Unsafe Roads : महाराष्ट्र

Submitted by जिन्क्स on 4 January, 2021 - 04:42

काही दिवसांपूर्वी काही कामा निमित्त रात्री एकटाच कार ने पुण्याहून सोलापूर कडे निघालो होतो. सोलापूर हायवे एकंदरीत पुण्यावरून निघणाऱ्या इतर महामार्गाच्या मनाने सूनसानच. त्यात पाटस गावाच्या पुढे तुरळक ट्रक ट्रॅफिक वगळता इतर वाहने फारच कमी. रात्री 11:30 च्या आसपास मळद गाव ओलांडल्यावर एका वळणाजवळ गाडी आली असता अचानक डाव्या बाजूने झाडीतून तूफान दगडफेक सुरू झाली. त्यातला एक दगड हेडलँपवर बसला आणि दुसरा बोनेटवर आदळला. दुसऱ्या दगडाच्या आघातामुळे गाडी डावीकडे रस्त्याच्या खाली उतरली. आरश्यातून मागे पाहिले असता 4-5 जण झाडीतून रस्त्यावर येताना दिसले. गाडी तशीच गेर मध्ये टाकून लगेच रस्त्यावर लागून भरधाव पळवली. पुढे रावणगाव पोलीस चौकीत जाऊन रीतसर FIR वगैरे नोंदवली. पोलिसांनी सहकार्य करत एक हायवे पेट्रोलिंग पार्टि प्रसंग घडला त्या दिशेला रवाना केली आणि मला पुढच्या मोठ्या गावापर्यंत एसकोर्ट केले.
पुणे सोलापूर हा प्रवास मी गेली अनेक वर्षे करत आलो आहे. दिवसाच्या वेगवेगळ्या प्रहरी कधी एकट्याने कधी कुटुंबासोबत तर कधी मित्रांसोबत अनेक वेळा केलेला आहे.असा प्रसंग घडल्याचे कधी ऐकवीत नव्हते. माझे अनेक मित्र हा प्रवास रात्री कुटुंबासोबत स्वतःच्या गाडीने करतात. त्या सर्वांना धोक्याची कल्पना दिली आहेच.
तर ह्या धाग्याचे प्रयोजन असे आहे की, तुमच्या बाबतीत कधी असा प्रसंग घडला आहे का? घडला असल्यास कोणत्या रस्त्यावर? ह्या धाग्यामुळे जे रस्ते कुटुंबासोबत प्रवास करण्यास ( कोणत्याही कारणाणे) धोकादायक आहेत त्याची सूची बनवता येईल. देशात काही ठिकाणी पोलीस अशा रस्त्यांवर गाड्यांचा ताफा बनवून पुढे पाठवतात. सुदैवाने महाराष्ट्रात असे कुठे दिसले नाही.
काही ऐकीव माहितीच्या आधारे आणि वर्तमानपत्रातून छापून आलेल्या बातम्यांच्या आधारे खाली यादी देत आहे,
1. बापदेव घाट - रात्री प्रवास करणाऱ्यांची लुटालूट.
2. खोपोली - मुरबाड रस्ता : पूर्वी एक्स्प्रेस वे वर लुटणारी टोळी कार्यरत होती तीच टोळी ह्या रस्त्यावर पण लुटालूट करत असत.
3. पंढरपूर - अहमदनगर रस्ता : ट्रक लुटणारी टोळी गेली अनेक वर्षे कार्यरत. स्थानिक बातम्या वाचल्यास कल्पना येईल.
4. घोटी - सिन्नर : अंडी काचेवर फेकून लुटणारी टोळी.
5. वरंद घाट: लुटालूट नाही पण हा रस्ता प्रचंड निर्मनुष्य आहे. देवघर धरणाच्या कडेकडेने जाणारा हा रस्ता संपतासंपत नाही. काही कारणाने तुम्ही इथे अडकलात तर मदत मिळण्याची शक्यता फार कमी आहे.
6. महाराष्ट्र -कर्नाटक - तेलंगणा ह्या राज्याच्या सीमेवरच्या हायवे सोडून आतमधल्या गावामध्ये रात्रीची बऱ्याच वेळेला तस्करी, चोरटी माल वाहतुक चालते. लुटालूट नसली तरी इथे पोलीस तुम्हाला अडवून मनसोक्त विचारपूस करू शकतात.
7. केळघर घाट : महाबळेश्वर वरून साताऱ्यात उतरणारा हा घाट पूर्वी फारच कुप्रसिद्ध होता.
8. बागलाण : ह्या प्रांतात रात्रीच्या वेळी फिरणाऱ्या वाहनांकडे स्थानिक लोक बऱ्याच वेळेला संशयाने पाहतात. त्यात त्या भागात जर एखादी अफवा ( मुले पालवणारी टोळी इ. ) पसरली असेल तर बाका प्रसंग उद्भवु शकतो.
9. कन्नड घाट: अवघड वळणांमुळे धीम्या झालेल्या ट्रक्स , मागच्या मागे माल पळवून नेणाऱ्या टोळ्या.

