कोथिंबिरीच्या वड्या

Submitted by सांज on 14 December, 2020 - 23:46

गॅस वर चहाचं आधण ठेऊन वसुधा ताईंनी कोथिंबिरीच्या जुडया निवडायला घेतल्या..

एरवी चार वेळा सांगूनही नेमकी कोथिंबीरच आणायला विसरणाऱ्या महेशरावांनी आज चक्क दोन जुड्या कोथिंबीर आणली होती आणि त्यामुळे वसुधा ताई सकाळी थोड्याशा वैतागल्याच होत्या. मनात म्हटलंही त्यांनी, इतकी वर्षं झाली आता तरी यांचा या बाबतीतला वेंधळेपणा काही कमी झालेला नाही!

तेवढ्यात, सोनाराने आपला एखादा नवीन घडवलेला सुरेख दागिना दाखवावा तशा उत्साहात त्या आणलेल्या कोथिंबिरीकडे बोट दाखवत महेशराव म्हणाले,
'पाहिलंस कशी ताजी लुसलुशीत कोथिंबीर आणलीय मी आज, तेही अगदी योग्य दरात! तू घालतेस तशी हुज्जत न घालता! नेहमी म्हणतेस नं कोथिंबीर विसरता म्हणून.. ही घे आज!'
त्यांच्या उत्साहाच्या फुग्यातील हवा क्षणार्धात काढून घेत वसुधा ताई म्हणाल्या,
'तुम्ही आज पण भाजीची यादी न्यायला विसरलात नं? आज कोथिंबीर आणू नका असं स्पष्ट लिहलं होतं त्यावर मी. दूधवाला आज सकाळी त्याच्या शेतातली ताजी कोथिंबीर देऊन गेलाय.. आता काय करु इतक्या साऱ्या कोथिंबीरीचं?’
आपण घातलेला गोंधळ लक्षात येऊन महेशराव म्हणाले,
'वड्या कर की. किती दिवसात केल्या नाहीस! तुझ्या हातच्या कोथिंबीर वड्या म्हणजे पर्वणीच की!’ कौतुकाच्या आडून बायकोचा राग शांतवण्याचा त्यांचा प्रयत्न चालू होता.
ते लक्षात येऊन ‘हो! माहितीय सगळं!’ अशा अर्थाचं मिश्कील हसू वसुधा ताईंच्या चेहऱ्यावर उमटलं. सगळ्या भाज्यांची वर्गवारी लावून त्या त्यांनी फ्रिजमध्ये जागच्या जागी ठेवून दिल्या. आणि कोथिंबीर मात्र ओल्या कपड्यात गुंडाळून ‘पाहू संध्याकाळी’ म्हणत तशीचं टेबलवर ठेवली.

गॅसवर मंद आचेवर चहा उकळत होता, त्याचा गोडसर सुवास स्वयंपाकघरात पसरु लागला. कोथिंबीरीची एकेक पानं देठापासून मोडताना वसुधा ताईंना वाटुन गेलं, या पदार्थाशी जोडलेल्या किती आठवणी आहेत. आपल्या घडणीला एक योग्य वळण मिळायला या वड्याच तर कारणीभूत आहेत की..

....

लग्न होऊन सासरी आल्यावर प्रथम इतक्या मोठ्या गोतावळ्याला पाहून तरुण वसुधा थोडीशी भांबावलीच होती. माहेरचं चौकोनी आटोपशीर कुटुंब सोडून त्या भल्या-थोरल्या, माणसांनी भरगच्च घरामध्ये प्रवेश करताना तिच्या मनात भितीयुक्त उत्सुकता जरुर होती. पण मग नंतर हळू-हळू त्या तिथल्या भिंतींमध्ये स्वत:ला फिट बसवता बसवता तिची तारांबळ उडू लागली. संस्कारांची नवी परिमाणं, ‘मान-पान’ या नवीनच विषयाशी झालेली ओळख, ते सोवळ्यातला स्वयंपाक.. कारल्याची चटणी.. मुगडाळीची धिरडी इ.इ. खडतर चाचण्यांमधून स्वत:ला धडपडत-ठेचकाळत पुढे रेटताना तिची दमछाक व्हायची. दुपारच्या वेळी घरातल्या बायकांची एकमेकींची उणी-दुणी काढणारी किंवा चेष्टा मस्करी करणारी सत्रं रंगायची. पुस्तकांमध्ये रमणारं वसुधाचं मन या अशा गोष्टींमध्ये रमायचं नाही. आणि मग त्यावरुनही तिची खिल्ली उडायची. आपण या सगळ्यांपेक्षा वेगळ्या का आहोत? किंवा या साऱ्याजणी म्हणतात तशा खरंच आपण अति लाडा-कोडामुळे एकलकोंड्या वगैरे झालोय का? असे प्रश्न त्या काळात सतत तिच्या डोक्यात मुक्कामाला असायचे. त्यातच पुढे ग्रॅज्युयेशनचा निकाल आला आणि त्यात विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झालेल्या वसुधाला लगोलग नोकरीची संधीही चालून आली. लेकी-सुनांनी घराबाहेर न पडण्याच्या त्या काळात सासऱ्यांच्या आणि नवऱ्याच्या पाठिंब्यामुळे वसुधा नोकरी करु लागली. पण त्यामुळे झालं असं की तिच्या पुढ्यातल्या घरगुती अडचणी अजून वाढल्या. तिला पुर्वीपेक्षा अधिक कष्ट घेऊन घरात स्वत:ला सिद्ध करत रहावं लागलं. ही काल आलेली मुलगी पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून बाहेर काम करते. स्वत:च्या पायांवर ऊभी आहे आणि आपण मात्र सारा जन्म रांधण्यात आणि उष्टी काढण्यात घालवतोय ही घरातल्या इतर बायकांच्या मनातील खंत वसुधाबद्दलच्या ईर्ष्येच्या स्वरुपात बाहेर पडू लागली. आणि ‘गळ्यात पर्स अडकवून बाहेर काय कोणीही जाईल.. शेरभर पुरण वाटून लुसलुशीत पोळ्या करुन दाखव म्हणावं मग मानेन हिला..’ सारखी वाक्य जाता-येता तिच्या कानांवर पडू लागली. त्यातच पूढे घडला तो कोथिंबीर वड्यांचा प्रकार..

