बांद्रा वेस्ट १९ 

Submitted by मिलिंद महांगडे on 1 December, 2020 - 10:58

बांद्रा वेस्ट १९ 

ती दहा  रुपयांची नोट रॉड्रिक आणि  मॉन्ट्याचा अंत पहात होती .  तिच्या मागे धावता धावता त्याला ब्रम्हांड आठवत होतं  .  त्या नोटेशी  त्याचा जणू पाठशिवणीचा खेळ चालू होता . आणि तो केव्हा संपेल हे कुणालाच सांगता येणार नव्हतं .  त्या  नोटेच्या शोधात ते  मुंबईच्या अशा चित्र विचित्र ठिकाणी फिरले ज्यांचा त्यांनी कधी स्वप्नातही विचार केला नव्हता . आत्ताही ते आणखी एका विचित्र ठिकाणी जाणार होते  - बारबालेच्या घरी  ! मॉन्ट्याने लगेच त्याची बाईक काढली. तो निघणार तेवढ्यात रॉड्रीकचा मोबाईल वाजला. 

" हॅलो. " 

“ हॅलो हनी. तू रागावलायस का  माझ्यावर ?  ” एलिनाचा  आवाज ऐकताच परत त्याच्या चेहऱ्यावर वैताग आलेला दिसला . एवढ्या महत्वाच्या कामाच्या वेळी आता  तिला काय बोलायचं  हेच त्याला कळेना . पण तिच्या आवाजात इतकं  मार्दव होतं  कि त्याला तिच्यावर चिडायचं जीवावर आलं . 

“ नो . ” तो एवढंच  म्हणाला . 

“ प्लीज रॉडी  , आय एम सॉरी . इट्स माय फॉल्ट ” ती आवाजात तोच मऊपणा  आणत म्हणाली . 

“ नो एलिना  … मी रागावलो नाही .”

“ मग फोन कट  का केलास ? “

“ मला खूप महत्वाचं  काम आहे   आय विल टॉक टू  यु लेटर ”

“ कँन यु मीट  मी इन दि इव्हिनिंग  ? ” एलिना  त्याला विचारात होती पण रॉड्रिकला हे सगळं  आता मिथ्या वाटू लागलं . त्याचे स्वातंत्र्याचे २-३ च दिवस राहिले होते. आणि हे एलिनाला कळलं  तर तिला किती दुख होईल ?  ती काय विचार करेल ?  आपलं  पुढे काय होईल ?  एकाच वेळी इतके विचार डोक्यात आल्याने  तो सुन्न झाला . 

“ रॉडी  हॉट  हॅपन्ड ?  आर यु देअर  ?…. रॉडी  ?  ” 

“ या , वी  विल मीट … ” म्हणत त्याने फोन कट  केला . तोच फोन डोक्याला लावून तो डोळे मिटून विचार करू लागला .  तोच पुन्हा फोन वाजला .  

“ प्लीज एलिना  , आय have  टोल्ड यु . नाऊ  प्लीज डोंट  डिस्टर्ब मी . ” तो वैतागून म्हणाला . 

“ डिस्टर्ब …? मी डिस्टर्ब  करतोय तुला  ?? ” पलीकडून आलेला आवाज एलिनाचा नक्कीच नव्हता . 

" हॅलो.… हुज धिस …? " त्याने साशंक मनाने समोरच्याला विचारलं . 

“ हुज धिस …? इतक्या लवकर विसरला  ?  अडीच दिवस राहीलेत... " पलीकडुन एक जाडाभरडा  आवाज आला. आता तो कुणाचा फोन होता हे रॉड्रीकच्या लगेच लक्षात आले. 

" हां साहेब. लक्षात आहे माझ्या. प्लीज  डोंट वरी. " रॉड्रीक आवाजात शक्य तितका मृदुपणा आणत म्हणाला. 

" ठिक आहे... ठिक आहे... काम कुटपर्यंत आलंय...?  " 

" चालु आहे साहेब... त्याच कामात आहे. " 

" ठिक आहे ,  तुला आठवण करुन द्यायला फोन केला होता. "  म्हणुन समोरच्याने फोन ठेवला. 

