मत्सर , असूया , जेलसी - भाग 1

Submitted by राधानिशा on 23 November, 2020 - 08:12

मत्सर , असूया , जेलसी ह्या भावनेकडे फार जजमेंटल होऊन पाहिलं जातं . अमुक व्यक्ती माझ्यावर जळते , हे सांगताना मत्सर ह्या भावनेला आपण कधीही नैसर्गिक म्हणून पाहत नाही .... काहीतरी अतिशय हीन दर्जाची भावना म्हणून पाहतो.

आपल्याला एखाद्या व्यक्तीचा मत्सर वाटतो हे आपण आपलं आपल्याशीही कबूल करायला तयार नसतो .. इतकी ही भावना निगेटिव्ह रंगवली गेली आहे . आपलं मन आपल्याशी कनविन्सिंगली खोटं बोलू शकतं , मला मत्सर वाटतो हे मान्य केलं तर मी वाईट ठरेन आणि आपल्याला स्वतःच्या नजरेत कधीच वाईट ठरायचं नसतं - मग मन त्या व्यक्तीमध्येच काही दोष पाहतं , त्याच्या वागण्यातल्या बोट ठेवण्यासारख्या गोष्टी ह्याच आपल्याला ती व्यक्ती न आवडण्याचं कारण आहे , असं आपल्याला सहज कनविन्स करतं .....

अर्थात खरोखरच स्वभावातल्या किंवा वागण्यातल्या दोषांमुळेच जनरली आपल्याला काही व्यक्ती आवडत नाहीत .... नेहमीच मत्सर हे कारण अजिबात नसतं .

पण ज्यावेळी ते असतं , तेव्हा ते स्वतःपासूनच लपवण्यासाठी मन या नेहमीच्या कारणाचं कव्हर त्याच्यावर घालतं , जेणेकरून आपल्याला मत्सर वाटतो आहे , हे स्वतःचं स्वतःला रियलाईझच होऊ नये .

मत्सर ही भावना माणसाचं " डे-टू-डे " आयुष्य किती कंट्रोल करते हा संशोधनाचा विषय होईल ...

एकतर ही बरीचशी सबकॉन्शस पातळीवर काम करत असते .. आपलं आपल्यालाच कळत नाही की मनात आहे ...

मत्सरच्या साफ उलट राग ही भावना .... ही अत्यंत नैसर्गिक म्हणून स्वीकारली जाते ... आपण स्वतःही ती सहज स्वीकारतो आणि इतर लोकही .

मला राग आला हे आपण जेवढ्या इजीली सांगतो तेवढं मला मत्सर वाटला किंवा मी जेलस झालो , हे कधीच सांगू शकत नाही .... थट्टेत बोलतो - I'm jealous .. पण जेव्हा खरी असुया असते तेव्हा चुकूनही बोलून दाखवत नाही .

राग ही भावना जसे सगळेच लोक अनुभवतातच तशी मत्सर ही सगळेच अनुभवत असावेत का ? आयुष्यात एक पॉईंट येतो ज्यावेळी माणूस स्वतःच्या आयुष्याबद्दल समाधानी होतो , त्याला जे हवं असतं त्यातलं बरंचसं मिळालेलं असतं ... त्यानंतर त्याला कोणाचा मत्सर वाटत नाही . पण हा पॉईंट सगळ्यांच्याच आयुष्यात येतो का ?

मत्सराने ड्रिव्हन आऊट होऊन केल्या जाणाऱ्या कृतींचं प्रमाण काय आहे ? मला स्वतःला आजपर्यंत मत्सरापोटी एखाद्याशी वाईट वागलेलं आठवत नाही ..

किंवा जर वागले असेन तर ते मत्सरामुळे अशी स्पष्ट जाणीव नव्हती म्हणावं लागेल ... There are times , ज्यांच्याबद्दल मी नेमकी तशी का वागले असा अजूनही प्रश्न पडतो - त्याच्या रूटशी मत्सर नसेलच असं ठामपणे सांगता येणार नाही ....

इतर कोणीही माझ्याशी मत्सरापोटी वाईट वागल्याचं आठवत नाही .

