मायाजाळ : ५

Submitted by अलंकार on 30 November, 2020 - 07:22

मायाजाळ : ५

https://www.maayboli.com/node/77357

डोकं पूर्णपणे चक्रावून गेलं होतं, हे जे काही होतं ते नक्कीच भयंकर होतं पण मला सगळं जाणून घेणं अतिशय गरजेचं होतं, कदाचित त्यामुळे काही मार्ग सापडेल ह्यातून बाहेर पडण्याचा, पण आईंना विचारायला ते सगळं सांगू शकतील याची शाश्वती नव्हती, त्या इतक्या कमजोर होत्या कि एक शब्द बाहेर पडायला अतिशय कष्ट पडत असावेत.
सर्वांगावर इतक्या जखमा घेऊन ह्या जिवंतच कश्या होत्या हाच प्रश्न मला पडला होता आणि इतकी वाईट अवस्था करणारा माणूस माणूस कसा असू शकतो??
पण आईंव्यतिरिक्त अजून कुणीच मला मदत करू शकत नव्हतं, मी हळूहळू एक एक प्रश्न त्यांना विचारत गेले, तोडकं मोडकं, एक एक शब्दाने त्याही माझ्या सगळ्या प्रश्नांना उत्तर देण्याचा प्रयत्न करत होत्या.
त्यांना खूप त्रास होत होता तरीही त्या बोलत राहिल्या, त्यांना होणारा त्रास बघून मलाहि अतिशय वाईट वाटत होतं, त्या माझ्याही आईच होत्या, स्वतःच्या आईची अशी अवस्था पाहणं खूप दुर्दैवी होतं पण त्यांनी जे काही सांगितलं त्यावर सगळ्यात आधी विश्वास ठेवणं कठीण होतं.

अंधश्रद्धा, काळीजादु, माया, त्यांचं शास्त्र ह्या सगळ्या वाईट शक्तीचं अस्तित्व स्वीकारूनच मला निनादला परत मिळवावं लागणार होतं, जे काही घडत होतं, पाहत अनुभवत होते त्यामुळे आपोआपच ह्या गोष्टींवर विश्वास बसत चालला होता.
पण आईंनी जे काही सांगितलं ते थरकाप उडवणार होतं.

निनाद,आई, इतकेच काय तर निनादचे वडील देखील त्याच्या मायाजाळात अडकलेले जीव होते, निनादच्या पणजोबाचे वडील सगळ्यांपासून लपून अघोरी शक्ती जोपासायचे, जगण्याची हाव माणसाकडून काहीही करून घेऊ शकते.
तो तो अघोरी होता ज्याने अमर होण्याच्या लालसेने फसवून त्यांचं शरीर हस्तगत केलं होतं, आणि पुढे एक एक पिढीच्या शरीरात वास करून जगत होता.
अमर होण्याच्या लालसेने निनादच्या पणजोबाचे वडील आंधळे झाले होते, तो अघोरी जे सांगेल ते वागत गेले,
"एका विधीत स्वेच्छेने शरीर त्याग करून, तुझ्या आत्म्यास आहुत्या पोहचवून सर्वशक्तिशाली बनवून पुन्हा तुझ्या शरीरात प्रवेश करून तुला अमरत्व प्राप्त करून देतो, एकदा का हि विधी झाली कि ह्या शरीराच्या अंशाच्या म्हणजे तुझ्या मुलाच्या शरीरात तू त्याच्या इच्छेविरुद्ध देखील प्रवेश करू शकशील, जीर्ण शरीर त्याग करायचा आणि नवीन शरीरात प्रवेश करायचा असेल तेव्हा नव्या शरीराचं रक्त हवनात आणि तुझ्या आताच्या शरीरावर अर्पण करायचं."
ते अघोऱ्याच्या मायेत अडकले होते.
हि विधी जेव्हा झाली तेव्हा त्या अघोऱ्याने स्वतः देह त्याग करून त्यांच्या शरीरात प्रवेश केला आणि त्यांच्या आत्म्याला कैद करून त्यांना फसवून त्यांचं शरीर हस्तगत केलं.
जसं आईंना त्याने स्वतःची हवस पूर्ण करायला डांबलं होतं त्याच कारणाने त्याने मला जिवंत ठेवलं असावं, ह्या विचाराने माझं सर्वांग भीतीने थरथरू लागलं, आईंची जी अवस्था होती ती पाहून मला पुढे विचार देखील करवत नव्हता.
स्वतःच शरीर अग्नीपासून दूर ठेऊन आमच्या कित्येक पिढ्या अघोऱ्याने नासवल्या, कोणाचे कर्म आणि कोण भोगतोय, पण मी निनादला ह्यातून सोडवणार होते.

निनादचं ह्या अघोऱ्यापासून रक्षण करण्यासाठी आईंनी स्वतःचा जीव धोक्यात घालून निनादला त्याच्या काका काकींकडे सुपूर्त केलं होतं, असंच स्वतःच्या बाळासाठी त्या माऊलीने धाडस केलं, निनाद वाचला पण आई अडकल्या, बाहेर पडून देखील, निनाद त्याच्या मायाजाळाच्या कक्षेबाहेर जाऊच शकला नव्हता. त्याला सगळं माहित असल्यामुळे तो इतके वर्ष ह्या जागेत कधी आलाच नाही आणि आज माझ्यासाठी इथे आला होता, इथे येऊन त्याचं काय होईल हे माहित असूनदेखील?

