नातीगोती - भाग ८ - नवं रहस्य!

Submitted by अज्ञातवासी on 6 December, 2020 - 11:18

पुढील भाग पुढच्या सोमवारी रात्री ९ वाजता प्रकाशित होईल!

नातीगोती - भाग ७
https://www.maayboli.com/node/77377

"किती वेळ बसणार सायली इथे?"
"तू जा ना दादा!"
"तुला शेतात एकटी सोडून जाऊ?"
"होय."
"काहीही बोलू नकोस, उठ लवकर. हेमंतकाकाकडे जाऊयात."
"तू जा..."
महेश थोडावेळ शांत बसला.
"तासाभराने येऊ?"
"हम्म, ठीक आहे."
तो गाडी घेऊन निघून गेला.
सायली अजूनही रात्रीच्या स्वप्नात होती.
आंबा, फणस, चिकू, सीताफळ!
आणि समोरच त्यांची दाट झाडे!
एक छोटंस घर, अर्धवट बांधकाम करून पडलेलं.
एका फणसाच्या झाडाला दोराने फळी बांधलेली.
"बाबा आज इथे माझ्यासोबत असता तर?"
सायलीला राहून राहून भरून येत होतं.
तास केव्हा गेला, कळलंच नाही.
साहेबरावांची गाडी धूळ उडवत शेताकडे आली. सायलीला बघून साहेबराव चरकलाच!
"ही पोरगी, पुन्हा???"
"साहेब बघा, नाहीतर विराजसारखी हीसुद्धा थांबून जायची."
"नाही थांबणार. विराजच्याच्या मागे मोहनराव स्वतः होते. हिच्या मागे कोण उभं राहणार? एकशेवीस एकर जमीन आहे. यांच्या सात पिढ्याही एकत्र मिळून एवढी जमीन पोसू शकणार नाहीत. कळलं?"
"आणि हिच्या मागे विराज उभा राहिलाच तर?"
साहेबराव पूर्ण गांगरले.
गाडी शेतरस्त्याला लागली. साहेबराव खाली उतरला.
"ओ मॅडम, कशाला उन्हातान्हात बसतायेत? घरी सोडून येऊ का?"
"उन्हात कशाला? आजोबांनी लावलेला आंबा आहे, इतका गारवा तर एसीत मिळत नाही."
साहेबराव जरा गांगरलाच.
"मॅडम, तुमच्या शहराच्या एसीची इथे काय बरोबरी? सोळा तास लाईट नसते शेतात. मोहन साहेब तर म्हटले होते, साहेबराव, तुमच्यासारखा देवमाणूस आहे, म्हणून शेती होतेय, नाहीतर माझ्याकडून काय झालं असतं?"
"अहो काका, तुमचं वाक्य चुकतंय. पप्पा असं म्हणाले असते, साहेबराव, माझ्यासारखा देवमाणूस आहे, म्हणून तुमच्याकडून शेती होतेय. नाहीतर माझ्याकडून काहीही शक्य झालं असतं. बरोबर ना?"
"मॅडम, काय मस्करी करताय, शोभत नाही तुम्हाला. मी तुमच्या वडिलांच्या..."
"म्हणूनच मी मस्करी नाही केली, खरं तेच बोलले. तुमची मस्करी करण्याची माझी हिम्मत??"
"सायली... चल..." वरून महेश ओरडला.
"येते हं...काका..." सायली हसत म्हणाली.
साहेबराव तिच्याकडे बघतच राहिला.
◆◆◆◆◆
"काय म्हणत होता साहेबराव?"
"आमचं सिक्रेट आहे, तुला कशाला सांगू?"
"विनाकारण कशाला त्याच्याशी डोकं लावतेस?"
"मी नाही, तो माझ्या शेतात आला होता."
"सायली, अग शेत तुझंच आहे, पण साहेबराव शेती करतोय ना?"
"हम्म, हाच सगळ्यात मोठा इशू आहे."
"काय?"
"काही नाही."
"बरं, आता येईलच घर."
"मीही वाट बघतेय."
तेवढ्यात महेशने गाडी एका दुकानासमोर थांबवली. दुकान तसं मध्यम आकाराचाच होतं, पण माल खच्चून भरला होता. मागे एक छोटासा बंगला होता.
"काका, तुला कोण भेटायला आलंय बघ."
दुकानात बरेच गिऱ्हाईक होते. त्यांच्यातून वाट काढत एक माणूस बाहेर आला व तो महेश व सायलीकडे निरखून बघू लागला.
"पाहुण्याबाई कुठच्या?" त्याने महेशला विचारले.
"ओळख तूच."
