मायाजाळ : ४

Submitted by अलंकार on 29 November, 2020 - 07:36

मायाजाळ : ४

https://www.maayboli.com/node/75593 मायाजाळ : १
https://www.maayboli.com/node/75625 मायाजाळ : २
https://www.maayboli.com/node/75642 मायाजाळ : ३

निनाद, निनाद, मी वेड्या सारखी दरवाजा बडवत राहिले पण दरवाजा साधा हलला देखील नाही.
निनाद आत आणि मी बाहेर, ज्याच्यासाठी हे वेडं धाडस केलं तोच आपल्यामुळे इतक्या भयंकर संकटात अडकला.
निनादला त्याने काही केलं तर???
ह्या एका विचाराने मी इतकी घाबरले कि मी तिथेच बसून रडायला लागले, मला काही करून आत जाणं भाग होतं, मी धावतच त्या चौकोनी झाकणाकडे धावले जिथून मी आधी बाहेर निघाले होते,
मी खूप जोर लावला पण तो काही केल्या उघडायचं नाव घेत नव्हता.
मी पूर्णपणे चक्रावून गेले होते आधी दोन्ही दरवाजे अगदी सहज रित्या उघडत होते पण आता काय झालं होतं??
भीतीने धड काही सुचतंच नव्हतं, ते दार तोडण्यासाठी काही मिळतंय का ते पाहू लागले,
बाजूला पडलेलं दगड उचलून मी जोरात त्यावर मारत राहिले, तुटणार नाही तोपर्यंत मारत राहिले, खूप प्रयत्न करून ते तुटलं, मी कसलाच विचार न करता झपाझप खाली आले आणि पुढे जे होतं ते पाहून अवाक झाले.

ते रिंगण त्या आहुत्या, ते हवन, तो त्याची भेदक नजर आणि निनाद काही म्हणजे काहीच नव्हतं तिथे.
फक्त एक मोठी रिकामी खोली, ज्यात जिवंतपणाच काय तर साधी निर्जीव वस्तूचंदेखील अस्तित्व नव्हतं.
साधारण दिसेल इतका उजेड होता, मी भिंती चाचपडून पाहू लागले, खाली जमीन चाचपडून पहिली पण काही नाही, डोळ्यांतून नकळत अश्रू वाहू लागले.
मनात मी हरले ह्याची जाणीव घिरट्या घालू लागली, मला इतक्यात हरायचं नव्हतं, मी डोळे पुसले, मोठा श्वास भरला आणि डोळे बंद करून घेतले.
कल्लोळ, वादळ, गोंगाट, भीती न जाणे काय काय होतं मनात, मला शंकराला स्मरायचं होतं पण त्याचं नाव जणू मी विसरले होते, श्वास जड जाणवत होते, डोकं दुखायला लागलं होतं, पण मला हार मानायची नव्हती.
तो गदारोळ मनातून हटवून माझ्या आराध्याला स्मरायचं होतं, तोच मार्ग दाखवणार होता.
खूप प्रयत्नानंतर "ओम नमः शिवाय" मनात उमटलं आणि सगळा गदारोळ हळूहळू शमून गेला.

