लहान मुलांना आस्तिक बनवावे की नास्तिक?

Submitted by ऋन्मेऽऽष on 1 December, 2020 - 12:20

आमच्याकडे मी नास्तिक आहे.
आई वडिल बायको तिघेही आस्तिक आणि रीतसर देवधर्म सांभाळणारे आहेत.

पण एक गोष्ट चांगली आहे की जेव्हापासून मला कळायला लागले आहे माझ्या नास्तिकत्वात माझ्या आईवडिलांनी कधी लुडबूड केली नाही.
तसेच जेव्हा मलाही प्रगल्भता आली तेव्हापासून मी देखील त्यांच्या आस्तिकत्वाला काय तो मुर्खपणा अश्या नजरेने बघितले नाहीये.

लग्न झाल्यावर आम्ही दोघांनी देखील हेच धोरण अवलंबवले आहे. एकमेकांच्या विचाराचा आदर करणे.
प्रसाद आहे तर तो खाल्लाच पाहिजे, वा खाल्लास तर मला बरे वाटेल असे भावनिक आग्रह ती कधी करत नाही.
तसेच ज्याप्रकारे तिला सोबत द्यायला म्हणून मी शॉपिंगला जातो, तीच भावना मनात ठेऊन तिला केवळ सोबत द्यायला म्हणून नेहमी तिच्या बरोबर मंदिरातही जातो. भले मग तिथे जाऊन दर्शन न घेता तिच्या चपला सांभाळायचे काम का करत असेना. तिलाही यावर काही आक्षेप नसतो.

मग मुले झाली. त्यांना आपण नेहमीच देवाधर्माबाबत सकारात्मकच सांगतो. जगात देव असो वा नसो, तो त्यांच्या गोष्टीच्या पुस्तकात, कथांत, चित्रपटात, कार्टून कार्यक्रमातही ईत्र तित्र सर्वत्र पसरला आहे. त्यामुळे देव हि संकल्पना लहानपणापासूनच त्यांच्या परीचयाची होते. घरातही त्यांचे फोटो, मुर्त्या असतात, ज्यांची रोज पूजा होते. मग तो देव असूही शकतो वा नसूही शकतो हा विचार लहान वयातच त्यांच्या डोक्यात घालण्यात काही अर्थ नाही. बिचारे गोंधळूनच जातील. त्यामुळे मी माझे नास्तिक विचार आजवर कधीच मुलांसमोर मस्करीतही उघड केले नाही. त्यांच्यासमोर कधी अशी चर्चा होऊ नये याचीच काळजी घेतली.
हो, पण उगाच त्यांना जास्तीचे देव देव करायला लावणेही मला पटत नाही. ते सुद्धा आजवर घरात कटाक्षाने पाळले गेलेय.

सध्या नवीन घरात नवीन देव्हार्‍याचे उद्घाटन झाल्यापासून बायकोने आधीच ठरवल्याप्रमाणे रोज संध्याकाळच्या दिवेलागणीच्या वेळी आरती सुरू केली. त्यानंतर मुलगी रोज शुभंकरोती कल्याणम सुद्धा म्हणते. माझ्या वर्क फ्रॉम होमचा त्यावेळेस महत्वाचा टाईम असतो. दिवसभराच्या कामाच्या मीटींग्ज असतात. त्यामुळे मी कामात बिजी असतो. माझे वर्क डेस्क अगदी देव्हाराच्या समोरच आहे. म्हणजे काय गंमत आहे बघा, मी रोज सतत देवाला बघतच त्यासमोर चार फूटांवर बसून काम करत असतो Happy
आणि तरीही मी त्यांच्या पूजा आणि आरतीपासून अलिप्त असतो. लेकीची शुभंकरोती आणि तिला लेकाने दिलेली साथ तेवढी कौतुकाने ऐकतो. प्रामाणिकपणे सांगायचे तर दिवसभर दंगा मस्ती करून घर उठवणारी मुले अचानक गुणी बाळासारखी वागताना बघून छानच वाटते. त्यानंतर आरती झाल्यावर आरतीचे ताट माझ्यासमोर बायको घेऊन आलीच तर स्टाईलमध्ये त्या दिव्यावरून हात फिरवून मग तो डोक्यावरून फिरवतो Happy