....

उकळत्या चहाखालचा गॅस बंद करुन महेशराव वसुधा ताईंना म्हणाले,
‘काय गं, कुठे हरवली आहेस?’
‘अरेच्चा! उतू गेला का चहा?’
‘नाही! पण मी आलो नसतो तर गेला असता’ असं म्हणून त्यांनी चहा कपात ओतून घेतला.
चहा पिता पिता वसुधा ताईंच्या पुढ्यातला कोथिंबीरीचा पसारा पाहून महेशराव म्हणाले,
‘माझ्या वेंधळेपणामुळे तुझं काम वाढवून ठेवलं नं मी आज!’
वसुधा ताई खजील होऊन म्हणाल्या,
‘नाही हो! हे सगळं करायला आवडतं मला, फक्त वय वाढल्यामुळे आता थोडंसं थकायला होतं इतकंच!’
‘पूर्ण स्वयंपाकाला बाई लाव म्हणून किती दिवसांपासून सांगतोय तुला पण ऐकत नाहीस माझं.’ ‘लावलीय की पोळ्यांसाठी. पण बाकी नको हं.. मी रमते हो हे सगळं करण्यात!’ वसुधा ताई म्हणाल्या. ‘किती बदल होत जातात नं काळानुरूप आपल्यामध्ये! मला ती लग्न झाल्या झाल्या स्वयंपाकघरात पाऊल ठेवायलाही घाबरणारी वसुधा आठवतेय.. किती घाबरायचीस तू तेंव्हा!’
‘हम्म्म्म्.. ते दिवस गेले आता आणि ती माणसंही गेली. किती बाळबोध हेते नं मी तेंव्हा! पुस्तकांपलीकडचं आयुष्यच ठाऊक नव्हतं मला..’
एकत्र कुटुंब, दोघांच्या नोकऱ्या, मुलं-बाळं, त्यांचं शिक्षण, नंतर लग्नं.. या साऱ्यांमध्ये त्या दोघांना एकमेकांसाठी वेळ तसा मिळालाच नव्हता. निवृत्तीनंतर मात्र वसुधा ताईंनी ठरवलं होतं, मुलांना त्यांच्या त्यांच्या मार्गाने जाऊ द्यायचं आणि आपण आयुष्याची संध्याकाळ नवऱ्यासोबत छान घालवायची. इतक्यात फोन वाजला म्हणून महेशराव उठले. सुमेधने, त्यांच्या मुलाने, व्हिडीओ काॅल केला होता.. मग या दोघांचं मुलाशी, सुनेशी बोलणं सुरु झालं.
टेबलावरची कोथिंबीर पाहून सुनेने विचारलं,
‘आई.. काय करताय एवढ्या कोथिंबीरीचं?’
‘काही नाही गं.. कोथिंबीर वड्यांची फर्माईश आहे तुझ्या सासरेबुवांची!’
‘अरे वा! मला शिकायच्याच होत्या. यु-ट्युब वर पाहून मी ट्राय केल्या २-३ वेळा पण म्हणाव्या तशा जमल्याच नाहीत! आता पाहते तुम्ही कशा करता ते..’
‘चालेल की. पण तेवढा वेळ आहे का तुझ्याकडे? तासभर तरी लागेल.. नाहीतर मी कृती सांगु का तुला?’ वसुधा ताई विचारत होत्या.
‘लागुद्या हो आई.. करा तुम्ही, आज वेळ आहे माझ्याकडे.. आणि नुसती कृती ऐकुन पदार्थ जमत नाहीत हे आताशा समजलंय मला, ते नीट शिकुनच घ्यावे लागतात!’
सईचं बोलणं ऐकुन वसुधा ताईंना नलु आत्या आठवल्या.. हीच गोष्ट किती छान समजाऊन सांगितली होती त्यांनी आपल्याला तेव्हा! आपल्या सुनेला मात्र ती न समजावता समजली याचं क्षणभर त्यांना कौतुकही वाटलं.
महेशरावांनी मग फोनचा अॅंगल अॅडजस्ट करुन दिला आणि सासु-सुनेचं आॅनलाईन कोथिंबीर वडी वर्कशाॅप सुरु झालं..

