बांद्रा वेस्ट- २२

Submitted by मिलिंद महांगडे on 4 December, 2020 - 03:31

बांद्रा वेस्ट- २२

                               दोघे घरी आले तेव्हा कोणालाच काही सुचत नव्हतं  . एक ए पी आय जामसंडे पुरेसा  नव्हता तर त्यांच्या पुढे आता वैनीसाहेब  येउन उभी राहिली  रॉड्रिक आधीच इन्स्पेक्टर जामसंडेला दहा करोड देण्याचं काबुल करून बसला होता . दहा करोड तर सोडाच पण त्याच्याकडे खर्च करण्यासाठी दहा रुपयेही शिल्लक नव्हते . त्या गुंडांचा कोकेनचा  बॉक्स पोलिसांच्या ताब्यात होता .  हे  त्या वैनीसाहेबांच्या  टोळीला सांगून उपयोग नव्हता . तो बॉक्स  दोन दिवसात परत करू असा वायदा मॉन्ट्या देऊन बसला होता , आणि तेही अशक्यच होतं . 

“ आता दोन्ही बाजूंनी अडकलो आपण  ”  मॉन्ट्या  रडकुंडीला येउन म्हणाला  , “  आयला ,  ती वैनीसाहेब  मधेच कुठून टपकली  ?  तरी नशीब , ऐन वेळी मला काहीतरी सुचलं  आणि वेळ मारून  नेली ” 

“  एग्झाक्ट्ली  ! ,  त्या इन्स्पेक्टर जामसंडे च्या बाबतीत पण मी हेच केलं  होतं  . आता तुला पटलं  कि नाय  ?? ” रॉड्रिकच्या बोलण्यावर मॉन्ट्याने नुसती होकारार्थी मान हलवली .  दोघेही पुन्हा शांतपणे बसून राहिले . मॉन्ट्या तर डोकं दोन्ही हातात धरून खाली मान घालून बसला . 

“ आयला , डोकं फुटायची वेळ आली . काय करायचा तरी काय आता  ? आता फक्त दिवस मोजत बसायचा … दिवस कसले ? तास मोजत बसायचाय  …  काही तासांचा तर सवाल  आहे .  हां  … पण आपल्या हातात एक गोष्ट आहे  … आता फक्त हे ठरवायचा कि कुणाच्या हातून मरायचा ते   !!  तुला काय वाटतं  रॉडी   ?  त्यातल्या त्यात मला जामसंडे बरा  वाटतोय . तो निदान केस करून आपल्याला खडी  फोडायला तरी पाठवेल .  पण ती वैनीसाहेब  तर  आपल्याला गोळीच घालेल … मरण्यापेक्षा जेल बरी … ! पण त्या जामसंडेचा  पण भरवसा देता  येत नाय  . त्याचा डोका  फिरला तर तोही एन्काउंटर  करायचा आपला …  आयला , दोन्ही साईडनी  लटकलोय  आपण यार … ! ”  मॉन्ट्या बराच वेळ काहीतरी बडबड  होता . रॉड्रिकच त्याच्याकडे लक्षच नव्हतं  . तो खालमानेने कुठेतरी शुन्यात बघत होता . अगदी एकटक ! त्याच्या डोळ्यांची पापणीही हलत नव्हती . जणूकाही बसल्या बसल्या त्याचा पुतळा झाला होता . मॉन्ट्याने त्याच्याकडे एकवार बघितलं. रॉड्रिकला तसा बसलेला पाहून त्याला एकदम त्याची दयाच आली . काल परवापर्यंत हसणाखेळणारा रॉडी आता निस्तेज निष्प्राण होऊन बसला होता . त्याला तसं  बघवत नव्हतं  मॉन्ट्या उठून खिडकीबाहेर पाहू लागला . बाहेरचं जग तसंच धावत होतं . रोजच्यासारखं .  काही वेळ तसाच शांततेत गेला . अचानक कसल्यातरी आवाजाने मॉन्ट्याने मागे वळून  पाहिलं . रॉड्रिक घाई घाईने आतल्या खोलीत जात असलेला त्याने पहिला . ‘ इतक्या तातडीने हा का आत गेला  ? ‘ मॉन्ट्याला त्याचा संशय आला आणि तोही त्याच्या मागोमाग आतल्या खोलीत गेला . रॉड्रिकने त्याच्या वडिलांच्या रूम मधलं मोठं कपाट  खाडकन  उघडलं .  आणि आतल्या कप्प्यांमध्ये काहीतरी शोधू लागला . कपाटात असलेलं सामान  , कपडे  बाहेर टाकू लागला .   ‘ हा काय करतोय ? त्याचं  डोकं बिकं फिरलं  नाही ना ? ‘ मॉन्ट्या त्याच्याकडे  आश्चर्याने पाहू लागला . शोधता शोधता रॉड्रिक एका ठिकाणी अचानक थांबला . बहुतेक त्याला हवी  असलेली वस्तू मिळाली होती . कपाटातून त्याने जी वस्तू बाहेर काढली ती बघून तर मॉन्ट्याच्या पायाखालची जमीन सरकली . रॉड्रिकच्या हातात एक जुन्या काळातली रिव्हॉल्वर होती . आणि तो तिच्याकडे एकटक बघत होता .  त्याच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती . सायको  लोकांच्या डोळ्यात असते तशी !  

