बांद्रा वेस्ट - २४

Submitted by मिलिंद महांगडे on 6 December, 2020 - 11:34

बांद्रा वेस्ट २४ Bandra West- 24

” रॉडी, बराच वेळ झाला रे …. दोघे येतील ना …? ”

” येतील तर काय ? येणारच ! दोघेही पैशाचे भुकेले आहेत. फक्त दोघांनी दिलेली वेळ पाळली पाहीजे… टाईम इज व्हेरी इम्पॉर्टंट… ” तो घड्याळात बघत म्हणाला.

” तु नीट सांगितलंय ना फोन करुन …? ”

” हो रे …. प्रत्येकाला दोनदोनदा सांगितलंय …. तसे अजुन दहा मिनीट बाकी आहेत ” रॉड्रीक मनगटावरच्या घड्याळाकडे बघत म्हणाला.

रॉड्रीक आणि मॉन्ट्या दोघेही रात्रीच्या अंधारात दबा धरुन बसले होते. बांद्रा फोर्टचं गेट आतुन त्यांना स्पष्ट दिसत होतं. परंतु ते बांद्रा फोर्ट मधे अशा ठिकाणी लपुन बसले होते कि गेटमधुन आत येणाऱ्याला ते सहजासहजी लगेच दिसले नसते. रॉड्रीकने विचारपुर्वक हा प्लॅन आखला होता. त्याचा काहीही संबंध नसताना तो विनाकारण ह्या लफड्यात अडकला होता. आता त्याच्याकडे जामसंडेला द्यायला दहा करोड नव्हते आणि वैनीसाहेबांना द्यायला त्यांचा तो कोकेनचा बॉक्सही नव्हता. तो दोन्ही बाजुंनी कोंडीत सापडला होता. आता ह्यातुन सुटण्याचा हा एकच मार्ग त्याला दिसत होता. परंतु त्याने जसा विचार केला होता त्या प्रमाणे घडलं तर आणि तरच ह्या सगळ्या जंजाळातुन त्याची सुटका होणार होती. पण तसं घडायची शक्यता – प्रोबॅबिलीटी पन्नास टक्के होती. मॉन्ट्याने त्याला तसं करण्यापासुन परावृत्त करण्याचा एकदा प्रयत्न करुन पाहीला परंतु त्यांच्यापुढे हा मार्ग स्विकारण्यावाचुन दुसरा पर्यायच उरला नव्हता. परीस्थितीपुढे घाबरुन नांगी टाकण्यापेक्षा लढुन काहीतरी मार्ग निघणार असेल तर त्यांना ते करणं भागच होतं. कदाचित सगळं काही प्लॅनप्रमाणे घडलं तर ह्या कठीण प्रसंगातुन ते वाचणार होते. ” मदर मेरी, प्लीज …. ” त्याने वर पाहुन अभिवादन केले. रॉड्रीकने डाव्या बाजुला पाहीलं. वरळी-बांद्रा सिलींक रात्रीच्या दिव्यांच्या प्रकाशात चमकत होता. जणुकाही लांबलचक जहरी नाग समुद्रावर आरामात पहुडला आहे … भन्नाट वेगात गाड्यांचं येणं-जाणं चालु होतं. क्वचित गाड्यांचे हॉर्न ऐकायला येत होते. त्यांना तसं बसुन अर्ध्या तासाच्या वर झाला होता. ते मुद्दामच लवकर आले होते. कदाचित त्यांच्यावर कोणी पाळत ठेवली असेल तर त्याला खरं वाटावं म्हणून निघताना एक मोठी सुटकेस घेतली होती . हा त्यांच्या प्लॅनचा एक भागच होता. घड्याळाचा काटा कासवाच्या गतीने चालत होता. अर्धा तास त्यांना अर्ध्या वर्षासारखा वाटला. ते असा विचार करत असतानाच बाहेरुन कुणीतरी आत येत असल्याची चाहुल लागली.

” शु sss …. कोणीतरी येतंय …. ” रॉड्रीकने हळु आवाजात मॉन्ट्याला सांगितलं.

त्यांनी नीट कान देऊन ऐकण्याचा प्रयत्न केला. बुटांचा आवाज, पण एका माणसाच्या बुटाचा नाही, तर दोन तीन माणसांच्या बुटांचा आवाज येत होता.

” ह्या जामसंडेने आणखी दोन जण आणलेत वाटतं …! ” मॉन्ट्या हळु आवाजात म्हणाला.