....

त्या दिवशी वसुधाला घरी यायला जरासा उशीरच झाला होता. काॅलेजात परीक्षा चालू असल्यामुळे कामाचा ताण थोडा वाढला होता. त्यातही ज्युनियर प्रोफेसर असल्यामुळे सिनीअर्सची सद्दी सहन करणं तिला भाग होतं.
हात-पाय धुऊन आत आली तोच मोठ्या सासूबाईंनी फर्मान सोडलं,
‘वसुधा, आज जरा कोथिंबीर वड्या कर पाहू.. बाकी स्वयंपाक होत आलाय. वड्या तेवढ्या तू कर.’ ‘सासूबाई अहो पण मी कधी केल्या नाहीत त्या’ वसुधा गडबडली.
‘त्यात काय एवढं! तुझ्या सारख्या प्रोफेसरीण बाईला काय अवघड आहे? डाळीचं पीठ, आलं-लसूण, मीठ-मिरची लावून कोथिंबीर वाफवायची आणि मग तेलावर परतायची बास!’
‘बरं’ म्हणून वसुधाआत गेली आणि साडी बदलून लगोलग कामाला लागली. सासुबाईंकडून ऐकलेल्या ओझरत्या कृतीवरुन फार काही अवघड पदार्थ नाही असं तिला वाटलं पण मनात थोडी धाकधुक होतीचं. तिने कोथिंबीर धुवून घेतली आणि चक्क पालक-मेथी वाफवावी तशी कढईत तेल सोडुन वाफवायला ठेवली त्यात मग डाळीचं पीठ आणि पाणी टाकून सरळ हाटायला सुरुवात केली.. पण पाण्याचं प्रमाण जास्त झाल्यामुळे मिश्रण सैल झालं आणि मग ते मिळून येण्यासाठी तिने पीठाचं प्रमाण वाढवायला सुरुवात केली.
बाकीच्या साऱ्याजणी तिची गम्मत पहात होत्या पण आज त्यांनी ठरवलं होतं की तिला कोणीच काहीच सांगायचं नाही. तिलाही कळू देत स्वयंपाक करणं म्हणजे काही खायची गोष्ट नाही ते.. खूप प्रयत्नांनंतर वड्या पाडण्यात तिला यश आलं. मग एकेक करुन त्या तेलावर परतायला सुरूवात केली. पण जास्त पाणी आणि पीठामुळे वड्या तेल पिऊ लागल्या. तिने त्या तशाचं कशा बशा करुन सगळ्यांना वाढल्या. मोठ्या दीराने पहिल्याचं घासात,
‘या कोथिंबीरीच्या वड्या आहेत की पिठल्याच्या?’ असं म्हणून तोंड वेडंवाकडं केलं.
त्याला जोड देत सासरेबुवा म्हणाले,
‘सुनबाई, आम्ही तुम्हाला हुशार समजत होतो! पुन्हा असा तेलाने माखलेला पदार्थ वाढू नका कोणाच्या ताटात. आधी नीट शिकून घ्या.’
वसुधाला मेल्याहून मेल्या सारखं झालं. त्या दिवशी रात्री ती खूप रडली.
थोड्या वेळाने नलु आत्या तिच्यापाशी आल्या आणि तिच्या डोक्यावरुन हात फिरवू लागल्या. तरुणपणीचं यजमान निवर्तल्यामुळे सोवळ्या होऊन त्या कायमच्या माहेरी भावाकडे आल्या होत्या. तिच्या डोळ्यातलं पाणी पुसून त्या म्हणाल्या,
‘असं रडू नकोस बाळा, मला समजतंय हो तू खंतावली आहेस.. घरात, बाहेर दोन्हीकडे स्वत:ला सिद्ध करता करता मेटाकुटीला येतेयसं.. पण वसुधा, या घरातल्या बाकीच्या बायका आहेत नं, तुझ्या या सासवा, जावा, नणंदा.. यासुद्धा खंतावल्याचं आहेत गं .. त्यांची खंत तुझ्यापेक्षा निराळी आहे इतकंच. तुझ्यातल्या क्षमता सिद्ध करण्याची तुला जी संधी मिळाली ती त्यांना नाही गं मिळाली. इच्छा असो वा नसो त्या स्वयंपाकघराशी बांधल्या गेल्या आणि मग हळु-हळु त्यालाचं विश्व समजू लागल्या.. बरं, स्वयंपाक हे काही येरागबाळ्याचं काम नाही बरं! तीही एक कला आहे.. नुसती कृती कळली की पदार्थ बनतो असं नाही, त्याला अनुभव लागतो, हाताला चव असावी लागते, प्रमाणाचं गणित समजावं लागतं! आणि इतकं असुन त्यांचं हे काम दुय्यमच समजलं जातं.. ना पुरेसा मान मिळतो ना निर्णयप्रक्रियेत सहभाग. वर वाट्याला येतं ते परावलंबित्व. स्वत:साठी कधी काही घ्यावंसं वाटलं तर परवानग्या काढत बसावं लागतं.. तुझं तसं नाही, तु चार पैसे कमावतेस, स्वत:ची हौस पुरवण्याचं स्वातंत्र्य आणि क्षमता तुझ्यापाशी आहे.. त्यांचं दु:ख मोठं आहे बयो..’
नलु आत्यांचं ते बोलणं ऐकुन वसुधा अंतर्मुख झाली, त्या परिस्थितीकडे पाहण्याचा नवाच दृष्टिकोन तिला दिसला. ज्याचा तिनं आधी विचारच केला नव्हता.. ईर्ष्येमागची खंत आणि टोमण्यांमागचं कारुण्य तिला दिसायला लागलं होतं.