निनादसाठी मी जीव द्यायला तयार होते पण हा जो खेळ चालवला होता त्या अघोऱ्याने तो संपवूनच मरणार होते.
त्याला नष्ट करायचा एकाच मार्ग होता तो म्हणजे त्या अघोऱ्याच्या शरीराला अग्नीचा स्पर्श होणं, त्याचं शरीर जळालं कि त्याचा आत्मादेखील शरीरासोबत नष्ट होईल आणि हा मायावी खेळ कायमचा मोडेल.
आईंना इथेच ठेवून मला इथून बाहेर निघावं लागणार होतं, मी त्या खिडकीतून कशीतरी बाहेर पडली, बाहेर मोठमोठ्या आवाजाने मंत्रोच्चरण चालू होतं,
मला एक क्षण देखील न घालवता निनादला शोधायचं होतं, आवाज सगळ्याबाजूनी सारखाच येत होता, मी प्रत्येक दिशेने वेड्यासारखी धावत होते पण निनाद कुठेच नव्हता.
तो माझ्या मनासोबत खेळत होता, माझं चित्त भरकटव होता. मला आधी माझ्या मनावर सय्यम आणायचा होता.
माझा आराध्य मला नक्कीच मदत करणार होता.
"ओम नमः शिवाय" मी नाम घेत राहिले, मला माझ्याच मनाचा आवाज येऊ लागला, त्याचा आवाज एकाच दिशेने येऊ लागला.
मी नाम घेणं चालून ठेवलं आणि आवाजाच्या दिशेने धावले.
तो हवनासमोर बसला होता, मंत्रोच्चरण चालूच होतं, आणि समोर एक सांगाडा पडला होता, म्हणजे तो त्या अघोऱ्याचा होता, समोर पात्रात भरलेलं रक्त तो हवनात टाकत होता.
जर ह्या क्षणाला त्याने ते रक्त त्या शरीरावर ओतलं तर माझा निनाद, नाही मला हा विचार नव्हता करायचा, मला फक्त त्याला परत आणायचं होतं सुखरूप.
मी नाम घेत पुढे गेले, तो विचलित होतं होता, त्याचा आवाज खालावला होता, कदाचित हे माझ्या आराध्याच्या नामस्मरणाचा प्रभाव होता,
मी त्याचा सामना फक्त नामस्मरणाच्या बळावर करणार होते, कारण मला माहित होतं कोणत्याही वाईट शक्तीचा निभाव माझ्या शिवाच्या पुढे लागणार नव्हता.
मी निडरपणे त्याच्या समोर उभी होते, तो चिडला, त्याचे डोळे अतिशय लाल झाले होते, अचानक त्याचे माझ्या अंगावर काही फेकलं आणि पूर्ण अंगाची आग होऊ लागली, खूप त्रास होऊ लागला, मला हालचाल करता येईना, नाम घेणं माझ्याही नकळत थांबलं, तो कुत्सित हसला, मी त्या सांगाड्याच्या जवळच पडेल होते.
काही क्षण मंत्रोच्चारण करून तो उठला, हातात ते रक्ताचं पात्र, सगळं संपणार होते, मी हरणार होते, हा खेळ अनंत काळ चालू राहणार, कित्येक जीव नाहक बळी जाणार.
नाही नाही मी जिवंत असे पर्यंत हे होऊ देणार नव्हते, माझा आराध्य ह्या तुच्छ शक्तीपुढे हार मानणार नाही, मी सर्वशक्ती एकवटून त्याला अडवण्याचा प्रयत्न करू लागले.
आमच्यात झटापट होतं असताना अनपेक्षित पणे त्याने मला हवनाच्या दिशेने लोटलं आणि माझ्या पायाला गुंतून तो सांगाडाच हवनात पडला.
एक गगनभेदी किंचाळी पूर्ण घरभर पसरली, आणि मी डोळे घट्ट मिटून घेतले, पुढे जे होईल ते मला पाहायचं नव्हतं, विचित्र आवाजांनी संपूर्ण इमारत धगधगत होती.
थोड्या वेळाने एक थंड स्पर्श माझ्या डोक्याला झाला, समोर पाहिलं ते डोळे माझ्या निनादचे होते, तो निनाद होता.
मला रडू आवरलं नाही, डोळ्यांतून पाणी वाहत होतं, शब्द संपले होते.
मला तितक्यात आईंची आठवण झाली, मी त्याला घेऊन धावत त्या रूम मध्ये गेले, निनादने एकाच नजरेत त्यांना ओळखलं, त्यालाही रडू आवरलं नाही.
त्याला तर त्या जिवंत आहेत याची इतके वर्ष जाणिवच नव्हती.
आईंच्या डोळ्यात पाणी होतं आणि ओठांवर हसमाधानकारक हसू होतं, निनादने " आई " हाक दिली आणि त्यांनी डोळे मिटले.

आई हे युद्ध जिंकल्या होत्या, जरी त्या आता आमच्यात नसल्या तरीही खरा लढा आईंनी दिला होता मी फक्त निमित्त झाले.
माझ्या आराध्यांच्या सोबतीशिवाय ह्या लढ्यात आईंसोबत जिंकणं अशक्य होतं.

समाप्त....

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

छान

अलंकार, छान झालीये!
पण सुरुवात जशी फुलवत केली, शेवटाकडे येताना जरा घाई झाली का? अजून तुम्हाला लिहायला scope होता कदाचित.. हेमावैम

हो अजून लिहायचा होता पुढचा भाग, पण जास्त डीप होतेय, वाटून आवरत घेतलं.
पुढच्या कथेत अजून चांगलं लिहण्याचा प्रयत्न करेन
सगळ्यांचे खूप खूप आभार..