शताब्दीचा प्रवास (भाग-१)

Submitted by पराग१२२६३ on 19 December, 2020 - 12:52

पहिल्या भागाची लिंक
https://www.maayboli.com/node/73907

आता बाहेरचं धुकं थोडं कमी झालं होतं. बोरिबेल ओलांडत असताना हैदराबादहून आलेली आणि मुंबईकडे निघालेली एक्सप्रेस शेजारच्या अप लाईनवरून धडाडत दौंड जंक्शनच्या दिशेने गेली. दौंडच्या पुढे भिगवणपर्यंत मार्गाचे दुहेरीकरण आणि विद्युतीकरण पूर्वीच झालेलं असलं तरी भिगवणपर्यंत विजेची इंजिनं अजून फारशी जात नाहीत. त्यामुळं हैदराबादहून आलेल्या 17032 एक्सप्रेसचं सारथ्यही डब्ल्यूडीपी-4डी या भारदस्त अश्वाकडेच होते. तिच्या मागोमागच अवघ्या 5 मिनिटांच्या अंतरानं मालठणच्या बाहेर 22 डब्यांची 22601 चेन्नई सेंट्रल साईनगर शिर्डी एक्सप्रेसही डब्ल्यूडीएम-3डी च्या साथीनं दौंडकडे निघून गेली. बरोबर सव्वासातला मालठणमध्ये शिरल्याबरोबर माझ्या बाजूला एक बॉक्सएन वाघिण्यांची मालगाडी उभी असलेली दिसली. ती कुर्डुवाडी, सोलापूरकडे जाणारी होती. मात्र शताब्दीला मार्गावर प्राधान्य देण्यासाठी तिला लूप लाईनवर नेऊन थांबवले होते. दोन डब्ल्यूडीजी-4 अश्वांसह निमूटपणे उभ्या असलेल्या त्या मालगाडीचे गार्ड आणि लोको पायलट शताब्दीकडे पाहत होते.

दरम्यान, सकाळचा चहा येऊन गेला होता आणि नाश्ता यायला अजून थोडा वेळ लागणार होता. त्यामुळे गाडीत काहींच्या सहप्रवाशांबरोबर गप्पा चालू होत्या, काहींचे वर्तमानपत्राचे वाचन सुरू होते, तर काहींची डुलकी सुरू होती, तर काहींचे मोबाईलमध्ये डोळे घालून काही पाहणे सुरू होते. पुढे भिगवणमध्ये आत जाताना शताब्दी थोडी हळू धावू लागली. भिगवणनंतर पुढे अजून दुहेरी मार्ग सुरू झालेला नसल्यामुळे इथे नेहमीच डाऊन दिशेला जाताना गाडीचा वेग मंदावत असतो. त्यामुळे मला वाटलं की, हळूच गाडी पुढे जाईल आता, पण तितक्यात वेग आणखी कमी झाला आणि गाडी 3 मिनिटं भिगवणमध्ये फलाटावर विसावली. गाडी थांबल्यामुळे पेंगुळलेले प्रवासी जरा जागे झाले होते. आमच्या शेजारच्या मेन डाऊन मार्गावर एकट्या डब्ल्यूडीजी-4 अश्वासह टँकरची मालगाडी उभी होती. ती कुर्डुवाडीच्या दिशेने निघालेली होती आणि तिला शताब्दीसाठी रोखून धरण्यात आले होते. पलीकडच्या मार्गावर सोलापूर विभागाला देण्यात आलेल्या नव्या एलएचबी डब्यांचा एक मोकळा रेक उभा होता.

आता एकेरी मार्ग सुरू असल्यामुळे दोन स्थानकांच्या मधल्या मार्गावर गाड्या आळीपाळीने सोडण्यात येऊ लागल्या होत्या. जिंती रोडमध्ये शताब्दीला मार्ग उपलब्ध करून देण्यासाठी रोखून धरलेली सीएसएमटी चेन्नई सेंट्रल मेल दिसलीच माझ्या बाजूच्या खिडकीतून. इथून पुढे विद्युतीकरणाच्या कामाची सुरुवात झालेली दिसली, मात्र दुहेरीकरणाचे काम संथगतीने सुरू असल्याचे लक्षात आले. जिंती रोडनंतर तर काहीच दिसले नाही. पलीकडच्या खिडकीतून दिसणाऱ्या उजनीच्या बॅक वॉटरचे दृश्य पाहण्यात तिकडे बसलेले प्रवासी मग्न होते. 7.39 ला पारेवाडी ओलांडले. तिथे कंटेनर घेऊन हैदराबादकडे निघालेल्या मालगाडीला शताब्दीसाठी बाजूला काढण्यात आले होते. 2 शक्ती अश्वांसह ती गाडी शताब्दी पुढे जाण्याची आणि आपला स्टार्टर सिग्नल ऑफ होण्याची आतुरतेने वाटतच पाहत उभी असावी. पारेवाडीनंतर दुहेरीकरणासाठी आखणी करून ठेवलेली होती. शताब्दी आता पुन्हा वेगाने धावू लागली होती. पुढच्या वाशिंबे स्थानकातही कुर्डुवाडीच्या दिशेने निघालेली आणि शताब्दीच्या वाटेत येणारी सिमेंटवाहू मालगाडी 2 डब्ल्यूडीजी-4 अश्वांसह बाजूच्या लाईनवर नेऊन उभी करण्यात आली होती. दौंडपासून पुढे गाड्यांना मार्ग उपलब्ध करून देण्याचे, कोणती गाडी कुठे बाजूला ठेऊन कोणती गाडी पुढे न्यायची याचं नियोजन सोलापूर विभागातील ऑपरेटिंग विभागातील सेक्शन कंट्रोलरकडून होत होती. मध्ये मध्ये एकेरी मार्ग असल्यामुळे हे काम जरा जास्तच किचकट आणि जिकरीचं होत असतं.