....

वड्यांचं मिश्रण कुकरमध्ये वाफायला ठेवून वसुधा ताई सुनेला म्हणाल्या,
‘बरं का सई, कोथिंबीर धुवून चिरायची मग कोरड्या कपड्यावर थोडी सुकू द्यायची.. आणि जास्तीचं पाणी शोषलं गेलं की मग त्याला पीठ लावायचं बरं, नाहीतर वड्या बिघडतात’
‘अच्छा! तरीचं मला काही केल्या जमत नव्हत्या. किती बारकावे असतात नाही प्रत्येक पदार्थाचे! सुमेध रोज तुमच्या स्वयंपाकाचं कौतुक करत असतो आणि माझी धांदल उडालेली पाहुन मला हसत असतो.’ ‘जमेल गं तुलाही.. अनुभवाने सारं काही जमायला लागतं. आपण आपल्या चुकांमधुन शिकत रहायचं फक्त! माणसांच्या स्वभावातली आणि स्वयंपाकातली गुंतागुंत समजायला याच गोष्टी उपयोगास येतात बघ!’ आयुष्यानं त्यांना शिकवलेली गोष्ट त्या त्यांच्या सुनेला समजाऊ पहात होत्या.
गप्पा मारता मारता मग त्यांनी वाफलेलं वड्यांचं पीठ बाहेर काढून थंड व्हायला ठेवून दिलं.

....

तो नवा दृष्टीकोन घेऊन वसुधा रोजच्या जगण्याला भिडायला लागली आणि तिचं तिला कळत गेलं गोष्टी किती सोप्या होत्या ते.. सासुबाईंच्या रागामागची माया कळायला लागली.. न बोलल्या गेलेल्या शब्दांमागचे भाव उमजायला लागले.. आणि जिथे जिथे शक्य तिथे तिथे कधी स्वत:कडे कमीपणा घेत तर कधी थोडंसं सामंजस्य स्वत:मध्ये भिनवत ती साऱ्यांमध्ये सहभागी होत गेली.. आणि हळु-हळु तिची खंत आणि इतरांचं कारुण्य दोन्हीही तिनं आपलंसं केलं.. ती मग त्या घरात अगदी अभिन्न होत गेली. आणि एक दिवस तिने प्रयत्नपुर्वक शिकुन घेतलेल्या कोथिंबीर वड्या सर्वांना बेहद्द आवडू लागल्या.

....

सुरीने छान एकसारख्या वड्या पाडून वसुधा ताईंनी त्या तेलावर छान खरपूस भाजून घेतल्या. आणि त्यांचा खमंग वास घरभर पसरला. महेशराव आत येत म्हणाले,
‘अरे वा! झाल्या वाटतं कोथिंबीर वड्या तयार!’
‘हो झाल्या.. हे घ्या चव घेऊन सांगा कशा झाल्यात ते’ म्हणत वसुधा ताईंनी वड्यांची प्लेट त्यांच्या समोर ठेवली आणि मग त्यातली एक वडी तोंडात टाकून ‘बहार!’ असं म्हणून त्यांनी वड्यांचा फज्जा पाडायला सुरुवात केली.
‘आई माझ्याही तोंडाला पाणी सुटलंय आता’ सई आणि सुमेध दोघंही एकदाचं म्हणाले.
‘अरे मग या की इकडे, तुम्ही आलात की परत बनवेन मी’ वसुधा ताई आनंदाने म्हणाल्या.
त्यावर सई लगेच म्हणाली,
‘नाही आई यावेळी मी बनवेन आणि तुम्हाला खायला देईन.. मग तुम्ही सांगा मी पास की फेल ते!’ आपली परंपरा पुढे चालत असलेली पाहून वसुधा ताई समाधानाने म्हणाल्या, ‘नक्की!’.

- सांज
https://chaafa.blogspot.com/2020/12/blog-post.html

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अप्रतिम लिहिलं आहे ... असं समजावून सांगणारी अनुभवी नातलग बाई आणि समजून - उमजून घेणारी सून खूप दुर्मिळ असतील .... जेलसी वाटते म्हणून त्या अशा वागतात असं म्हणून मोडीत काढणं सोपं आहे , समजून घेऊन - स्वीकारून , आपलंसं करून घ्यायला मॅच्युरिटी लागते , हे सुंदर प्रकारे लिहिलंय .

