"शकुंतला देवी" चित्रपटाबद्दल...

Submitted by निमिष_सोनार on 23 December, 2020 - 08:36

आज (दि. 14 ऑगस्ट 2020) "शकुंतला देवी" हा अतिशय छान चित्रपट पहिला. गिनीज बुक ऑफ वर्ड रेकॉर्ड्स मध्ये शकुंतला देवींची नोंद आहे आणि त्यांना ह्यूमन कॉम्प्युटर म्हणून ओळखले जायचे. (मृत्यू: 2013).

शकुंतला देवींचे कठीण गणिती आकडेमोड सोपे करून सांगणारी आणि सुपर मेमरी संदर्भातली पुस्तके मी लहानपणी वाचली होती पण त्यांचे आयुष्य खूपच वादळी आणि गुंतागुंतीचे होते हे चित्रपट बघितल्यावर कळते.

कॉम्प्युटर्सच्या वेगाने गणितातील कठीण कोडी त्यांनी विनासायास सोडवली हे बघून अतिशय आश्चर्य वाटत राहते. संपूर्ण चित्रपटात ही आकडेमोड त्या कॉम्प्युटर्सच्या वेगाने कशा काय करतात याचे स्पष्टीकरण नाही कारण त्यांना स्वतःलाही त्याचे कारण नीटसे माहीत नव्हते. त्यांच्याजवळ सोप्या युक्त्या होत्या हे जरी मानले तरीही असेच वाटत राहाते की त्यांना ही मिळालेली दैवी देणगीच होती! कारण युक्ती वापरली तरी आकडेमोड करायला थोडातरी वेळ लागतोच तो त्यांना अजिबातच लागत नव्हता!

चित्रपटात आणखी एक गोष्ट कळते की शकुंतला देवी ह्या कधी शाळेत गेल्याच नाहीत. तरीही त्या गणितात सुपर जिनियस होत्या. जगभर वेगवेगळ्या देशांत जाऊन त्यांनी अनेक स्टेज शो घेतले आणि कठीणातील कठीण गणित चुटकीसरशी (अक्षरशः) सोडवून वाहवा आणि टाळ्या मिळवल्या.

त्या मिश्किल स्वभावाच्या होत्या असे चित्रपटात दाखवले आहे आणि विद्या बालनने ते अतिशय चांगल्या रीतीने पडद्यावर साकारले आहे.
पन्नास अंकी किंवा जास्त संख्येचे घनमुळ तोंडी अर्ध्या मिनिटाच्या आत त्या सोडवत असत पण त्यांच्या स्वतःच्या खासगी जीवनातील त्यांचे आई, वडील, पती, मुलगी, जावई यांच्याशी जीवनाच्या विविध टप्प्यावर असलेले नातेसंबंध मात्र खूप मोठे कठीण कोडे होते जे त्यांना सोडवणे जमलेच नाही आणि सोडवायला जातांना त्या ते आणखी कठीण करून ठेवत असत. याला त्यांच्या बालपणात घडलेल्या काही घटना कारणीभूत होत्या. पण त्याच चुका त्या स्वतःच्या मुलीसोबत करायला लागतात, तेव्हा त्यांच्याबद्दल सहानुभूती रहात नाही. एके क्षणी तर शकुंतला देवी खलनायिका (किंवा आजच्या फॅशननुसार "ग्रे शेड्स" म्हणूया!) वाटायला लागतात कारण त्यांनी जीवनात घेतलेले अनेक निर्णय खूप विचित्र, टोकाचे आणि भावनेच्या भरात घेतले होते जे आपल्या मनाला पटत नाहीत.

त्यांचे पती परितोष यांच्या तोंडी त्यांच्या मुलीशी बोलतांना एक संवाद आहे: "तुझी आई एक झंझावात आहे, वादळ आहे. तिच्या मार्गातून मी पूर्ण दूर होऊन आणि तिला तिच्या मनाप्रमाणे वागू देऊनच मी तिच्यावरचे प्रेम सिद्ध करू शकतो!" या चित्रपटात इतरही अनेक सुंदर डायलॉग्ज आहेत.
विद्या बालनने अभिनयाची कमाल केलेली आहे. तिला याआधी पण बायोपिकचा अनुभव आहे (डर्टी पिक्चर मधली सिल्क स्मिता). एरवी पण तिच्या अभिनयाबद्दल वादच नाही, ती उत्कृष्ट अभिनेत्री आहे. शकुंतला देवीची भूमिका तीने आपल्या उत्स्फूर्त अभिनयाने जिवंत केली आहे. श्रीदेवी, माधुरी, काजोल, करिश्मा यासारख्या काही अभिनेत्री भूमिकेत शिरून संपूर्ण चित्रपट आपल्या खांद्यावर पेलण्यास समर्थ होत्या, त्यात आणखी नव्या पिढीतील नावे आपण जोडू शकतो जसे विद्या बालन नंतर मग दीपिका, प्रियांका, करीना वगैरे.

या चित्रपटात परितोष (पती), अनु (मुलगी), अजय (जावई), जेवीयर (स्पेनचा मित्र) या पात्रांची भूमिका करणाऱ्या कलाकारांनी पण उत्तम अभिनय केला आहे.

हा चित्रपट बघण्यासाठी तुम्ही अजिबात गणितज्ञ असण्याची गरज नाही कारण हा मानवी नातेसंबंधांवर सखोल भाष्य करणारा एक सुंदर चित्रपट आहे. तुम्हाला गणितातील काहीच कळत नसले तरीही हरकत नाही कारण त्यामुळे चित्रपट बघण्यास आणि समजण्यास काहीही अडचण येत नाही.

(या चित्रपटाच्या निमित्ताने मी मागच्या वर्षी बघितलेला काजोलचा "हेलिकॉप्टर ईला" हा चित्रपट प्रकर्षाने आठवला, फार सुंदर चित्रपट नक्की बघा! मानवी नातेसंबंधावरचा छान चित्रपट आहे तो!)

- निमिष सोनार, पुणे
(दि. 14 ऑगस्ट 2020)

Group content visibility: 
Public - accessible to all site users