तुमचेही असे काही अनुभव असल्यास किंवा काही माहिती असल्यास भर घालावी.
अजून माहिती साठी ही दुवा
https://www.team-bhp.com/forum/route-travel-queries/32480-unsafe-roads.html

Group content visibility: 
Use group defaults

अनुभव थरारक!

माहितीपूर्ण धागा आहे. महाबळेश्वरला जाणारे सगळेच घाट पावसाळ्यात व रात्री बेरात्री जाण्यासाठी सुरक्षित वाटत नाहीत.
१. वरंध घाट (शिरवळ-महाड रस्ता)
२, पोलादपूर आंबेनळी घाट (महाड-महाबळेश्वर रस्ता)
३. पसरणी घाट (वाई-महाबळेश्वर रस्ता)

बाप रे!
सुखरूप बाहेर पडलात ते वाचून बरे वाटले.
आम्ही कारने नेहमी प्रवास करतो..पहाटे प्रवास सुरू करून हाय वे ने जाणे प्रीफर करतो.

भयानक अनुभव !

बापदेव घाट >>> कात्रज वरून सासवडला जाताना लागतो तो का??
तो बोपदेव घाट

आताशा रहदारी फार वाढलीये त्या रस्त्याने, तेव्हा तसा धोका नसावा

मुंबीतुन दापोली कडे जातानाचा, टोळफाट्याहुन मंडणकड मार्गे जाणारा रस्ता बराच भयाण आणि रिस्की आहे, रस्ता क्वालिटी बेकार, घाटात सुरक्षा कठडे नाहीत .

भयानक अनुभव.

मला स्वतःला अनुभूव नाही आला पण >२० वर्षांंपासून पुणे सोलापूर मार्गावर अशा घटना घडल्याचे ऐकून आहे.
एकदा आईबाबा पुण्याहून हैद्राबादला ट्रेनने येत असताना दौंड सोलापूर दरम्यान ट्रेन अडवून दरोडा घालण्याचा प्रयत्न. ट्रेन सिग्नल फोडून ट्रेन थांबवली आणि डब्यात प्रवेश मिळवण्याचा प्रयत्न सगळी दारं ठोठावत होते आणि खिडकीतून दगडं रॉड्स मारत होते, सगळ्यानी खिडक्या बंद केल्या. ड्रायव्हर्सना मारहाण केली.

एकदा एक कलीग बसने मुंबईहून हैद्राबादला परतत होता दौंड सोलापूर दरम्यान बस वर सशस्त्र दरोडा पडला. सगळ्यांच्या लहान बॅग्स, खिशातील सर्व काही आणि पाकीट पर्स पोत्यात भरून निघून गेले.
त्यांच्यातला एक माणुस पुण्याहून तिकिट काढून बस मध्ये बसला होता आणि अचानक तब्येत बिघडली, उलटी करण्याचे नाटक करून बस थांबवली होती.

आम्ही लातूरला व्हाया सोलापूर गेलो होतो. असल्या लूटमारी बद्दल ऐकुन होतो. पण scorpio गाडीत ५ जण हट्टे कट्टे (मी सोडून) असल्याणे गाडीत ३-४ rod टाकून घेतले होते. आलेच अंगावर तर शिंगावर घ्यायचा बेत होता. पण नशीबाने तशी वेळ आली नाही Happy

खूप भीतीदायक अनुभव आहे तुमचा.

मुंबई - अहमदाबाद महामार्गावर रात्रीचा प्रवास जरा भितीदायक वाटतो विशेषतः वसईच्या पुढे. आम्ही नेहमी त्या मार्गाने प्रवास करतो पण तसा काही विशेष वाईट अनुभव आला नाही. पण रात्रीच्या वेळी प्रवास करताना भीती वाटतेच.

