बंगाली भाषेतील पारोमा या चित्रपटावरील लेख

Submitted by सतीशगजाननकुलकर्णी on 14 January, 2021 - 11:53

पारोमा

मन मनास उमगत नाही आधार कसा शोधावा, स्वप्नातील पदर धुक्याचा हातास कसा लागावा?..

पारोमा १९८५ सालचा बंगाली भाषेतील national film award विजेता चित्रपट. या चित्रपटाच्या कथा आणि दिग्दर्शना ( कथा आणि दिग्दर्शन अपर्णा सेन ) इतकीच प्रभावी आहे यातील “पारोमा” या स्त्रीची व्यक्तिरेखा . “पारोमा” हि केवळ एक कर्तव्यदक्ष सून, प्रेमळ आई किंवा आपल्या पतीची साथ देणारी सहचारिणी नाही तर या घरंदाज स्त्रीत असणारे अनेक पैलू उलगडून दाखवणाऱ्या स्त्रीत्वाचे ते मानसिक आंदोलन आहे.

चित्रपटाची सुरवात देवीच्या पूजेने होते. या पूजेसाठी भास्कर ( दीपंकर डे ) आणि पारोमा ( राखी ) या नवरा बायकोचे सर्व कुटुंबीय एकत्र जमले आहेत. पूजेचा उत्सव जल्लोषात चाललेला आहे. आणि या आनंदाच्या क्षणांचे फोटो राहुल नावाचा तरुण काढत आहे. राहुल ( मुकुल ) पारोमाच्या पुतण्याचा बुबुचा बालपणाचा मित्र आणि सुप्रसिध्द व्यवसायिक फोटोग्राफर.

देवीची पूजा हा राहुलच्या दृष्टीने तो परदेशात राहत असल्याने आगळा वेगळा उस्तव आहे. पूजेचे फोटो घेत असताना राहुलचा कॅमेरा पारोमाचे सौदर्य टिपतो. वास्तविक, पारोमा चाळीशी ओलांडलेली स्त्री. पण तिचे सौंदर्य बघून राहुल पहिल्याच भेटीत तिच्याकडे आकृष्ट होतो. एक दिवस राहुल बुबुकरवी विचारतो “पारोमाचे फोटोग्राफ्स त्याने काढले तर चालेल का ?” हे फोटो काढून त्याला मासिकात प्रसिद्ध करायचे आहेत. राहुलला घरचे लोक आनदाने परवानगी देतात.

काही दिवसांचा काळ जातो. भास्कर कामानिमित्त परदेशी गेलेला आहे. पारोमाच्या घरच्यांची समंती मिळाल्यावर राहुल पारोमाचे फोटो काढण्यासाठी येतो. पण फोटो काढतानाही पारोमाची खानदानी अदब आपल्याला जाणवत असते. हातामध्ये सितार घेऊन सरस्वतीच्या पोज मध्ये पारोमा बसलेली आहे. नकळत तिची साडी पाउलावरती येते. पारोमा संकोचून साडी सावरते. राहुल तिला सांगतो देवीच्या उत्सवा दिवशी तिने पायाला मेंदी लावली होती आणि त्यावेळी पारोमा चांगली दिसत होती. राहुलला तिचे पायांना मेंदी लावलेले फोटो काढायचे आहेत. पारोमा जेव्हा मेंदी लावू लागते तेव्हा राहुल येऊन तिला मदत करू लागतो आणि तिच्या पायांना अनाहुतपणे स्पर्श करतो. आंपण विवाहित स्त्री आहोत याची तिला जाणीव आहे. आणि त्याचमुळे पारोमा त्याला विरोध करते. इतकेच नव्हे तर ज्या पायाला तिने मेंदी लावली होती ती मेंदी दुसऱ्या दिवशी निग्रहाने पुसून टाकते. जणू तिच्या पायाला झालेला स्पर्श ती पुसून टाकते आहे. या छोट्याशा प्रसंगानातर पारोमा बुबुला सांगते ती घरगुती व्याप सांभाळणारी स्त्री आहे आणि फोटो शूटसाठी तिला वेळ नाही .

पारोमाने विरोध दर्शवला आहे. तरीही एक दिवस राहुल येतो. पारोमाला फोटो काढायची इच्छा नाही हे त्याला माहित आहे. तरीही एक दिवस शहर फिरण्याच्या निमित्ताने राहुल पारोमाला घेऊन बाहेर जातो.