"नाही ओळख पटत राव."
"कधी बघितलंय का?"
"नाही."
"तुला ना हेमंतकाका, हाणला पाहिजे. मोहनकाकांना तरी ओळखायचा ना तू?"
"ये, काहीही काय बोलतो? माझा जिवाभावाचा दोस्त."
"मग त्यांच्या मुलीला तू ओळखत नाही?"
हेमंत क्षणभर थबकलाच...
"काय???" तो उडीच मारायच्या बेतात होता. "सायली?"
"हो सायली. सायलीच..."
"देवा, किती मोठी झालीये ही. चला चला, आधी आत या."
तिघेही आत निघाले.
हेमंतचा बंगला तसा छोटेखानीच होता, पण छान सजवलेला होता.
थोडयावेळ औपचारिक बोलणं झालं. हेमंतच जास्त बोलत होता, आणि सायली ऐकत होती, पण अजूनही सायलीला हवा असलेला मुद्दा येत नव्हता.
"काका, एक विचारू?"
"विचार ना."
"पप्पा आणि तुम्ही, किती दिवस बरोबर होतात?"
"सहा वर्षे."
"पप्पा शाळेत कसा होता."
"राक्षस. नुसता राक्षस. प्रचंड हुशार, पण तितकाच चिडखोर, आणि इमोशनलसुद्धा. दर महिन्याला त्याचा शर्ट फाटायचाच मारामारीत."
"इतकं???"
"नको विचारू. कहर होता. गजानन तर त्याच्या वाऱ्याला उभा राहायचा नाही."
"अच्छा. मग पपा इतका का बदलला?"
"अग मोठेपणी सगळेच बदलतात. पण तो तर दहावीलाच बदलायला लागला होता."
"म्हणजे?"
"काही नाही, अग असच..."
"तुम्हाला माझी शपथ..." सायली पटकन म्हणाली.
"देवा..." हेमंतच्या चेहऱ्यावर वेदना स्पष्ट जाणवली. "सांगतो..."
"तो हळूहळू बदलला होता. थोडासा शहाणा झाला होता.
त्याचं कारण होतं, चेतना..." हेमंतचा चेहरा गोरामोरा झाला.
सायली उत्सुकतेने त्याच्याकडे बघतच राहिली.
"ये काका, काय सांगतोय?" महेश तर बावरलाच.
"दादा तू बाहेर जाशील प्लिज?" सायली म्हणाली.
"सायली?"
"प्लिज!!!"
महेश निमूटपणे बाहेर गेला.
"कोण होती चेतना?"
"सायली..."
"सांगा ना."
"अग, वेडेपणा होता तो."
"म्हणजे... चेतना आणि आम्ही, दररोज एकाच रोडने जायचो."
"बरं? आणि?"
"आणि... मोहनला ती खूप आवडायची. बस..."
"आणि?"
"आणि काय. काही नाही. संपलं."
"संपलं नाही. अजून सांगा."
"कसं सांगू तुला?"
"सांगा ना."
"अहो, बोलत काय बसलात. चहा घ्या." आतून हेमंताची बायको बाहेर आली.
"सॉरी काकू, मी सकाळीच चहा घेऊन आले. तुम्ही घ्या ना."
"अग असं कसं? जाऊदे, तुझं नाव मी विचारलंच नाही."
"मी सायली. सायली मोहन पटवर्धन. तुमचं नाव काकू?"
...आणि तिच्या उत्तराने सायलीला भोवळच यायची बाकी राहिली...
"छान. मी चेतना हेमंत पवार..."

क्रमशः

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Interesting होत चाललीये स्टोरी !
सोमवारपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आता..But no problem.. Happy

@मृणाली - धन्यवाद!
@मेघा - धन्यवाद!
@लावण्या - धन्यवाद!
@रुपाली - धन्यवाद!

आता कथांच scheduling चालुये, म्हणजे कुठलीही कथा मागेपुढे राहणार नाही.
थँक्स!!

छान...!!!
पुढील भागाच्या प्रतिक्षेत..

मस्त चालू आहे कथा. .
पुन्हा एकदा सांगते की सिरियलसाठी कथा - संवाद लेखन हा प्रांत आजमावून पहा..

एकदा सांगते की सिरियलसाठी कथा - संवाद लेखन हा प्रांत आजमावून पहा.. >> +11
Interesting.. छान पकड घेतलीय, पुढे काय होणार, याची उत्सुकता!