Happy चांगली आहे.
थोडा वेगळा दृष्टीकोन सुचवते बघा पटतो का: Every man has to carry his own cross. परिस्थितीनुसार परवशता होती पण तो सासवा-नणंदेचा क्रॉस होता. परावलंबी होत्या म्हणून मिळवत्या सुनेला सासवा-नणंदाने बोलावं हे बरोबर नाही. जे अयोग्य आहे त्याला समजून घ्या ही शिकवण नलू आत्याने दिली. अशी शिकवण निदान माझ्या मुलीला मी देऊ शकणार नाही- माझ्या भाचेसुनेला हौशीने देईन Wink तुम्ही अशा शिकवणीचे उघड समर्थन केले नाही पण "आणि जिथे जिथे शक्य तिथे तिथे कधी स्वत:कडे कमीपणा घेत तर कधी थोडंसं सामंजस्य स्वत:मध्ये भिनवत ती साऱ्यांमध्ये सहभागी होत गेली.." हे वाक्य जामच खटकलं.
पुढच्या कथेच्या प्रतिक्षेत...

आ.रा.रा.
न वाचल्याबद्दल धन्यवाद!

चांगलं लिहिलंय. अनेक साठीच्या आसपास असलेल्या स्त्रियांना या कथेशी रिलेट करता येईल. कोणालाच व्हिलन न केल्याने कथेत हिरो कोणीच नाही. Everybody is also-ran category. मला वाटतं की ही कथा वापरून एक फार भारी group discussion होऊ शकतं तरूण मुलामुलींचं may be कॉलेज मधल्या किंवा नुकतेच करीअर सुरू केलेल्या. खूप छान मुद्दे समोर येतील.
मला माझ्या PhD program मधल्या ethics class ची आठवण झाली. यात आम्हाला एक पुस्तक वाचायला सांगितलं होतं. It was an "airport read" kind of a book. Story of a new grad student in the lab who witnesses how everyone is tempted to manipulate the data slightly for their own benefit including the post doc, lab tech and even the PI. And then when things go wrong, how everyone tries to justify their actions. असं काहीसं कथानक होतं. यात data manipulate झाला की नाही झाला हे उघडपणे सांगितलं नव्हतं. त्यामुळे there was a lot of room for interpretation.
ही कथा पण तशी वाटते.

चांगली आहे कथा.
थोडी टीपिकल आहे पण जमलीये.
नुसतं गृहिणीचं काम आणि तिचं गृहिणी असणं ह्यालाच कमीपणाचं लेखत नाहीत, तर त्यावर कथा लिहिण्यालाही कमी पणाचं लेखतात हे भरत यांचा प्रतिसाद वाचुन कळलं.
आधी तो प्रतिसाद वाचताना अ‍ॅमी ने लिहिलाय असं वाटलं मला Happy

मज्जाय.

< ‘गळ्यात पर्स अडकवून बाहेर काय कोणीही जाईल.. शेरभर पुरण वाटून लुसलुशीत पोळ्या करुन दाखव म्हणावं मग मानेन हिला.>
हे वाक्य बहुतेकींना पटलेलं दिसतंय.
मला ते वाक्य रामतीर्थकर बाईंच्या भाकरी आली-च पाहिजे टोनमध्ये ऐकू आलं.

लेखिकांची ग्रो व्हायची तयारी नाही. वाचक स्त्रियांची तर नाहीच नाही.

मला आणखी लिहायचं नव्हतं. पण सस्मित यांनी माझं नाव घेऊन लिहिल्याने, त्यांच्यासाठी लिहिलं.

अहो भरत, त्यात काय पटण्यासारखं आहे?
कथेतील एक पात्रं दुसर्‍या पात्राला बोलतंय ते.

लेखिकांची ग्रो व्हायची तयारी नाही. वाचक स्त्रियांची तर नाहीच नाही.>>> आता झालोत की बर्याच ग्रो Happy काहीजणी तर वरच्यासारखी बरीच वाक्य ऐकता ऐकता ग्रो झाल्या असतील. Happy
जाउद्या.

सस्मित Happy
आणि अजूनही ऐकावी लागत असतील अशी वाक्य !
जाउ द्या !

भरत, एकदम अनेकवचनी "लेखिका" का बरं? घराबाहेरचं अनुभवविश्व लिहीणार्‍या मायबोलीवर बर्‍याचजणी आहेत. एकीने घरातील कथा लिहीली म्हणून बिघडत काही नाही. त्यात काही विचार उदा: "स्वतःकडे कमीपणा घेऊन अभिन्न झाली" मला झेपत नाहीत. असं अनेकींना वागावं लागत असलं तरी कथेतही नायिकेला बिचारी का ठेवायची? कथेत तरी तिला "नलू आत्याच्या बोलण्यानुसार तिने इतरांना समजून घेतले. पुढे सासवा-नणंदेच्या बोलण्याचा त्रास तिला होईनासा झाला. दर सहामाहीला ती नवी पर्स घेऊ लागली. दर एक तारखेला ती कराचीवाला स्वीटस मधून जिलबी-कोथिंबीरवडी आणू लागली. कराचीवाला मिठाईमुळे सैपाकाचा त्रास कमी झाला म्हणून सासू वसुधालाच 'बहार' म्हणू लागली" अशी सुखी का नाही ठेवत? Saving Mr. Banks नावाचा सिनेमा प्रत्येक लेखकाने बघावा.
वाचक म्हणून हे सगळं एका पोस्टीत सांगून सोडून द्यायचं. असतील लेखिका सूज्ञ तर अधिक सांगणे नलगे. नसतील तर त्यांच्यावर कशाला आपला अजून वेळ व्यर्थ घालवायचा?

