अज्ञातवासी - भाग २४! - जुनी गणिते, नवीन खेळ!

Submitted by अज्ञातवासी on 6 February, 2021 - 05:31

भाग - २३

https://www.maayboli.com/node/77928

"शेखावत!"
'शेखावतची तुमच्याशी काय दुष्मनी, मोक्षसाहेब?"
"माझ्याशी नाही, मी तर फक्त एक मोहरा होतो. टार्गेट संग्राम होता."
"म्हणजे?"
"म्हणजे मी मेलो असतो, तर त्याचा संशय १०० टक्के संग्रामवर आला असता. जसा तुम्ही घेतला खानसाहेब. बाकी त्या जयशंकरचं काय केलंत?"
"अजूनही जिवंत आहे, गोडाऊनमध्ये."
"बायकापोरं आहेत का त्याला?"
"आहेत ना, एक मुलगा एक मुलगी. का?"
मोक्ष हसला.
"सोडून द्या त्याला. आणि त्याच्या मुलाला आणि मुलीला हवेलीवर आणा. त्यांच्या केसालाही धक्का लागता कामा नये...
...पण त्याच्यावर असा दबाव असला पाहिजे, की त्याने तोंड जरी उघडलं, तरी या पोरांची प्रेते त्याला दिसतील..." मोक्ष शांतपणे म्हणाला.
खानसाहेब त्याच्याकडे बघतच राहिले.
"तुम्हा दोघांचं झालं असेल, तर प्रॅक्टिसला जाऊयात?" झोया तिथे येत म्हणाली.
"जी मॅडम." मोक्ष उठला व तिथून निघाला...
◆◆◆◆◆
"आज उझी चालवणार का?"
"ना. एके५६ दे."
झोयाने एके५६ त्याच्या हातात दिली.
मोक्षने रायफल अनलॉक केली, व सुसाट गोळया चालवायला सुरुवात केली...
तो थांबला.
"ग्रेट!" झोया न राहवून ओरडली.
सगळ्या गोळ्या आडव्या एका सरळ रेषेत लागल्या होत्या!
"आता उझी दे."
झोयाने उझी त्याच्याकडे दिली.
त्याने पुन्हा गोळ्या चालवायला सुरुवात केली.
यावेळी गोळ्या उभ्या रेषेत लागल्या होत्या.
"आजकालच्या बंदुकांना नेम धरण्याची गरजच पडत नाही, बघ ना गोळ्या आपोआप कशा निशाण्यावर लागतात." तो हसत म्हणाला.
झोया त्याच्याकडे बघतच राहिली. तिला काय बोलावं तेच सुचेना.
"झोया?" तो म्हणाला.
"काय?"
"किती वेळ बघत राहणार माझ्याकडे?"
"अरे, सॉरी... तिने झटकन मान दुसरीकडे वळवली."
"चल, जाऊयात. नाहीतर या हवेलीत कितीही वेळ थांबलो, तरी मन भरत नाही." त्या पडक्या हवेलीकडे बघत तो म्हणाला.
...आणि दोघेही तिथून निघाले.
◆◆◆◆◆
"काय करताय अप्पा."
"यादी बनवतोय."
"कशाची यादी?"
"राज्यभिषेकाची."
"कधीतरी समजेल असं बोलत जा हो." सौदामिनीबाई किणकिणल्या.
"किती दिवस खुर्ची रिकामी ठेवणार? दादा जाऊन आता दोन महिने होत आले. तो मोक्ष अमेरिकेला गेला, तेव्हापासून तो तर अज्ञातवासीच झालाय. सगळी माणसं सोडलेल्या वळूसारखी झालीत. आता त्यांना सरळ करायला हवं. पुढच्याच आठवड्यात अण्णांची पुण्यतिथी येतेय, तेव्हाच संग्रामला बसवून टाकू. आताच ती वेळ आहे."
"अप्पा..." संग्रामला हर्षवायू झाला. "बघा एकेकाला कसा सरळ करतो ते. टाचेखाली रगडून टाकेन एकेकाला."
"मग तू मूर्ख आहेस." अप्पा शांतपणे म्हणाले.
"आई, यांचं हे नेहमी असं असतं..." संग्राम वैतागला.
