्यातच ते गेले.
स्टाफलाही हा धक्का बसला होता.

(क्रमशः)
( पुढील भागासाठी कृपया इथे टिचकी मारावी )

Group content visibility: 
Public - accessible to all site users

डेंजर आहे
मजा आली(अर्थात ज्यांनी अनुभवले त्यांना आली नसणार)

आई गं, बिचारे मोहनबाबू. छान रेखाटली आहे व्यक्तीरेखा. डिटेल्स्मुळे त्या व्यक्तीरेखेशी एकरुप होता येते. भावना अनुभवता येतात. खूपच मस्त रंगवलय.

मस्तच लिहिलीए...मजा येतीए..भयावह वातावरण छान रंगवले आहे..
झाडावर लटकलेल्या भुतीचा फोटो डेंजर आहे !

पु भा प्र

फोटो डेंजर आहे >> +१

छान आहे गोष्ट! मला अगदी ब्लॅक अँड व्हाइट हिंदी सिनेमा सारखे वातावरण वाटतंय. विश्वजीत किंवा मग डायरेक्ट दिलीप कुमार, वैजयंती माला, प्राण वगैरे कास्टिंग. पुनर्जन्म. नायक गावाबद्दल ऐकून कुतुहलाने येतो पण गावात आल्यावर त्याला विचित्र भास होऊ लागतात, त्याला बघून लोक भराभर निघून जातात किंवा दारे लावून जातात, पण एक वेडी मात्र "बाबूजी? " असं म्हणून त्याला शिव्या वगैरे देते. मग शेवटी गावाबाहेरच्या मंदिराचा जख्ख पुजारी एका अभागी "रानी" ची करुण कहाणी सांगतो. कोलकता वरून बदली होऊन आलेला तरुण स्टेशन मास्तर श्याम बाबू आणि रानीच्या असफल प्रेमाची कथा, सावकार किंवा मुखियाच्या मुलाचा रानीवर डोळा असल्याने त्यांच्या लग्नाला विरोध, मग मध्यरात्रीच्या गाडीने भाग जानेका प्लॅन, पण सावकाराच्या मुलाने आणि त्याच्या गुंडांनी त्यांची केलेली ताटातूट आणि दोघांचेही अकाली मरण, त्यामुळे रानी चा अतृप्त आत्मा रोज त्या गाडीच्या मागे धावतो बाबूजी ला शोधत. आणि आता स्टेशन मास्तराचा पुनर्जन्म म्हणजे आपला कथानायक गावात परत आलेला आहे. आगे क्या होगा? देखिये भाग ५ मे Happy

सर्वांचेच आभार. Happy
आजचा व्हॅलेंटाईन डे भूताखेतांच्या सहवासात घालवलाय Lol
आता जरा व्हॅलेंटाईन डे साजरा करते.
शेवटचे दोन भाग राहीले फक्त.

मैत्रेयी
मला तुमचा प्रतिसाद दिसला नव्हता. मी तुम्हाला उद्देशून नाही लिहीले हो काहीच. आत्ता पोस्ट केल्यावर एक नवीन दिसले.
गैरसमज नको प्लीज. उद्या उरलेले भाग टाकते.
ही सत्यकथा आहे. मी तिथे जाऊन काही काही गोष्टींचा वेध घ्यायचा प्रयत्न केला आहे. पुढे येईलच ते.

मस्त