” ते त्याच्या बरोबरचे शिपाई आहेत…. बरं झालं …. त्यांचा पण निकाल लागेल आज… ” रॉड्रीक निश्चयपुर्वक म्हणाला.

ते तिघे आत फोर्टमधे आले . आणि एका कठड्यावर बसले . रॉड्रीक आणि मॉन्ट्या त्याच्यापासुन केवळ दहा पंधरा फुटांवर लपुन बसले होते. त्यांना त्यांचं बोलणं व्यवस्थीत ऐकु येत होतं…

” साहेब, इथं कुणी दिसत नाय फोन करा की त्याला .”

” पाटील, काय घाई आहे…? येऊ द्या बिचाऱ्याला … दहा खोके आणायला वेळ लागणारच…! माझ्या माणसाने सांगितलंय कि ते दोघे मोठी सुटकेस घेऊन घरून निघालेत . आणि असंही आपण जरा लवकरच आलोय. “

” मला डाऊट वाटतोय साहेब, एवढं पैसं असतील का त्याच्याकडं.? म्हणजे समजा त्यानं नाय दिले तर ? ”

” त्याचा बाप देईल …! तो बॉक्स अजुनही आपल्या ताब्यात आहे. नाय दिले तर केस करुन आयुष्यभर जेलमधे सडवीन साल्याला … अरे आणि तो पकडलेला माल पण काय कमी नाय … दोन तीन खोक्याचा असणारच …! काय…? ” ए पी आय जामसंडेच्या बोलण्यात भलताच आत्मविश्वास आणि अहंकार दिसत होता.

” बाकी साहेब, चांगला मोठा बकरा कापलात… म्हणजे पैसे आले तरी फायदा आणि नाय आले तरी फायदा …द्या टाळी ! ” त्यावर ते दोन हवालदार हसायला लागले. ‘हसुन घ्या हरामखोरांनो ‘ रॉड्रीक मनात म्हणाला. आता फक्त ती बाई वेळेवर आली पाहीजे … रॉड्रीकने घड्याळात पाहीलं … खरं तर एव्हाना ती यायला हवी होती. ती आली नाही तर सगळंच मुसळ केरात जाईल…. ‘ गॉड प्लीज… सेंड हर सुन… ‘ रॉड्रीक देवाची प्रार्थना करु लागला. तो विचार करत असतानाच त्याला त्या पोलिसांचा आवाज ऐकु आला. , ” साहेब, बराच वेळ झालाय … एक फोन तर करुन बघा… ” जामसंडेचा एक शिपाई त्याला म्हणाला.

” हो साहेब… आपण किती वेळ वाट बघायची ? तुम्ही लावा त्या पोराला फोन.. ” दुसऱ्या हवालदारानेही त्याला दुजोरा दिला. त्यामुळे ए पी आय जामसंडेही विचार करु लागला … थोडा विचार करुन त्याने आपला मोबाईल खिशातुन काढुन त्याचा नंबर शोधु लागला. रॉड्रीकच्या डोक्यात अचानक ट्युब पेटली …. तो फोन सायलेंट करायलाच विसरला होता. तेवड्यात जामसंडे ने त्याला फोन लावलाच… रॉड्रीकने घाईघाईने जीन्सच्या खिशातुन फोन काढला, तो सायलेंट मोडवर टाकेपर्यंत जामसंडेचा कॉल लागला होता. अर्धी रिंग वाजली आणि त्याने फोन कट केला.

” अरे , फोन कट केला त्याने … ” एपीआय जामसंडे संशयाने त्याच्या कट केलेल्या कॉलकडे बघु लागला.

” साहेब इथं कुठंतरी फोनची रिंग वाजल्याचा पण आवाज आला. ” एक शिपाई म्हणाला.

” नाय रं … तुझा कान वाजत आसंल … मला नाय ऐकु आलं काही .. ” पोलिस शिपाई पाटील दुसऱ्याला म्हणाला.

” साहेब, तुम्ही ऐकली ना रिंगटोन … थांबा मी शोधतो आसपास… ” म्हणत तो शोधायला निघाला.

” ओ… मेजर… बसा … मला पण नाय ऐकु आली रिंगटोन …. तो कशाला लपुन बसंल…? मी परत फोन लावतो … ” म्हणत जामसंडेने परत फोन लावला. एव्हाना रॉड्रीकने त्याचा फोन सायलंट मोडवर टाकला होता . ह्यावेळी रॉड्रीकने कॉल कट केला नाही.