पण माझा जगाचा , आयुष्याचा अनुभव फार तोकडा आहे . कामाच्या ठिकाणी अमुक जण जाणूनबुजून सहकार्य करत नाही , अडथळे आणतो , मला वाईट लाईटमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करतो किंवा अमुक एकाला माझं बरं झालेलं बघवत नाही .... या तक्रारी लोकांनी केलेल्या ऐकल्या - वाचल्या आहेत ... त्यामुळे मत्सर ही भावना वाटते तितकी निरुपद्रवी नसावी आणि बरेच पराक्रम हातून घडवून आणत असावी असं वाटतं .

ज्यांना अशा लोकांशी डील करावं लागतं त्यांच्याविषयी सहानुभूती आहेच . पण आत्ता मी त्या लोकांचा विचार करत आहे , जे मत्सरापोटी एखादी कृती करायला उद्युक्त होतात ....

मत्सर हा कपड्यावर पडलेला स्टबर्न डाग आहे ... राग हा चिखल आहे , तो चटकन दिसतो आणि धुवून टाकता येतो .. पण मत्सर एकतर पटकन लक्षात येत नाही .... आला तरी तो जाण्यासाठी काय करायचं हे माहीत नसतं ... रागाशी डील करायला आपण शिकलो आहोत पण ह्याच्याशी डील करणं आपल्याला जड जातं ....

आणि बहुतेक लोकांच्या आयुष्यात थोड्याशा मत्सरामुळे काही फरकही पडत नसावा कदाचित ... निदान वरवर तरी ... राग हा जसा प्रॉब्लेम क्रिएट करतो , तसे मत्सर करत नाही ... निदान वरवर तरी !

त्याचं कारण त्रास देण्याच्या संधीचा अभाव हे असू शकतं किंवा बहुतेकांची सद्सद्विवेकबुद्धी जागृत असते .... सबकॉन्शस लेव्हलला कुठेतरी ही मत्सर ही भावना आहे - ही चांगली नाही - हिच्या आहारी जाऊन चुकीचं वर्तन करता नये... ही जाणीव जागृत असते ...

काही लोकांच्या मनात मात्र मत्सर रागाचं रूप घेतो ... अमुक माणूस मला अजिबात आवडत नाही .. राग येतो . त्याची कारणंही मन शोधतं - त्या माणसातले बारीकसारीक दोष .... मग त्याचा राग करायला , वेळप्रसंगी त्याला त्रासही द्यायला ते मोकळे होतात ..... कारणांची खोलवर चिकित्सा करायच्या भानगडीत पडत नाहीत .

पण हे तुलनेने कमी लोकांच्या बाबतीत घडतं , त्यामुळे अँगर मॅनेजमेंट क्लासेस नि कोर्सेस जसे सुरू झाले आहेत तसे जेलसी मॅनेजमेंट आजपर्यंत सुरू करावे लागलेले नाहीत . समाजातली सध्याची परिस्थिती पाहता अँगर मॅनेजमेंटपेक्षाही लस्ट मॅनेजमेंट कोर्सेस आणि गाईडन्सची नितांत आवश्यकता आहे असं वाटतं ... असो , तो वेगळा विषय झाला .

मत्सर ही भावना बहुतांश लोकांच्या बाबतीत प्रत्यक्ष वागणं कंट्रोल करण्याएवढी ताकदवान नसली आतल्या आत मात्र ती एनर्जी शोषून घेत असते ... It's a poison .. एखाद्या जमिनीत एखादी विषारी वस्तू ठेवली तर ती हळूहळू झिरपत जाऊन त्या जमिनीची उत्पादकता कमी करते , शक्ती कमी करते तसं काहीसं .. किंवा फुलझाडं - फळझाडं लावली आहेत आणि जमिनीतली बरीचशी शक्ती , पोषण , पाणी एखादं निरुपयोगी , उपद्रवी गवतच शोषून घेतं आहे तसं .... ते काढून टाकल्याशिवाय ती फुलझाडं - फळझाडं बहरणार नाहीत ....

Group content visibility: 
Public - accessible to all site users

विचार छान मांडले आहेत. .
राग आणि मत्सर दोन्ही नकारात्मकच पण रागाला एक "status" आहे तर मत्सर फारच खालच्या पातळीवरचा समजला जातो हे खरे आहे.

