शुभेच्छा देतो की मस्करी करतो? : नागपुरी तडका

Submitted by अभय आर्वीकर on 23 November, 2020 - 02:18

शुभेच्छा देतो की मस्करी करतो? : नागपुरी तडका

सुख-समृद्धीच्या देतो शुभेच्छा
की तू करतो मस्करी?
कुठून येईन रे भाऊ धन
आम्हा शेतकऱ्याच्या घरी?

सायबीन सवंगाचं काम
बिलकुल नाही पडलं
चकरभुंग्यापायी पीक
खुमसूखुमसू रडलं
घरी धन आणासाठी
करु का रे गांजा-तस्करी?
कुठून येईन रे भाऊ धन
आम्हा शेतकऱ्याच्या घरी?

औंदाच्या पावसापायी
भलतंच ईपरीत घडलं
कापसाचं अख्खं बोंड
बुडापासून सडलं
आता काय तुह्याच घरी
म्या करावी का चोरी?
कुठून येईन रे भाऊ धन
आम्हा शेतकऱ्याच्या घरी?

साल पह्यलेच नापिकीचं
पुन्हा बोंडअळी वरून
बोंडअळ्याच विकाव्या का
आता पोत्यामधी भरून?
खाणार काय आमटी करून
सांग इतकं तरी!
कुठून येईन रे भाऊ धन
आम्हा शेतकऱ्याच्या घरी?

तुह्यं "धन-लाभ भवतु"
सांग फलन कसं?
शेतीत कुठं हाय बापू
तुले वाटते तसं?
जरी तुले रुचत नाय
पण गंमत हाये खरी
कुठून येईन रे भाऊ धन
आम्हा शेतकऱ्याच्या घरी?

तुले जसं देते अभय,
तसं मले कोण देते?
सरकार फक्त शेतीलेच,
पार नोचू नोचू खाते
कांदा मारला, कापूस मारला
उद्या मारणार तुरी
कुठून येईन रे भाऊ धन
आम्हा शेतकऱ्याच्या घरी?

- गंगाधर मुटे "अभय"
============
२०/११/२०२०

Group content visibility: 
Use group defaults