जावयाचा मान, जावयाचे लाड, जावयाची मज्जा ..

Submitted by ऋन्मेऽऽष on 11 February, 2021 - 16:54

आमच्याकडे हुंडा वगैरे घेतला जात नाही, लग्नाचा खर्च वर वधू दोघे अर्धे अर्धे उचलतात, मानपान वगैरे फारसे नसते.. असे म्हणतात, प्रत्यक्ष अनुभवले नाही. कारण माझे लग्न आमच्यात झाले नाही.

माझ्या बायकोकडे मानपान, हुंडा, जावयाचे लग्नाआधीच भरभरून लाड पुरवणे वगैरे भरपूर चालते.. असे ती म्हणते, प्रत्यक्ष अनुभव नाही. कारण मी तिच्याशी पळून लग्न केले. त्यामुळे स्वाक्षरी करायला आलेल्या तिच्या बहिणींनी जी ईवलीशी क्याटबरी दिली तीच गोड मानून घेतली.

पुढे मात्र रीतसर लग्न झाले. तिच्याशीच. तेव्हा त्या आंतरजातीय विवाहात मानपानाचे राडे होऊ नयेत म्हणून दोन्ही बाजूंकडून कुठलाच घाट घातला गेला नाही. थोडक्यात जावयाचा मान काय असतो, त्याचे काय लाड होतात हे लग्नापुरते तरी मी मुकलोच.

लग्नानंतरही काही मला चांदीच्या ताटात जेवू घातले अश्यातला भाग नाही, पण चांगली माणसे होती. म्हणजे आहेत. तर कपडालत्ता वगैरे सणासुदीला देताहेत, हसून माझ्याशी बोलताहेत हेच तेव्हा माझ्यासाठी खूप होते.

अश्यात लग्नानंतर त्यांच्या गावाला जायचे ठरले. त्यांच्या कुलदैवताच्या दर्शनाला. त्याशिवाय लग्न कबूल होत नाही म्हणतात. हे त्यांच्यात आमच्यात नाही तर तुमच्या आमच्या सर्वांच्यातच असावे. म्हटलं, चला जाऊया.

ऑफिसला सेकंड हनीमूनला जातोय सांगत आठवड्याभराची सुट्टी टाकली. कारण देवदर्शनाला जातोय हे सांगणे माझ्या नास्तिक इमेजच्या विरुद्ध असल्याने लाजायला होत होते.
ईथे आमचा पहिलाच अजून झाला नाही वगैरे डायलॉग मारत आमच्या देवदर्शनाच्या वयात पोहोचलेल्या बॉसने उपकार करतोय असे भासवत रजा मंजूर केली. येताना मला पाव किलो स्ट्रॉबेरी आणायला विसरू नकोस हे सांगायला तो विसरला नाही. रजेच्या अर्जावर मी महाबळेश्वर लिहिले होते. आणि चाललो होतो बल्लाळेश्वरला. किंवा जे काही त्यांचे दैवत होते, आता नेमके नाव आठवत नाही. पण दोन्ही नावात ईश्वर असल्याने नरो वा कुंजरो वा सारखे पाप अर्धेच लागणार होते. आणि त्या पापातही बायको अर्धी वाटेकरी व्हायला राजीखुशी तयार होती. कारण ते तिथे जाऊन देवाकडून धुवून घेऊ असा तिला विश्वास होता.

असो, तर पॉईंटावर येऊया. त्यांची घरची गाडी होती. जावयाचा मान देत मला मागे सासूबाईंसोबत बसवले. बायकोला पुढे ड्रायव्हर शेजारी बसवले. ड्रायव्हर तिचाच सख्खा भाऊ असल्याने हरकत घ्यायचा प्रश्न नव्हता. देवदर्शनाला म्हणे असेच जायचे असते, येताना पाहिजे तर बसवतो तुम्हाला एका सीटवर. ऊच्च संस्कार, मोकळे विचार, दोन्ही एकदमच.

गाडी सुटली, गावाला पोहोचली, प्रवासात अध्येमध्ये मला खाऊ घातले होते. त्यात जावयाचा मान वगैरे फारसा नव्हता. सर्वांनी आपला आपला मेदूवडा, ईडलीवडा वगैरे खाल्ले होते. ते सुद्धा का हे रात्री गावाला पोहोचल्यावर मला समजले. जेव्हा ताटात वरणभात आणि भेंडीची भाजी समोर आली. तिलाच ऊचलून तिची शिवी बनवून वाढणार्‍यालाच परत द्यावी असे वाटले होते. हा तर जावयाचा शुद्ध अपमान होता. पण सांगतोय कोणाला, त्या अपमानाचेच लोणचे बनवून गिळला तसाच वरणभातासोबत.

