पाटील v/s पाटील - भाग २४

Submitted by अज्ञातवासी on 16 December, 2020 - 10:40

मागचा भाग - https://www.maayboli.com/node/77472

नवीन भाग पुढच्या बुधवारी रात्री ९ वाजता

अतिदक्षता विभागाबाहेर संपूर्ण पाटील परिवार चिंताक्रांत होऊन बसला होता.
"कृष्णा. "
"जी दादा!" कृष्णराव हडबडून म्हणाले.
"पोराला जर काही झालं ना, मी जीव घेईन सगळ्यांचा."
कृष्णराव काहीही बोलले नाही.
"जगन, वेंकट आणि श्रीया. तुम्ही तिघेही घरी जा. कीर्ती एकटी आहे. ओला..."
"नाही, मी नाही जाणार." ओलाने डोळे पुसले.
"असं करू नका. सगळ्यांनी थांबायची गरज नाही. प्लिज. हे हॉस्पिटल आहे."
"दादा, मी आणि ओला थांबतो ना.".कृष्णराव म्हणाले.
"मुलगा तुझा असला, तरी तो माझा जीव आहे. कळलं? मी नाही जाणार कुठे."
कुणी काहीही बोललं नाही. बराचवेळ शांतता पसरली.
"सर! मी काही बोलू का?" कृष्णरावांच्या कानावर आवाज पडला.
"व्यास! तुम्ही इथे?" ते आश्चर्याने उडालेच.
"हो सर, यावं लागलं. खरंच यावं लागलं. मोहन सरांना दिलेलं वचन पूर्ण करण्यासाठी. मी आज जे केलं, ते तुमच्या परवानगीविना केलं. माफ करा."
"व्यास, काय केलंत तुम्ही?" वसंतराव भांबावून म्हणाले.
"मी अंबा पाटीलला राधाबाईंना भेटवलं!"
"व्यास! मूर्ख!" वसंतराव कडाडले.
"हो सर, हा मूर्खपणाच आहे. पण, ज्या उद्देशासाठी मोहन सरांनी जीव पणाला लावला ना, त्याच्यापुढे हा मूर्खपणा काहीच नाही."
वसंतराव व्यासकडे बघतच राहिले.
"सर, आय थिंक मी आता निघाव. जर मला नोकरीवरून काढायचं असेल, तर आताच काढा. मी पाटील स्टीलच्या नावाने तिकीट बुक न करता पर्सनली करेन."
वसंतराव काहीही बोलले नाही.
"व्यास! प्रायवेट प्लेनने आला आहात, प्रायवेट प्लेननेच जा. कळलं?" कृष्णराव म्हणाले.
व्यासच्या चेहऱ्यावर हसू पसरलं.
"दादा, मी आईकडे जातोय. बघू तरी दे, दोघी बहिणी इतक्या वर्षानी भेटतायेत. काय होतंय ते."
कृष्णराव राधाबाईंच्या रूमकडे निघाले...
वसंतरावांनी त्यांना अडवलं नाही...
◆◆◆◆◆
डोळे मिटून राधाबाई पडल्या होत्या. मंद श्वास चालू होता.
अतिशय अशक्त अशा राधाबाईंना बघून अंबाला रडूच कोसळलं.
तिने स्वतःला आवरलं, व राधाबाईंजवळ आली.
"राधा!" तिने राधाबाईंच्या हातावर हात ठेवला.
राधाबाईंनी हळूहळू डोळे उघडले.
"आलीस?"
तो क्षीण आवाज ऐकून अंबेला रडूच कोसळलं.
राधाबाईंनी खोल श्वास घेतला.
,किती उशीर? कधीची वाट बघतेय तुझी. बहिणीला इतकी वाट बघायला लावू नकोस. वाट बघता बघता निघून गेले असते तर?"
"नको बोलू असं, राधी,मला माफ कर. मी चुकले, मला माफ कर. राधी तू शिक्षा दे ग मला, मला माफ कर."
अंबेचे अश्रू थांबत नव्हते. राधाबाई तिच्या हातावर हात फिरवत होत्या.
"शांत हो. शांत हो."
अंबा हळूहळू शांत झाली.
"अग, माफी तर मी मागायला हवी. इतके दिवस बहिणीचा राग ठेवला. अंबे, तुझ्याविना कोण रक्ताचं आहे ग मला? तुझ्या जन्मापासून मी तुझ्या सोबत होते, का नाही तुला माफ करू शकले? का नाही? पैसा इतका महत्वाचा होता?
लहानपणी माझ्यासाठी झाडावर चढून चिंचा तोडणारी अंबा आठवतेय आता. राधे तुला जड होईल म्हणून धुण्याचं सगळं ओझं डोक्यावर घेणारी अंबा आठवतेय मला. एकदा ताप उतरत नव्हता, तर तळपायाला रात्रभर कांदा चोळणारी अंबा आठवतेय मला. अंबे... इतकी वर्षे कसं विसरले ग मी तुला?"
राधाबाईंना धाप लागली. अंबेने घाईघाईने त्यांना पाणी पाजलं.
"कमी दिवस राहिलेत. सोबत राहा... रक्ताचं नातं आहे, मरणानेच तुटेल! सोबत रहा अंबे, सोबत राहा."
राधाबाईंचा आवाज क्षीण झाला.
"राधा... ये राधा... " अंबाचा श्वास अटकला...
"नाही गेलीये अजून. फक्त थोडा आराम हवा. तू सोबत राहा."
राधाबाईंनी अंबाचा हात पकडला व डोळे मिटले, अंबा त्यांच्याकडे बघतच राहिली.
काचेतून हे दृश्य बघणाऱ्या कृष्णरावाना अश्रू आवरत नव्हते...
...त्यांच्या मागे उभ्या असणाऱ्या वसंतरावांचीही हीच परिस्थिती होती...

क्रमशः

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान...!
पुढील भागाच्या प्रतिक्षेत

@गार्गी - धन्यवाद!
@मृणाली - धन्यवाद!
जोपर्यंत आठवण करून देणारी मंडळी आहेत, तोपर्यंत भाग येणारच वेळेवर Happy
@लावण्या - धन्यवाद

मस्त