मी हळुवार डोळे उघडले तर निनाद तांबरलेल्या डोळ्यांनी रागाने माझ्यासमोर अगदी तोंडासमोर उभा होता.
त्याचा तो अवतार पाहून मी होते त्या जागेवरून खालीच कोसळले.
उघडाबंब, सर्वांगावर राख, पिंजर फासलेले, छातीवर कापलेलं त्यातून रक्त चालू होतं, तो शरीराने निनाद होता पण डोळे ती नजर त्याची होती.
मी सगळीकडे पाहिलं तर तो तसाच तिथे झोपला होता जिथे आधी मी पाहिलं होतं, ते हवन त्या आहुत्या सगळं होतं.
तो तिथे आहे मग हा कोण आहे?? निनादचं शरीर पण निनाद नव्हता.
मी जोरात ओरडले "निनाद", आता तो माझ्याकडे पाहून कुत्सितपणे हसत होता, मी निनादला हाक मारू लागले आणि तो गरजला.
निनाद नाही आता फक्त मी, हे शरीर हे आयुष्य माझं. मी अमर आहे, अमर . . .
मी नसमजून त्याच्याकडे केवळ पाहत राहिले.
नाही समजलं, तो कुत्सितपणे म्हणाला " ते शरीर जुनं आणि निकामी झालं, मग आता हे नवीन शरीर, नवीन प्रवास" मी त्याच्याकडे भान हरपल्यागत पाहत राहिले फक्त.
आणि तो जोरजोरात हसू लागला.
"आता फक्त एक विधी ती झाली कि मग निनादचा आत्मा कैद कायमचा, त्याआधी तुझी व्यवस्था करतो"
म्हणत तो कधी माझ्याजवळ आला आणि मी कधी एका अंधाऱ्या खोलीत बंद झाले कळलं देखील नाही, भानावर आले ते कोणाच्यातरी विव्हळण्याच्या आवाजाने. . .
त्याचं काय झालं, तो काय प्रकार होता, सगळं विचार करण्यापलीकडे होतं, मन डोकं सुन्न झालं होतं.
पुन्हा तोच विव्हळल्याचा आवाज, मी दचकले, अजून काय काय पाहायला मिळणार ह्या भीतीने अक्षरशः कापायला लागले होते.
अंधारात काहीच दिसत नव्हतं आवाज खोलीच्या कोपऱ्यातून येत होता, ते विव्हळणं खूप वेदनादायक जाणवत होतं, पण इतकं सगळं पहिल्या आणि अनुभवल्यानंतर कशावर विश्वास ठेवणं अशक्य होतं.
मी घाबरून भिंतीला टेकले आणि डोकं खिडकीला लागून एकाच झटक्यात ती उघडली गेली, मनात काहीही नसताना खिडकी मिळाली आणि थोडा उजेड आत आला, मी सगळ्यात आधी त्या आवाजाच्या दिशेने पाहिलं आणि जे पाहिलं ते अपेक्षेच्या विचारांच्या विरुद्ध होतं.

एक अतिशय वृद्ध स्त्री मरणाची वाट पाहत जमिनीवर मलूल होऊन पडली होती. तिची अवस्था पाहून कशी माहित नाही पण मी धावत त्यांच्याजवळ गेले, त्यांना उठवण्याचा प्रयत्न करू लागले, त्यांना केलेल्या स्पर्शाने मी झटक्यात हात मागे घेतला कारण त्यांच्या दंडावर खोल जखम होती, माझी दोन बोट त्यात रुतली त्यामुळे त्या विव्हळल्या.
नकळत माझ्या तोंडातून "आई" शब्द बाहेर आला, त्यांनी हालचाल केली, एका अतिशय क्षीण आवाजात
"कोण निनाद" म्हणाल्या.
धक्क्यावर धक्के बसत होते, त्यांच्या तोंडून निनादचं नाव ऐकून त्याच क्षणाला असंख्य तर्क मनात घोळू लागले.
निनाद नाही, मी निनादची पत्नी, आणि तुम्ही??
तिने माझा हात घट्ट पकडला, उठण्याचा प्रयत्न करू लागल्या पण अंगात काही शक्ती नसल्याने त्यांना उठायला जमत नव्हतं.
मीही त्यांचा हात पकडला, सांगा ना तुम्ही कोण??
"आई निनादची"
आणि तो जो निनाद सारखा दिसतो तो, तो कोण आहे?? ज्याने निनादला वश केलंय?? तो कोण आहे???
"बाबा निनादचा"
मला आता चक्कर यायची बाकी होती.
हा राक्षस निनादचा बाबा आहे, शी . . .मनातल्या मनात मला शिसारी आली.
मग घरी आहेत ते कोण?? हे कोण?? काय आहे निनादच्या जन्माचं रहस्य????

( मला माहित नाही कि हा भाग पहिल्या भागांच्या फ्लोने झालाय कि नाही, थोडा प्रॉब्लेम झाला होता त्यामुळे लिहता आलं नव्हतं, खूपच उशीर झाला पुढचा भाग लिहायला त्यामुळे मनापासून सॉरी,
हा भाग कसा झालाय आवर्जून कळवा, खूपच उशीर केल्याबद्दल पुन्हा मनापासून सॉरी )

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

चालू ठेवा.
पुढच्या भागाची वाट पाहतोय.

फार सॉलिड
कथा वेगवान आहे.सगळे भाग झाल्यावर परत वाचेन.

जबरदस्त ट्विस्ट दिलाय ह्या भागात. छान पोटेंशिअल आहे ह्या थिममध्ये आणि लेखनशैली सुद्धा पुरक आहेच त्यामुळे लवकर पुढील भाग सातत्याने येत राहतील ह्यासाठी नक्की प्रयास करा, पुढील लेखनास शुभेच्छा !