वाटलं रात्रीची वेळ आहे, आपण उशीरा पोहोचलो असावे, गावच्याकडे ईतक्या उशीरा पाहुणचार करायची पद्धत नसावी. उद्या दुपारच्या जेवणाला साग्रसंगीत बेत असेल. पण कसले काय. सकाळ होताच मेहुण्याने मला उचलले, गाडीत टाकले, आणि नेले मार्केटमध्ये. तिथेच मिसळपाव खाऊ घातले. बोलताना समजले की गावच्या काकांचा राग आहे या आंतरजातीय विवाहावर. त्यामुळे काल रात्रीपासून माझ्याशी तो बोलायलाही आला नाही. मला त्याने शून्य फरक पडणार होता. पण काकूंनाही माझी सरबराई करण्यास सक्त बंदी होती. त्यामुळे आता हेच आपले जेवण आहे समजून मी लागलीच वाटीभर तर्री आणि दोन पाव एक्स्ट्रा मागवले.

दिवसभर मग ईकडे तिकडे गाव ऊंडरून आम्ही संध्याकाळी घरी परतलो. काकांचा राग तसाच. माझ्यासमोरून गेले. मी हसलो. त्यांनी मान वळवली. मला शून्य फरक पडणार होता. पण आमचे मेहुणे मेहुणे मेव्हण्यांचे पाव्हणे यांचे पित्त खवळले. सासूबाईंना म्हटले भावोजींचा आता अधिक अपमान सहन नाही करायचा. एवढ्या गोर्‍यागोमट्या पोराकडे बघून हसत नाही म्हणजे काय! चला, रात्रीच्या मुक्कामाला हॉटेल गाठू. खरेच, हे आधीच का केले नाही हे मला समजले नाही.

पण मग सासूबाई जड अंत:करणाने म्हणाल्या, हे आमचे गावातले मूळ घर आहे. घरात राहणार्‍यांकडून ईज्जत का नसेना पण सातबार्‍यात वाटा आहे. ईथे मुक्काम करणे, या घराच्या ऊंबरठ्याला पाय लागणे गरजेचे आहे. दोन दिवसांचाच प्रश्न होता म्हणून आलो. पण हे असे होत असेल तर आता जाऊया. रात्रीचे एखाद्या लॉजवर मुक्काम करूया आणि सकाळी देवदर्शनाला निघायचेच आहे.

पण मग मीच म्हटले, राहूया! कारण सकाळी माझ्या तिथल्या स्त्रीलिंगी मेहुण्यांनी माझ्याशी छान गप्पा मारल्या होत्या. त्या रात्रीही गप्पा मारायला येतील अशी आशा होती. त्यामुळे आता रात्रीचे नुसते झोपण्यापुरते कुठेतरी निवार्‍याची शोधाशोध करण्यापेक्षा ईथेच वरणभात आणि शेपूची भाजी खाऊन लवंडूया म्हटले.

रात्री अपेक्षेप्रमाणे त्या गप्पा मारायला आल्या. छान थट्टामस्करी झाली. एक ईवलीशी क्याटबरी त्यांनीही मला दिली. पोटात शेपू ओठात क्याटबरी. म्हणजे हे नाराजीचे खूळ फक्त वडीलधारी मंडळीच जोपासत होती हे स्पष्ट झाले. त्यामुळे सकाळी मुद्दाम मेहुण्यांनाच लाडाने टाटा बाय बाय करत निघालो. काका अजूनही मान फिरवूनच होते. पण आता त्याने मला मायनस फरक पडणार होता. कारण त्यांच्यासमोरच त्यांच्या पोरींना मुंबईला आलात की आमच्याकडे यायचे बरे का असे लाडीक आमंत्रण मी दिले होते. आणि त्यांनीही ते आमंत्रण तितक्याच लाडीकपणे स्विकारले होते. जगाच्या पाठीवर कुठेही गेले तरी हा मेहुणींचा मान कुठल्याही जावयाला चुकला नाही हेच खरे.

क्रमशः
असे बोलून ईथेच थांबायचा विचार आहे. पण त्याने लोकांना वाटेल की शीर्षकातला जावयाचा मान, ते जावयाचे लाड, ती जावयाची मज्जा हीच की काय Wink
पण तसे नाहीये हं. तो देवदर्शनाचा मानाचा किस्सा तर अजून पुढे आहे.
पण खरेच खूप झोप आल्याने क्षमस्व आणि क्रमशः .........

------------

भाग २ ईथे टिचकी मारून वाचू शकता - नव्हे वाचाच Happy
https://www.maayboli.com/node/78106

Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद वर्णिता, पुढचा आणि अंतिम भाग लवकरच. जास्त वेळ अर्धवट ठेवण्यात रस नाही. नाहीतर माझे पुढचे धागे ताटकळत राहतील..

