ऑथेल्लो ते ज्युलिअस सीझर- अमेरिकन शेक्सपिअर

Submitted by सनव on 2 January, 2021 - 18:08

Shakespeare in a Divided America- James Shapiro

2020 च्या उल्लेखनीय पुस्तकांच्या एका यादीमध्ये हे पुस्तक सापडलं होतं. लेखक शेक्सपिअरचे अभ्यासक आहेत.

इंग्लडच्या या विख्यात नाटककाराच्या लेखनाचा The New World अर्थात अमेरिकेवरील प्रभाव असा विषय घेऊन रंजक मांडणी केली आहे. अमेरिकन इतिहासातील काही निवडक राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक स्थित्यंतरे, महत्वाच्या घटना व त्यावर विल्यम शेक्सपिअरचा असलेला प्रभाव, शेक्सपिअरकडे बघण्याच्या अमेरिकन दृष्टिकोनात होत गेलेले बदल असा पुस्तकाचा आवाका आहे. अमेरिकन इतिहास व शेक्सपिअर हे दोन्ही जर आवडीचे विषय असतील आणि अर्थात रंगभूमीवर प्रेम असेल तर हे पुस्तक वाचायला आवडेल.

Othello, Hamlet, Macbeth, Julius Caesar, The Tempest, Romeo and Juliet, The Merchant of Venice, The Taming of The Shrew आणि इतर काही शेक्सपिअरच्या नाटकांचा पुस्तकात सखोल आढावा घेतला आहे. लेखक शेक्सपिअरचा अभ्यासक असल्यामुळे सर्व नाटकांच्या बद्दल एक वेगळा दृष्टिकोन मिळतो. लिखाण दुर्बोध होत नाही किंवा कंटाळा येत नाही. उलट रंगभूमीच्या आसपास वावरण्याचा आनंद मिळतो.

The Bard of England म्हणून प्रसिद्ध असलेला हा नाटककार महान होताच यात शंका नाही.पण शेवटी तोही त्याच्या काळाचं एक product होता. त्यामुळे त्याचे विचार काही वेळा आजच्या तुलनेत बुरसटलेले वाटतात. त्यानुसार लेखकाने शेक्सपिअरच्या नाटकांवर टीकाही केली आहे आणि त्याची कारणंही दिली आहेत.
शेक्सपिअरच्या नाटकांचे विनोदी, शोकांतिका आणि ऐतिहासिक असे साधारण तीन गट केले जातात. या प्रत्येक गटाची वैशिष्ट्ये , साचा, मर्यादा आणि सौंदर्यस्थळे यांचा विचार करायला पुस्तकातून दिशा मिळते.

यादवी युद्धाच्या आधीच्या काळातले Othello चे प्रयोग, अब्राहम लिंकनचं आवडतं Macbeth, The Tempest आणि वंशवाद, दुसऱ्या महायुद्धानंतरच्या काळात स्त्रियांनी घराबाहेर पडून अर्थार्जन करायला सुरुवात केल्यामुळे कुटूंबव्यवस्थेत झालेले बदल, 60 च्या दशकातील मुक्तपणा आणि LGBTQ व्यक्तींची हक्कांसाठी चळवळ, 1998 चा ऑस्कर पुरस्कारप्राप्त हॉलिवूड चित्रपट 'शेक्सपिअर इन लव्ह' ते 2016 ची थरारक(!) निवडणूक असा 200 वर्षांचा कालखंड पुस्तकात रेखाटला आहे. अमेरिकेतील परंपरावाद आणि पुरोगामीत्व यांच्यातील वाद व स्पर्धा 200 हून अधिक वर्षे जुनी असून दोन्हीवर शेक्सपिअरचा प्रभाव आहे. (म्हणूनच Shakespeare in a divided america हे शीर्षक समर्पक ठरतं.)

पुस्तकाबद्दलची माझी तक्रार फक्त 'अजून जास्त वाचायला आवडलं असतं' इतकीच आहे. Romeo and Juliet वरून अमेरिकेत Westside Story बनवलं- त्याबद्दल अधिक तपशील चालले असते. 60s च्या दशकाबद्दल एखादं प्रकरण आवडलं असतं. शेक्सपिअरचं इतर साहित्य(sonnets , poems) याबद्दल विवेचन हवं होतं.

शेक्सपिअरचा कालखंड 1564 ते 1616. इंग्लंडची राणी एलिझाबेथ (पहिली) हिचा तो समकालीन होता. याच काळात 31 डिसेंबर 1600 रोजी ईस्ट इंडिया कंपनी या बहुराष्ट्रीय कंपनीची स्थापना लंडनमध्ये झाली आणि तत्क्षणी भारताचं व भारतीयांचं भविष्य बदललं. इंग्रज साम्राज्य पसरत गेलं तसा शेक्सपिअरही जगभरातील लोकांना माहित होत गेला. इंग्रजांचा हा साहित्यिक वारसा त्यांनी जपला व म्हणून तो जगभर विख्यात झाला.
त्या तुलनेत आपल्याकडील संस्कृत नाटकं व नाटककार यांच्याबद्दल आपल्याला फारशी माहिती नसते. हा फरक पुस्तक वाचताना जाणवून गेला. त्याचवेळी नाटकवेड्या मराठी माणसांनी शेक्सपिअरसहीत जगभरातील नाटकांवर प्रेम करताना आपला स्वतःचा मराठी मातीतील वारसा रुजवला आणि जतन केला आहे याचाही अभिमान वाटतो.
नवीन वर्षी जगभरातील स्थिती पूर्ववत होऊन रंगभूमीवरील प्रयोग पाहण्याचा योग यावा हीच नटेश्वरचरणी प्रार्थना.

Group content visibility: 
Public - accessible to all site users