“ रॉडी  , हे काय ?  ” मॉन्ट्याला काही कळेना . त्यावर रॉड्रिक  काहीच बोलला नाही . नुसता त्या रिव्हॉल्वर  कडे बघत राहिला .  ‘ रॉडीच्या डोक्यावर परिणाम तर झाला नाही  ना ? , टेन्शन  मुळे  त्याच्या डोक्यात आत्महत्येचा विचार वगैरे आला नसेल ना ? ‘ अचानक मॉन्ट्याच्या डोक्यात ट्यूब पेटली , काहीतरी केलंच पाहिजे , त्याने एकदम रॉड्रिकच्या अंगावर झडप घातली . आणि त्याच्या हातातली  रिव्हॉल्वर खेचण्याचा प्रयत्न करू लागला . 

“ रॉडी  , वेडा  झालायस का ? डोका  बिका  फिरलंय का काय ?  ” त्याच्या हातातली रिव्हॉल्वर खेचत मॉन्ट्या म्हणाला . 

“ मॉन्ट्या सोड … ”

“ नाय , मी नाय सोडणार … तू सायको झालायस . ठीक आहे  हा खूप मोठा प्रोब्लेम आहे पण सुसाईड  त्यावरचा उपाय नाही …  ”

“  मॉन्ट्या  हॅव  यु गॉन  मॅड  मी कशाला मरायला सुसाईड  करू ? ”  

“ तेच तर म्हणतोय न मी ….  आं … म्हणजे तू  ….???  मग हे  कशाला  ? ”  त्याच्या डोक्यात अजून प्रकाश पडेना . 

“ रिव्हॉल्वर फक्त सुसाईड  करण्यासाठी नसते मित्रा   …. ”   रॉड्रिक  त्या रिव्होल्वर कडे निर्धाराने बघत म्हणाला . मॉन्ट्याने त्याच्या हातातली रिव्हॉल्वर सोडली . 

“ आयला …. आपल्याला वाटला कि तूझ्या डोक्यात कसला तरी फ्युज उडाला … सॉरी  यार  ”  मॉन्ट्या  कसनुसं  तोंड करून म्हणाला . अगदी  उत्साहाने आपला मित्र समजून एखाद्याच्या पाठीवर थाप मारावी आणि तो दुसराच कोणीतरी निघाल्यावर  होतो तसा मॉन्ट्याचा चेहरा झाला .  “ माझ्या डोक्यात एक प्लान आलाय . ये बस . सांगतो तुला …  ” रॉड्रिक  आणि  मॉन्ट्या  बाजुच्या सोफ्यावर बसले . जसजसा रॉड्रिक  सांगू लागला तसतसा मॉन्ट्याचा चेहरा उजळत गेला . 

