कुणाशी तरी बोलायचंय

Submitted by मी चिन्मयी on 4 December, 2020 - 18:43

इथे खूप धागे ऑलरेडी आहेत. त्यामुळे यात काय नवीन असं बर्याचजणांना वाटू शकतं. मुळात पर्सनल प्रॉब्लेम्स इथे कशाला मांडायचे असाही मतप्रवाह असू शकतो. पण मला गरज आहे. व्यक्त होण्याची. अनोळखी माणसं बरा ऑप्शन आहे कारण कुणी 'जज' करणार नाही. आणि केलंच तरी उद्या ऊठून त्यांना सामोरं जावं लागणार नाही.
‌माझं लग्न होऊन आता दोन वर्ष होतील. मी तिशीची आणि तो पस्तीशीचा असताना लग्न झालं. छानसं गोंडस पिल्लूही जन्माला आलंय. समाजाच्या दृष्टीने संसार फळाला आलाय. सार्थक झालंय. कुटुंब पूर्ण झालंय. पण आत कुठेतरी मी अपुर्णच राहिलेय. याचं कारण म्हणजे नवरा बायको म्हणून आम्ही एकत्र राहिलोच नाही. अगदी सलग १० दिवसही नाही. नवरा नोकरीनिमित्त बाहेरगावी असतो. विकेंड्सना घरी येतो. अर्थात ही गोष्ट लग्नाआधीही माहिती होतीच. पण तेव्हा या गोष्टीचा इतका त्रास होईल असं वाटलं नव्हतं. आणि कुठेतरी आशा होती की तो मला त्याच्यासोबत तिकडे घेऊन जाईल. पण हे बोलून दाखवण्याची हिम्मत झाली नाही. आणि त्याने सोबत नेलं नाही. लग्नानंतर १०-१२ दिवसांनी त्याची सुट्टी संपली आणि तो कामावर हजर झाला. नव्याचे नऊ दिवस नवीन ओळखी, नवीन घरात रुळण्याचा प्रयत्न यात विरून गेले. मग एकटेपणा जाणवायला लागला. फोनवर बोलणं व्हायचंच. पण ते पुरेसं नव्हतं. त्याची सोबत हवी होती. त्याला डोळ्यांसमोर बघायचं होतं. पण नाही. मग रात्री गुपचूप उशीत तोंंड खुपसून रडणं सुरु झालं. घरचे लोक काळजी घेत होतेच. पण ही मनस्थिती कुणाला सांगणार? अशातच मला एक जॉब मिळाला. माझा दिवस बाहेर जायला लागला. पण संध्याकाळ घरीच होती. आणि ता वेळ अक्षरश: जीव खायला यायला लागली. जॉब ही पळवाट झाली. स्वत:ला कितीही गुंतवून ठेवायचं म्हटलं तरी २४ तास काय करणार? नवर्यासोबत खटके उडायला लागले. छोट्या छोट्या गोष्टी हर्ट करायला लागल्या. फोनवर रडारड आणि घरच्यांसमोर हसतमुख चेहरा अशी कसरत सुरू झाली. एक वर्ष होत आलं.मनातली पोकळी अजूनच मोठी झाली. दोघांचं वय थोडं जास्त असल्याने 'चान्स' घ्यायचं ठरलं. प्रेगनन्सी कन्फर्म झाली. आनंदाचे वारे वाहायला लागले. थोडे दिवस छान गेले. पण पुन्हा ती पोकळी जाणवायला लागली. यावेळेस जरा जास्तच. हार्मोन्समुळे असेल कदाचित. पण एकटेपणा पुरता खायला उठला. सतत वाटायला लागलं की हे मुल नको. जिथे आपलंच नातं स्थिर नाही तिथे हे नवीन कशाला. पण अबॉर्शन करायला किती हिम्मत लागते हे तेव्हा कळलं. नाही जमलं. आता बाळ झालंय तेव्हा ते नकोच होतं ही फिलिंग प्रखर व्हायला लागलेय. पोस्टपार्टम डिप्रेशन गळ्यात पडलंय. पण त्याची सुरूवात तर खूप आधीच झालेय. प्रचंड चिडचिड, रडारड (पुन्हा घरच्यांपासून लपवूनच) होतेय. यात विचार जोर धरू लागलाय तो सगळं संपवण्याचा. स्वत:ला आणि बाळालाही. हे किती चुकीचं आणि अमानुष आहे याची कल्पना आहे. तरीही.
‌-बाळावर जीवापाड प्रेम आहे माझं. नवर्यावरही आहेच. पण आता सगळंच नको नकोसं वाटतंय. काहीच नकोसं वाटतंय.
‌-त्याने लग्नानंतर मला सोबत नेलं नाही कारण त्याला वेगळा संसार मांडायचा नव्हता. मी तयार झाले कारण तेव्हा एवढा त्रास होईल याची कल्पना नव्हती. नंतर माझ्या जॉबमुळे जाता आलं नाही आणि पुढे प्रेगनन्सीमुळे. तरीही बाळ झाल्यावर तो मला सोबत घेऊन जाणार असं ठरलं. पण मध्यंतरी त्याचे वडील कोरोनामधे गेले. तो एकुलता एक नसला तरी घरची जबाबदारी त्याच्यावर आली आणि पुन्हा माझ्या स्वप्नांना खिळ बसली. आता वेगळं होणं शक्य नाही.
‌-त्याची बदली इकडे व्हायला अजून ६ महिने आहेत. पण माझा पेशन्स संपलाय. आणि कशी कुणास ठाऊक पण त्याच्यासोबत जाऊन राहण्याची इच्छाच मेलेय. ज्याला एक नजर बघायला जीव तळमळायचा तो नजरेसमोर नको झालाय. सगळ्याचाच उबग आलाय.
‌- एकटीनेच रहायचं होतं तर मी लग्न कशाला केलं? सगळंच मनाविरूद्ध कसं काय आणि कधीपर्यंत? आता तो तयार आहे मला सोबत घेऊन जायला पण माझीच इच्छा नाहीये. सगळं फ्रस्ट्रेशन ओवरफ्लो व्हायला लागलंय आणि माझं बाळ त्यात भरडून निघायला लागलंय.
‌- माझे विचार चुकीचे आहेत, बाळाची यात काही चूक नाही, नवर्याचा नाईलाज आहे हे सगळं माहितेय मला. पण नाही सहन होत आता. नुसता सेल्फिश विचार करून भागत नाही तसं वागावंही लागतं कधीकधी. ते मला जमलंच नाही. मीच हट्ट करायला हवा होता.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