दूरवर दिसणारे ते सुंदर शहर. नेहमी घरामध्ये बाहुलीसारखी बसत असणाऱ्या पारोमाने शहराचं सौदर्य कधी बघितलंच नाही. डोळे भरून पारोमा शहराच अप्रतिम सौदर्य बघत असते. कधी डोळ्याच्या कॅमेरया मधून तर कधी राहुलच्या कॅमेरया मधून. पारोमा जितकी दिसायला सुंदर आहे तितकेच सुंदर तिच्या अंतरंगात अनेक गुण आहेत. विखुरलेल्या शहराच ते अप्रतिम सौंदर्य बघितल्यावर तिला प्रेमकुमार मित्राची कविता आठवते. आणि तिच्या डोळ्यात पाणी येते.

कविता हा तिचा भूतकाळ आहे. आयुष्यातलं खऱ्या अर्थाने तिच्या आयुष्यात आनंदी असणारे काव्य भूतकाळात हरवले आहे याची तिला खंत आहे.

पारोमाची आई नॉर्थ कलकत्ता येथे राहत आहे. राहुलला ते जुन्या पद्धतीचे घर बघायचे आहे पारोमाचे माहेरचे जुने घर तो बघत असतो आणि त्याचवेळी पारोमा तिथे येते. तिच्या सुंदर आठवणी तिथे आहेत. ती खोली……… ज्या ठिकाणी तिच्या गुरुजींनी तिला सतार शिकवली होती. खिडकीच्या बाहेर असणारी ती फुले.... त्या फुलांचे नाव पारोमोला कधीच आठवत नाही. तीच्या मावशीची खोली ..... जी विधवा असताना प्रेमात पडल्याने सर्वांनी तिला बहिष्कृत केले होते... तिच्या साऱ्या आठवणी आता विस्मृतीच्या पडद्याआड गेलेल्या आहेत.

पारोमा आपल्या मावशीची जुनी खोली राहुलला दाखवते. खोलीची खिडकी ती उघडते आणि अचानक पक्षी आत येतात. पारोमा दचकते आणि राहुलला बिलगते. तो मोहाचा क्षण... राहुल पारोमाचे सौंदर्य बघतो आणि दोघांच्या मनात असणाऱ्या सुप्त भावनांचे परिवर्तन चुंबनामध्ये होते. मघाशी उडणारे पक्षी आणि त्यांचा आवाज आता शांत झाला आहे . करकरणारे दार थांबते. पारोमा दचकते. जे घडू नये ते घडल होत. प्रेमात पडल्यामुळे तिची मावशी ज्या खोलीत बहिष्कृत झाली होती त्याच खोलीत पारोमा राहुलच्या प्रेमात पडलेली होती.

आपल्या बेडरूम मध्ये हमसून हमसून रडणारी पारोमा. ती आपल्या भावनांना वाट करून देत आहे. हे घडलंच कस?आपल्या मनात तर कोणत्याच भावना नव्हत्या! मग अचानक भावनाचे पक्षी बाहेर कसे आले? का त्या पक्षांची आपल्यला जाणीवच नव्हती? ती मनोमन घाबरली आहे. आणि त्याच वेळी फोनची बेल वाजते. भास्करचा फोन आहे. पारोमाचा रडणारा आवाज बघून तो काळजीत आहे पण तिच्या भावनांना त्याचा प्रतिसाद व्यवहारिक आहे. आपल्या भावनांना व्यक्त करू पाहणारी पारोमा आणि व्यवसायामध्ये गुरफटलेला नवरा. पारोमा पुढच्या क्षणी अलिप्त होते आणि फोन ठेवते.
ज्यावेळी पारोमा भास्करशी बोलत असते त्याचवेळी तो समोर असलेल्या त्याच्या पी.ए कडे वैषयिक नजरेने बघत असतो. त्याला एक रात्र तिच्याबरोबर जेवणाच्या निमित्ताने घालवायची आहे. पी.ए जेव्हा मनाई करते तेव्हा तिचा उल्लेख तो “बीच” म्हणून करतो.

एक छोटासा प्रसंग. पारोमा अपराधाच शल्य घेऊन व्यतीत झाली आहे आणि त्याचवेळी एका स्त्री बरोबर रात्र घालवण्यासाठी नवरा मात्र आतुर आहे. दोन्ही परस्परविरोधी आणि त्याचमुळे हा प्रसंग अधिक बोलका होतो.

