नातीगोती! - भाग ७

Submitted by अज्ञातवासी on 1 December, 2020 - 14:38

नातीगोती या कथेचे सर्व भाग दर सोमवारी प्रसिद्ध होतील!

भाग ६.५ - https://www.maayboli.com/node/77300

"एकशे वीस एकर म्हणजे किती?"
महेशने डोक्याला हात लावला. "खूप जास्त!"
"बरं..."
"फक्त बरं? अग थोडा तरी उत्साह दाखव."
"मी काय करू उत्साह दाखवून?"
"म्हणजे?"
"मी थोडीच ना यात भाज्या पिकवणार आहे... म्हणजे कांदा पिकवणार आहे."
"बरं चल, विहीर बघशील?"
"हो." सायली उत्साहाने म्हणाली.
विहीर शेताच्या टोकाला होती. महेशने जाईला कडेवर घेतलं.
"तसं मी कुणाच्या कडेवर बसत नाही." जाई फुशारकी मारत म्हणाली.
"हो आजीबाई, कळलं!"
विहिरीच्या टोकापर्यंत पोहोचत सायलीचा घाम निघाला.
"साठ लाख रुपये एकर भाव चालुये आता. विचार कर सायली."
"बहात्तर कोटी रुपये!" सायली शांतपणे म्हणाली.
"अख्या पिंपळगावात कुणाकडे एवढी प्रॉपर्टी नसेल."
"दादा आमच्या कंपनीचा वर्षाचा टर्नओवर एकशेवीस कोटी रुपये आहे."
महेश चमकलाच!
"पण पप्पा नेहमी म्हणायचा. आपल्या माणसांची आणि जमिनीची किंमत होत नाही. चल."
दोघेही परत निघाले.
◆◆◆◆◆
सूर्य पूर्ण कलला होता.
महेश आणि सायली रस्त्यापर्यंत पोहोचले. तेवढ्यात एक स्कॉर्पिओ त्यांच्यासमोर येऊन थांबली, व मागच्या दारातून एक माणूस उतरला.
"अरे वा, मोहनरावांची मुलगी आली, चांगलं झालं. नमस्कार!"
त्याने सायलीला नमस्कार केला.
"मी या शेतातला सालदार. सर्व शेती मी बघतो. मोहनरावांचा माझ्यावर खूप विश्वास. ते असताना कधीही शेती बघायला आले नाही, इतका विश्वास!" तो छद्मीपणे म्हणाला.
"नाही नाही, साहेबराव..." महेश गडबडला.
सायली आळीपाळीने दोघांकडे बघत होती.
"चला, निघतो आम्ही." थोड्या वेळाने तीच म्हणाली.
शेतातली पहिली फेरी तिथेच संपली.
◆◆◆◆◆
"काय मग, कसा गेला आजचा दिवस?" जेवणाच्या टेबलावर सगळे बसले होते.
"मस्त!" सायली बोलता बोलता म्हणाली.
"शेत पूर्ण फिरलीस?" गजानन म्हणाला.
"नाही, दोन दिवस लागतील मला एवढं फिरायला."
"बाबा, साहेबराव भेटले. जरा नाराज दिसले हिला सरळ शेतावर घेऊन गेलो तर."
"त्या मेल्याने का नाराज व्हायचं? शेती त्याच्या नाही, तर हिच्या बापाची आहे." पूर्णाआजी ओरडलीच.
"आता कराराने दिलीये, तर आपण गप्पच बसायचं. जेवा." गजानन म्हणाला.
"करार म्हणजे काय काका?" सायलीने उत्साहाने विचारले.
"म्हणजे, दरवर्षी साहेबराव मोहनला एकरी पन्नास हजार देणार. त्याच्या बदल्यात साहेबरावने शेतातील उत्पन्न घ्यायचं."
"पन्नास हजार, हं. जरा कमीच आहेत ना?" सायली म्हणाली.
"नीट मन लावून एकट्याने केली ना, एकरी कमीत तीन चार लाख कुठे नाही गेले. साहेबराव नाडतोय."
"मी जेवते. आज मला जाम झोप येतेय. तसंही, ह्या शेती वगैरे मध्ये मला इंटरेस्ट नाही. मला दुसरं काहीतरी शोधायचंय. गजाननकाका, पप्पाचे लहानपणीचे कुणी मित्र आहेत गावात?"
"लहानपणीचे? आठवावे लागतील"
"अरे कुणीतरी असेलच ना?"
"अरे हेमंत आहे ना... तुसुद्धा ना गजानन!"
"अरे हेम्या, विसरलोच बघ. हेम्याच!"
"बरं, उद्या मला त्यांना भेटायचंय."
"चालेल ना. भेटून ये. तुला बघून तोही आनंदीच होईल बघ."
"हम्मम्म."
बघता बघता सायलीने जेवण आटपलं, व ती शतपावलीसाठी अंगणात आली.
'एवढी जमीन घेऊन काय करायचं होतं पप्पाला?'
तिचं विचारचक्र थांबत नव्हतं.
ती चालून दमली, व सरळ झोपायला निघून गेली.
◆◆◆◆◆
सायली आता लहान झाली होती. लहानपणीची सायली.
पप्पाचा बोट धरून ती शेतात फिरत होती.
'सायली, ही जमीन आहे ना, ही माझ्या आयुष्यातली तू व तुझ्या मम्मानंतर सगळ्यात मोठी कमाई!
बघ ही आंब्याची झाडे! कितीही खा, संपणार नाहीत. हा आंबा, फणस, सीताफळ, चिकू. सगळं तुझ्या आजोबांच्या हातचं.
तू एकदा सेटल हो, मग बघ, दुसऱ्याच दिवशी मी रिटायर होतो, आणि शेतीकडे बघतो.'
'पप्पा, मीपण येईल तुमच्यासोबत.'
'नक्की ये! तुझी वाट बघेल मी. कायम!'
तिला खाडकन जाग आली!
तिने उशीत तोंड खुपसून मनसोक्त रडून घेतलं.

क्रमशः

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

@गौरी - धन्यवाद।
@गार्गी - धन्यवाद।
@मेघा - धन्यवाद।
@आसा - धन्यवाद।
@मृणाली - धन्यवाद।
@रुपाली - धन्यवाद।

या कथेचे पुढील सर्व भाग दर सोमवारी प्रसिद्ध होतील.