माझे डॉक्टर!--५--मोबाईल डॉक्टर!

Submitted by सुरेशकुलकर्णी on 20 January, 2021 - 21:36

दिवस दिवाळीच्या आसपासचे. आमचे मेव्हणे, त्यांच्या नाताला बेंगलोर दाखवायला घेऊन आले होते. तो असेल दहा बारा वर्षाचा. परतीच्या मांसूनच शेपूट वळवळत होत. त्यारात्री, त्यानं बेंगलोरला, चांगलंच झोडपून काढायचं ठरवलं असावं. संध्याकाळपासूनच पावसानं फेर धरला होता.

अश्या वातावरणात, जे व्हायचं तेच झालं. पावसाच्या पहिल्या सरीला विद्युतमंडळाने लाईट घालवून टाकले. बाहेर दिवसभर वणवण उन्हात भटकून, जिभेचे चोचले पुरवत फिरलेली मंडळी, तापली. श्री मेव्हणा आणि सौ. मेव्हणा यांच्या, तापीबरोबर संडासच्या फेऱ्या सुरू झाल्या. त्यांचा नातूहि, त्यांना सामील होता! मोठी पंचाईत होती. घरातले दोनचार लिंब वापरून झाली!

"अरे, कोणी डॉक्टर आहे का? आपल्या कॉम्प्लेक्स मध्ये? रात्री बेरात्री इमर्जन्सी उद्भवली तर? मला काळजी वाटायला लागलीयय!" मी मुलाला विचारले.

"हो, न अश्या पावसात ऑटो किंवा टॅक्सी मिळणे शक्यच नाही! खाजगी दवाखाने बंदच असतील. हॉस्पिटलला इमर्जन्सीत, घेतील ऍडमिट करून! तेथवर जायचे म्हणजे ऍम्बुलन्सचाच पारियाय आहे!"

माझे धाबे दणाणले! नगरला असतो तर काही हातपाय हलवता आले असते. तेव्हा, आजच्या सारखी ओला किंवा मेरु कॅबची सोय नव्हती. घरी गाडी पण नव्हती. मुलाची बाईक अश्यावेळेस काय कामाची?जनरेटरवर फ्लॅटमध्ये उजेड होता. पण बाहेर मिट्ट अंधार!

"बाबा! मै देखती हू!" सुनबाईनी मला धीर दिला.

मोबाईलवर चार सहा कॉल केले. तिच्या कानडीत काय बोलली माहित नाही.

"बाबा! एक डॉक्टर मिल गया! दस मिनिटमे पोहच जायेगा! फिकर मत करो!" आमच्या सुनबाई मोठ्या धीराची आहे.

तिने म्हटल्या प्रमाणे, दहाव्या मिनिटाला फ्लॅटची बेल वाजली.

मी दार उघडले. दारात चिक्क ओला रेनकोट घातलेल्या आणि हातात ब्रिफकेस घेतलेला, पिझा डिलेव्हरी बॉय सारखा दिसणारा माणूस उभा!

"मे, डॉक्टर रेड्डी! व्यंकटेशा रेड्डी! कॉल था मॅडम का."

"हा, प्लिज कम इन!"

त्याने रेनकोट काढून दाराबाहेर ठेवला. ओले झालेले बूट अन त्यातले ओले सॉक्स काळजीपूर्वक बाहेर काढून ठेवले. आणि मग घरात आला. मी पुढे केलेल्या खुर्चीत विराजमान झाला. ट्यूब खालच्या उजेडात बसल्याने, त्याला व्यवस्थित बघता येत होते.

वर्ण काळच पण तजेलदार होता. डोक्यावरचे कुरळेकेस आणि ओठावरच्या बोटभर रुंदीच्या मिश्याचे केस त्याहून काळे कुळकुळीत होते. त्यामुळे त्याचा चेहरा उजळ वाटत होता. पांढरा हाफ शर्ट, रंग उडालेली जिनची पॅन्ट. याने मी डॉक्टर आहे म्हणून सांगितले नसते तर, मोटर मेकॅनिक म्हणून सहज खपून गेला असता. पण त्याच्यात एक गोष्ट स्पेशल वाटली, ते म्हणजे त्याचे नितळ हास्य!

