अज्ञातवासी! - भाग ११ - गंगापुत्र!

Submitted by अज्ञातवासी on 15 November, 2020 - 13:24

भाग १० - https://www.maayboli.com/node/77204

"मला माझे बाबा दिसतात."
"काय?"
"हो."
"कधीपासून हा प्रकार चालू आहे?"
"गेल्या आठवडाभरापासून."
"बरं. तुम्हांला ते अगदी समोर दिसतात, की असे भास होतात?"
"रात्री स्वप्नात येतात. थोडंजरी शांत बसलं तर डोक्यात विचार सुरू होतात, आणि दिसतात अगदी समोर!"
"हम्म. काही फिजीकली जाणवतं का?"
"नाही."
"बरं, म्हणजे अलमोस्ट सुरुवात आहे."
"अहो मला माहिती नाही."
"काय दिसतं नेमकं सांगू शकाल?"
"जळका वाडा, जळणार खुर्ची!"
"अच्छा, तुमचा वाडा आहे का?"
"माझा नाही, माझ्या परिवाराचा."
"बरं. नाव काय म्हणालात?"
"मोक्ष राजशेखर शेलार!!!!"
डॉक्टर खुर्चीत अक्षरश: सर्दच झाला. त्याने घाईघाईने कागद खरडला, आणि मोक्षकडे दिला.
★★★★★
"अप्पा, आठवडा झालाय, अजूनही जाण्याची चिन्हे नाहीत."
"सध्या डॉक्टरकडेही फेऱ्या मारणं चालुये."
"मानसोपचारतज्ञ!" अप्पा म्हणाला.
"हो अप्पा तेच."
"का जातो, काही पत्ता? "
"माहिती नाही. डॉक्टरला धमक्या दिल्या तरी काही बोलत नाही."
"हिंमतवान आहे."
"नाही, दादासाहेबांच्या विरोधात जाण्यापेक्षा काहीही होऊ दे, असं म्हणतो."
"दादा, दादा, कायम हे नाव. दादा कधी मरणारच नाही का?" अप्पाने त्वेषाने मुठी आवळल्या.
"नाही, वेताळ कधी मरत नाही. आणि हळूहळू नवीन वेताळ तयार होतोय."
"म्हणजे?"
"अप्पा, वाडा बदलतोय...."
◆◆◆◆◆
कडकडा जळून वाड्याची लाकडे पडत होती. तो धावत होता.
"कुठे धावशील, कुठे पळशील? जगापासून पळशील. स्वतःपासून नाही."
"बाबा..."
"वेताळ आहे मोक्षा मी, वेताळ कधीही मरत नाही. वेताळ फक्त रूप बदलतो."
"बाबा सोडा मला, जाऊ द्या!!!"
"तुला सोडू? कसं सोडू? तुला सोडलं तर या रिक्त हातांनी कुणाशी लढू? वेड्या मुला, मी गेलो आणि युद्ध संपल असं वाटलं तुला? नाही. युद्ध तर सुरू झालंय..."
"कुठलं युद्ध बाबा, कोणतं युद्ध..."
"जे युद्ध तुला लढायचंय मोक्षा!"
"बाबा मला कुणाशीही लढायचं नाही."
"आता तू पळू नाही शकत बाळा...
...कारण तुझ्यासाठी मी जीव दिला..."
मोक्ष दचकून उठला...
त्याला दरदरून घाम फुटला.
◆◆◆◆
"बाळा एकटा एकटा राहतोस. झालंय तरी काय?" सकाळी मोक्ष गॅलरीत उभा होता. काका जवळ येत म्हणाले.
"काही नाही काका."
"काही नाही काय. कुणाशी बोलत नाहीस, काही नाही. सदैव खोलीत एकटा. जरा बाहेर पडत जा, बरं वाटेल. उद्या दहावं आहे दादाचं."
"लक्षात आहे काका."
"बाळा, कधीही काही वाटलं, मला सांग. दादाचा खूप जीव होता तुझ्यावर."
'कारण तुझ्यासाठी मी जीव दिला...' मोक्षला रात्रीचा प्रसंग आठवला...
"हो काका, नक्की सांगेन."
◆◆◆◆◆
"मोक्षसाहेब मला बोलवलं?"
"हो खानसाहेब. या ना, बसा."
खान बसला.
"त्या दिवशी काय घडलं?"
"म्हणजे?"
"म्हणजे बाबांसोबत नेमकं काय घडलं?"
"मोक्षसाहेब. तुम्हाला खरोखर ऐकायचय?"
"खानसाहेब, किती दिवस मी पळत राहणार, किंवा दूर राहणार. कधी न कधी सामोरं जावंच लागेल."
"मोक्षसाहेब, मी आजपर्यंत फक्त आज्ञा पाळत आलोय. कधीही सल्ला दिला नाही, पण तुम्हाला एक सल्ला देऊ?"
"बोला खानसाहेब."
"शेलरांचा वाडा म्हणजे चक्रव्यूह आहे मोक्षसाहेब. जितकं जाणून घ्याल, तितकं गुंतत जाल."
"...मी प्रवेश केलाय खानसाहेब. आता अभिमन्यू होण्याची तयारी ठेवावी लागेल..."
मोक्ष प्रेतवत थंडपणे म्हणाला...
खान त्याच्याकडे बघतच राहिला...
थोड्यावेळाने त्याने सांगण्यास सुरुवात केली.
◆◆◆◆◆
सकाळी पाच वाजता दोन फॉर्च्युनर गोदावरीच्या तीरावर थांबल्या.
त्यातून सहा माणसे उतरली.
"दादासाहेब, थंडी जाणवतेय आजकाल."
"खानसाहेब, एकदा या गोदावरीच्या पात्रात गेलं ना, थंडी कुठे पळून जाते कळत नाही. आई आहे शेवटी आमची."
"सगळ्या नाशकाची..."
"बरोबर खानसाहेब. पण लक्षात ठेवा, ही आईच तिच्या बाळांना परतही घेते."
"म्हणजे दादासाहेब?"
"भीष्म पितामह..."
"आठवलं, गंगेचे पुत्र!" खानसाहेब हसले.
"बरोबर खानसाहेब. महाभारत म्हणजे सगळ्या प्रश्नाचं उत्तर, आणि सगळ्या उत्तरांवर पुन्हा निर्माण होणारे प्रश्न."
"बरोबर."
"चला खानसाहेब, गोदाआई बोलवतेय."
दादासाहेबांनी शर्ट काढला व धोतरावर ते हळूहळू स्तोत्र पुटपुटत घाटाच्या पायऱ्या उतरत खाली निघाले...