मी_चिन्मयी, बिग हग! इतक्या पहाटे धागा काढलास, झोप झाली रात्री की जागीच होतीस? थोडं खाऊन घे मग चर्चा वाचायला ये. तोवर मायबोलीकर लिहीतीलच काही उपयोगी. (परिचय नसताही थोडं अधिकाराने लिहीले आहे कारण अशा घालमेलीत जेवण-खाणाचे तीन तेरा होतात.)

मी सुद्धा जागा आहे पहाटेपर्यंत.. पण पिक्चर बघत Happy

कोणाशी तरी बोलायचेय हा विभाग माबोवर याचसाठी सुरू झालाय की वैयक्तिक विषयावर बोलता यावे.
पण धागा टेंपररी डुप्लिकेट आयडी न वापरता ओरिजिनल आयडीने काढला आहे असे लक्षात येतेय. याला नक्कीच फार गटस लागतात. कौतुकच वाटले !

अश्या नाजूक विषयावर काही सल्ला द्यावा ईतकी माझी पात्रता नाही. ते बाकीचे छान देतीलच.
पण वर जे आपण लिहिलेय त्यातील एक वाक्य आशादायी वाटले,
>>>> त्याची बदली इकडे व्हायला अजून ६ महिने आहेत
>>>
तर आपले आयुष्य फेजेसमध्ये चालते. कुठलीही एक फेज वा स्थिती कायम राहात नाही. हे ही दिवस जातील हे सगळीकडे लागू होते. आणि तुमच्या केसमध्ये तर ते स्पष्ट दिसत आहे. बाकी हे मधले दिवस लवकरात लवकर जाओ यासाठी तुम्हाला शुभेच्छा Happy

पण मुळात हे दिवस कधी जातील असा विचारच करू नका. उलट या फेजमध्ये काही चांगले घडत असेल ते एंजॉय करा. आपल्याला मिळणारा पर्सनल टाईम कसा वापरता येईल हे बघा. कारण कदाचित ते तुम्ही पुढच्या फेजमध्ये मिस कराल.
आणि सध्या तुम्ही जे उपलब्ध नाही तेच आयुष्य आहे अशी स्वताची समजूत करून घेतली आहे. पण त्यापलीकडेही आयुष्यात ईतर काही असेलच. आणि तुमच्या आसपासच असेल. या प्रश्नावरून फोकस हटवा आणि थोडा प्रकाश ईतर गोष्टींवर टाका Happy

आधीचा ताण आणि पोस्टपार्टमने अजून ताण वाढला आहे.

चांगल्या सायकॅट्रीस्टकडे लवकर जा. खूप काळ हा ताण सहन करू नका. इतक्या वेदना, वेगवेगळे विचार, कधी राग, कधी हताशा , कधी गिल्ट, अशा आंदोलनामुळे मन नाजूक होते, स्वतःला आणि मनाचा हा त्रास थांबवण्यासाठी लवकर डॉक्टरांकडे जा. समुपदेशक नाही, डॉक्टर.

गरज असेल तर ते समुपदेशकाचा सल्ला घ्यायला सांगतील.

हापण काळ जाईल. त्रास संपेल आणि सुखाचं आयुष्य लवकरच सुरू होईल.
शुभेच्छा.

मी स्वानुभवने सांगत आहे. शरीराच्या वेदना सांगता येतात, मनाच्या सांगताही येत नाहीत. त्यात काय एवढं असं लोकांना वाटतं. आपल्याला काय दुखतंय त्यावर बोट ठेवता येत नाही. कोणाचा उपाय पटत नाही.

तुम्ही आधीच एक दोन वर्षे त्रासात काढलीये , आता ताण वाढू देऊ नका. डॉक्टरांच्या उपायांमुळे खरंच त्रास कमी होईल, पूर्ण जाइलही.

हे वाचणं सुद्धा पेनफुल आहे माझ्यासाठी. मनाचं दुखणं फार वाईट, शारीरिक दुखणं परवडलं एकवेळ पण हे नको.

पण यात एक गंमत आहे, शरीराचं दुखणं बरं करायला डॉक्टर लागतो, पण मनाचं दुखणं बरं करायला आपण स्वतः पुरेसे असतो. पॉझिटिव्ह रहा, फक्त सहा महिन्यांचा प्रश्न आहे वगैरे सांगण्याची तुम्हाला गरज नाहीच आहे, कारण ते तुम्हाला कळतंय. लिहिताना भरून आलेलं तुम्ही इथं व्यक्त केलंत इतकंच. तो भर ओसरला असायला हवा एव्हाना. अजूनही तसेच विचार येत असतील तर प्लिज कुणाशीतरी समोरासमोर बोला. एखादी छान मैत्रीण असेलच की तुम्हाला. इथं अनेक सल्ले येतील पण तुम्हाला समजून घेणं, तुमच्या डोळ्यात बघून तुमची वेदना वाटून घेणं इथं कुणाला जमणार नाही. आणि हो, त्या मैत्रिणीला येताना एखादी मोठ्ठी कॅडबरी सांगायला विसरू नका. तुम्ही यातून नक्की बाहेर पडाल. शुभेच्छा!