भरत, तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे पण या कथेत त्या आत्यांनी दिलेला perspective खरंतर चांगला आहे. She advised that Vasudha should choose her battles wisely and ignore the unwarranted criticism. वसुधाने नोकरी सोडली नाही ही एक चांगली गोष्ट आहे.
Story next door वाटावी आणि तरीही त्यावर अधिक चर्चा करावीशी वाटेल अशी कथा लिहीणेही सोपे नाही. माझ्या मते हे कथालेखिकेचे यशच आहे.
कथेत discuss करण्यासारख्या इतर अनेक गोष्टी (biases) आहेत. मात्र कथा लेखिकेला यावर चर्चा अपेक्षित नसावी म्हणून मी पुढे काही लिहीत नाही. जर सांज यांना objectively कथेतील पात्रांच्या वागण्याची चर्चा झालेली चालणार असेल तर मग बरेच काही लिहीण्यासारखे आहे.

अशी वाक्य आम्हाला अजूनही ऐकावी लागलीयेत ( माझं वय 30 वर्ष) . ती वाक्य बरोबर आहेत की नाहीत हा मुद्दा नाहीये. ती ऐकावी लागतात त्यामुळे त्यात कोणाला काही खटकलं नसावं.

मला आवडली कथा. पटली का नाही हा वेगळा भाग आहे पण आवडली नक्की.

मी पर्स गळ्यात ऐवजी बॅक पॅक पाठिवर अडकवायचा त्याग करायला तयार आहे पण मऊ लुसलुशीत पुपो जमल्या पाहिजेत. Happy

पुढल्या पिढीला शुभेच्छा साठी धन्यवाद भरत. Happy
शुभेच्छा आमच्या पिढीलाही हव्यात की.
आता असलेल्या आमच्या 'मागच्या' पिढीकडुन अजुनही हे असं काही ऐकायला मानसिक बळ आणि संयम यासाठी.
आणि ह्याचा बोध घेऊन आमच्या पुढल्या पिढीला आम्ही अशी वाक्य आम्ही ऐकवु नयेत ह्यासाठी. Happy

बरं! लेखिकेने मनावर घेऊन अजुन एकदा कोथिंबीर वड्या करायल्या घ्याव्यात.
वसुधा 'गळ्यात पर्स अडकवून बाहेर काय कोणीही जाईल.. शेरभर पुरण वाटून लुसलुशीत पोळ्या करुन दाखव म्हणावं मग मानेन हिला.' हे ऐकुन जी पिसाळली की तिने को व न करता बेसन पिठलं केलं. सगळ्यांच्या पुढ्यात पातेलं आपटुन सरळ खोलीत निघुन गेली.
को व करण्यासाठी माझी वाट बघत बसल्या. करायच्या होत्या ना. दिवसभर काय कामं करतात ह्या बायका? नुसती जेवणं, धुणी भांडी आणि रिकाम्या वेळात कुचाळक्या. ह्यांना काय कळणार नोकरी कशी करतात ते. अडाणी बायका. हुं! काहीबाही मनात बडबडत राहिली. रागाने धुमसत तिने आयुष्या कधी को व न करण्याची शपथ घेतली.
--महेशरावांनी आज चक्क दोन जुड्या कोथिंबीर आणलेली बघुन तिचं डोकंच फिरलं. तिने त्यातली एक जुडी दोन शेजारणींमधे वाटुन टाकली अशा न घडलेल्या कोव ची कथा लिहिली पाहिजे.

पुढे सासवा-नणंदेच्या बोलण्याचा त्रास तिला होईनासा झाला. दर सहामाहीला ती नवी पर्स घेऊ लागली. दर एक तारखेला ती कराचीवाला स्वीटस मधून जिलबी-कोथिंबीरवडी आणू लागली. कराचीवाला मिठाईमुळे सैपाकाचा त्रास कमी झाला म्हणून सासू वसुधालाच 'बहार' म्हणू लागली">>>>>>> आवडलं Happy

लेखिकांची ग्रो व्हायची तयारी नाही. वाचक स्त्रियांची तर नाहीच नाही.>>

अरेच्चा! इतना जजमेंटल क्यूं होते हो ? Happy

'दुसरी बाजू समजून घेणे' हा अर्थ मला तरी " ईर्ष्येमागची खंत आणि टोमण्यांमागचं कारुण्य.. " या वाक्यात जाणवला. आणि तो आवडला. याचा अर्थ असा नाही की ती ईर्ष्या आणि ते टोमणे बरोबरच आहेत असं मला वाटतं. पण ही दुसरी बाजू म्हणा, आतली बाजू म्हणा, समजली की त्या ईर्ष्येकडे, टोमण्यांकडे जरा सहानुभूतीने बघता येत असेल आणि त्यामुळे ते सुसह्य होत असेल (कथेत नायिकेला त्याच घरात सगळ्यांबरोबर राहण्याला पर्याय नसावा).

