अज्ञातवासी - भाग २५! - जुळवाजुळव

Submitted by अज्ञातवासी on 7 February, 2021 - 11:43

भाग २४ https://www.maayboli.com/node/78040

वाडा जळत होता, खुर्ची जळत होती....
खुर्चीवरचा तो माणूसही आगीच्या ज्वाळानी वेढला गेला होता...
"मोक्षा, अनेक प्रश्न उभे आहेत समोर. काय करणार? सांग ना, सांग ना..."
"उत्तर शोधेन बाबा, हळूहळू."
"आणि उत्तरे नाही मिळालीत, तर काय करणार?"
"एकतर प्रश्न संपतील, नाहीतर मी!"
"तथास्तु..." त्या माणसाने हात वर केला.
"एकच प्याला वाचलंय?"
"हो, बऱ्याचदा."
"कधी वाटलं, की माझ्यापासून सुटका हविये, तर त्यातच उत्तर मिळेल."
"मला सुटका नकोय बाबा, मला उत्तरे हवीत."
"मिळतील....जा आता, तांडव करा मोक्षा..." दादासाहेब भेसूर हसले.
आणि मोक्षाला जाग आली...
◆◆◆◆◆
"अरे किती रडशील? किती? बस कर."
आवाज टिपेला पोहोचला होता.
"महाराज, पोरगं रडायचं थांबत नाहीये." अण्णा कळवळून महाराजांसमोर उभे राहिले.
निवृत्ती महाराजांनी डोळे उघडले...
"महाराज पोरगं रडायचं थांबत नाहीये."
"रडत नाहीये अण्णा, येण्याची वर्दी देतंय. दवंडी दिली नाहीस ना तू, त्यामुळे दवंडी देतंय."
"महाराज, काय करू म्हणता?"
"पेढे वाट गावभर. सांग, राजा आलाय..."
"महाराज..."
"त्याची कुंडली माझ्या डोक्यात कोरली गेलीये आण्णा. माझ्या आयुष्यात अशी कुंडली बघितलेली नाही."
"म्हणजे?"
"हा राज्य करेल, पण देवमाणूस बनून नाही. हा लोकांमध्ये वावरेल, पण माणूस बनून नाही. लोक याला घाबरतील, पण हा फक्त मनुष्य बनून राहणार नाही. याचं नाव दुमदुमेल, पण त्याबरोबर याला बिरुदही चिकटेल. माणसांमधील भुतं हा जागवेल, त्यांच्यावर राज्य करेन...अण्णा, तुझं नाव हा त्रिखंडात गाजवेल...
...पण एका क्षणी, अचानक...हा जाईल... हा जाईल अण्णा, आणि त्याची जागा त्याचाच अंश घेईल. अण्णा, माणसं जपता जपता, त्याचं सगळ्यात जवळचं माणूस घात करेल...
म्हणून सावध राहा, बाळा, सावध रहा..."
निवृत्तीअण्णा बाळाकडे वळले.
"अरे शांत हो, बाळा शांत हो..."
बाळाच्या रडण्याचा आवाज टिपेला पोहोचला...
"शांत हो..
त्रस्त समंधा... शांत राहा..."
महाराज ओरडले...
त्याक्षणी ते बाळ हसू लागलं...
◆◆◆◆
अहमदनगरच्या एका मोठ्या बंगल्याजवळ गाडी थांबली.
'आजची रात्र मुक्काम असेल, मात्र सकाळी पाचलाच तयार राहा.' ड्रायवरला सूचना मिळाल्या.
अप्पा गाडीतून उतरले, आणि बंगल्याकडे बघतच राहिले.
"अप्पासाहेब..."
समोरून एक माणूस अप्पांसमोर आला.
"तात्या! "
तात्यासाहेब जाधवांनी अप्पांना नमस्कार केला.
"तात्या, एवढा मोठा झालास, तरीही अजून जुनाच तात्या आहेस." अप्पा म्हणाले.
"अण्णांची कृपा!" तात्या म्हणाले. "चला, आत चला!"
दोघेही आत निघाले.
तेवढ्यात तात्यांचा मुलगा पंकज त्यांच्या समोर आला.
"तात्या, भरपूर मोठा झालाय रे."