लग्न केल्या नंतर संसार कसा असावा ह्या मध्ये तुम्ही काही तरी मनात ठरवलेले असणार.
1) जसे संसार दोघांनाच असावा
2) दोघांनी एकत्र च राहायला हवं आणि त्या मध्ये तिसरे कोणी नसावे.
म्हणजे बाकी कुटुंब.
हे तुमच्या मनात एकदम पक्क चित्र असावे भावी संसार विषयी.
आपण जे ठरवतो किंवा जे घडावे अशी तीव्र इच्छा असते ती गोष्ट घडली नाही की जबरदस्त निराशा येते किंवा राग येतो.
ह्या दोन्ही भावना तुमच्या मनात येत आहेत.
तुमच्या मनासारखे घडले नाही म्हणून तुम्ही निराशेने पछाडलेल्या आहात आणि त्याच बरोबर नवरा,मुल ह्यांच्या विषयी मनात राग सुद्धा उत्पन्न होत आहे.
ह्याला एकच उपाय आहे तुम्हाला तुमचे मन दुसऱ्या ठिकाणी गुंतवावे लागेल.जीवनातील लहान सहान प्रसंगात आनंद मिळवावा लागेल.
वेगवेगळ्या गोष्टीत रस दाखवला लागेल त्या मधून आनंद निर्माण करायला लागेल.
जॉब जात आहात तर तेथील कामांत मन रमवयला लागेल.
मी माझ्या कामात सर्वोत्तम होईन असा विचार करून इंटरेस्ट नी जॉब करावा .
साधी बस जरी आपल्या वेळेनुसार आली नाही तरी माणसाची चीड चीड होते.
मानवी मन असेच असते ..त्या वर नियंत्रण ठेवणे गरजेचे.
जीवनात अनेक वेळेला आपल्या la हवं तसे घडत नाही तेव्हा निराश होवून चालत नाही.
जीवन खूप सुंदर आहे काही एक दोन कारणासाठी निराश होण्या एवढे संकुचित नक्कीच नाही..

Mee chinmayee, this is post partem depression.
Please please get help.
Talk to husband via professional help even if you dont want him in front of you.

There is fb mommy groups for post partem - u can get lot of help. Do you want to join? I can find out details. (I am part of another mommy group which is extremely helpful and genuine - i have seen mom's who need help refer to pp group.
Pm me if u want.(vipu or sampark)
Please please dont try to handle it yourself. People saying "stay positive" mean well but sometimes they may not understand it can be beyond one's control.
Take care and good luck.
~love and hug from one mom to another!

कित्येक वेळा आपल्याला आपल्या तात्कालिक स्थितीचा इतका कंटाळा आलेला असतो की त्यापेक्षा वेगळी स्थिती जर समोर आली तर आपण फारसा विचार न करता त्यात उडी घेतो. उडी घेऊन स्थिरस्थावर झाल्यावर लक्षात येते की ही स्थितीही आपल्याला फारशी रुचत नाहीये, जशी असेल असे वाटले होते तशी नाहीये. मग वेध लागतात त्यातून बाहेर पडायचे. निर्णय पूर्ण विचारांती घेतले नाही तर हे चक्र सुरूच राहते. मग स्थिती काहीही असो, नोकरीबदल, जागाबदल, लग्न कुठलीही.

तूमचे लग्न खरेतर उशिरा वगैरे झाले नाहीय पण कदाचित तेव्हा तसे वाटले असेल, सामाजिक प्रेशर असतो, लोक मुद्दाम विचारतात व व. त्यामुळे चांगला मुलगा मिळाल्यावर एकत्र राहता येणार नाही हे माहीत असूनही तुम्ही हो म्हटले असावे. फारसा विचार केला नाही. मूलही इतरांनी आता आधीच उशीर वगैरे म्हटल्यामुळे त्या प्रेशरमुळे जन्माला घातले असावे. मनापासून आता मूल हवेय असे वाटले असावे/नसावे. तेव्हाच्या एकटेपणाच्या कंटाळ्यावर मूल हे उत्तर वाटले असावे. आता परत कंटाळा वाट्याला आला.

आता यातून मार्ग एकच की काहीही मार्ग काढायचा प्रयत्न करू नका. एक गोड बाळ, ज्याला काहीही माहिती नाही, आईने आपल्याला ऊब द्यावी व दूध तोंडी द्यावे ह्यापेक्षा काही अपेक्षा नाहीत असे गोड बाळ तुमच्याकडे आहे. तुम्ही पूर्णवेळ त्याला बघा, त्याच्याकडे लक्ष द्या. बाहेरच्या जगात दिवस जातील, 6 महिने संपतील, तुम्हाला कळणारही नाही. बाळ भरडून निघतेय लिहिलेत. असे करू नका. त्याच्या मानसिक वाढीवर याचे परीणाम होतील, तुम्हाला नंतर याचे वाईट वाटेल.

आपल्या हाती काहीही नसते, असतो तो फक्त आत्ताचा क्षण. तो क्षण जगा, बाळासोबत जगा. बाकी आयुष्यात उणीवा भरपूर आहेत, त्या दूर करणे आपल्या हाती नाही. हाती आहे फक्त हा आत्ताचा क्षण कसा घालवायचा एवढेच. तो बाळाशी हसत हसत घालवा, बाळही हसरे होईल.

तुम्हाला जसा त्रास होतोय तसा नवऱ्यालाही होत असणार. तो जेव्हा तुम्हाला भेटतो, दोघे एकत्र असता तेव्हा नेहमीच एकत्र नसल्याचा तणाव त्या वेळेस राहिला तर तो एकत्र असण्याचा वेळही फुकटच गेल्यासारखा. यातली कुठलीही परिस्थिती तुमच्या हाती नाहीये. त्यामुळे जी परिस्थिती समोर आली तिचा आनंद घ्या. जे मिळत नाही/मिळाले नाही ते डोक्यातून काढून टाका आणि समोर जे आले त्याचा आनंद घ्या.