" च्यायला ह्या जामसंडे च्या !!!  मागेच लागलाय....!  ब्लडी स्वाईन...!  असं म्हणुन रॉड्रीकने एक शिवी हासडली. 

" बरोबरच आहे.  तो मागे लागणारच. !  तु त्याला कमीटमेंटच तशी देऊन आलायस... " मॉन्ट्या म्हणाला. " चल बस,  आपल्याला त्या बारबालेला शोधलं पाहीजे. " म्हणत त्याने गाडीला कीक मारली. आणि दोघे त्या बारबालेच्या शोधात निघाले. त्या नोटेच्या शोधापाई काय काय करावं लागत होतं...!  आता कोण कुठली ती बारबाला,  तिचा काही संबंध नसतानाही तिच्या दारी जायची पाळी आली होती. तसं बघायला गेलं तर मॉन्ट्या बराच उत्सुक दिसत होता तिच्याकडे जायला  ! कदाचित आपली तिच्याशी ओळख होऊन एखादा चान्स मिळेल हा विचार त्याच्या डोक्यात चालला असावा. रॉड्रीकने ते बरोबर ओळखलं.

" कशी होती  रे ती दिसायला ?  " त्याने मुद्दामच मॉन्ट्याला विचारलं. 

" कशी म्हणजे काय  ... कंडा माल आहे. काल आपण बघितलं ना रात्री त्या रिक्षावाल्याच्या भावाबरोबर बसली नव्हती का .... बारच्या मागे...! " मॉन्ट्या सांगु लागला. 

" तुझं तिच्याकडेच लक्ष होतं वाटतं...! " 

" नाय रे.  ती सहज दिसली आपल्याला.  बोल्लो भारी माल आहे. " 

" आपला तिच्याशी काही संबंध नाही. नोट मिळाली की गप निघायचं... " रॉड्रीकने त्याला दम भरला. 

" हा ना भाई ... त्यासाठीच तर चाल्लोय... बाकी काय नाय " मॉन्ट्या आपली बाजु सावरत म्हणाला.   ती बारबाला वाकोला,  सांताक्रुज परीसरात पाईपलाईन रोडला रहात होती. त्या दोघांनी बराच वेळ शोधाशोध केली.  पण त्या पोऱ्याने सांगितलेल्या पत्त्यावरचं हॉटेल संजनेया  काही मिळत नव्हतं. 

" बॉस,  यहांपे संजनेया हॉटल किदर है...?  " मॉन्ट्याने एका रिक्षावाल्याला विचारलं. त्यावर त्याने नुसता खालचा ओठ बाहेर काढुन दाखवला. आणखी दोन तीन जणांना विचारलं पण त्यांनाही काही माहीती नव्हती. 

" त्या हरामखोर पोराने फसवलं तर नसेल ना आपल्याला ?  " मॉन्ट्या वैतागुन म्हणाला. 

" तो कशाला फसवेल ?  थांब आपण समोरच्या त्या पानवाल्याला विचारु.  " म्हणत रॉड्रीक त्याच्याकडे गेला. 

" संजनेया हॉटेल ...?  अरे वो तो कब का रिडेव्हलपमेंट मे गया । अब वहाँ  टॉवर बन रहा है।  " हे दोघे कोण हुकलेले इकडे आले?  असा चेहरा करुन तो पानवाला रॉड्रीक आणि मॉन्ट्याकडे पाहु लागला. 

" कहाँ पे है वो?  " 

" ये सिदा चले जाव,  फिर एक छोडके दुसरा राईट फिर लेफ्ट,   वहां पे एक सर्कल आएगा।  उसके लेफ्ट जाके फिरसे राईट मारनेका,   आ गया संजनेया हॉटल....!  लेकीन अबी कुछ नही है वहां पे।  " पानवाल्याने अगदी सहज सांगितलं पण ते दोघांच्याही डोक्यावरुन गेलं. मग पुन्हा त्याच्याकडुन दोनदा वदवुन घेतल्यावर त्यांची वरात निघाली. 

