कुणाशी तरी बोलायचंय

Submitted by मी चिन्मयी on 4 December, 2020 - 18:43

इथे खूप धागे ऑलरेडी आहेत. त्यामुळे यात काय नवीन असं बर्याचजणांना वाटू शकतं. मुळात पर्सनल प्रॉब्लेम्स इथे कशाला मांडायचे असाही मतप्रवाह असू शकतो. पण मला गरज आहे. व्यक्त होण्याची. अनोळखी माणसं बरा ऑप्शन आहे कारण कुणी 'जज' करणार नाही. आणि केलंच तरी उद्या ऊठून त्यांना सामोरं जावं लागणार नाही.
‌माझं लग्न होऊन आता दोन वर्ष होतील. मी तिशीची आणि तो पस्तीशीचा असताना लग्न झालं. छानसं गोंडस पिल्लूही जन्माला आलंय. समाजाच्या दृष्टीने संसार फळाला आलाय. सार्थक झालंय. कुटुंब पूर्ण झालंय. पण आत कुठेतरी मी अपुर्णच राहिलेय. याचं कारण म्हणजे नवरा बायको म्हणून आम्ही एकत्र राहिलोच नाही. अगदी सलग १० दिवसही नाही. नवरा नोकरीनिमित्त बाहेरगावी असतो. विकेंड्सना घरी येतो. अर्थात ही गोष्ट लग्नाआधीही माहिती होतीच. पण तेव्हा या गोष्टीचा इतका त्रास होईल असं वाटलं नव्हतं. आणि कुठेतरी आशा होती की तो मला त्याच्यासोबत तिकडे घेऊन जाईल. पण हे बोलून दाखवण्याची हिम्मत झाली नाही. आणि त्याने सोबत नेलं नाही. लग्नानंतर १०-१२ दिवसांनी त्याची सुट्टी संपली आणि तो कामावर हजर झाला. नव्याचे नऊ दिवस नवीन ओळखी, नवीन घरात रुळण्याचा प्रयत्न यात विरून गेले. मग एकटेपणा जाणवायला लागला. फोनवर बोलणं व्हायचंच. पण ते पुरेसं नव्हतं. त्याची सोबत हवी होती. त्याला डोळ्यांसमोर बघायचं होतं. पण नाही. मग रात्री गुपचूप उशीत तोंंड खुपसून रडणं सुरु झालं. घरचे लोक काळजी घेत होतेच. पण ही मनस्थिती कुणाला सांगणार? अशातच मला एक जॉब मिळाला. माझा दिवस बाहेर जायला लागला. पण संध्याकाळ घरीच होती. आणि ता वेळ अक्षरश: जीव खायला यायला लागली. जॉब ही पळवाट झाली. स्वत:ला कितीही गुंतवून ठेवायचं म्हटलं तरी २४ तास काय करणार? नवर्यासोबत खटके उडायला लागले. छोट्या छोट्या गोष्टी हर्ट करायला लागल्या. फोनवर रडारड आणि घरच्यांसमोर हसतमुख चेहरा अशी कसरत सुरू झाली. एक वर्ष होत आलं.मनातली पोकळी अजूनच मोठी झाली. दोघांचं वय थोडं जास्त असल्याने 'चान्स' घ्यायचं ठरलं. प्रेगनन्सी कन्फर्म झाली. आनंदाचे वारे वाहायला लागले. थोडे दिवस छान गेले. पण पुन्हा ती पोकळी जाणवायला लागली. यावेळेस जरा जास्तच. हार्मोन्समुळे असेल कदाचित. पण एकटेपणा पुरता खायला उठला. सतत वाटायला लागलं की हे मुल नको. जिथे आपलंच नातं स्थिर नाही तिथे हे नवीन कशाला. पण अबॉर्शन करायला किती हिम्मत लागते हे तेव्हा कळलं. नाही जमलं. आता बाळ झालंय तेव्हा ते नकोच होतं ही फिलिंग प्रखर व्हायला लागलेय. पोस्टपार्टम डिप्रेशन गळ्यात पडलंय. पण त्याची सुरूवात तर खूप आधीच झालेय. प्रचंड चिडचिड, रडारड (पुन्हा घरच्यांपासून लपवूनच) होतेय. यात विचार जोर धरू लागलाय तो सगळं संपवण्याचा. स्वत:ला आणि बाळालाही. हे किती चुकीचं आणि अमानुष आहे याची कल्पना आहे. तरीही.
‌-बाळावर जीवापाड प्रेम आहे माझं. नवर्यावरही आहेच. पण आता सगळंच नको नकोसं वाटतंय. काहीच नकोसं वाटतंय.
‌-त्याने लग्नानंतर मला सोबत नेलं नाही कारण त्याला वेगळा संसार मांडायचा नव्हता. मी तयार झाले कारण तेव्हा एवढा त्रास होईल याची कल्पना नव्हती. नंतर माझ्या जॉबमुळे जाता आलं नाही आणि पुढे प्रेगनन्सीमुळे. तरीही बाळ झाल्यावर तो मला सोबत घेऊन जाणार असं ठरलं. पण मध्यंतरी त्याचे वडील कोरोनामधे गेले. तो एकुलता एक नसला तरी घरची जबाबदारी त्याच्यावर आली आणि पुन्हा माझ्या स्वप्नांना खिळ बसली. आता वेगळं होणं शक्य नाही.
‌-त्याची बदली इकडे व्हायला अजून ६ महिने आहेत. पण माझा पेशन्स संपलाय. आणि कशी कुणास ठाऊक पण त्याच्यासोबत जाऊन राहण्याची इच्छाच मेलेय. ज्याला एक नजर बघायला जीव तळमळायचा तो नजरेसमोर नको झालाय. सगळ्याचाच उबग आलाय.
‌- एकटीनेच रहायचं होतं तर मी लग्न कशाला केलं? सगळंच मनाविरूद्ध कसं काय आणि कधीपर्यंत? आता तो तयार आहे मला सोबत घेऊन जायला पण माझीच इच्छा नाहीये. सगळं फ्रस्ट्रेशन ओवरफ्लो व्हायला लागलंय आणि माझं बाळ त्यात भरडून निघायला लागलंय.
‌- माझे विचार चुकीचे आहेत, बाळाची यात काही चूक नाही, नवर्याचा नाईलाज आहे हे सगळं माहितेय मला. पण नाही सहन होत आता. नुसता सेल्फिश विचार करून भागत नाही तसं वागावंही लागतं कधीकधी. ते मला जमलंच नाही. मीच हट्ट करायला हवा होता.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