पारोमाची मानसिक अवस्था अपराधाची आहे पण तरीही त्या दिवशीचा राहुलचा झालेला ओठांना स्पर्श तिला सुखावूनहि गेलेला आहे. त्याचे पर्स मध्ये विसरलेले कार्ड आणि कॅमेराचा फिल्टर परत देण्याच्या निमित्ताने दोघांची पुन्हा एकदा भेट होते. एकीकडे राहुल तिला सॉरी म्हणतोय पण दुसरीकडे तिच्या मात्र डोळ्यात आश्रू आहेत.. तिच्या न कळत पारोमा त्याच्या प्रेमात पडली आहे. “ तू जाऊ नकोस” हा संदेश देताना न केवळ तिचे डोळे बोलत आहेत तर विलग होऊन तिचे ओठ सुद्धा प्रेमाच्या त्या उत्कठ क्षणाची पुन्हा एकवार याचना करत आहेत. त्या दिवशी पारोमा राहुलला आपल सर्वस्व देते.

खोलीत सर्वत्र अंधार. बाहेर विजांचा कडकडाट आणि पारोमाच्या हातात मात्र सतार आहे. आयुष्यातल्या त्या अंधारात पारोमाला संगीत सापडले होते. हा प्रसंग पाहत असताना सुधीर मोघेंची एक कविता आठवते “ साधून हीच वेळ आला कुठून वारा. सुखवीत फुल त्याने लुटला पराग सारा. मग होय चंदनाचे अस्तित्व पेटलेले. वेड्या मुसाफिराने त्याचेच गीत केले” एका चंदनाचे अस्तिव पेटलेले असते.

पारोमा आणि राहुल दिवसातील बहुतेक वेळ एकत्र असतात. एक दिवस भास्कर परदेशातून येतो. पण पारोमा आनंदी नाही. उलट संभ्रमित आहे. राहुलला आता कसे भेटायचे हा प्रश्न तिला आहे. एक दिवस राहुल तिला सांगतो त्याला आता ग्रीसला जायचे आहे. पारोमा दु:खी होते. राहुल तिलाही बरोबर घेऊन जायला तयार आहे. काही वेळ दोघेही स्वप्न रंजनात घालवतात पण ते शक्य नाही हे तिलाही माहित आहे. दोघेही पुन्हा भेटण्याचा वायदा करतात आणि आकाशातून जाणारे विमान आपल्याला दिसते. राहुल ग्रीसला गेलेला असतो. पण जाताना पारोमाला तिच्या आठवणीतली त्या दुर्मिळ फुलांच रोपट भेट म्हणून देतो.

पण खऱ्या वादळाची सुरवात येथूनपुढेच होते. राहुलच्या जाण्यान पारोमा उदास आहे. पण ती त्या झाडांच्या पानांना कुरवाळत राहुलच्या आठवणी ताज्या करत असते. आणि एक दिवस परदेशातील लाईफ मासिक जिथे राहुल फोटो प्रसिद्ध करत असतो ते पोस्टान घरी येत . खानदानी सौंदर्य असलेले आपल्या पत्नीचे फोटो बघून तो आनंदित होतो. पण पुढच्याच पानावरचे फोटो बघून मात्र तो आश्चर्यचकित होतो. आता आश्चर्याची जागा रागाने घेतलेली असते. कारण ते फोटो पारोमाच्या देहप्रदर्शनाचे असतात .जे खानदानी सौंदर्य त्याच्या अभिमानाचा विषय असतो त्याची परिणीती पत्नीच्या तिरस्कारा मध्ये होते.

त्या क्षणापासून पारोमाचे घरातील स्थान बदलते. जी पारोमा घराचा आत्मा होती ती आता बहिष्कृत आहे.. पण ज्या व्यक्तीमुळे या साऱ्या घटना घडल्या त्या राहुलला हे सगळ कळवायच अस पारोमा ठरवते. पारोमाची शीला (अपर्णा सेन ) नावाची मैत्रीण आहे. पण शीला कडून कळते राहुल न्यूयॉर्क किंवा ग्रीस कुठेच नाही. राहुलचा पत्ता नाही या गोष्टीमुळे पारोमा खचून जाते आणि शेवटी आपले आयुष्य संपवायचा निर्णय घेते.