तुम्ही डॉक्टरी मदत घेत आहात असे तुमच्या इतर धाग्यात आहे. विचारी समंजस आहात. त्यामुळे सगळे संपवून टाकायचा विचार डोक्यातून काढून टाका. हे करून तुम्हाला काहीही लाभ नाही.

मी_चिन्मयी, प्लिज ताबडतोब चांगला काउंसिलर गाठा. तुमच्या गायनॉकशी संपर्क साधा. तुम्ही ज्या मानसिक ताणातून जाताय त्याची त्यांना कल्पना द्या.
नवऱ्याने या काळात जवळ असायला पाहिजे होते वगैरे वाटणे सहाजिक आहे. पण आत्ता फोकस स्वताच्या पोस्ट डिलिव्हरी रीकवरीवर द्या. तुमचे शारीरिक आणि मानसिक हिलींग खूप महत्वाचे आहे. त्यासाठी तुम्हाला हवी असेल ती मदत घ्या/ मागा. तुम्ही आणि तुमचे मूल आता प्रायोरीटी आहात. काळाजी घ्या प्लिज.

मी चिन्मयी, बिग हग.
रिमोट संसार अत्यंत वैतागवाडी असतात.म्हणजे स्पष्ट भाषेत बोलायचं तर लग्नाने आलेले सर्व निर्बंध तर मिळाले पण फायदे तुकड्यातच मिळाले असं.खाया पिया कुछ नही ग्लास तोडा बारा आना सारखं.(बाकी उदात्त गोष्टी 'लग्न म्हणजे नुसतं नवरा बायको नव्हे, पूर्ण कुटुंब,लांब राहिलं तर काय झालं, सासरप्रति हे कर्तव्य' वगैरे आपला नवरा शेजारी कायम असल्यावर मान डोलवायला बऱ्या.)
डॉ ची मदत घेच.ती मिळेपर्यंत जे काही स्वतःला आनंदी ठेवेल ते नक्की कर.आवडत्या मालिका, पुस्तकं वाच.नानबा ने सांगितलेला फेसबुक ग्रुप जॉईन कर.

बाळ ही पूर्ण वेळ मानसिक रित्या दमवणारी जबाबदारी असते.अगदी नवरा बरोबर आहे आणि तरीहि नवऱ्याचे ऑफिस मध्ये 11 तास झाल्यास 'मीच एकटी घरी अडकलेय' म्हणून चिडचिड होते.माझ्या एका मैत्रिणीने मिळत असलेली 6 महिना मॅटरनिटी लिव्ह कमी करून बाळ झाल्यावर 4 महिन्यात परत ऑफिस चालू केले.

जमल्यास दिवसातले 2-3 तास बाळाची नीट व्यवस्था करून काहीतरी कारणाने घराबाहेर जाता आल्यास उत्तम.(एखादा क्लास किंवा योगा मेडिटेशन वगैरे लाऊन)
आणि तोंडदेखलं फेसबुक पोस्ट बोलत नाहीये.आम्ही आहोत.पुण्यात तू कुठे आहेस त्यावर जवळच्या मायबोलीकर मैत्रिणींशी बाळासाठी 1-2 तास मदत लागली तर नक्की संपर्क करून बघ.
या प्रतिसादात खूप इंग्लिश शब्द आलेत.घाईत लिहिला.

ही फेज पण लवकर जाईल.तोवर खंबीर राहायचे आहे.

नवऱ्याशी या विषयावर बोललीस का? त्याचं काय म्हणणं आहे? त्यालाही ही परिस्थिती बदलायला हवी आहे का? जर बदलायला हवी असेल तर त्यासाठी कसा मार्ग काढायचा हे दोघांनी मिळून ठरवा.
सहा महिन्यांनी तुम्ही एकत्र येणार असलात तर हा वेळ चांगल्यात चांगल्या प्रकारे कसा घालवता येईल याचा विचार कर. सहा महिन्यांनंतरच्या त्या दिवसाची वाट पहात झुरत बसलं तर काळ आणखी सावकाश जातो.

बाळाला सांभाळायला घरात बाकी माणसं आहेत ना? बाळापासूनही थोडा थोडा ब्रेक घेत रहा.

'नवरा नजरेसमोरही नकोसा वाटणे' ही तात्पुरती फेज आहे, हे नक्की. विशेषतः मुळात तुमच्यात काही गंभीर प्रॉब्लेम्स नसल्याने. त्यामुळे डोंट वरी. माणसांच्यात रहा. एकटी एकटी नको. ही फेज जाणार आहे यावर विश्वास ठेव आणि आत्ता जे आहे तेही काही वाईट नाहीये, हेही नक्की लक्षात ठेव.
छान हेल्दी बाळ जन्माला आलंय, डिलिव्हरी सुखरूप झाली आहे, हे सकारात्मक आहेच ना.

चिन्मयी.. . वरचे सगळे प्रतिसाद कळकळीने दिलेले आहेत त्यांवर विचार करून बघा .
दोघे एकत्र असता तेव्हा नेहमीच एकत्र नसल्याचा तणाव त्या वेळेस राहिला तर तो एकत्र असण्याचा वेळही फुकटच गेल्यासारखा>> साधना यांनी हे जे लिहिले आहे ना तेही महत्त्वाचे आहे. विशेषतः तुमच्या वैवाहिक जीवनाच्या दृष्टीने. या दोन्ही प्रकारच्या परिस्थितीतून गेल्याने सांगत आहे की काळ हेच औषध आहे यावर. अर्थात समुपदेशन हवंच, पण स्वतःदेखील यातून मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. मागे मला वाटते प्रेग्नन्सी मध्ये असताना स्तोत्रांच्या धाग्यावर तुम्ही काही मार्गदर्शन विचारले होते. तर त्याचा अवलंब करून जर आताही मन शांत होत असेल तर ते करून बघायला हरकत नाही. तुम्ही लवकर यातून बाहेर पडावं म्हणून शुभेच्छा.

पहिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं- तुम्ही तुमच्या डॉक्टरांशी पोस्ट पार्टम डिप्रेशनबद्दल बोलला आहात का? नसेल तर एकदा बोलून घ्या. गायनॅक, फॅमिली डॉक्टर किंवा अगदी बाळाचे पेडियट्रिशियन यापैकी जिथे बोलायला कम्फर्टेबल आहात आणि भेट होऊ शकेल तिथे बोला. हल्ली हे खूप कॉमन आहे त्यामुळे डॉक्टर नक्कीच मदत करू शकतील.

दुसरं- थोडा मिस्टरांच्या दृष्टीने विचार करायला हवा. त्यांचे वडील करोनाने अचानक गेले म्हणताय म्हणजे तो त्यांना मोठाच मानसिक धक्का असणार. घरची जबाबदारी, जॉब करत राहणं, नवीन बाळाची जबाबदारी, पित्याचं छत्र हरपले हे सगळं overwhelming असेल. सो त्यांनाही थोडा वेळ द्या, तुमच्याकडून सपोर्ट द्या.

सगळ्यांनाच thanku. इतका वेळ काढून मला प्रतिसाद देताय आणि समजूनही घेताय त्यासाठी.
बर्याच जणांना वाटतंय की मी फक्त एकाच गोष्टीचा विचार करत बसलेय. तसं नाहीये. सून म्हणून, आई म्हणून जमेल ते सगळंच करते आहे मी. त्याबद्दल कुणाचीच काही तक्रारही नाहीये. मी,नवरा आणि बाळ हे स्वप्न कुणाचं नसतं? सगळ्यांचच असतं. माझंही आहेच. पण एकत्र कुटुंबात रहायला माझी काही हरकतही नाहीये. मला त्याच्या कुटुंबासोबत रहायला लागतंय याचा त्रास नाहीये, मला 'फक्त 'त्याच्या कुटुंबासोबत रहायला लागतंय हा त्रास आहे. लग्न झाल्यापासून दोघांना निवांत असा वेळ मिळालाच नाही. आणि मुळात मी introvert असल्याने या गोष्टी कुणाला बोलून मोकळं होणं जमलंच नाही. त्यामुळे सगळं साचत गेलंय आणि आता सहन करण्यापलीकडे गेलंय. नवर्याशी बोलणं होतं पण कुठेतरी सगळी चीड बाहेर पडते आणि शेवटी भांडणच होतं. वर म्हटलंयाप्रमाणे जे दोन दिवस आमच्या वाट्याला येतात ते कितीही प्रयत्न केला तरी सुखाने जात नाहीत. Pretend तरी किती करणार?
मन गुंतवायला दुसरं काही करायला वेळच नाहीये. घरातलं काम, बाळाचं काम यात पुर्ण दिवस जातोच. पण विचार करायला वेगळा वेळ कुठे हवा असतो? ते तर सतत डोक्यात चालूच असतात.
डॉक्टरची गरज आहे आणि लवकरच जाणारही आहे. पण तोवर कुठेतरी व्यक्त होणं गरजेचं होतं. म्हणून इथे.
नवर्याला सपोर्ट करण्याबाबत म्हणाल तर एवढी मोठी ट्रॅजिडी झालेय घरात. मी समजून घेतलंच आहे. त्याच्यामागे कसलाही लकडा लावलेला नाही. पण आता समजून घ्यायची पाळी त्याचीही आहे असं मला वाटतं.

"मला त्याच्या कुटुंबासोबत रहायला लागतंय याचा त्रास नाहीये, मला 'फक्त 'त्याच्या कुटुंबासोबत रहायला लागतंय हा त्रास आहे. "
अगदी योग्य शब्दात मांडलंस.आणि हा त्रास असणं पूर्ण नैसर्गिक आहे.वयाची 26-27 वर्षं एका घरात काढल्यावर दुसऱ्या घरात, दुसऱ्या कुटुंबात स्वतःला पूर्ण वाहून घ्यायचं तर हे सर्व ज्याच्यासाठी केलं तो नवरा हा बोनस हवाच.
तुला जे वाटतं त्यात कोणताही गिल्ट मानून घेऊ नकोस.
डॉक्टरभेट, आणि बी12 डी व्हिटामिन टेस्ट सुद्धा ते सांगतीलच.व्हिटामिन कमी मुळेच असं होतं असं नाही.पण व्हिटामिन आणि थायरॉईड संतुलित असेल तर त्रास थोडा कमी होती आणि लवकर आनंदी व्हायला फायदा होईल.
तुला सध्या जे वाटतंय ते पूर्णपणे सध्याच्या परिस्थितीत अगदी योग्य आहे.इथे मन मोकळं नक्की कर.

मी काही वर्षाच्या संसार मधून एक गोष्ट शिकलो आहे बायको जर रागात असेल तर कसलाच विरोध न करणे आणि शांत पने ऐकुन घेणे.
राग हा थोड्या वेळच असतो नंतर त्याची तीव्रता कमी होते.
पण विरोध केला की भांडण वाढत नवीन मतभेदाचे विषय तयार होतात.
मनात क्लेश निर्माण होतो.
आणि असेच वरचे वर घडत गेले की काही वर्षांनी किती ही प्रिय व्यक्ती असेल तरी नकोशी वाटते.
डोळ्या समोर पण नकोशी वाटते.
हेच वागणे मी बायको कडून सुद्धा अपेक्षित करतो.
मी रागात असेन तर तिनी काही वेळ शांत राहवे विरोध करू नये .
राग ओसरला की माणूस शांत होतो स्वतःच्या चुकीची पण जाणीव होते.
ह्यांचा प्रश्न मध्ये पण त्यांच्या नवऱ्याने हीच भूमिका घ्यावी.
मतभेद हळू हळू कमी होतील

लोकांना प्रत्येक वेळी सल्लेच हवे असतात असं नाही. व्यक्त व्हायची इच्छा असते. जागा असतेच असं नाही.