दोन मुद्दे आहेत.
एक - पुढल्या पिढीला आधीच्या पिढीकडून ऐकून घ्यावं लागतं. ते पुढल्या पिढीने कसे हँडल करायचे. कथेत त्याबद्दलचा एक पर्स्पेक्टिव्ह मांडला आहे. अनेक बायका मनाची तशी समजून (म्हणजे टोमण्यामागचं कारुण्य इ.) न घालता नायिकेने जे केलं तेच करत असतात. फक्त त्यांना आपण संत ज्ञानेश्वर असल्याचा भास होत नाही..
दोन - कथानायिकेला ती सुगृहिणी नसल्यामुळे ऐकून घ्यावं लागलं. तरीही वाचकांपैकी अनेकींचा सूर हा आहे की गृहिणीपदाला आणि तिच्या कामाला कमी लेखलं जातं. म्हणजे या सगळ्या जणी कथानायिकेला टोमणे मारणार्‍या स्त्रियांच्याच मानसिकतेत आहेत का? (मग त्यात कारुण्य बिरुण्य आहे की नाही, हे जिचं तिने तपासावं). तिच्या नोकरी करण्याला तुच्छ लेखलं याबद्दल कोणीही, हो असं होतं बरं का, असं म्हटलेलं नाही. म्हणजे तसं आता होत नसावं असं समजावं का? म्हणजे बाई नोकरी करायला लागली तरी तिने सुगृहिणी असायलाच पाहिजे असं आताच्या मुली- स्त्रियांना वाटतंय का?

माझ्या पहिल्या प्रतिसादात मी लिहिले होते की नोकरी करणार्‍या स्त्रियांची आपली कितवी पिढी आहे ते पहा. तरीही चित्र तेच असेल, तर नक्की काय चुकतंय ते तपासायची गरज आहे.
यासाठीच येत्या पिढीला असलं काही ऐकून घ्यावं लागू नये अशा शुभेच्छा दिल्या.

शेवटी कथा डेटेड आहे असं मला वाटलं कारण मीरा यांनी लिहिलं तसं अशा मासिक , दिवाळी अंकांत कोणे एके काळी यायच्या. तशाच कथा आजही रेलेव्हंट वाटत असतील तर नक्की काय चुकतंय हे तपासायची गरज आहे.

पर्स गळ्यात ऐवजी बॅक पॅक पाठिवर अडकवायचा त्याग करायला तयार आहे पण मऊ लुसलुशीत पुपो जमल्या पाहिजेत. >>>>>>>>>>>

आणि कोथिंबीर वड्या पण. मला दोन्ही जमत नाही Happy

भरत यांचे प्रतिसाद पटले आहेत. मी ही लिहिणार होतेच पण टाळलं . हल्ली मनातलं लिहालायही नकोसे वाटते. समोरचा कसा घेईल प्रतिसाद कोणास ठाऊक ! पण आता आलेच आहेत प्रतिसाद तर लिहिते.

कथेत आलेली वाक्य मलाही ऐकून घ्यावी लागलेली आहेत. विशेषतः "शिकलात तर काय झालं , स्वयंपाकपाणी पण जमलं पाहिजे" . मात्र माझ्याएव्हढंच किंबहुना माझ्यापेक्षा कमी शिकलेल्या भावाला मात्र ही वाक्य बोलून दाखवली जात नाहीत. अश्यावेळी खूप चिडचिड होते.

मग वर जो choose your Battle चामुद्दा आलाय तो मी वेगळ्या तर्हेनें सोडवला.
जेव्हा मला अशी वाक्य सहन शक्तीच्या पलीकडे ऐकवण्यात आली तेव्हा मी खुल चॅलेंज दिलं. "मी जे म्हणाल ते पदार्थ करते पण तुम्हीही माझी बॅलन्सशीट, लीगल documents तयार करून द्यायचे." अर्थातच समोरच्याची बोलती बंद झाली.
फिलिंग विजयच समाधान मिळालं पण इतकं शिकूनही ही वाक्य आजही ऐकवली जातात याच वैषम्य आहेच. असो Happy

तिच्या नोकरी करण्याला तुच्छ लेखलं याबद्दल कोणीही, हो असं होतं बरं का, असं म्हटलेलं नाही. म्हणजे तसं आता होत नसावं असं समजावं का? म्हणजे बाई नोकरी करायला लागली तरी तिने सुगृहिणी असायलाच पाहिजे असं आताच्या मुली- स्त्रियांना वाटतंय का?>>>>>>>>>>>

आताच्या मुली-स्त्रीयांचे माहिती नाही पण आधीच्या पीढीला/ नोकरी करू न शकणाऱ्या कथेतल्याप्रमाणे जावांना नक्कीच वाटतं, हि शिकलेली असली, नोकरी करणारी असली म्हणून काय झाले हि स्वयंपाकात निपुण असली पाहिजे.... लहाणपणापासून स्वयंपाक घरात पाऊल न ठेवणारीकडून लग्नानंतर लगेच अपेक्षा सुरू...अर्रेच्या हिला साधा स्वयंपाक येत नाही-......स्वानुभव.