"दुर्योधनाच्या बाजूने इतके राजे, महाराजे महाभारतात का लढले माहितीये? कारण त्याने फक्त जिथे गर्व दाखवायचा, तिथेच दाखवला. तो प्रत्येकाशी लढत बसला नाही. युधिष्ठीरसुद्धा त्याच्या लोकप्रियतेने चिंतीत होता.
संग्राम, राज्य करायचं असेल, तर राजा बनून... मनाचा मोठेपणा दाखवायचा, राजा बनून...माणसं जोडत राहा, राजशेखर शेलार दादासाहेब फक्त माणसांमुळे बनला. कळलं?"
"हो अप्पा," संग्राम चरफडत म्हणाला.
अप्पा यादी बघू लागले.
"उद्यापासून थोडं बाहेर फिरावं लागेल संग्राम. थोडं झुकावं लागेल. मनाची तयारी ठेवा." अप्पा पान उलटत म्हणाले.
संग्रामने निमूटपणे मान हलवली.
◆◆◆◆◆
वाड्यावर पुन्हा जल्लोष सुरू झाला होता.
"एकहाती, म्हणजे शब्दशः एकहाती गेले दादासाहेब, आणि सगळ्या रेहमानच्या टोळीला संपवून आले." कुजबुज चालू होती.
"तो दुबईचा डॉन, त्याच्यावर आपले दादासाहेब भारी पडले."
दरवाजाजवळच दादासाहेबाना पाच सुवासिनींनी ओवाळले, व दादासाहेब आत गेले.
"दादा, मर्द शोभला..." जगनअण्णांचा आनंद गगनात मावत नव्हता.
दादासाहेब फक्त हसले.
"मुंबईतून आता माल यायला काहीही धोका नाही. गृहमंत्रीही जरा दबावात आलाय शूटआउट मुळे, कारण सगळे मुडदे एकाच गॅंगचे पडलेत." जाधव मागून म्हणाला.
"नाही, गृहमंत्री दबावात आहे, कारण आता मुंबईत गँगवार चालू होईल. सगळे आता पावरफुल व्हायला बघतील. जाधव, आता वेळ आपली आहे सगळे मार्ग नीट बसवून घे. आणि अण्णा, गृहमंत्र्याला सांगून द्या, कुणी रहमानची गॅंग उडवली ते...
..आपलं नाव ऐकूनच मार्ग मोकळे व्हायला हवेत..."
"जी दादासाहेब..." अण्णा हसले.
दादासाहेबांनी अण्णांना हात जोडले व ते आपल्या खोलीकडे निघाले.
खोलीत शांतपणे ते डोळे मिटून बसले.
त्यांच्यासमोर राहून राहून ते भेदक डोळे येत होते.
'मला शोधायला हवं तिला....शोधायला हवं... मला बोलायचंय तिच्याशी...'
त्यांनी मनाशी निर्धार केला.

क्रमशः

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्तच!!!
पुढील भागाच्या प्रतिक्षेत........

मस्तच!!!
पुढील भागाच्या प्रतिक्षेत........--- +1111
नातीगोती पण लिही की..
आणि लवकर लवकर लिहीत जा बरं..

सगळ्यात आधी तर खूप खूप सॉरी!!! उशीर झाला.
आजही हा भाग घाईघाईतच झाला. अजून तर पाच टक्केही कथा पूर्ण नाही, तरीही उशीर होतोय. क्षमस्व.
सर्व प्रतिसादकांचे धन्यवाद. खरंच मला तुम्ही प्रचंड समजून घेताय, केव्हाही भाग आला तरी वाचताय, प्रतिसाद देताय, मी खरंच तुमचा आभारी आहे.
पुन्हा एकदा धन्यवाद, आणि क्षमस्व... वाचत राहा...

झाला पण वाचून.
एक तर उत्कन्ठावर्धक लिहिता.
लिहिता तर लिहिता ते पण इतक्या गॅपनं.
भाग पण तसा लहानच.

बरं, पुढचा भाग कधी येऊ शकेल?

मस्त आहे कथा. पण कृपया कृपया कृपया इतका वेळ लावू नका.