चिन्मयी यांनी हे सगळं लिहिलंय म्हणजे कुठे काय बिनसतंय हे त्यांना उमगलंय. मार्गही त्यांचा त्या शोधत आहेत. तो लवकर मिळो यासाठी शुभेच्छा!

चिन्मयी, तुझ्या पुढील आनंदी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा!
लवकरच हि वेळ निघून जाईल.. यातून बाहेर पडशील आणि सगळं छान होईल... शुभ्राला खूप खूप लाड !!

डॉक्टरची गरज आहे आणि लवकरच जाणारही आहे.
पण आता समजून घ्यायची पाळी त्याचीही आहे असं मला वाटतं.
>>> बरोबर. ही तुमच्या एकटीची समस्या नाहीय, interpersonal relationship issue आहे. दोघांंनीही सोबत डॉक कडे जायला हवे. लौकर मार्ग मिळण्यास शुभेच्छा.

चिन्मयी
खूप शुभेच्छा....
आता दिवस कठीण जाताहेत खरं -पण होईल सर्व ठीक.. तुझ्या नवऱ्या बरोबरचं सहजीवन असावं, बाळ होतानाच्या स्थित्यंतरात त्याची पूर्ण साथ असावी /त्याने आधार व्हावं असं वाटण्यात काहीही चुकलं नाहीए

वर अनेकींनी लिहिल्या सारखी वैद्यकीय मदत तू घेणार आहेसच - बाकी सध्या फोकस स्वतः वर ठेव.. सगळं नीटच होणार आहे

चिन्मयी पोस्टपार्टम डीप्रेशनसाठी लवकरात लवकर तज्ञांना भेटा. आणि नवरा त्याच्या सेटलमेंटच्या ठिकाणी नेत असेल तर नक्की जा. फक्त तिथेही डीप्रेशनसाठी सपोर्ट मिळेल याची काळजी घ्या.
मन त्याच त्या विचारात गुंतत असेल तर मुड फ्रेश करणारी गाणी, थोडी योगासने किंवा चालण्याचा व्यायाम, स्तोत्र वगैरे वापरून पहा.

नवर्याला व तुम्हाला फॅमिली काउंसलरकडे जाण्याची गरज आहे.तुमच्या नवर्याला संसार म्हणजे गंमत वाटत आहे असे वाटते.तुम्हाला सध्या त्याचा राग येतोय कारण भुतकाळातली त्याची वागणुक.फॅमिलि काउंसलरकडे जाणे योग्य ठरेल.

तुमच्या वैद्यकीय समस्या अन्य धाग्यावर ओझरत्या वाचल्या होत्या पण बाळंतपण, त्यातून निर्माण होणार्‍या प्रकृतीविषयक अडचणी याची माहिती नसल्याने काही लिहीले नाही.
पोस्टपार्टम डिप्रेशन असेल तर वैद्यकीय मदत अनिवार्य आहे, हे नक्की. नवर्‍यासोबत वा एकट्या, बाळाच्या भल्यासाठी लौकरात लौकर जाणे गरजेचे.

पहिले बाळंतपण म्हणून माहेरी जाणे शक्य नव्हते का? थोडा रिलीफ मिळाला असता.
आता सासूबाई एकट्या पडतील म्हणून जाऊ शकत नसाल तर आई / मावशी / काकू / आत्या कुणी रहायला येऊ शकतील का एखाद महिना, हे पहा.
किंवा धाकट्या बहिणींपैकी कोणी. जिची तुम्हाला सोबत वाटेल, जिच्याशी तुमचे चांगले जमते, गप्पा होतात अशी, जिच्यावर बाळ सोपवून तुम्ही स्वतःसाठी १-२ तास वेळ काढू शकाल. बाहेर जाण्यासाठी, निवांत झोपण्यासाठी ( जे सासू / जाऊ यांच्याबाबतीत शक्य होणार नाही कदाचित)

कित्येक महिन्यांचा मानसिक ताण साठलेला आणि आता बाळामुळे शारीरिक दगदग, अपुरी झोप
+ एकत्र कुटुंबातील गुणी सुनेच्या दुखर्‍या जागा काही असतील तर ---- याचा कडेलोट झालाय.

अतिविचार, उलटेसुलटे विचार करून काही साध्य होणार नाही. तकतकलेले डोके योग्य निर्णय घेऊ शकणार नाही. चुकीचा निर्णय अजून गोत्यात आणेल.

दिशा दिसेनाशी झाली की की स्वस्थ बसावे काही काळ. का ही ही न करता. धुके दाटल्यावर पुढे पाऊल टाकणे इष्ट नाही, ते दरीत जाऊ शकते, तसे. थोड्या बसा, वाट पहा, धुके निवळेल. मग ठरवा कुठे कसे जायचे.

प्रचंड चिडचिड, रडारड (पुन्हा घरच्यांपासून लपवूनच) होतेय. यात विचार जोर धरू लागलाय तो सगळं संपवण्याचा. स्वत:ला आणि बाळालाही. >>>>>

ही नवीन चूक होईल इतकेच म्हणेन सद्ध्या. जुन्या चुका बघायच्या तर जज करावेच लागेल. पण त्या आहेत. नंतर वाटले तर लिहीन.