“ आईला रॉडी  ,  आपला तर विश्वासच बसत नाय …  असा सगळा होईल काय ? ” सगळा प्लान ऐकल्यावर मॉन्ट्या  अविश्वासाने त्याला म्हणाला . 

“ डेफिनेटली … ”

“ तुला भरोसा आय ना  … मग बास … आपण  आहे तुझ्या बरोबर …  बघू भेन्चोद , होऊनच जाऊ दे च्यामायला … ”

“ नाय मॉन्ट्या  , तू आत्तापर्यंत माझ्यासाठी खूप काही केलंयस . आणि मी तुला माझ्या ह्या प्रोब्लेम मध्ये आणखी त्रास देणार नाही . आता जे होणार आहे त्यात खूप रिस्क आहे . मला तुझा जीव धोक्यात नाही घालायचा .  हे काम मी  एकटाच करणार . ” 

“ काय ?  तू असं  का बोलतोयस  ? ”

" तुला सांगितलं ना !  या कामात खुप रिस्क आहे.  जरा जरी मिस्टेक झाली तर जीव पण जाऊ शकतो. " 

" जीव जाऊ शकतो काय ? ” मॉन्ट्या थोडा विचार  करू लागला .  “  मग आता तर मी तुला एकटा सोडणारच नाय... आयला  ह्या सगळ्या प्रकरणात  मी  सुरुवातीपासून तुझ्याबरोबर होतो. आणि संकटाच्या वेळी तुला एकट्याला टाकुन जाऊ काय ? "

" मॉन्ट्या यु डोंट अंडस्टँड... त्या नोटेचा शोध घेणं सोपी गोष्ट होती. त्यात काही रिस्क नव्हती .  बट नाऊ सिच्युएशन  has बिकम वर्स्ट ... आता ती नोट मिळणं जवळजवळ इम्पॉसिबल आहे. आता आपण वेगळ्याच प्रॉब्लेम मधे अडकलोय. त्यात  आपला शेवट निश्चित आहे. आय मिन माझा...!  त्यामुळे तु आता ह्यात पडु नको. आय विल मॅनेज.... " 

" आहा रे ...!  आला मोठा मॅनेज करणारा ... हिच का आपली दोस्ती ... भेंचोद,  मजा मारायला दोस्त.... आणि प्रॉब्लेम आला कि गांड दाखवायची ?  रॉडी साल्या,  आपण तसला दोस्त नाय.... आता जे तुझं होईल ते माझं  .... परत असलं काय बोल्लास तर याद राख..." 

मॉन्ट्याच्या बोलण्यावर रॉड्रीकला काय बोलावं ते सुचेना. खरं तर रॉड्रिक ला मनातून वाटत होतं  कि मॉन्ट्या त्याच्या बरोबर असावा . आणि आता तो तसं म्हणाल्यामुळे त्याला खूप मोठा आधार मिळाल्यासारखा  वाटला .  तो नुसता मॉन्ट्याकडे बघत राहीला.  त्याच्या डोळ्यात पाणी केव्हा आलं त्याचं त्यालाही कळलं नाही.  मॉन्ट्याने त्याला मिठी मारली 

" साले .... साथ जिये थे .... अब मरेंगे तो भी साथ साथ.... तसही आपल्याला करमणार नाही यार तुझ्याशिवाय.... " दोघांचेही खांदे अश्रुंनी ओले झाले होते. 

क्रमशः

लडाखचे  प्रवासवर्णन

Ladakh Bike Trip – दुचाकी लडाखायण 1

माझी अर्धदशक  नावाची कादंबरी वाचण्यासाठी खाली लिंक दिली आहे

https://www.mehtapublishinghouse.com/book-details/ARDHADASHAK/3048.aspx

Amazon link

https://www.amazon.in/Ardhadashak-Milind-Mahangade/dp/9353174163/ref=sr_...

Flipkart Link

https://www.flipkart.com/ardhadashak/p/itm7149b4896e81d?pid=978935317416...

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users