हिंजवडी चावडी: गोंधळ दिवस-3

Submitted by mi_anu on 6 January, 2021 - 00:42

यापूर्वीचे भागः
हिंजवडी चावडी: गोंधळ दिवस-1
हिंजवडी चावडी: गोंधळ दिवस-2

तिकडे निम्मी मीटिंग रूम मध्ये एका परदेशी माणसाशी बोलत होती
"मायकेल, आय गॉट टू लिव्ह नाऊ.देअर इज अनप्लॅनड फायर ड्रिल."
"ओह, कॅन फायर वेट?आय विल टेक 5-10 मिनिट्स मोअर देन आय हॅव टू टेक किड्स टू स्कुल."
हा मायकेल म्हणजे एक नंबर चा चेंगट माणूस आहे.परवा पूर आला म्हणून ऑफिस बंद होतं तेव्हा 'तुम्ही पाचव्या मजल्यावर, तुम्हाला कशाला हवी पुरासाठी सुट्टी' म्हणून वाद घालत बसला होता.'ऑफिस ला बोटीतून येऊ का' म्हटल्यावर गप्प बसला.तिकडे सिक्युरिटी वाली माणसं बाहेर हाका मारत होती.
"मायकेल आय रियली हॅव टू गो.यु कॅन मेल मी."
निम्मिने "जाती हूँ मै" चा राग परत आळवून फोन कट केला.

फायर ब्रिगेड ड्रिलवाले कंपनीत 60% लोकांना जिना कुठे आहे माहीत नाही हे बघून आश्चर्याने बेशुद्ध पडायला आले होते.त्यात मीटिंग रूम न सोडणारी, प्रोग्राम कंपाईल झाल्यावर निघतो म्हणून जागा न सोडणारी, जाता जाता कॉफी मशीन ची कॉफी घेऊन मग आगीसाठी खाली जाणारी, आगीच्या ऑकेजन साठी कंगवा आणि आयलायनर घेऊन पटकन वॉशरूम मध्ये जाणारी बिनडोक जनता पाहून 'खरी आग लागू दे' असं त्यातल्या बऱ्याच जणांना वाटायला लागलं.

मांजर आणि टीम मधला मुलगा बाहेर येऊन गर्दीत एका ओंडक्यावर बसले.मांजरीने डबा उघडला.आता आणि काही व्यत्यय यायच्या आत चार घास पोटात जाणं गरजेचं होतं.
"लो ना, ग्राउंडनट लड्डू लो."
"थॅंक्यु मॅडम.वैसे तो हमारे यहां नॉर्थ मे बिना खाये फास्ट करते है."
तितक्यात फायर ड्रिल चा माणूस आला.
"ओ तुम्हाला गंमत वाटते का सगळी?इथे फायर ड्रिल चालू आहे आणि तुम्ही इथे बसून लाडू पेढे खाताय? खरी आग लागल्यावर पळायला वाट तरी आठवेल का? माने, इथे या, हे बघा लोक सिरीयसनेस न दाखवता आरामात लाडू खात बसलेत."
"पण तुम्ही अजून तयारी करताय ना?तोपर्यंत खाऊन होईल.उपास आहे हो."
"मॅडम, कृपा करून उभं राहून खा.इथे असं बसलेलं पाहिलं तर लोक सिरीयसली घेणार नाहीत फायर ड्रिल.इमर्जन्सी मध्ये तुम्हा लोकांची जबाबदारी आमच्यावर असते."(माने नी 'इथे किल्ल्यावर दारू पिऊ नका, किल्ल्याचं पावित्र्य भंग होतं' सारख्या सुरात सुनावलं.)

आपण बसून 5 मिनिटात 5 चमचे भोपळा भाजी खाल्ल्याने फायर ड्रिल च्या गांभीर्यात अडथळा कसा येतो हे मांजरीला अजूनही कळेना.हे लोक दरवर्षी येतात, लोकांना तितक्याच गंभीरपणे भाषण देतात, मणभर पाणी वापरून काटक्याना लावलेली आग विझवून दाखवतात.आणि दर वर्षी लोक जिना कुठेय ते विसरतात.

आता चालत चालत भोपळा खाण्याशिवाय पर्याय नाही.टीम मधला मुलगा 'हमारे नॉर्थ मे' च्या गुजगोष्टी करायला एका फ्रेशर मुलीबरोबर सटकला.

4 नंबर कँटीन मध्ये इतर मांजरी कॅडबी चा चॉकलेट मिल्कशेक पित बसल्या होत्या.फायर ड्रिल संध्याकाळी झालं असतं तर ते झाल्यावर लगेच घरी जाता आलं असतं.आता फायर ड्रिल झाल्यावर परत जाऊन उशिरा पर्यंत काम करावं लागणार.अश्या तीव्र दुःखावर चॉकलेट हे एकमेव सोल्युशन असतं.हळूहळू आपल्याला ऑफर मिळाली नाही याचं दुःख मांजरीवर नव्याने पसरायला लागलं आणि तिने थिक डार्क चॉकलेट कॅडबी विकत घेतलं.पलीकडे लक्ष गेलं तर विश्वंभर भाटवडेकर मित्रांबरोबर आईस्क्रीम खात बसला होता.मनात 'ग्रीन टी, होय रे चोरा' म्हणून मांजरीने खुनशी हास्य केलं.