सगळं स्फोट व्हायच्या लेवलला येईस्तोवर दाबून ठेवून, माझं सगळं मस्त चाललय हा मुखवटा घालून फिरायची सवय सोडावी लागेल. अन्यथा हा लाईफ पॅटर्न होऊन जाईल. विषय/कारणे वेगळे असतील, परिस्थिती हीच राहील.

अतिताणाने बीपी व त्यातून अन्य किचकट आजारपणे उद्भवली, तर तुम्ही जगात आणलेल्या जिवाचे भवितव्य काय हाही मुद्दा आहेच. मुलगा असेल तर करेल कोणी कौतुकाने, मुलगी असेल तर भरवसा नाही....

यावर सगळे संपवणे हा इलाज नाही, हे कळण्याइतक्या तुम्ही सूज्ञ आहात हे तुमच्या लिखाणावरून कळतेय पण अविचाराचा शहाणपणावर विजय व्हायची एक घातवेळ असते. त्यादिशेने प्रवास करू नका ही विनंती.

इथे सगळे आहेतच,
+ कोणी जवळची मैत्रीण, जिथे तुमचा मुखवटा काढून मन मोकळे करू शकाल, समोरासमोर बसून. तिच्याशी बोला.
जी स्पर्शातून, नजरेतून, केवळ सोबत असण्यातून तुम्हाला रिलॅक्स करेल...

माझं मी निभवेन, कशाला त्यांना त्रास, मी आधी काही बोलले नाही आता अचानक हे सगळे कसे उघड करू -- याने फक्त तुमचा लोड वाढेल, हाताबाहेर जाईल.
बोलल्याशिवाय प्रश्न सुटत नाहीत, मागितल्याशिवाय मदत मिळत नाही. हाक मारली तर एक ओ नक्की येईल.
इथेच २०-२५ आल्या ५ तासात..?
काल रात्रीपर्यंत किती जणांना माहिती होते मी चिन्मयीना काही खुपतेय?

तुमच्या वैद्यकीय समस्या अन्य धाग्यावर ओझरत्या वाचल्या होत्या पण बाळंतपण, त्यातून निर्माण होणार्‍या प्रकृतीविषयक अडचणी याची माहिती नसल्याने काही लिहीले नाही//

ते दिसतच आहे की तुम्हाला माहिती नाहीये. कारण सॉरी टू से पण मला तुमची पोस्ट unnecessarily harsh वाटली. त्यानी ऑलरेडी लिहिलंय की जज करू नका.
नवीन बाळासोबत पहिलं वर्ष हा काळ टफ असतोच बरेचदा, मग क्लिनिकली डायग्नोज झालेलं पीपीडी असो वा नसो. पण हेही दिवस पटापट निघून जातात.

>> लोकांना प्रत्येक वेळी सल्लेच हवे असतात असं नाही. व्यक्त व्हायची इच्छा असते. जागा असतेच असं नाही.
+१११

१. टोकाचे विचार मनात येतात तेंव्हा "अतिविचाराने मनाला आलेली गुंगी आहे, बाकी याला अर्थ नाही" इतके मनाला बजावत रहा बस्स. विचारांच्या गर्तेत जात आहोत असे जाणवल्यास दीर्घ श्वास घ्या.
२. आपणास comfortable वाटेल तिथे व्यक्त होत राहा, हलके वाटेल. सुदैवाने कनेक्टेड जगात आपण आहोत. मायबोली व अन्य सोशल साईट्सवर चांगले फोरम्स/ग्रुप्स आहेत.
३. नेटवर (युट्युब/प्राईम/नेटफ्लिक्स इ) Inspirational, Comedy etc व्हिडीओज आहेत ते पहात रहा.मानसिक थकवा येतो तेंव्हा कैकदा विमानांचे टेक ऑफ घेतानाचे व्हिडीओज पाहून सुद्धा उर्जा येते Happy गमतीशीर वाटेल पण हे खरे आहे. मानवी मन हे फार गूढ पद्धतीने काम करते. त्यास योग्य ट्रिगर मिळावे लागतात.
४. स्वत:स कार्यमग्न ठेवा, व्यस्त ठेवा, वाचनाची आवड असेल तर त्यात व्यस्त ठेवा.

लवकरात लवकर तज्ञांना भेटा(लच). हि एक छोटी फेज आहे यातून बाहेर याल यात काही शंकाच नाही. आपणास शुभेच्छा!

कारवी अगदी माझ्या मनातले लिहिलेत. कदाचित इतक्या छान प्रकारे मी लिहू शकले नसते.

ज्या अर्थी चिन्मयी यांचा नवरा एकुलता एक मुलगा नाही म्हणजे चिन्मयीला जाऊ -ननंद असावी. पण त्यांच्या सासर्याच्या मृत्युनंतर चिन्मयी सोडून इतर लोकानी एकट्या पडलेल्या सासूबाईची काळजी कोणी घेतलेली दिसत नाही.

आधिच चिन्मयी आणि नवरा याना एकत्र कमी वेळ मिळतो आणि त्यात बाळ आणि सासू ची जबाबदारी एकटीवर ज्यात नवरा नसतो. त्यामुळे चिडचिड होत असावी.

इतर भावंडानी सासूबाईला थोडे महिने रहायला नेले तर चिन्मयीला थोडा स्वतः साठी वेळ मिळेल. हे इतर नातेवाईकांना किंवा चिन्मयीच्या नवर्याला कळायला हवे होते.
चिन्मयीची सासू असली तरी त्यांचा नवरा आणि इतर भावंडांची आई आहे. ते सगळे चिन्मयीच्या गळ्यात त्यांची जबाबदारी टाकून मोकळे. वडिल गेल्यानंतर आईलाही मानसिक आधराची गरज आहे हे त्या स्वार्थी लोकांच्या लक्षात येऊन सुद्धा जबाबदारीची टाळाटाळ करित आहेत. हेच चिन्मयी च्या रागाचे कारण असावे.

