दिसलीस तू ... (भाग २)

Submitted by nimita on 6 January, 2021 - 20:53

पुढचे काही दिवस अर्पितासाठी खूपच धावपळीचे गेले. आई बाबा त्यांच्या नव्या घरात स्थिरस्थावर होईपर्यंत ती दर दोन दिवसांआड त्यांना भेटायला जात होती. इतकी वर्षं कायम त्यांना दोघांना आपल्या डोळ्यांसमोर बघायची सवय असल्यामुळे आता ते दोघंच सगळं कसं मॅनेज करत असतील याबद्दल तिला खूपच काळजी वाटत होती. पण लवकरच आपली ही चिंता व्यर्थ असल्याचं जाणवलं अर्पिताला. आई बाबा दोघंही नव्या घरात खूप खुश होते. समवयस्क मित्र मैत्रिणींबरोबर खूप एन्जॉय करत होते दोघं... सकाळच्या योगाभ्यास आणि मेडिटेशन पासून ते रात्रीच्या टीव्ही सिरिअल्स आणि बातम्या पर्यंत... सगळं अगदी वक्तशीरपणे चालू होतं. आणि त्यात भर म्हणून वेळच्या वेळी कॉलनी च्या सेंट्रल किचन मधून ताजं, गरमागरम जेवण आणि नियमित डॉक्टरी तपासण्या...

एका भेटीत अर्पिता त्यांना म्हणाली सुद्धा - "तुमची दोघांची वयं ऐंशी आणि सत्त्याहत्तर आहेत हे सांगून सुद्धा खरं वाटणार नाही लोकांना ! तरुणांना लाजवेल असा उत्साह आणि सकारात्मकता आहे तुमच्या जवळ !! खरंच, तुम्हांला दोघांना असं भरभरून आयुष्य जगताना बघून खूप छान वाटतंय! इथली समवयस्कांची कंपनी चांगलीच मानवली आहे तुम्हांला....मी उगीचच काळजी करत होते तुमची."

त्यावर थोडं भावुक होत प्रमिलाताई तिला म्हणाल्या," आमची कसली काळजी करतेस बाळा ? आमची अर्धी लाकडं मसणात …. उलट आता आम्हांला दोघांना तुझी काळजी वाटायला लागलीये. अचानक एकटी पडलीयेस तू. कधी कधी वाटतं -आम्ही इकडे येऊन चूक केली की काय? इतके स्वार्थी झालो की तुझ्याबद्दल विचार देखील नाही आला आमच्या मनात ? अभिजीत च्या पश्चात तू आमची सून म्हणून नाही तर मुलगी बनून राहिलीस ; सक्ख्या मुलीप्रमाणे इतकी वर्षं आमची सेवा केलीस. खरं म्हणजे मैथिली च्या लग्नानंतर तुझ्या आयुष्यात एक पोकळी निर्माण झाली असणार.. तसे आम्ही दोघं सुद्धा खूप मिस करतो तिला... मग दोघं एकमेकांना सांत्वना देत राहतो. पण तू ?? तू एकटी कसं सांभाळतेस गं स्वतःला ? "

प्रमिलाताई स्वतःशीच बोलत असल्यासारख्या आपल्याच तंद्रीत बोलत होत्या. अर्पिताचा हात हातात घेत त्या पुढे म्हणाल्या," तुझ्या या म्हाताऱ्या आईचं ऐकशील?" अर्पिताच्या डोळ्यांतलं प्रश्नचिन्ह बघून त्या म्हणाल्या, "तुझ्या आयुष्याच्या या टप्प्यावर तुला एका साथीदाराची गरज आहे... प्लीज, माझं ऐक... तू योग्य जोडीदार शोधून लग्न कर..."

त्यांच्या हातातून आपला हात सोडवून घेत अर्पिता म्हणाली,"आई, प्लीज आता पुन्हा तोच विषय कशाला काढतीयेस ? मी सांगितलं ना...."

पण तिचं बोलणं मधेच थांबवत जयंतराव म्हणाले,"अर्पिता,आम्हांला लक्षात आहे तू सांगितलेलं .. तू म्हटलंस त्याप्रमाणे - तुझ्या आयुष्यात अभिजीत ची जागा दुसरं कोणीही घेऊ शकणार नाही.. मान्य आहे आम्हांला ; गेली दहा वर्षं तुला त्याच्या आठवणींबरोबर आयुष्य जगताना बघत आलोय आम्ही. पण तुला असं जगताना बघून आमचं हृदय मात्र तीळ तीळ तुटत राहातं.. बऱ्याच वेळा विचार केला की तुला पुन्हा नव्यानी आयुष्य सुरू करायला भाग पाडावं - पण अशा बाबतीत जबरदस्ती करून चालत नाही - म्हणून गप्प बसायचो. अर्थात, एकीकडे तुझं अभिजीत वरचं हे प्रेम बघून मनात खोल कुठेतरी खूप सुखावत ही होतो.

पण एका ठराविक वयानंतर नुसत्या आठवणींच्या साथीनी आयुष्य नाही जगता येत; अशा वेळी मनात असलेल्या,आठवणीमधल्या जोडीदाराची साथ अपुरी वाटायला लागते. दिवसभर आपण कुठेही असलो तरी - 'दिवसाच्या शेवटी आपल्या घरट्यात आपली वाट बघणारं कोणीतरी आहे'- ही भावना, हा विश्वास खूप महत्त्वाचा असतो बेटा!