मत्सर ही भावना परिचीतशी आहे. त्यामुळे लेख फार आवडला. प्रांजळ लिखाण आहे. मी या विषयावरती पूर्वी लिहीलेले काही उतारे खाली देते आहे.त्याविषर्यी बोलायचे असल्यास विपुत बोलावे. मला हा धागा हायजॅक करायचा नाही.
___________
अन्य मुलींप्रमाणेच, साधारण पौगंडावस्थेत ज्या सुमारास मला प्रथम भिन्नलिंगीय सुप्त आकर्षणाची जाणीव झाली, त्याच अगदी त्याच सुमारास, मत्सर नामक अधिक क्लिष्ट अन सर्वव्यापी भावनेची देखील ओळख झाली. किंबहुना इतक्या हातात हात घालून या दोन्ही भावना जीवनात आल्या की दोन्ही गोष्टींचे मेंदूतील केंद्र एकच असावे की काय असे पश्चात, वाटून गेले. एखादा गोंडस मुलगा काय किंवा गणिताचे बुद्धीमान, शिक्षक काय जेव्हा महाविद्यालयीन आयुष्यात आवडले, तेव्हा तेव्हा त्यांच्याभोवती रुंजी घालणार्‍या, त्यांच्याशी मैत्री असलेल्या, माझ्या मते त्यांच्यावर प्रभाव टाकणार्‍या कोणा ना कोणा मुलीबद्दल तीव्र मत्सर निर्माण झालाच झाला. अन हिरव्या डोळ्याच्या राक्षसाने तो काळ मला अत्यंत पीडले असे आठवते. दर वेळेला कोणी आवडले, कोणा मुलाचे आकर्षण वाटले, की कोणीतरी मुलगी अतिशय नावडायची. तीन्ही त्रिकाळ तिच्याविषयी विचार येत. असूया, मत्सर, हेवा वाटे, राग राग येई.कोणी मुली इतक्या सुंदर, भाग्यवान कशा असू शकतात न आपणच काय घोडं मारलय आदि भावना डोकावत. एकंदर स्वतःचे स्वतःला मिझरेबल करुन घेण्याची कोणतीही संधी मी दवडत नसे.

पुढे वाचनात आले की मेंदूच्या ज्या भागाला पीडनेची, वेदनेची जाणीव होते, जो भाग वेदना आयडेंटीफाय करतो तोच भाग मत्सर नामक इन्टेन्स भावनेचे नियंत्रण करतो. त्याहीपुढे काही मानसोपचारतज्ञांकडून ही माहीती मिळाली की काही विशिष्ट मेंटल डिसॉर्डर्स (मानसिक व्याधी) मध्ये मत्सर अधिक अधोरेखीत होतो किंबहुना मत्सर हा एक सिम्प्टम असतो.

माझ्या मते, "हेवा" (एन्व्ही) या भावनेचा उत्क्रांतीमध्ये काही सकारात्मक सहभाग असूही शकतो. की मनुष्य अधिक प्रेयस प्राप्त करण्यास प्रयत्नशील व उद्युक्त होत असेल कदाचित, परंतु असूया/मत्सर या भावनेचा सकारात्मकतेशी सुतराम संबंध नसावा.

नंतर नंतर जसेजसे आत्मभान येत गेले तसेतसे अतिशय नकारात्मक छटा असलेल्या या वेदनामय भावनेच्या कचाट्यातून, पंज्यातून पूर्ण सुटका झाली. एक वेगळाच दृष्टीकोन मिळत गेला. कालांतराने "जोलीन" नावाचे "डॉली पॅट्रनचे" नितांत सुंदर गाणे ऐकण्यात आले. एका रुपगर्वितेला, एका सामान्य विवाहीतेने केलेली व्याकुळ विनवणी शब्दांकीत करणारे हे गाणे.मला इतके आवडले कारण यात आहे ना मत्सर ना हेवा फक्त एक रोखठोक विनंती की माझ्या नवर्‍यावर गारुड घालू नकोस. तुला असे छपन्न मिळतील मी मात्र जर तो मिळाला नाही तर प्रेमाशिवायच राहीन. तू सुंदर आहेस तुला हवा तो पुरुष मिळेल, पण तेवढा माझा नवरा सोड. त्याच्या मागे लागू नकोस.

https://www.youtube.com/watch?v=Ixrje2rXLMA
__________________________

राधानिशा तुम्हाला आवडले नाही तर मी ही प्रतिक्रिया काढून टाकेन.