With a better mind सगळ्यांना धन्यवाद. जवळच्यांसमोर व्यक्त होण्यापेक्षा त्रयस्थांसमोर व्यक्त होणं सोपं हे प्रकर्शाने जाणवलं. सुरूवातीला फॅमिली डॉक्टरकडे गेले. त्यांनी थोडं काऊंसिलिंग केलं आणि अँटिडिप्रेसंट्स दिले. लवकरात लवकर एका होमिओपथिक डॉक्टरकडे जाण्याचा सल्ला दिला. लास्ट विकेंडला दोघेही तिथे गेलो. त्यांनी खूप प्रश्न विचारले, पूर्ण हिस्टरी जाणून घेतली. मग काऊंसिलिंग. इथे बर्याच जणांनी सुचवलेल्या गोष्टीच त्यांनीही सांगितल्या. 'अपेक्षा कमी ठेव आणि फक्त स्वत:कडे आणि बाळाकडे लक्ष दे' असं सांगितलं. औषधं चालू केलेत. थोडा परिणाम दिसतोय. पण हा सगळा स्ट्रेस बिल्ड व्हायला खूप वेळ गेलाय, तसाच तो कमी व्हायलाही वेळ जाईल असं सांगितलं.नवरा खूप काळजी घेतोय. मिळेल तितका वेळ सोबत घालवतोय. ओवरनाइट मिरॅकल शक्य नाही. पण सुरूवात तर केलेय. रोजचे पॅनिक अॅटॅक्स कमी झालेत. रडणं कमी झालंय. पुढे बघू.
But thanks a ton to all of you. Family outside the family.

मस्त गं चिन्मयी.
लवकर एका ठिकाणी राहायला याल आणि मग जमेल तशी मजा कराल या शुभेच्छा.
तोवर मन रमवायला भाडीपा चे डोनाल्ड ट्रंप आणि लॉकडाउन मधले अंबानी व्हिडीओ बघून टाक.

Good to know.
Was worried not seeing ur reply earlier.
Good to know that u r getting right help.

छान वाटले वाचून,मुळात काहीवेळा सोल्युशन पेक्षा ऐकणारा कान हवा असतो,व्यक्त होऊन मोकळं झालं की मार्ग स्वतःलाच सापडत जातो,
तुला खूप खूप शुभेच्छा

छान चिन्मयी तुझ्यतिल सकारात्मक बदलासाठी . तुझी आणि बाळाची काळजी घे.

काऊन्सेलिंग च्या वेळी तुझा नवरा पण बरोबर आला हे चांगले झाले. बर्याच नवीन गोष्टी त्याला सुद्धा कळल्या असतिल ज्या तू बोलू शकली नव्हतीस.

चांगल्या दिशेने प्रवास सुरू झालाय हे वाचून बरं वाटलं मी चिन्मयी ... शुभेच्छा.
आता पुन्हा असं दडपून ठेवू नका भावनांना, त्रासांना.
पूर्वपदावर आल्यानंतर Aroma therapy चाही वापर करता येईल रिलॅक्स रहाण्यासाठी.
होमिओपॅथी तज्ज्ञांकडे गेलाच आहात तर नंतर Bach flower therapy चाही विचार करता येईल. सद्ध्या एकात एक औषधे नकोत. ही ट्रीटमेंट पूर्ण होऊ दे.

छान वाटले वाचून,मुळात काहीवेळा सोल्युशन पेक्षा ऐकणारा कान हवा असतो,व्यक्त होऊन मोकळं झालं की मार्ग स्वतःलाच सापडत जातो,>>> +१.

अरे वा, मस्तच. छान वाटले तुमची प्रतिक्रिया बघून. तुम्हाला शुभेच्छा.

<< सगळा स्ट्रेस बिल्ड व्हायला खूप वेळ गेलाय, तसाच तो कमी व्हायलाही वेळ जाईल. >>
होईल सगळं छान, थोडा धीर धरा. ६ महिने बघता बघता जातील.

तुम्ही इथे येऊन अपडेट दिला, म्हणून धन्यवाद. बऱ्याचदा लोकं गायब होतात सल्ला मिळाला की. गप्पा मारायला येत रहा.

अरे वा, मस्तच. छान वाटले तुमची प्रतिक्रिया बघून. तुम्हाला शुभेच्छा.
तुम्ही इथे येऊन अपडेट दिला, म्हणून धन्यवाद. बऱ्याचदा लोकं गायब होतात सल्ला मिळाला की. गप्पा मारायला येत रहा. •••~~~~ +१२३४५६७८

वरच्या सगळ्यांशी सहमत. खुप बरं वाटलं तुझी प्रतिक्रिया वाचून. जीव भांड्यात पडल्यासारखा झाला. आता हळूहळू सगळं नीट होइल.

Pages