वासुदेवमहेशात्मकृष्णावेणीधुनीस्वसा ।
स्वसाराद्या जनोद्धर्त्री पुत्री सह्यस्य गौतमी ॥१॥
सुरर्षिवंद्या भुवनेनवद्या याद्यात्र नद्याश्रितपापहंत्री ।
देवेन या कृत्रिमगोवधोत्थदोषापनुत्यै मुनये प्रदत्ता ॥२॥
वार्युत्तमं ये प्रपिबन्ति मर्त्या-यस्याः सकृत्तेऽपि भवन्त्यमर्त्याः ।
नन्दन्त ऊर्ध्वं च यदाप्लवेन नरा दृढेनेव सवप्लवेन ॥३॥
दर्शनमात्रेण मुदा गतिदा गोदावरी वरीवर्ति ।
समवर्तिविहायद्रोधासी मुक्तिः सती नरीनर्ति ॥४॥
रम्ये वसतामसतामपि यत्तीरे हि सा गतिर्भवति ।
स्वच्छान्तरोर्ध्वरेतोयोगोमुनीनां हि सा गतिर्भवति ॥५॥
तीव्रतापप्रशमनी सा पुनातु महाधुनी ।
मुनीढ्या धर्मजननी पावनी नोद्यताशिनी ॥६॥
सदा गोदार्तिहा गंगा जन्तुतापापहारिणी ।
मोदास्पदा महाभंगा पातु पापापहारिणी ॥७॥
गोदा मोदास्पदा मे भवतु वरवता देवदेवर्षिवन्द्या ।
पारावाराग्र्यरामा जयति यतियमीट्सेविता विश्ववित्ता ॥८॥
पापाद्या पात्यपापा धृतिमतिगतिदा कोपतापाभ्यपघ्नी ।
वंदे तां देवदेहां मलकुलदलनीं पावनीं वन्द्यवन्द्यां ॥९॥

आता आवाज टिपेला पोहोचला....
...स्तोत्र संपलं...
...आणि पुढच्याच क्षणी दादासाहेबांनी पाण्यात डुबकी मारली...

क्रमशः

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

@रुपाली - धन्यवाद!
@शब्दसखी - धन्यवाद!
@पद्म - धन्यवाद!
@आसा - धन्यवाद!
सध्या एकाच वेळी चार कथांवर काम करत असल्याने भाग छोटे होताहेत, याची जाणीव आहे. हळूहळू मोठे होत जातील.
तसंही कथेचा आवाका प्रचंड मोठा असल्याने, संपण्यास वर्षतरी लागेल. ,

@मी गार्गी - धन्यवाद! Happy
@मृणाली - धन्यवाद
@sharad - धन्यवाद
@मेघा - धन्यवाद
@मास्टरमाईंड - धन्यवाद.

पुढील भाग टाकला आहे.