तोंडभर हसून त्याने, हातातली ब्रिफकेस मांडीवर ठेवून त्याने खडलंखुट्ट करून उघडली.

"पेशंट किधर?"

आळी-पाळीने त्याने तिघांना तपासले. तिघांना एक एक इंजेक्शन टोचलं.

"सर, दे आर डी हायड्रेटिंग! सलाईन देनेको होना!"

"सलाईन?"

"नो प्रॉब्लेम! आय विल मॅनेज!"

त्याने मोबाईल काढला जवळच्या मेडिकल मधून तीन आयव्ही मागवून तिघांना लावले. तोवर सुनबाईनी कॉफी करून सर्वाना दिली.

सलाईन दोन तास घेणार होते.

"डॉक्टरसाब, आपक नाम रेड्डी, कर्नाटका नही लागते."

"सर, हम ए पी से है. बट, मेरा फोरफादर बेंगलोर आया. इधरीच सेंटलेड हो गये!"

"आपका, क्लिनिक कहा है? कभी जरुरत हो तो आनेके लिये."

"मेरा, नो क्लिनिक! मे मोबाईल डॉक्टर!" पुन्हा तेच रुंद हास्य चेहऱ्यावर झळकावत तो मिस्किलपणे म्हणाला.

आजवर बिना डॉक्टरांचा दवाखाना हजारो वेळेला पहिला होता. आज पहिल्यांदाच बिन दवाखान्याचा डॉक्टर पहात होतो!

"क्यू? दवाखाना नाही बनाया?"

"सर, क्लिनिक नीड्स हेवी इन्व्हेस्टमेंट! मै नही कर सकता! मनी प्रॉब्लेम तो है हि, बट आय डोन्ट नीड इट!"

काय वेडा माणूस आहे. दवाखान्याची गरज नाही म्हणतो.

"व्हाय?"

"फास्ट थिंग. आय आम ओन्ली एमबीबीएस! नो स्पेशलायझेशन! तो कोन मेरे क्लिनिक मे आयेगा? सेकंडली आय आम हैप्पी विथ प्रेझेंट स्टेट! कॉल मी ऑन मोबाईल आणि आय आम एट युवार सर्व्हिस!"

"आपने स्पेशलायझेशन करना चाहिये था! ज्यादा पैसे मिलता था!"

"हम पूवर था. स्पेशलाझेशन नाही किया. बट नो प्रॉब्लेम! आय अर्ण लाईक एनी डॉक्टर, हॅव्हिंग क्लिनिक! और सर, मनी इज नॉट एव्हरी थिंग! आय डोनेट माय संडेज टु ऑर्फन हाउसेस, फ्री मेडिकल ऍडव्हाइस! मै हैप्पी अँड फ्री बर्ड!" पुन्हा तेच नितळ हास्य अन मिस्कील सूर.

अपेक्षेपेक्षा खूप कमी फी घेऊन डॉ. व्यंकटश निघून गेला. 'काळजीचे कारण नाही!' हा दिलासा नव्हेतर विश्वास देऊन गेला. जाताना मी त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पहात होतो. त्याच्या खांद्यावर दोन पारदर्शक पंख असल्या सारखा मला भास झाला.

अशी माणसं जगात अजून आहेत. गरिबीने उच्य शिक्षण नाही मिळाले. भपकेबाज दवाखाना याने करण्यासाठी कर्जाची भानगडच केली नाही! एक बाईक, मेंदूतील वैद्यकीय ज्ञान आणि मनातील सेवाभाव! हीच त्याची इन्व्हेस्टमेंट!

हा 'मोबाईल डॉक्टर' माझ्या आयुष्यातला सगळ्यात अनमोल डॉक्टर आहे!

व्यंकटशा, तू अनंत, तुझी रूपे अनंत!

सु र कुलकर्णी. आपल्या प्रतिक्रियांची वाट पहातोय. पुन्हा भेटूच. Bye.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users