निम्मी आकाशाकडे बघत आईस्क्रीम वरचं चॉको सिरप खात होती.
"काय गं, काय झालं?"
"मायकेल वेडा आहे."
"त्याला असं नसतं हँडल करायचं.नेटवर्क मध्ये डिसरप्शन आहे असं सांगून हळूहळू हेडफोन वर घासून कागदाचा खरखर आवाज करत बाहेर सटकायचं."
तितक्यात मांजरीचा फुटका फोन वाजला.साहेबांनी सर्वाना व्हॉटसॅप ग्रुपवर फायर ड्रिल ला लवकर बाहेर न निघाल्याबद्दल झापलं होतं.
"काय गं फोन कसा फुटला?"
"कव्हर लावून चार्ज करत होते तर होत नव्हता.म्हणून कव्हर काढून पॉवर बँक लावली होती तर बागेत चालताना दगडावर उलटा पडला."
"बापरे!!"
"तो रिपेअर केला गं.पुढे ऐक.1500 देऊन रिपेअर केला तर नवऱ्याबरोबर बाईकवरून जाताना स्पीड ब्रेकर वर उपडा पडला आणि त्याच्यावरून सायकल गेली."
"पण मग कशाला वापरतेस?तो दुसरा चांगला फोन आहे ना?"
"चांगला फोन फोन कॉल्स ना.आणि फुटका फोन डिजिटल डीटॉक्स ला."
"उपासाला चालतं कॅडबी?"
"सासूबाईनी सांगितलं बाहेरचं मीठ खायचं नाही उपासाला.ते खरकटं असतं.अजून बाहेरची साखर किंवा बाहेरचं चॉकलेट याबद्दल कोणी काही सांगीतलं नाहीये."

सर्व मांजरी आपली दुःखं कॅडबीत बुडवून परत नव्याने काम करायला निघाल्या.पुढच्या वेळी 2-3 तासाचं फायर ड्रिल असावं असं मनात प्रत्येकाला वाटत राहिलं.

(समाप्त)

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सोहा तुमचे बरोबर आहे.
पूर्वी मी एका कंपनीत सर्व्हिस सेंटर इनचार्ज होतो. तिथे काही ज्वालाग्राही रसायनांचा वापरही व्हायचा. इमर्जन्सी एक्झिट मार्ग व्यवस्थित नव्हताच आणि वरून त्या दाराला कुलुप ठोकले असायचे. मी व्यवस्थापनाशी मागे लागून, भांडुन योग्य जागी आणखी एक इमर्जन्सी एक्झिट करुन घेतले, आधीचेही कार्यरत करून घेतले. इमर्जन्सी एक्झिट दारांंना आतुन कुलूप न लावता येणारे, सहज उघडता येणारे बोल्ट, बाहेर काहीच नाही असे असावे.

लोकांनी या बाबी गांभीर्याने घ्यायला हव्यात आणि आपल्या व्यवस्थापनाचा पिच्छा पुरवायला हवा / योग्य तिथे तक्रारी करायला हव्यात. आपल्याकडे कुठे पाळतात हे, असे म्हणुन दुर्लक्ष करू नये.

हॉटेल्समध्ये खूप वास्तव्य असल्याने माझे भूकम्प आणि आणि आगीचे अनुभव हॉटेल मधलेच आहेत. पहिला भूकम्प अनुभवला तेव्हा पासून इमर्जन्सी एक्झिट व्यवस्थित असलेल्या हॉटेल्समध्येच उतरतो. रूमच्या दारामागे इमर्जन्सी एक्झिट मार्ग दर्शवणारा नकाशा लावला असतो. तो प्रत्यक्ष बघुन खात्री करून घ्यावी. याचा 2001 गुजरात भूकंपावेळी फायदा झाला. भूकम्प थांबायच्या आत म्हणजे एक मिनिटाच्या आत हॉटेलच्या बाहेर होतो, चौथ्या मजल्यावरून.
बहुतेक जण दोन मिनिटात बाहेर होते - पाच मजलीच हॉटेल होते. आमच्या हॉटेलला काही झाले नाही, थोड्या क्रॅक्स गेल्या पण एक इमारत भूकंप झाल्यावर तीन चार मिनिटांनी कोसळली. ऑफिस होते ते, २६ जानेवारी सुटी असल्याने रिकामी होती.

लोकांनी या बाबी गांभीर्याने घ्यायला हव्यात आणि आपल्या व्यवस्थापनाचा पिच्छा पुरवायला हवा >>

"चलता है" हे ब्रीदवाक्य असणाऱ्या आणि अखंड जुगाड करणाऱ्या लोकांकडून फारच अपेक्षा बुवा तुमच्या.

Pages