परवा मुलगी तिच्या आवडीचे काहीतरी हस्तकला शिल्पकला करत पसारा मांडून बसली होती. बरेच दिवस होमवर्क न केल्याने आधीच मायलेकींमध्ये तणतण झालेली. अश्यात तिच्या आईने आरतीची वेळ झाली म्हणून तिला हाक मारताच तिने नकार दिला. मी लेकीला म्हटले, "जा ग्ग, शुभंकरोती नाही म्हणायचीय का तुला आज.. हे नंतरही करता येईल.."

त्यावर तिचे ऊलट उत्तर आले, तू तर पप्पा रोज आरती चालू असताना आपले काम करत बसतोस. मग मलाच का सांगतो आहेस?

रोज एकूणच हे माझे वागणे मुलं ऑब्जर्व्ह करत असतील असे माझ्या डोक्यातही नव्हते. मला खरेच यावर काय उत्तर द्यावे समजले नाही. उगाच पटकन काही बोलून जायचे आणि मुले तेचा पकडून बसायचे असे नको होते.

मुले आपले बोललेले ऐकत नाही तर अनुकरण करतात याची कल्पना आहे. मग मलाही तिने हे करावे असे वाटत असेल तर माझा विश्वास असो वा नसो मला आरतीला उभे राहावे लागेल का? पण त्याचवेळी असाही प्रश्न पडतो की तिने हे करणे खरेच गरजेचेच आहे का ज्यासाठी मी सुद्धा ते करावे जेणेकरून ती अनुकरण करेल.

जिथे आईबाबा दोघे आस्तिकच वा नास्तिकच असतील तिथे हा प्रश्न कदाचित पडत नसेल असे वाटते. जिथे अशी स्थिती नसते तिथे तुमचे धोरण काय असते?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुमच्या देवाबद्दलच्या ज्या संकल्पना आहेत त्या मुला/मुलीला समजावून सांगा व त्या का तश्या आहेत तेही समजावून सांगा. पुढे मुले स्वतःहून जे करायचे आहे ते करतील.

इच्छा असेल तर तुम्ही रिचर्ड डोकिन्स यांचे गॉड डिल्युजन व डेविल्स चॅपलेन ही दोन पुस्तके वाचा. या दोन्ही पुस्तकात मुलांना कसे वाढवावे यावर स्वतंत्र चॅप्टर्स आहेत.

घरात देव आहेत पण त्यांची पूजा कोणी करत नाही. घर बदललं की पुढच्या सणापर्यंत देव खोक्यात बंद असतात. मग दसरा, दिवाळी, पाडवा अशा मराठी सणांना हुक्की आली तर गंध वगैरे लावुन पूजा करायला ते बाहेर निघतात. एकदा बाहेर आले की बाहेरच असतात. पुजेनंतर कधी आरती केली तर झांजा, घंटा वाजवायला लागलं की मुलं येतात. त्यांना त्याच्या मनाला येईल तेव्हा घंटा घेऊन वाजवायला बंदी नसते. आंघोळ कर इ. उपचार सांगितले तरी अगदी जेवताना घंटा बडवायची लहर आली तर बडवा. त्यावर बंधन घालत नाही. प्रसाद म्हणून दिलेली साखर ते परत परत मागून खातात.
देव, पूजा हे उपचार देवापेक्षा मला पूर्वीच्या आठवणीत घेऊन जातात, तो नॉस्टेल्जिआ वर्षातून एखाददा छान वाटतो. मुलं मोठी झाली की त्यांचा नॉस्टेल्जिआ वेगळा असेल.
टूथ फेरी, सँटा जसा खरा आहे मानून वर्तन करतो तसाच गणपती बाप्पा ही आपल्याला सगळं देतो असंच सांगतो. देव काही देत नाहीये हे त्यांना ही दिसतच असेल. त्यांना आणखी अक्कल आली की कळेलच.
भारतात असताना कुठे आरती चालू झाली की ठार अश्रद्ध असलो तरी पावलं तिकडे वळतात आणि हाताने टाळ्या वाजवल्या जातात. धुपाचा वास, कापूर, आरतीचे सूर, लय, ठेका ह्याचं ती तसंच. शुभंकरोती च्या वेळी मुलं शांत मनाने बसत असतील आणि ते शांत बसणं तुम्हाला हवं असेल तर तुम्हीही ते करायला लागा. मुलांनी पुस्तक वाचायला सांगण्यापेक्षा आपण वाचून दाखवली आणि मग वाचत बसलो की जशी आवड निर्माण होते तसंच. देव का आणखी काही... ती एक संधी (अपॉर्चुनिटी) मानून त्यांच्या जवळ त्या विषयावर बोलून हळूच एक विचाराचं पिलू डोक्यात सोडता येतं.