*नाहीतर माझे पुढचे धागे ताटकळत राहतील..* - मला कल्पना आहे ही लाईन खूप लांबलचक असणारच. माझ्या मधल्याच थिल्लरपणामुळे ताटकळणं कांहींसं वाढलं असेल . क्षमस्व.
Wink

छान लिहलयं..! सासरवाडीला गेल्यावर तुमच्या मनात काय विचार चालले होते ते छान व्यक्त केलेत..
बरं..! जावयाला ( राशीला लागलेला ) दशम ग्रह म्हणतात. ( ह. घ्या. ) तर त्यावर पण लिहा काहीतरी..!

भाऊंचं व्यंगचित्र मस्तच..!

जावयाला ( राशीला लागलेला ) दशम ग्रह म्हणतात.
>>>>

जावयाचे पोर हरामखोर असेही काहीतरी म्हणतात ना... त्याचे कारण कोणाला ठाऊक आहे का?

तुमच्या मुलीच्या मुलाचे कितीही लाड करा, शेवटी ते दुसऱ्याच्या घरचेच राहणार. आपल्या वाट्याला काही त्याच्या बाललीला किंवा त्याच्या पालनपोषणाचा आनंद येणार नाही. तसेच कधी जरूर पडली तर आपली जबाबदारी उचलण्याचे बंधन त्याच्यावर नाही. (नैतिक असते, मानले तर.) ते त्याच्या इच्छेवर. म्हणून ते हरामखोर.

जावयाच्या मुलाला कितीही लळा लावला तरी त्याचा ओढा या ajiajobankade न येता जावयाच्या आई वडलांकडे राहतो.किंवा aikadchya.ची फारशी माया नसते.
अशीच एक दुसरी म्हण aahe-- ज्याचे त्याला आणि गाढव ओझ्याला!

देवकी, हो खरे आहे
पण याचे मूळ पितृसत्ताक पद्धतीत आहे. जावई आणि त्याचे पोर नाहक बदनाम झालेय

पण याचे मूळ पितृसत्ताक पद्धतीत आहे >> म्हणजे जावयाच्या मुली मात्र असं करत नाहीत, असे काही आहे का? मला स्वतःला आईकडचं आजोळ नव्हतंच, त्यामुळे कल्पना नाही.

पण हे पितृसत्ताक पद्धती पेक्षा दुसरांचा तो बाब्या आपलं तर कारटं (चुकून उलट नाही लिहिलंय) असं असू शकतं खालील म्हणी प्रमाणे:

जावई माझा भला लेकीसंगे आला, तो मेला बाईलबुद्ध्या सुने मागे गेला:
दिवाळीला दोघेही बायकोच्या गावी जातात.
जावई आपल्या पोरीसोबत आला म्हणुन त्याचे कौतुक, पण तोच नियम आपल्या लेकाला न लावता, तो बायकोमागे गेला तर तो बायकोच्या ताटाखालचं मांजर!

आपल्या पोरांच्या पोरांना आपलाच लळा लागला पाहिजे, पण तेच मुलींच्या सासू सासऱ्यांंनी केले की त्यांची नातवंड हरामखोर.

'जावयाचे पोर हरामखोर असेही... ' मला वाटतं, हें लाडिकपणे म्हटलेलं वेगळ्याच अर्थाने प्रचलित झालं असावं !

म्हणजे जावयाच्या मुली मात्र असं करत नाहीत,
>>>

पितृसत्ताक या मुद्द्याचा चुकीचा अर्थ काढलात. म्हणजे आपल्यकडे लग्न झाल्यावर मुली नवरयाचे नाव लाऊन त्याच्याकडे राहायला जातात. मुलांनाही आडनाव आणि जात वडिलांच्या आईवडीलांची लागतात. त्यामुळे साहजिकच त्यांना आईकडच्या आजीआजोबांपेक्षा वडीलांकडचे आजीआजोबा तुलनेत जास्त जवळचे वाटणे स्वाभाविक आहे.

मला वाटतं, हें लाडिकपणे म्हटलेलं वेगळ्याच अर्थाने प्रचलित झालं असावं !
>>>
हे शक्य आहे.
लहान मुलांना लाडीकपणे हरामी, हरामखोर असे म्हटले जाते काही ठिकाणी..

पितृसत्ताक या मुद्द्याचा चुकीचा अर्थ काढलात. >>> अच्छा म्हणजे यातील पोर म्हणजे मुलगा आणि मुलगी दोन्हीना हे लागू आहे तर. कारण जावयाच्यामुली सुद्धा जावयाचे आडनाव आणि जात लावतात.

मग तसे असेल तर पितृसत्ताकपेक्षा मी सांगितलेल्या कारणास्तव ही म्हण पडली असण्याची शक्यता जास्त आहे.

लाडीकपणे म्हणायचं असेल तर कुठल्या पोरांना म्हटलं असतं ना, फक्त जावयाच्या नाही.

Pages