महाराष्ट्राबाहेर वडिलांना १९९५ साली दिल्लीच्या प्रवासात भीतीदायक अनुभव आला होता. त्यावेळी दिल्लीला प्रगती मैदानावर पूर्ण भारतातील शेतकऱ्यांचा मेळावा आणि शेती उत्पादनाचे प्रदर्शन भरवले गेले होते. महाराष्ट्रातून तसेच आमच्या गावातून काही शेतकरी त्या मेळाव्याला गेले होते. प्रदर्शन आटोपल्यानंतर हषीकेश, हरिद्वारला व इतर काही ठिकाणी बाबांचा पुढचा मुक्काम होता. एके रात्री हरिद्वारला जात असताना एका रस्त्यावर त्यांची बस अचानक थांबविली गेली. तोंडाला कापड बांधलेले दरोडेखोर बसमध्ये घुसले. सगळेजण झोपेत होते. अचानक गोंगाट झाल्याने सगळे जागे झाले. दरोडेखोरांना पाहून सगळे घाबरले कारण प्रसंग गंभीर होता. पण बस ड्रायव्हर आणि क्लिनर हुशार होते. त्यांनी प्रसंगाचे गांभिर्य ओळखलं. त्यांनी त्या दरोडेखोरांना सांगितले की, हे शेतकरी आहेत. दिल्लीला शेतकरी मेळाव्याला आले आहेत. त्यांच्याजवळ तुम्हांला काही मौल्यवान वस्तू सापडणार नाहीत आणि आश्चर्य म्हणजे... " चलो.. जाने दो... किसान लोग है ना? जाओ!! असं म्हणतं त्यांनी बस न लुटता पुढे जाऊ दिली. किती दयाळू दरोडेखोर!! जेव्हा बाबांनी हा प्रसंग परत आल्यावर सांगितला होता तेव्हा त्या प्रसंगाचे एवढं गांभीर्य वाटलं नव्हतं. पण आज जेव्हा मी विचार करते तेव्हा जाणवतं की, त्यांच्यावर गुदरलेला प्रसंग खरचं भीतीदायक होता.

अरे बापरे! भयानक अनुभव आला तुम्हाला. बरं झालं धीराने गाडी पुढे चालवत राहिलात ते! >>> अगदी अगदी.

बाकीच्यांचे अनुभव पण फार भयानक.

>> त्यांच्यातला एक माणुस पुण्याहून तिकिट काढून बस मध्ये बसला होता आणि अचानक तब्येत बिघडली, उलटी करण्याचे नाटक करून बस थांबवली होती.

काही वर्षांपूर्वी मी हैदराबादहून पुण्याला खाजगी बसने येत होतो. मध्यरात्री अचानक पोटात ढवळून अस्वस्थ वाटायला लागल्याने ड्रायव्हरला गाडी थांबवायची विनंती केली. तेंव्हा त्याने ऐकून न ऐकल्यासारखे केले आणि बराच वेळ बस थांबवलीच नाही. न राहवून मी पुन्हा विचारताच म्हणाला, "अशी मध्येच कुठेही थांबवता येत नाही. गाड्या लुटतात. योग्य जागा बघून थांबावे लागते" असे म्हणून दहा एक मिनिटांनी थांबवली. आता हे वाचल्यानंतर त्यामागचे कारण कळले. ड्रायव्हर लोकांना सूचना असाव्यात. रात्री बेरात्री बसमधल्या कुणीही गाडी थांबवायला सांगितली कि लगेच त्या ठिकाणी थांबवायची नाही. मी काय किंवा कुणीही काय गाडी लुटणाऱ्या टोळीतला माणुस असू शकतो ना? Happy हो, पण हैदराबादला जाणेयेणे होते तेंव्हा ह्याच रस्त्यावर काहीतरी निमित्ताने गाडी अडवून स्थानिक गुंडांनी खाजगी बसचालकांशी अरेरावी शिवीगाळीची भाषा करत भांडणे करण्याच्या घटना मात्र घडायच्या.

घोटी - सिन्नर : अंडी काचेवर फेकून लुटणारी टोळी.... गेल्या ७-८ वर्षात या रस्त्यावर राञी अपराञी प्रवास केला आहे आणि अजुनही करतो पण असं काही आढळून आले नाही. आता रस्ता पण चांगला आणि राञभर रहदारी चालु असते.
२०१० च्या आधी मी पण खुप ऐकुन होतो. याच रस्त्यावरील पांढुर्ली घाटात अशा घटना घडत.
अहमदनगर - जामखेड - भुम - तुळजापुर रस्त्यावर पण अशा घटना घडत असं ऐकलं आहे.
पंढरपूर - अहमदनगर रस्ता : ट्रक लुटणारी टोळी गेली अनेक वर्षे कार्यरत. स्थानिक बातम्या वाचल्यास कल्पना येईल.... गेल्या आठवड्यात नवीन वर्ष म्हणून याच रस्त्याने पंढरपूरला जाऊन आलो.

तुळजापुर, पंढरपूर, कोल्हापूर, पुणे, कोकण अशा बर्याच ठिकाणी मी राञी प्रवास केला आहे. वर उल्लेख केलेल्या मार्गांनी. पण नशिबाने असं काही आढळून आले नाही. कदाचित आता रस्ते मोठे झाले आहेत. रहदारी पण वाढली आहे.