बांद्रा वेस्ट- १६

Submitted by मिलिंद महांगडे on 20 November, 2020 - 11:42

बांद्रा वेस्ट- १६ Bandra West- 16

रॉड्रिक आणि मॉन्ट्या कसेबसे उभे  राहिले . अंगात  काहीच  त्राण  शिल्लक नव्हतं . खाली पडलेली गाडी उचलायचं  भानही त्यांना  राहिलं  नाही . दोघांचेही पाय लटपटत  होते. सगळं  अंग घामाने भिजून गेलं  होतं .   ए. पी. आय. जामसंडे त्यांच्या जवळ आले . ‘  खाड … खाड  … ‘ त्यांनी दोघांच्याही पहिल्या दोन मुस्कटात  मारल्या .  त्यांचा हात जबरदस्तच होता . पहिला रट्टा  पडताच दोघांच्याही डोळ्यासमोर काजवे चमकले . कानशिलं  गरम झाली . डोकं बधिर झालं . त्या तडाख्याने दोघेही  होलपडून बाजूला पडले . 

 “ भोसडीच्यांनो , आजारी आहात काय ? “  हे  ,  हे  औषध आहे काय  ? “ खाली पडलेल्या मॉन्ट्याच्या आणखी एक कानाखाली लावली . 

“ साहेब , हा बॉक्स  आमचा  नाही , आमची काहीच चूक नाही . वि आर इनोसंट , प्लीज  ट्रस्ट मी.  “ रॉड्रिक त्यांना समजावण्याचा प्रयत्न करू लागला  , तोच त्याच्याही  एक  कानफटात बसली . 

“ इनोसंट … ? मादरचोद … कोकेन सप्लाय करतोस आणि वर तोंड करून सांगतोस ? “ जामसंडे आता रागाने लाल झाला होता . त्याने रॉड्रिकची कॉलर  पकडली . 

“ साहेब… प्लिज…. विश्वास ठेवा . आम्ही तसले नाही हो… “ बोलता बोलता रॉड्रिकच्या डोळ्यात पाणी केव्हा जमा झालं त्यालाही कळलं  नाही . समोरचा पोलिस ऑफिसर त्याला धुसर दिसू  लागला . 

“ आयला , तरीच मला डाउट आला . , हे बेनं रात्री -बेरात्री  भटकतंय ,  दारू प्येतंय , कायतरी लफडं हाय  “  मघाचा हवालदार आता उगाचच  बढाई मारू लागला . 

“ साले आपल्याला चुत्या बनवून चालले होते . हरामखोर … कुठून आणली हि पावडर ? कुठून आणलं  हे कोकेन  ? अरे बोल ना भेन्चोद …! “ जामसंडेचा राग अनावर झाला होता . त्याने आणखी एक रॉड्रिकच्या कानाखाली ठेऊन दिली .

 “ साहेब मी सांगतो सगळं . आम्हाला गुंडांच्या एका gang ने अडकवलय यात . आम्हाला पिस्तुलचा धाक दाखवून हे सगळं  करायला लावलं . आम्ही काय करणार साहेब … ? ” मॉन्ट्या सांगू  लागला . “ ते म्हणाले हे फक्त एका ठिकाणी पोहोचवायचं आहे . नाही केलं  तर ठार मारू म्हणाले . जीवाला घाबरून आम्ही हे केल. आम्ही तसले लोक नाहीत साहेब . माझं  चिंबई व्हिलेजमधे गॅरेज आहे . आणि हा माझा मित्र एका ठिकाणी जॉब करतो. आमचा वापर केला साहेब ह्यात ” 

“ कुठे पोचवणार होता हे कोकेन … ?” जामसंडेने त्याच रागात प्रश्न केला . 

“ हा पत्ता दिला होता साहेब . खारच्या या ठिकाणी जायचं होतं . ” रॉड्रिकने त्याच्या जवळचा कागदाचा चिटोरा  दिला . जामसंडेने तो निरखून पाहिला .  आणि  काहीतरी विचार करू लागला . 