घाटपांडे सर छान पोस्ट शेअर केलीत.
त्यातीलच एक वाक्य ईथे कोट करतो जे त्याचे सार आहे,
>>
बालकांच्या मनावर जर श्र्द्धाभावना बिंबवली तर त्यांची तर्कशक्ती खुंटते.
>>
पटले हे मला. या अनुषंगाने नक्की विचार करून निर्णय घेतो.
वरच्या एका पोस्टमध्ये म्हटल्याप्रमाणे लेकीला सहज गप्पा मारताना माझी नास्तिकत्वाची भुमिका का आहे हे सांगू शकतो. म्हणजे तिला तो विचार सुद्धा मिळेल. आणि तुम्ही शेअर केलेल्या लेखात दिल्याप्रमाणे देव बाहुलीसारखाच असून तो बोलू कसा शकतो या विचारांनी तिचा गोंधळ उडणार नाही.तिच्या तर्कबुद्धीला छेद जाणार नाही. देव म्हणजे पुराणातले थोर पुरुष आहेत. मुर्ती हे त्यांचे रुप वा प्रतीक आहे. असे ढोबळमानाने तिला वाटले तरी चालेल. जर सांताक्लॉज वगैरे कोणी खरा नसतो हे तिला माहीत आहे तर देव काही देतो हे तरी का मनावर बिंबवावे. जसे कुठल्याही वस्तूला पाय लागल्यावर पाया पडायला आपण मुलांना शिकवतो. ज्याला संस्कार म्हटले जाते. तसेच दिवेलागणीच्या वेळी दिव्याच्या पाया पडून शुभंकरोती म्हणावे आणि कृतज्ञता व्यक्त करावी असे समजावणे पुरेसे आहे.

हायझेनबर्ग,
मोठे होता होता आपण आपल्यातील निरागसता कुठेतरी हरवून बसतो ते याच भितीने कि कोणीतरी त्यावर अप्रगल्भतेचा शिक्का मारेल Happy

आपण धागा वाचला असेल तर आता मला आपल्याकडून विषयावर पोस्ट अपेक्षित आहे. कारण आपण नेहमीच वेगळा विचार करता. आपला दृष्टीकोण जाणून घ्यायला आवडेल.:)

आस्तिक म्हणजे नेमके काय व नास्तिक म्हणजे नेमके काय ?
स्वतःहून देवपूजा, आरती किंवा इतर काहीही करायचा कंटाळा पण कोणी दुसरे करत असेल तर प्रसादाला हात पुढे, वाटेत प्रसिद्ध मंदिर अनायासे दिसले तर आत जाऊन डोके टेकवणे याला आस्तिक म्हणत नाहीत. आस्तिक बनणे किंवा त्या वाटेवर साधे पाऊलही उचलणे हे अतिशय कठीण आहे. कारण जन्माला आल्यापासून पदोपदी संस्कार, आचरण, उच्चार या सर्व गोष्टीतुन एक कंडिशनिंग मुलावर घडत असते. हे कंडिशनिंग ओळखणे ही महाकर्मकठीण गोष्ट आहे. त्यातून बाहेर पडणे हे त्याहीपेक्षा कठीण. त्यामुळे आपण आस्तिक आहोत असे समजत असू तरी तसे प्रत्यक्ष असूच असे नाही, किंबहुना नसतोच. बहुतेक आस्तिक प्रखर बुद्धी असलेले असतात असे पाहिलंय आणि त्यांच्या बोलण्यालिखाणातून त्याचा प्रत्यय येतो. मायबोलीवरील अश्चिग हे मला मायबोलीवर माहित असलेले एक आस्तिक आहेत.