पारोमाच्या आत्महत्येचा प्रयत्न यशस्वी झालेला नाही. अनेक उपचार केल्यावर पारोमा शारीरिक दृष्टीने बरी आहे पण ती अजुनी बरी होण्यासाठी तिला डॉक्टर मानसोपचार तज्ञाला दाखवायला सांगतात. तिच्यामधे असणारी अपराधाची भावना आहे ती काढून टाकायला मदत होईल असे त्यांना वाटते. पण पारोमा म्हणते “ तिला कोणताच अपराध वाटत नाही” पारोमाचे हे अनपेक्षित उत्तर ऐकून सर्वाना आश्चर्य वाटते.

राहुलने भेट म्हणून दिलेल फुलांच रोपट पारोमाने शीला कडून मागून घेतलं आहे. त्या रोपट्याकडे ती भाऊक होऊन बघत आहे. इतके दिवस त्या रोपट्याच नाव तिला आठवत नसते. पण आज तिला आठवते त्या रोपट्याच नाव आहे युर्फोबिया कॉनटीनफोलीया. त्याला फुलेही आलेली असतात. राहुल आणि पारोमा यांच्या अर्थपूर्ण प्रेमाच ते प्रतिक. इतके दिवस तिच्या मनातील जे प्रेम संभ्रमित होते ते आता शाश्वत झाले. तिची मुलगी तिच्याजवळ येते आणि म्हणते “ किती सुंदर फुले आहेत” पारोमाच्या भावना कुणीतरी समजून घेतलेल्या होत्या. दोघी युर्फोबिया कॉनटीनफोलीया कडे बघत असतानाच चित्रपट संपतो. राहुलवरच्या खऱ्या प्रेमाची प्रचीती आता तिला आलेली असते.

पारोमाच्या व्यक्तिमत्वाला विविध छटा आहेत. ... . संसारी स्त्री म्हणून वावरणारी पारोमा, स्वत:च्या न कळत राहुलच्या प्रेमात पडलेली पारोमा आणि जेव्हा राहुल ग्रीसला निघून जातो त्यावेळी स्वत:च्याच संसारात एकटी पडलेली पारोमा. पारोमाची हि तीन भिन्न रूपे! पारोमाचे वय चाळीसच्या पुढे आहे आणि त्याचमुळे संसार आणि राहुल बरोबर निर्माण झालेले प्रेमसंबध यांच्यात होणारी घुसमट राखीने फार समर्थपणे आपल्या समोर सादर केली आहे. एका दृष्टीने राखी हि भूमिका जगली आहे.

राखीला उत्तम साथ दिली आहे मुकुल शर्मा आणि दीपंकर डे या दोन सहकलाकारांनी. उत्तम सहकलाकार म्हणून दीपंकर डेला १९८६ साली सिल्व्हर लोटस अवार्ड मिळाले होते.

पारोमा चित्रपट अपर्णा सेन यांचे प्रतिभावंत दिग्दर्शन आणि कथा आणि कलाकारांचा उत्तम अभिनय यांचा अपूर्व मिलाप आहे आणि संगीत दिले आहे भास्कर चंदावरकर यांनी

पारोमा हे व्यक्तीमत्व आपल्याला विचार करायला लावते. विषेशत: “ मी कोणताच अपराध केला नाही” हे तिचे वाक्य. स्वत:च्या न कळत आपण पारोमाच्या बोलण्याचा विचार करू लागतो खरच पारोमाला अपराध का वाटावा ? राहुल वर तिने प्रेम केले होते. जो भावनिक ओलावा तिला नवऱ्याकडून मिळाला नव्हता तो तिला राहुलकडून मिळाला. मग अपराध कसला? प्रेम करण हा गुन्हा नाही. पण आपल्या नवऱ्याचा विचार तिच्या मनात का आला नाही? हि केलेली प्रतारणा नाही का? मग नवरा करत होता ती प्रतारणा नव्हती ? का पुरुष म्हणून त्याला सर्व क्षम्य होते? विचारांचे काहूर मनात घोंघावत असतानाच चित्रपट संपतो पण अस्वस्थ विचार तसेच मनात थैमान घालत असतात आणि हेच या चित्रपटाचे खरे यश आहे.

सतीश गजानन कुलकर्णी

.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

हा चित्रपट बघायचा आहे पण बंगाली अजून तितकी चांगली कळत नाही. चांगला चित्रपट.
शहर डोळ्यासमोर उभे केले काही काही वाक्यातून.
हे समीक्षण आहे की आणखी काय म्हणतात या प्रकाराला ?

छान चित्रपट परिक्षण.
युट्युबवर हिंदीमधे आहे हा चित्रपट.

सुंदर ओळख!
बघायला आवडेल हा चित्रपट..! Happy