"हो... तुम्ही चार वर्षांपूर्वी बघितलं त्याला."
पंकजने वाकून नमस्कार केला.
"आयुष्यमान व्हा!" अप्पांनी आशीर्वाद दिला.
"आता नवीन दोन फॅक्टऱ्या उघडल्यात, त्याचं काम बघतोय. बाकी, कसा झाला प्रवास?"
"अगदी सुखकर."
"भले. चहापाणी घ्या, जरा आराम करा. मग बाकीचं बोलूच."
अप्पांनी मान हलवली.
◆◆◆◆◆
"आईला कमी ऐकू येतं आजकाल."
"हो, पण बरं वाटलं आत्याला बघून."
"आताशा माणसं ओळखत नाही."
"चालायचंच. वय झालंय."
"हो. बाकी नाशिक काय म्हणतंय.".तात्यांनी विचारलं
"चांगलंच म्हणायचं."
"म्हणजे?"
"कुणी खुर्चीवर नाही, मग आहेच सावळा गोंधळ." अप्पा अंदाज घेत म्हणाले.
"हम्मम. खुर्चीवर कुणीही येऊन तर नाही बसू शकत."
"हो रे. त्याला सगळं माहिती हवं. आपल्या परक्याची जाण हवी."
"दादासाहेबांनंतर असं कुणी उरलंच नाही." तात्यासाहेब हताशेने बोलले.
"म्हणून मी संग्रामला तयार करतोय. तोच आता खुर्ची सांभाळू शकेल."
"संग्राम तर लायक आहेच. पण..."
"पण काय तात्या?"
"लहान आहे अजून, थोडे दिवस दुसऱ्या कुणाला खुर्ची सांभाळू द्यावी."
"दुसरं कोण तात्या?" आप्पासाहेब रोखून बघत म्हणाले.
"तुम्ही, काकासाहेब, वाटल्यास मी थोडे दिवस येतो. कुणीही..."तात्यासाहेब म्हणाले.
अप्पा तात्यासाहेबांकडे बघतच राहिले.
"चला, जेवण करू. बाकी गप्पा निवांत होतीलच." तात्या हसत म्हणाले.
◆◆◆◆◆
"यावेळी इलेक्शन जरा अवघड असेल ना?"
"हो. आम्ही काँग्रेसला चिकटून राहिलो, आता वारं जकपाचं वाहतय. केंद्रात सत्ता त्यांचीच."
"थोडे दिवस. नगर जिल्हा आहे हा. काँग्रेसचा बालेकिल्ला."
"नाही, तिकडे धुळ्यात बघा, तुमच्या नाशकात तर नामोनिशाण राहिलं नाही काँग्रेसचं..."
"कारण आम्ही लक्ष दिलं नाही. आता लक्ष देऊ. तात्या, तुही निवडणुकीत लक्ष दे. दीड वर्ष आहे अजून, आताच तयारी चालू कर..."
"निवडणुका सोप्या नाही राहिल्यात आप्पासाहेब."
"सहा कोटी."
"काय?" तात्यासाहेब चमकून म्हणाले.
"संग्राम जर खुर्चीवर बसला, तर सहा कोटी सहज देता येतील. शेवटी नातंच नात्याच्या कामाला येईल."
"अप्पा, किंमत लावताय?" तात्यासाहेब हसले.
"नाही, विकत घेतोय? आहे किंमत कबूल? आणि विकत फक्त एक मत घेतोय. संग्रामसाठी. त्या बदल्यात लाखो मतांची बेगमी करून देईन. चालेल?"
"अप्पासाहेब, दीड वर्षांनंतरच आश्वासन आम्ही द्यावं, तुम्ही नाही."
अप्पा हसले. त्यांनी मोबाईलवरून काही बटणे दाबली.
क्षणार्धात ड्रायवर एक सुटकेस घेऊन हजर झाला.
"सहा कोटी!" आप्पासाहेब हसले. "एक मत, सहा कोटी!!!"
तात्यासाहेब विस्फारून त्या नोटांच्या बंडलांकडे बघतच राहिले.

क्रमशः

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हो आता गॅप पडू न देता लिहिण्याचा मानस आहे... >> धन्यवाद. हा भाग पण उत्तम.
कृपया पुढचा भाग टाकायला फार वेळ लावू नका.