मुलांना आस्तिक की नास्तिक बनवणे पालकांच्या फारसे हातात नाही असे आस्तिकांचे अनुभव वाचून वाटते. आस्तिकांनाही तेच कंडिशनिंग मिळते जे नास्तिकांना. पण स्वबुद्धीच्या बळावर आस्तिक कंडिशनिंग ओळखून ते नाकारतात. नाकारण्याची हिम्मत ठेवतात कारण हे कंडिशनिंग नाकारणे प्रचंड कठीण आहे.

अर्थात वर जे लिहिलेय ते माझे मत आहे, तेच वैश्विक सत्य आहे असा माझा दावा नाही, त्यामुळे उगीच वाद घालण्यात रस नाही.

घाटपांडे, लिंकबद्दल आभार. खूप छान विचार मांडलेत. पण वाचताना कुठेतरी वाटून गेलं की हे विचार असलेला माणूस सुसंस्कृत जगात श्वास घेऊ शकेल. सध्याचे जग इतके बार्बारीक होत चाललेय की त्यात अशा माणसाची घुसमट होणार. तो शांतपणे जगू शकणार नाही.

>>लहान मुलांना आस्तिक बनवावे की नास्तिक?<<
नास्तिक, विथ ऑल कॅपिटल लेटर्स. लहान मुलं हि मातीच्या गोळ्या सारखी असतात. विनाकारण त्यांच्या मनांत भंपक/भ्रामक संकल्पना घुसडुन त्यांची कोरी पाटि कलुषित करु नकोस. हे माझं, स्वानुभावाने दृढ झालेलं मत. (बाकि सण/उत्सव साजरे करणं यात धार्मिक पेक्षा सामाजिक अँगल महत्वाचा आहे) माझ्या व्याख्येनुसार नास्तिक माणुस नेहेमी वास्तवात जगतो, रॅशनली विचार करतो. हजारो वर्षांपुर्वि आदिमानवाने देवावर भरोसा ठेवला असता (देवाक काळजी रे, म्हणंत) तर आज तु हा धागा काढला नसतास, आणि मी त्यावर प्रतिसाद दिला नसता... Proud

मुलांना स्वतःहुन काहीही सांगू नये. म्हणजे रामकृष्णाच्या गोष्टी, महाभारत, हे सांगावे, किंवा वाचू द्यावे, पण त्यानंतर ते खरेच आहे किंवा खोटेच आहे हे बिंबवायला जाऊ नये, फक्त नास्तिक मत सुद्धा असते इतके त्यांना समजले तरी पुरे आहे. त्यांनी आपापल्या तर्कबुद्धिप्रामाणे योग्य त्या निष्कर्षापर्यंत (म्हणजे नास्तिक हा. :D) पोहोचावे. मला लहानपणी जेव्हा शंका यायची, तेव्हा मी ५-६वीत असताना, "रामसेतू अस्तित्वात असल्याने राम खरोखरीच अस्तित्वात होता पण कृष्ण नव्हता" असा निष्कर्ष काढला होता. यावर कोणीही काहीसुद्धा प्रतिक्रिया दिली नव्हती. आणि आता मागं बघून, हा एक 'कोप' करायचा प्रयत्न होता असं कळतं.

पण एक आहे. देवावर विश्वास न ठेवणे हे बऱ्याच लोकांसाठी अकल्पनिय असते, तसे कधीही होऊ देऊ नये.