आता शताब्दीचा वेग थोडा कमी झाला होता आणि इकडे गाडीत नाश्ता दिला जात होता. या गाडीत मिळणाऱ्या सेवेमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये बरीच सुधारणा बघायला मिळाली आहे. नाश्त्याच्या ट्रेमध्ये पोहे, ब्रेडचे दोन स्लाईस, बटर, सॉस आणि 5-स्टार चॉकलेट अशा गोष्टी होत्या. पुण्यात बसल्यापासून मास्क आणि हाजमोजे घालून बसलेल्या आणि मला काहीही नको म्हणणाऱ्या त्या प्रवाशानंही नाश्ता घेतला. इकडे माझे नाश्ता करता करताच खिडकीतून बाहेरच्या घडामोडींवर लक्ष ठेवणे सुरूच होते. 7.50 ला पोफळज ओलांडले आणि इथून पुढे विद्युतीकरणाच्या कामाची सुरुवात झालेली दिसली. देशातील चार महानगरांना जोडणाऱ्या मुख्य मार्गांचे विद्युतीकरण आणि दुहेरीकरणाचे काम पूर्ण झालेले असले तरी मुंबई-चेन्नई यातील एका महत्वाच्या मार्गाची ही दोन्ही कामे अनेक वर्षे रखडलेली होती. सध्या त्या कामांनी वेग घेतलेला असल्याने लवकरच भारतीय रेल्वेवरील डिझेल इंजिन जोडल्या जाणाऱ्या या एकुलत्या एक शताब्दीलाही विद्युत इंजिन जोडले जाताना पाहायला मिळेल याची खात्री विद्युतीकरणाचा वेग पाहून लक्षात आली.

मी नाश्ता करत असतानाच भालवणी ओलांडत असताना दौंडच्या दिशेने जाणारी विभागीय गाडी आमच्यासाठी रोखून धरलेली दिसली. इथून पुढे दुहेरी मार्ग सुरू झाला. तो वाहतुकीसाठी खुला झाल्यामुळे आता एका गाडीसाठी दुसरी गाडी रोखून धरण्याची इथून पुढे गरज नव्हती. आतापर्यंत कुर्डुवाडीपासून भालवणीपर्यंतचे दुहेरीकरण पूर्ण झाले होते. भालवणीतून बाहेर पडल्याबरोबर लगेचच नव्या कोऱ्या एलएचबी डब्यांची हुतात्मा एक्स्प्रेस दौंडच्या दिशेने गेली. तिला भालवणीच्या अप होम सिग्नलवर थांबवण्यात आले होते आणि शताब्दी बाहेर पडताच तिला आतमध्ये घेण्यात आले आणि मिनिटभराच्या विसाव्यानंतर तिला दौंडच्या दिशेने सोडले जाणार होते. कारण पुढे एकेरी मार्ग होता ना! आता हुतात्माला पुढे जाऊ देण्यासाठी भालवणीमध्ये रोखून धरलेली विभागीय गाडी अजून काही वेळ तिथेच थांबणार होती. कारण हुतात्माच्या पाठोपाठ कोईंबतूर लोटिट असते.

ही मध्य रेल्वेची एकुलती एक शताब्दी असल्यामुळे मध्य रेल्वे हिच्या देखभालीकडे विशेष लक्ष देत असल्याचे डब्यांच्या परिस्थितीवरून लक्षात आले. 8.04 वाजता केम ओलांडत असताना तिथे हुतात्माला पुढे सोडण्यासाठी रोखून ठेवलेली कोईंबतूर लोटिट एक्सप्रेस उभी होती. इकडे गाडीत प्रत्येकाचं आरामात नाश्ता करणं सुरू होतं. माझा नाश्ता मात्र संपला होता. घड्याळात 8.10 वाजले होते आणि शताब्दी ढवळस ओलांडत होती. तिथे 2 डब्ल्यूडीएम-3ए इंजिनांच्या मदतीने दौंडकडे जाणाऱ्या बीसीएन वाघिण्यांच्या मालगाडीला रोखले गेले होते. कुर्डुवाडी जंक्शन असले तरी दौंडप्रमाणेच पूर्ण वेगाने शताब्दी ते ओलांडत असते. अशा वेळी खिडकीतून बाहेर बघण्याची आणि फलाटावरचे प्रवासी अशा गाडीकडे डोळे विस्फारून पाहत असलेली बघण्याची आणि गाडीच्या चाकांच्या स्थानकात घुमणाऱ्या नादस्वरांचे गाडीत बसून रसग्रहण करण्याची मजा काही वेगळीच! कुर्डुवाडीतून बाहेर पडत असतानाच डब्ल्यूडीजी-4 इंजिनासह क्रांतिवीरा सांगोल्ली रायण्णा बेंगळुरूहून नवी दिल्लीकडे निघालेली कर्नाटक एक्सप्रेस कुर्डुवाडीत शिरत होती. इथून पुढे दुहेरी मार्ग सुरू झाला. आता नाश्त्यानंतरचा चहा दिला गेला. त्यासाठी कागदी कपातच गरम पाणी ओतून आणले होते, त्याचबरोबर चहाचे किटही दिले.

Group content visibility: 
Public - accessible to all site users