राधानिशा तुम्हाला आवडले नाही तर मी ही प्रतिक्रिया काढून टाकेन.
________________
अजुन एक -

आज एखादी विनोदी कथा विशेषतः: श्रीकृष्ण, भामा आणि रुक्मिणी यांच्यावर बेतलेली लिहिण्याची खूप सुरसुरी. ऊर्मी दाटून आली. पण प्रत्येक कथासूत्रात रुक्मिणीचा भाव खात राहिली, रुक्मिणीच भामेला प्रवचन झोडत राहिली. आणि भामा बिचारी असूया, मत्सर सगळं नाट्य घडवूनही उपेक्षित नायिकाच राहिली. एट्टो नॉय चॉलबे. असे ना का तुमची रुक्मिणी सद्गुणांची पुतळी,असेनाका भक्तीमधील साक्षात लीनता, हरीला ती प्रिया असेनाका पण आमच्य हट्टी भामेवरचा अन्याय आम्हाला सहन होणारच नाही. नाही काय चुकीचं आहे मत्सरात, काय चूक आहे सांगा असूयेत. अजिबात काहीही नाही. आपल्या प्रियकरावरती हक्क गाजवावासा वाटणे यात अपराधी वाटून घ्यायचं तसं मुद्दाम भामेला वाटवून देण्याचं कारणच नाही ना मुळी. असूया कधी वाटते असूयेमागचे मानसशास्त्र काय ते तरी घ्या जाणून. अतिशय प्रेमापोटीचच फक्त असूया उद्भवते. राधा काय रुक्मिणी, सत्यभामा काय प्रेमाच्या विविध जातकुळीच आहेत त्या.राधे मध्ये प्रेमाची फलश्रुती असेल तर रुक्मिणीच्या लीनता आहे, सत्यभामेच्या Longing आहे. प्रेम मिळाल्यानंतर ते हरवू नये याचा मनस्वी आणि करुण प्रयत्न आहे, ते हरवलं तर .... या "तर" चे जाळणारे दु:ख आहे. प्रेम मिळणं ही जर लॉटरी असेल तर ते चिरंतन टिकणे हा जॅकपॉटच म्हणा की, अगदी पॉवरबॉल. खरं तर काही लोक प्रेमात पाडण्याचे टाळतात ते याच कारणामुळे की नंतर दु:ख नको. पण असे ठरवून जसे प्रेमात पडता येत नाही तसे टाळू म्हटल्याने टळताही नाही.कोणीतरी प्रसिद्ध शायर (गालिब बहुदा) म्हणूनच गेलाय ना की - ये वोह आग है जो लगाये ना लगे और बुझाए ना बने " असो.
.
तर सांगायचा मुद्दा हा आहे की कथा तर लिहिली आहे की भामेला श्रीहरींची व्हेलेंटाईन डेट तर मिळाली, सिनेमा, शॉपिंग, हॉटेल,बाग, चॉकलेटस, फुले सग्गळं सग्गळं मनसोक्त झालं अगदी रात्रीचा चांदण्यातील नौकाविहारही. पण झालं काय तिच्या या सर्व सुखावरती एका क्षणात पाणी पडलं. कारण एकच झोपेत श्रीहरींच्या ओठावरती रुक्मिणीचं नाव आलं. ही कथा लिहून तयार आहे पण प्रकाशित करवत नाही. कारण एकच सत्यभामा आमची अतिशय लाडकी आहे. अगदी तिच्या हट्ट, असूयेसकट नव्हे त्यामुळेच. तिच्या अधिकार गाजविण्याच्या fiery, naive स्वभावामुळेच. खरं तर कोण्या कवीने स्वतः:ची प्रतिभा डिस्प्ले करण्याकरता उगाच ते पारिजातकाचे कुभांड रचले आहे. अशी फुले पडतात काय शेजारील दारी? इतकं वाकडं झाड पाहिलंय कोणी? का वारा पाहिलाय जो सतत एकाच दिशेने वाहणारा.
.
ते काही नाही. एक अशी कथा लिहिणारे ज्यात सत्यभामा वरचढ ठरेल. आणि तशी लिहीली की मगच प्रकाशित करेन.

सामो सुंदर प्रतिसाद आहेत , डिलीट नका करू ... ( इकडे रात्रीचे 3 वाजलेत , झोप लागेना म्हणून परत धागा उघडला facepalm ) , उद्या सविस्तर लिहिते .