आजच्या जगात आस्तिक ची नक्की व्याख्या काय आहे?? मूर्तीपूजा करा..मंदिरात करतात तसे दुध टाकणे,तूप टाकणे,दही टाकणे तासंतास मूर्तीसमोर उभे राहणे/बसणे..मंदिरात दर्शनासाठी रांगेत तासंतास उभे राहणे..
कि
मनातून देवावर विश्वास ठेवणे/पुजणे?
कुठल्याही देवाने सांगितले नाहीये कि माझ्या मागे पळा..तासंतास माझी आरती करा..माझी स्वच्छता करा..मिरवणुकीत फिरवा...
मानव सेवा माधव सेवा, माणुसकी ची जपवणूक शिकवली पाहिजे.
वेदांमध्ये लिहिले आहे कि, एक्कमेवादित्यम (देव एकच आहे).. नातेस्या प्रतिमास्ती(देवाचा कुठलाही आकार नाहीये)....
तर आधी मला सांगा कि नक्की आस्तिक म्हणजे काय मग ठरवता येईल मुलांना आस्तिक बनवायचे कि नास्तिक....

स्वतःच्या कष्टाच्या एका पैलाही खर्चु न देता मुलांना आस्तिक बनवावे. आपल्या अस्तिकतेचा भामट्यांनी कोणताही फायदा उठवु नये अन आपल्या कष्टाच्या पैशांनी भामट्यांच्या कायेखाली मांदं चढु नये यासाठी आस्तिकतेतील मुर्खपणा, भोंदुपणा आत्तापासुनच अधोरेखित करुन आपल्या मुलांना डोळस बनवणे खूप गरजेचे आहे.

मला तरी वाटतं कि मुलांना काही "बनवण्याची" गरजच नाहीये. सुदैवाने घरातच आस्तिक आणि नास्तिक दोघे असल्याने त्यांना निर्णय घेणे किंवा स्वतःचे आ/नास्तिकत्व ठरवणे आणि आचरणे सोपे जाईल.
लेखात विचारलेल्या प्रश्नाला "मला आवडत/ पटत/वेळ/ विश्वास नाही." यापैकी एक उत्तर मुलीच्या वयाचा आणि maturityचा विचार करून देता येईल. ह्या धाग्यावरून एक विनोद पुसटसा आठवतोय, कुणाला पूर्ण माहित असेल तर इथे पोस्ट करा.. एका प्रगल्भ जोडप्याला त्यांचं ५-७ वर्षाचं मूल विचारतं कि "मी कसा आलो?" प्रगल्भ जोडपं एकमेकांकडे बघून त्या मुलाला लगेच सेक्स एजुकेशन देऊन मोकळं होतं, नंतर मूल स्पष्ट करतं कि त्याचा काहीतरी सोपा साधा प्रश्न होता असं काहीतरी..

मुलांना तुम्ही ना आस्तिक बनवू शकत नाही नास्तिक.
सर्वच पालक मुलांनी उत्तम नागरिक बनाव
असेच समजून संस्कार करत असतात पण तसे घडते का.
काही गुंड होतात,काही चोर होतात काही लबाड होतात तर काहीच चांगले नागरिक होतात.
मुल मोठी झाली की स्वतःची बुध्दी वापरतात त्यांना पण प्रश्न पडतात.
त्यांना पण systmetic पद्धतीने चालले ल्या विश्वाचे गूढ वाटते.
आणि आपोआप ते आस्तिक बनतात.
जो पर्यंत विश्वातील सर्व प्रश्नांची उत्तरं मिळत नाहीत तो पर्यंत आस्तिक हे असणारच.

आस्तिक म्हणजे काय- देव असतो असे मानणे.
देव- a creator and controller entity.

नास्तिक म्हणजे काय- वरील गोष्ट मानण्यास काही कारण नाही असे मत असणे.

अजिंक्य... सेक्स म्हणजे काय असा प्रश्न असतो...
सगळे समजवल्यानंतर तो म्हणतो इथे फक्त दोन ऑप्शन दिलेयत. मेल आणि फिमेल.

ह्या सर्व भानगडीत पडण्या पेक्षा.
घरातील कामात आई वडिलांची जमेल तेवढी मदत करायला शिकवा.
बाहेर जावून शॉपिंग कसे करायचे ते शिकवा.
पैसे चे महत्व शिकवा.
घरात आणि समाजात काय जबाबदारी घ्यावी लागते ते शिकवा.
माणसं ओळखायला शिकवा.
व्यायाम करायला शिकवा.
आनंदी राहायला शिकवा.
ध्येय च पाठलाग कसा करावा ते शिकवा.
लोकांचा आदर करायला शिकवा.
उत्तम आहार कशाला म्हणतात ते शिकवा त्याचे महत्व शिकवा.
स्वतःची काम स्वतः करायला शिकवा

हे सर्व शिकवा त्यांना हेच आयुष्यात उपयोगी पडेल.