जास्त बोलले असेन तर माफी असावी.

कारवी यानी सुचवलेले पर्याय अगदी योग्य आहेत

मानांचे टेक ऑफ घेतानाचे व्हिडीओज पाहून सुद्धा उर्जा येते .....मानवी मन हे फार गूढ पद्धतीने काम करते. त्यास योग्य ट्रिगर मिळावे लागतात. >>>>
हे खरे आहे. आणि हा ट्रिगर अनपेक्षितही असतो. कधी कधी केल्यावर कळते की अरे इतके सोपे होते या गुंत्यातून सुटणे आपण आधी का नाही ट्राय केले.

Submitted by सनव on 5 December, 2020 - 11:39 >>>> सहमत.
प्रत्येकजण आपल्या दृष्टीकोनातून वाचतो / अर्थ लावतो. लिहीणार्‍याचा तो तसाच असतो किंवा नसतोही.
तरीपण, माझे 'जज' करणारे मुद्दे मी मांडलेलेच नाहीत, एकही नाही, कारण ही ती वेळ नव्हे.
मला त्यांना जे सांगावे असे आतून, प्रामाणिकपणे वाटले तेच लिहीले. लिहावेच असे वाटले तेव्हा लिहीले.

सियोना, जास्त नाही लिहीले तू. पण चिन्मयीने लिहीले आहे की सासरे करोनाकाळात गेले. त्या काळात चिन्मयी प्रेग्नंट असेल तर तिला एकटीला टाकून सासू नणंदे/जावेकडे नाही गेली ते एका अर्थी बरेच म्हणायचे. पण अशावेळी कुणीकुणाला सांभाळायचं हा प्रश्नच असतो. आता तो काळ संपला आहे. Hard part is over.

या धाग्याच्या निमित्ताने आज मी पण जरा मनातलं बोलतो. चार साडेचार वर्षांपूर्वी माझं लग्न झालं. बायको मेडिकल फिल्डमधली आणि मी इंजिनिअर. ती मिरजेत आणि मी मुंबईत. सुरवातीला दोघे एकमेकांकडे यायचो जायचो. तीन वर्षे याच्यातच गेली. तुमच्यासारखं माझ्या बायकोलाही वाटायचं कि एकत्र राहावं. पण नाईलाज होता. शेवटी बेबी झाल्यावर मी मिरजेतच यायचं ठरवलं. कंपनीनेही wfh ला मंजुरी दिली. सुरवातीला जेव्हडं चांगलं वाटत होतं तेव्हडंच हे प्रकरण नंतर डोकेदुखी ठरायला लागलं. बायकोच्या ड्युटीत मुलीला सांभाळायचं आणि उरलेल्या वेळेत कंपनीचं काम करायचं असा दिनक्रम सुरु होता. कधी कधी रात्री दीड दोन वाजायचे. तरीही सगळं मॅनेज करत होतो. पण नंतर कोरोना आला आणि सगळ्यांनाच wfh मिळाला. याचा तोटा असा झाला कि कंपनीचा वर्क रिपोर्ट जो आठवड्याला पाठवायला लागायचा तो आता दिवसाला द्यायला लागत होता. मला आता १६ तासाची ड्युटी लागली होती. त्यात पुन्हा आठवड्यात बायकोच्या दोन नाईट शिफ्ट असल्या कि रात्री फक्त तीन ते चार तास व्यवस्थित झोपायला मिळायचं बाकी वेळ जागाच. त्यात भरीस भर म्हणजे बायको कधी हॉस्पिटलमधून कोरोना आणेल सांगू नाही शकत. खूप वैताग यायचा या रुटीनचा. चिडचिड, नकोसं व्हायचं. असं वाटायचं कुठे झक मारली आणि लग्न केलं आणि बेबीचा चान्स घेतला. खोटं नाही सांगत पण आत्महत्येचा विचार माझ्या पण मनात एकदा आला. पण नंतर बोललो चाळीस एक वर्षांनी आपण मरणारच आहोत तर आताच कशाला घाई करा. तीस वर्षे कधी निघून गेले समजलं नाही. उरलेली चाळीस वर्षेही अशीच पापणी फडकायच्या आत निघून जातील. जे होईल ते होणारच आहे आपण फक्त दोरीवरच्या बाहुला आहोत हा मोड ऑन केला. जे होतंय ते होऊ दे. यापेक्षा काय वाईट होणार आहे? आता होईल ते चांगलंच होईल. नकारात्मक विचार दलदलीसारखे असतात जेव्हडा जास्त विचार कराल तेव्हडे त्यात अडकून पडलं. ताप आल्यावर मी सडकून मटणाचा सूप पितो, कंपनीची मिटिंग असली तरीही फाट्यावर मारून ९ ते १० ट्रेडिंग करतो, दुपारी सगळे झोपल्यावर मस्त बासरी वाजवतो, आवडती वेब सिरीज बघताना मधूनच कंटाळा आला कि राजकारणी धाग्यांवर वेड्यावाकड्या कमेंट्स टाकतो, संध्याकाळी कधीतरी विनाकारण सायकलवर लॉन्ग राईड करायला जातो. काय होणार आहे वाईट होऊन होऊन मरणारच आहोत ना तोपर्यंत थोडं जगून घेऊ. लहान असताना पतंग उडवताना जेव्हा पतंग खूप उंचावर जातो तेव्हा एक वेळ अशी येते कि आपला त्यावर कंट्रोल नसतो. वेडावाकडा, गोल फिरत तो कुठेही उडायला लागतो. तीच वेळ असते मांजा ढिला सोडायची. तुम्ही जोरजोरात मांजा खेचायला लागलात तर परिस्थिती नियंत्रणाबाहेर जायची शक्यता अधिक असते. आयुष्यात एकदा मांजा ढिला करून बघा पतंग नियंत्रणात येईल.

Pages