इतकी वर्षं आम्ही दोघांनी आमच्या इच्छेविरुद्ध का होईना पण तुझ्या भावनांचा आदर केला त्याचं मुख्य कारण म्हणजे - आम्ही दोघं आणि मैथिली तुझ्या जवळ होतो… पण आता परिस्थिती बदलली आहे. आता तुझ्या घरट्यातल्या सगळ्या पाखरांनी त्यांची स्वतःची घरटी बनवली आहेत... सगळे आपापल्या घरट्यात सुखात आहेत ! पण त्यामुळे तू मात्र एकटी पडलीस.… तुझी आई म्हणाली तसं खरंच कधी कधी आमच्या स्वार्थी वृत्तीचा राग येतो. आमच्या मनातला हा सल आम्हांला दोघांनाही स्वस्थ बसू देत नाही.

आणि म्हणूनच आम्हांला वाटतंय की आता तुसुद्धा तुझं स्वतःचं नवीन घरटं बनवावंस. एक सुयोग्य जोडीदार शोधून तुझं हे थांबलेलं आयुष्य पुन्हा सुरू करावंस !! याला तू आमचा स्वार्थ म्हण हवं तर - पण तू जेव्हा लग्न करून नवा सुखी संसार थाटशील ना तेव्हा आमच्या मनातली ही बोचणी नाहीशी होईल."

बोलता बोलता जयंतरावांच्या डोळ्यांत पाणी तरळलं. त्यांना दोघांना असं भावुक झालेलं बघून अर्पिताचा देखील गळा दाटून आला. तिला त्या दोघांच्याही मनस्थितीची पूर्ण कल्पना होती. तिच्या मनात हळूच एक शंका डोकावली -'त्यांच्या मनातल्या या भाव भावनांचा त्यांचा तब्येतीवर काही विपरीत परिणाम तर नाही ना होणार?' त्या नुसत्या कल्पनेनीच तिचा जीव घाबरा झाला. अचानक वातावरणात आलेला ताण काहीसा हलका करण्यासाठी ती हसत म्हणाली," कन्यादानाचं पुण्य पदरात पडावं म्हणून चाललीये ना ही सगळी धडपड ? का इथे कोणी भावी आदर्श जावई सापडलाय दोघांना? असेल कोणी तर बोलवा त्याला ; चहा पोह्याचा कार्यक्रम उरकून टाकू लगेच..."

तिची ही क्लृप्ती उपयोगी पडली. आई बाबांच्या चेहेऱ्यांवर हसू तरळलं. तिच्या पाठीवर एक प्रेमळ दणका घालत जयंतराव म्हणाले," विषय कसा बदलायचा हे तुझ्याकडून शिकायला पाहिजे."

पण प्रमिलाताई मात्र बधल्या नव्हत्या; त्या आपला मुद्दा पुढे रेटत म्हणाल्या," ते सगळं ठीक आहे; पण अर्पिता, आमच्या या इच्छेवर तू परत एकदा विचार कर. मी खरं म्हणजे तुला इमोशनल ब्लॅकमेल करून तुझ्याकडून होकार मिळवू शकते... पण मी तसं काहीही करणार नाहीये. कारण पहिली गोष्ट म्हणजे तसं करणं अयोग्य आहे ; आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मला खात्री आहे की तू आमच्या या सूचनेवर नक्की विचार करशील आणि सर्वतोपरी योग्य असा निर्णय घेशील. फक्त एकच सुचवायचं आहे तुला .. कोणताही निर्णय घेताना फक्त भावनेच्या आहारी जाऊ नको ; प्रॅक्टिकली पण विचार कर."

आपल्या बायकोच्या बोलण्याला समर्थन देत जयंतराव म्हणाले," आणि अजून एक महत्वाची गोष्ट.. तू जर पुन्हा लग्न केलंस तर त्याचा अर्थ - तुझ्या मनातलं अभिजीत बद्दलचं प्रेम कमी झालं किंवा आता तू त्याला विसरलीस - असा अजिबात होणार नाही. त्यामुळे जर तसं काही तुझ्या मनात असेल तर ते पूर्णपणे काढून टाक आणि अगदी तटस्थपणे काय ते ठरव !"

अर्पिता नी त्यांचं दोघांचं म्हणणं ऐकून घेतलं.त्यांच्या प्रत्येक शब्दातून त्यांच्या मनातली तगमग, तिच्याविषयी त्यांना वाटणारं प्रेम, काळजी सगळं सगळं पोचत होतं अर्पिता पर्यंत. "मी नक्की विचार करीन या सगळ्याचा," असं आश्वासन देत तिनी त्या दोघांचा निरोप घेतला आणि घरी जायला निघाली.

गाडीत बसता बसता ती तिच्या ड्रायव्हरला म्हणाली," सलीम, आधी गणेश मंदिरात थोडा वेळ थांबायचं आहे आणि मग नंतर घरी जायचंय."

"ठीक आहे ताई," म्हणत सलीम नी गाडी सुरू केली. 'आज ताईंचा मूड ठीक नाहीये वाटतं - थोड्या उदास दिसतायत... गणेश मंदिरात थांबणार यावरूनच लक्षात येतंय.' सलीमच्या मनात आलं. त्याला अर्पिताकडे कामाला लागून चार पाच वर्षं झाली होती. आणि या कालावधीत तो अगदी तिच्या घरातला एक सदस्यच बनला होता. मैथिलीच्या लग्नात अगदी त्याच्या घरचंच कार्य असल्यासारखा राबला होता तो.

अर्पिताला जेव्हा जेव्हा मनःशांती हवी असायची तेव्हा ती थोड्या वेळासाठी का होईना पण तिच्या घराजवळच्या गणेश मंदिरात जाऊन बसायची. तिची ही सवय सलीमला चांगलीच ठाऊक होती. त्यामुळे त्यानी जास्त काही न बोलता मंदिराच्या दिशेनी गाडी चालवायला सुरुवात केली.

क्रमशः

Group content visibility: 
Public - accessible to all site users