दोन - कथानायिकेला ती सुगृहिणी नसल्यामुळे ऐकून घ्यावं लागलं. >> आक्षेप!! वसुधाला ऐकावं लागलं ते सासू नणंद इ च्या sense of entitlement मुळे. आपण सोसलं म्हणून सुनेला बोलायचा अधिकार आपल्याला नाही हे ज्या सासूला उमगलेलं असतं तिच्या सूना आणि ती स्वतः असे सगळे सुखात असतात. प्रश्न वसुधाला सैपाक येत होता का नव्हता हा नाहीच. खोडसाळ स्वभावाचे लोक काहीही कारणावरून खोड्या काढतात.

नोकरी करणार्‍या स्त्रियांची आपली कितवी पिढी आहे ते पहा. तरीही चित्र तेच असेल, तर नक्की काय चुकतंय ते तपासायची गरज आहे.
यासाठीच येत्या पिढीला असलं काही ऐकून घ्यावं लागू नये अशा शुभेच्छा दिल्या.>>>>>>
हे असं काही ऐकवणं हा एक स्वभावाचा भाग आहे. तर कधी वर लिहिल्याप्रमाणे इर्षेचा भाग आहे. चित्र सगळीकडे असंच आहे असं नाही. ही कथा ह्या अशा एका घरातली आहे. असं घडतं हे माहित आहे, बघितलंय म्हणून ते पटलंय. ते बरोबर आहे असं कुणालाही इथे वाटत नाहीये. त्यामुळे लेखिका आणि वाचक स्त्रिया ग्रो झालेल्या नाहीत असा समज करुन घेऊ नये.
काही घरात अगदी न शिकलेली सासुपण 'असुदे. अजुन इतकं नाही येत तिला स्वयंपाकाचं. पण हुशार आहे मोठ्या पगाराची नोकरी करते. असं म्हणुन आपल्याला जे नाही करता आलं ते तिला करता यावं असा विचार करते. तर कधी सरकारी नोकरीत असलेली सासु पण आम्ही नाही का नोकरी करुन केलं सगळं असं म्हणते.

या कथेत वसुधाला जे ऐकावे लागले ते तिने सुनेला नाही ऐकवले. हा शेवट दिसतो म्हणजे पुढील पिढीला असे ऐकून घ्यावे लागणार नाही असा मी तरी अर्थ काढला.

आपण सोसलं म्हणून सुनेला बोलायचा अधिकार आपल्याला नाही हे ज्या सासूला उमगलेलं असतं तिच्या सूना आणि ती स्वतः असे सगळे सुखात असतात.>>>>>>>>>
100%सहमत
पण बर्याचदा असं होत नाही ना, आपण किती सोसलं हे सांगणे सासुबाई सोडतच नसतात! Happy

आत्ता चालू आहे ती चर्चाही छानच आहे.वेगवेगळे मतप्रवाह समोर येताहेत. बऱ्याचं जणींचे अनुभवही ऐकायला मिळतायत.
माझ्या कथेच्या निमित्ताने (कोणाला ती बरी वाटतेय कोणाला वाईट, दोन्ही प्रकारांचं स्वागत आहे) चांगल्या मुद्दयांवर चर्चा घडून येतेय याचा आनंदच आहे

यात अजून एक गंमत अशी आहे की ही सगळी चर्चा हिरीरीने करण्यात फक्त बायकाच असतात. या धाग्यावर हर्पेन, भरत आणि आ. रा. रा. सोडून एकाही पुरूष आयडीने प्रतिसाद दिला नाहीये. तेव्हा घरकाम हा विषय अजूनही किती बायकांच्याच गळ्यात पडलेला आहे हे स्पष्टच आहे. वर त्याला home maker अशी गोंडस पदवी देऊन त्याला ग्लोरीफाय देखील करण्यात येते! यात पुरूषांचा काहीही दोष नाही. या कथेत देखील नवरा आणि मुलगा हे दोघेही वसुधाच्या स्टोरीत अनभिज्ञासारखे वावरतात! कोथिंबीरीच्या वडीवरून वसुधाच्या मनावर परिणाम करणारा प्रसंग नवऱ्याच्या ध्यानात तरी आहे का किंवा मुलाला माहिती आहे का काय माहीत? अजूनही शिकवणी ही सासूकडून सुनेकडेच चालू आहे. वडील आणि मुलाचा रोल कोथिंबीरीची जुडी आणणे आणि आस्वाद घेण्यापुरताच दिसतो. You (स्री पुरूष दोघेही) got to raise your concerns and get everyone involved in household chores. त्याशिवाय हे चित्र बदलणार नाही. भरत यांचे प्रश्न valid आहेत.
ती एक कुठल्याशा तेलाची जाहिरात येते युट्यूबवर - माँ हमेशा किचनमें क्यूँ होती है? मला वाटलं व्वा चांगला संदेश असेल तर शेवटी वाक्य काय की आमच्या तेलामुळे पदार्थ अधिक काळ ताजे राहतात म्हणून मग आईचा सगळा वेळ किचनमधे जात नाही - किचन के अलावा भी म्हणजे जणू किचनमधे आईची जागा ही by default असतेच Sad

Pages