 “ साहेब प्लीज आम्हाला सोडा  . आमची काही चूक नाही ह्यात . ” रॉड्रिक  गयावया करू  लागला . 

 “  पकडल्यावर सगळे असेच म्हणतात …  तू काही वेगळं  सांगत नाहीस . ” जामसंडे त्याच्याकडे रोखून पाहत म्हणाला .  रॉड्रिकला कळलं  कि आता जास्त काही बोलून फायदा नाही . 

“ पाटील घाला ह्या भोसडीच्यांना गाडीत !  ” ए पी आय जामसंडेने  ऑर्डर सोडली . त्यासरशी पाटील हवालदाराने त्या दोघांना आत गाडीत मागच्या बाजूला ढकललं . आणि दरवाजा लावून घेतला . 

 “ साहेब ऐका तर खरं …  ” मॉन्ट्या विनवण्या करू लागला . पण पोलिस काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्ह्ते. जामसंडे आणि दोन्ही हवालदार बाहेर उभे  राहून काहीतरी बोलू लागले . त्या खाली पडलेलेल्या  मोटार सायकलची तपासणी करत होते .  आधीच ती चोरीची बाईक होती . तो गुन्हाही त्यांच्याच नावावर खपणार होता .  म्हणजे आधी चोरी केली आणि नंतर ड्रग्सची डीलिंग करताना रंगेहाथ पकडले गेले. सगळे पुरावे हे त्यांच्या विरुद्ध होते. आणि त्यात हे दोघे पुरते अडकले होते. थोडा वेळ तपासणी केल्यानंतर जामसंडे ने हवालदाराला काही सूचना दिल्या . 

 “ रॉडी , आपण आता फुल्ल टु लटकलो . आता देव जरी आकाशातून आला तरी आपल्याला वाचवू शकत नाही . ” मॉन्ट्या रडकुंडीला येउन बोलू  लागला . रॉड्रिक मात्र शांतपणे बसला होता . बहुतेक त्याच्या डोक्यात काहीतरी विचारांची चक्रे चालू होती . 

“ आता काय करायचा रे रॉडी  ? आता आधी हे आपल्याला पोलिस स्टेशन  मध्ये नेतील  , तिथे तुडव तुडव  तुडवतील , कोर्टात नेतील , तिथे  शिक्षा होईल ,  मग  सगळी लाईफ  बरबाद . लाईफ भर जेल मध्ये सडायला लागेल …. ”  मॉन्ट्याला पुढची चिन्हे दिसू लागली . आणि तो ढसाढसा रडायलाच लागला.  

“ मॉन्ट्या प्लीज रडू नकोस . देअर हॅज  टु  बी अ वे … काहीतरी करायला पाहिजे . ” रॉड्रिक विचार करत म्हणाला . 

“ आता दुसरा काही मार्ग दिसत नाही . जेल दिसतंय मला … ” असं  म्हणून तो आणखीनच रडू लागला . 

“ मॉन्ट्या  ,   मघाशी तू बोललास ते बरोबर आहे . “ रॉड्रिक त्याच्याकडे  म्हणाला . 

“ काय  ? “ 

“ हेच कि  पोलिस स्टेशन , कोर्ट , जेल …. ” रॉड्रिक बोलत होता , मॉन्ट्या त्याच्याकडे बघू लागला . “ पण ह्यातून वाचण्याचा एक मार्ग मला दिसतोय  ”

“ काय  ? बोल लवकर … “ 

 “ जे काही करायचं ते आत्ताच …!  एकदा का आपण पोलिस स्टेशन मध्ये गेलो कि तू म्हणालास तसा देवही आपल्याला वाचवू शकणार नाही ” असं  म्हणून रॉड्रिकने अचानक गाडीचं  दार उघडलं  आणि बाहेर पडला . मॉन्ट्या तर त्याच्याकडे पाहतच  राहिला . हा पळून बिळून जायचा विचार तर करत नाही  ना ? पण त्याने सरळ त्या हवालदाराला हाक मारली . 