" आयला हे किती आत आहे ....!  तरीच ते  आपल्याला सापडलं नाही. "  

" तो एरीया रिडेव्हलपमेंट मधे गेलाय असं म्हणत होता तो.  मग तिचं घर मिळणं पण मुश्किल आहे,   लेटस् सी... " 

दोघे पुन्हा विचारत विचारत कसेतरी त्या परीसरात पोचले. संजनेया हॉटेलचा नामोनिशान नव्हता. आता तिथे बिल्डींगचा पाया खणण्यासाठी मोठमोठे खड्डे पाडण्याचं काम चालु होतं.  

" इथेच कुठली बिल्डींग सांगितली होती रे  ?  " 

" साईदर्शन " 

"  इथेच कुठेतरी असली पाहीजे. " 

आसपास थोडी शोधाशोध केल्यावर त्यांना शेवटी ती बिल्डींग एकदाची दिसली. थोडी जुनीच बिल्डींग होती. 

" फायनली....!  " म्हणत रॉड्रीकने निश्वास टाकला. ते दोघे बिल्डींगच्या गेटपाशी आले. आता ती कोणत्या मजल्यावर राहते हा एक चिमुकला प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहीला. बिल्डींगच्या तळमजल्यावर नावांची पाटी होती.  परंतु त्यातली तिची रुम नंबर काही कळत नव्हती. त्यामुळे कुणाला तरी विचारणं भागच होतं. तेवढ्यात समोरुन एक गृहस्थ येताना दिसले. 

" इथे,  नाझनीन म्हणुन कोणी रहातं का ?  " रॉड्रिकने समोरच्या गृहस्थाला थेट विचारुन टाकलं.  

" नाझनीन ?  वो तिसरे फ्लोअर पे रहती ...!  " म्हणुन तो माणुस त्यांच्याकडे पाहत निघुन गेला. 

“ तो  माणूस आपल्याकडे जराशा  विचित्र नजरेने बघत होता का रे ? ”   मॉन्ट्याने विचारलं . 

“ नाही  .  तसं  का वाटलं  तुला  ? ”

“ नाय रे सहजच … एका बारबालेचा पत्ता हे लोक का विचारतायत असं  वाटलं  असेल त्याला ”

“ तसं  काही नाही . तू चल . त्याचा कशाला विचार करतोयस ? ” रॉड्रिक  त्याला जवळ जवळ खेचुनच घेऊन गेला . खरं  सांगायचं  तर आधी  मॉन्ट्याला गंमत  वाटत होती कि एका बारबालेच्या घरी जायला मिळणार … तिच्याशी ओळख होणार … आणि मग  जमलं  तर ….  ! पण आता तिच्या बिल्डींग खाली आल्यावर त्याचं  अवसान गेल्यासारखं  झालं . 

“ मी काय बोल्तो  रॉडी  , तू जा वर…  मी थांबतो इथेच . ” मॉन्ट्या  गाडीपाशीच थांबला . 

“ का ?  आता का ?   मघाशी जाम  उड्या  मारत होतास .  !   ” 

“ कसातरीच वाटतंय रे … बारबालेच्या घरी काय जायचा ? ”

“ तुला काय लगेच तिच्यावर पैसे उडवायचे  नाहीत . आपलं  काम झालं  कि कल्टी  मारायची … ”

चल  गपचूप … ”  रॉड्रिक  त्याला जवळ जवळ खेचतच घेऊन गेला . 

क्रमशः

https://kathakadambari.com

माझी अर्धदशक  नावाची कादंबरी वाचण्यासाठी खाली लिंक दिली आहे

https://www.mehtapublishinghouse.com/book-details/ARDHADASHAK/3048.aspx

Amazon link

https://www.amazon.in/Ardhadashak-Milind-Mahangade/dp/9353174163/ref=sr_...

Flipkart Link

https://www.flipkart.com/ardhadashak/p/itm7149b4896e81d?pid=978935317416...

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users