माझा लहानमुलांना सल्ला आहे. नास्तिक असाल M आणि घरातले आस्तिक असतील तर गप रहा, आपण नास्तिक नाही आहोत याचे नाटक करत रहा.
घरात आरती सुरू असेल तर आपण जाऊन उभं राहणं, एखाद दोन आरत्या तोंडपाठ येणं याने आपल्या नास्तिकतेवर काही गदा येत नाही.

पण जर का हा / ही नास्तिक आहे हे कळलं तर असा काही मनोछळ सोसावा लागतो की बस. घरात कुणी जेवढं कट्टर आस्तिक, तेवढा जास्त सोसावा लागतो. बौद्धिकं घेतली जातात. मागे लागून स्तोत्र वाचायला लावणे, नेमाने देवळात घेऊन जाणे देवाबद्दलच्या गोष्टी वाचायला देणे (यात भाकडकथाही0 असतात), ते बघ ते केवढे मोठे शिकलेले डॉकटर आहेत ते पण आस्तिक आहेत, उगीच आहे का? असले डोस, उदाहरणे देत रहाणे, एखादी चांगली घटना घडली की बघ, हे देवाचं केलंस ना त्याचं फळ आणि एखादी नाही घडली मनासारखी तर तिकडूनही तू स्वतःहून देवाचं काही करत नाहिस ना म्हणुन असं झालं, आता अमक्याची आरती / तमक्याचं स्त्रोत्र पाठ कर वगैरे वगैरे.

मोठे झालात की मग आपला कल उघड करा.

आस्तिक,नास्तिक वर खूप वेळा वादळी चर्चा झाली आहे .
कोणीच आपली मतं बदलत नाहीत आपल्या मतावर ठाम असतात .
काहीच निष्कर्ष न निघता विषय मात्र भलती कडेच जातो.
त्या मुळे परत तो विषय चर्चेत घेण्यात काही अर्थ नाही.

त्या मुळे परत तो विषय चर्चेत घेण्यात काही अर्थ नाही > असे म्हणू नका. आस्तिक-नास्तिक, युपीए-नडीए, हिंदु-मुस्लिम हे टॉपिक बंद झाले तर मायबोली बंद पडेल.

पोथ्या पुराणे वाचायला द्या
आपोआपच नास्तिक होतील

Happy

जोक्स द अपार्ट हुमायून नेचर आहे हे

ज्याची जबरदस्ती होते त्याच्या विरुद्ध जाण्याकडे सहसा कल असतो

त्यात पुन्हा कर्मकांडात अडकलेले आस्तिक आणि यातलं काहीच न करता नुसती श्रद्धा असलेले अस्तिस्क
नास्तिक असूनही देव बसवणारे, कधी देऊळ दिसलेच तर नमस्कार करणारे आहेत तसेच कट्टर बुद्धिवादी आणि देवाला रिटायर करा म्हणणारेही आहेत
यातलं कशात बसवायचं आहे याचाही विचार व्हायला हवा

नास्तिकता हि माणसाला व्यसन,व्यभिचार,मानसिक आजार याकडे घेऊन जाते.देव आहे की नाही या फंदात पडण्यापेक्षा आस्तिक असण्याचे बरेच फायदे आहेत जे मुलांना मिळू शकतात त्यासाठी मुलांना आस्तिक बनवावे.
सर्वांचे भले करणारा देव आहे व तो माझ्यासोबत आहे ह्या विचाराने आयुष्यातील अनेक कठिण प्रसंग लिलया पार पाडता येतात. आस्तिक लोक जास्त आनंदी,सकारात्मक ,नैतिक असतात असा अनुभव आहे .
आस्तिकतेचा कर्मकांडीय अतिरेक मात्र नका शिकवू.

Pages