” आयला हा फोन का उचलत नाही.? ” जामसंडेला आता त्याचा संशय येऊ लागला . रॉड्रीकने कॉल संपल्यावर लगेच एक मेसेज टाईप केला ” sir, i m in auto. will Reach in 10 minutes. Sorry for late. आणि लगेचच सेंड केला.

” ओके…. येतोय रे दहा मिनटात… ” जामसंडेचं त्यावर समाधान झालेलं दिसलं. पण आता ती वैनीसाहेब ह्या दहा मिनीटात पोचली पाहीजे. रॉड्रीक आणि मॉन्ट्या दोघेही ती येण्यासाठी मनोमन प्रार्थना करु लागले. पाचच मिनीटे होतात न होतात तोच बाहेर गाडीचा आवाज आला. रॉड्रिक आणि मॉन्ट्या सावध झाले .

“ साहेब , आला वाटतं तो … ” एक शिपाई म्हणाला .

“ येऊ द्या त्याला आत . ” जामसंडे कट्ट्यावरून उठत म्हणाला .

इकडे रॉड्रिकच्या हाताला घाम सुटला होता . खाली पाय थरथरत होते . आता तो जे करणार होता ते अतिशय निर्णायक होतं . मॉन्ट्याही डोळे विस्फारून एकदा गेट कडे तर एकदा रॉड्रिककडे आळीपाळीने पहात होता . रॉड्रिकने थरथरत्या हाताने जीन्स मध्ये मागच्या खिशात ठेवलेलं रिव्हॉल्वर काढलं . आणि समोर गेटवर रोखलं . आता कोणत्याही क्षणी वैनीसाहेब आणि त्यांची टोळी त्या गेट मधून आत येणार होती . घामाचा एक थेंब रॉड्रिकच्या कपाळावरून डोळ्याच्या बाजूने खाली येऊ लागला . त्याच्या हृदयाचे ठोके जलद गतीने पडू लागले . त्याला पावलांचे आवाज ऐकू यायला लागले . त्याची नजर गेटवर खिळून होती . जशी त्याला गेटवर काही माणसं येताना दिसली तशी त्याने डोळे झाकून त्या दिशेने गोळी झाडली … ती कुठे लागली कुणास ठाऊक पण त्यांच्या बाजूलाच काही अंतरावर असलेल्या पोलिसांनी चमकून गोळी सुटलेल्या दिशेने पाहिलं . ए पी आय जामसंडे ने तेवढ्यात चलाखी करून त्याच्या कमरेला असलेलं पिस्तुल काढलं आणि रॉड्रिक आणि मॉन्ट्या लपून बसलेल्या ठिकाणी रोखून अंधारात अंदाजाने लागोपाठ तीन गोळ्या झाडल्या . तेव्हा त्या दिशेने कुणाचा तरी जोरात ओरडण्याचा आवाज आला . त्याचवेळी फोर्टच्या गेट पलीकडून गोळीबार सुरु झाला . त्यातली एक गोळी पोलिस शिपाई पाटीलच्या छातीत शिरली . त्यासरशी तो उडून मागे पडला . जामसंडे ने चमकून गेटकडे पाहिलं . तो आणि उरलेला एक शिपाई आता गेटच्या दिशेने गोळ्या झाडू लागले . दिवाळीत फटाक्यांच्या लडी लावाव्यात तसे गोळ्यांचे आवाज येत होते . दोन्ही बाजूंनी पिस्तुलाच्या फैरी झडत होत्या . तब्बल वीस एक मिनिटे गोळीबार सुरूच होता . त्यानंतर सर्वकाही शांत झालं … अगदी पूर्वी होतं तसं … पूर्वीच्या निरव शांततेचं … आता भयाण शांततेत रुपांतर झालं !!!

क्रमशः

लडाखचे प्रवासवर्णन

Ladakh Bike Trip – दुचाकी लडाखायण 1

माझी अर्धदशक नावाची कादंबरी वाचण्यासाठी खाली लिंक दिली आहे

https://www.mehtapublishinghouse.com/book-details/ARDHADASHAK/3048.aspx

Amazon link

https://www.amazon.in/Ardhadashak-Milind-Mahangade/dp/9353174163/ref=sr_...

Flipkart Link

https://www.flipkart.com/ardhadashak/p/itm7149b4896e81d?pid=978935317416...

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users