“ ए हरामखोर , चल गाडीत बस  ” त्याला बाहेर आलेला बघताच हवालदार उखडला . 

“ प्लीज , आय वॉन्ट  टु  टॉक टू  युअर ऑफिसर . “ त्याच्या अस्खलित इंग्लिशमुळे  आणि निर्धाराने उच्चारलेल्या वाक्यामुळे हवालदार थोडासा भांबावला . त्याने लगेच त्याच्या साहेबांना हाक मारली . जामसंडे साहेबांनी त्याच्याकडे पाहिलं आणि परत त्यांचा राग उफाळून आला . “ भाडखाऊ , तू बाहेर कसा आलास ? चल गाडीत बस … “ 

 “ सर  प्लीज , मला खूप महत्वाचं  बोलायचं तुमच्याशी . त्यात  तुमचाच फायदा आहे . माझं  फक्त ऐकून घ्या एकदा . नाही पटलं  तर  पोलिस स्टेशनला  घेऊन जा तुम्ही  … “ रॉड्रिकने एक एक शब्द आत्मविश्वासपूर्वक उच्चारला . ए पी आय जामसंडेने एकवार त्याच्याकडे पाहीलं  . थोडा विचार केला अन म्हणाला  , “ बोल  ” रॉड्रिकने आजूबाजूला पाहिलं . दोन्ही हवालदार त्याच्याकडेच बघत होते . 

“ साहेब थोडं  प्रायवेट बोलायचं  होतं .… प्लीज … ” रॉड्रिकने त्याच्याकडे सूचक नजरेने पाहिलं .  जामसंडे काय समजायचंय ते समजला . त्याने दोन्ही हवालदारांना जायला सांगितलं . दोघे गेल्यावर रॉड्रिकने एक दीर्घ श्वास घेतला आणि बोलायला सुरुवात केली . मॉन्ट्या आतून गाडीच्या काचेतून सगळं  पाहत होता . रॉड्रिकला आणखी  दोनचार  पडणार असं  त्याला वाटलं . पण समोर घडत होतं त्यावर त्याचा विश्वास बसेना .  रॉड्रिक जामसंडेला  काहीतरी  समजावून सांगत होता  आणि तो ऑफिसर हि त्याच्याकडे लक्ष देऊन ऐकत होता . मधूनच तो रॉड्रिकला काहीतरी विचारत होता .  वीस - पंचवीस मिनिटे त्यांचे बोलणे झाले .  आणि ते परत येताना जामसंडे ने रॉड्रिकच्या हातात हात दिला ते बघून तर मॉन्ट्या डोळे विस्फारून त्यांच्याकडे पाहू लागला . दोघेही गाडीजवळ आले . 

“ पाटील , ते दार उघडा … ये रे  बाहेर ये . “ जामसंडेने ऑर्डर सोडली . मॉन्ट्या बाहेर आला  तोच चेहऱ्यावर अनेक प्रश्नचिन्हे घेऊन  ! रॉड्रिकने डोळ्यांनीच त्याला  समजावलं . 

“ चला , निघा आता . , जा घरी … ” जामसंडे दोघांनाही उद्देशून म्हणाला . “ आणि हे लक्षात ठेव “ असे म्हणून रॉड्रिककडे हाताची तीन बोटे दाखवली . 

“ हो साहेब , माझ्या लक्षात राहील . थँक यु  सर … “ 

क्रमशः

https://kathakadambari.com

माझी अर्धदशक  नावाची कादंबरी वाचण्यासाठी खाली लिंक दिली आहे

https://www.mehtapublishinghouse.com/book-details/ARDHADASHAK/3048.aspx

Amazon link

https://www.amazon.in/Ardhadashak-Milind-Mahangade/dp/9353174163/ref=sr_...

Flipkart Link

https://www.flipkart.com/ardhadashak/p/itm7149b4896e81d?pid=978935317416...

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users