भुभु आणि माऊ बाळांच्या गंमती जमती

Submitted by आशुचँप on 11 November, 2020 - 12:06

अमांचा धागा हायजॅक झाल्यामुळे आणि काही सदस्यांनी सुचवल्याप्रमाणे नवा धागा काढत आहे.
इथे सगळ्या भूभू आणि माऊ पालकांचे स्वागत आहे. ज्यांना व्हावं वाटतय त्यांचेही स्वागत

आपल्या बाळांच्या गमंती जमती, त्यांचे फोटो आणि किस्से मायबोलीकरांशी शेअर करण्यासाठी हा धागा. बाकीच्यांनी नुसता आनंद घ्यावा. तुम्हाला या बाळांचा त्रास झाला असेल, राग असेल तरी हरकत नाही पण तुम्ही तुमच्या तक्रारी वेगळ्या धाग्यावर टाकू शकता. ऑलरेडी तसा धागा आहे. इथे फक्त पॉझीटीव्ह गोष्टीच शेअर व्हाव्यात अशी इच्छा आहे.

हे वाचून कुणाला भूभू किंवा माऊ पालक व्हावेसे वाटले तर आनंदच आहे

या आधी अमांच्या धाग्यावर टाकलेले काही किस्से इथे पुन्हा टाकत आहे.
=====

माझा आणि ओडीन चा साधा फंडा आहे
तुम्ही आमच्या वाट्याला जाऊ नका
आम्ही तुमच्या वाट्याला जाणार नाही
लोकं उगाचच ओव्हररिऍक्ट होतात असाही अनुभव
एकदा फिरायला जात असताना समोरून छोटी मुलगी आणि तिचे बाबा येत होते म्हणून आम्ही रस्त्याची साईड बदलून पलीकडे गेलो
त्याला व्यवस्थित लीश बांधलेला होता आणि शांतपणे तो इकडे तिकडे बघत चालत होता
पण इकडे येताच एक आजोबा अचानक पिसाळले आणि ए हाड हाड म्हणत त्यांनी काठी उगारली
तो काठीला घाबरत असल्याने बिचारा फुल स्पीडणे उलट्या दिशेला पळाला तो त्या मुलीच्या दिशेने
ती किंचाळली तिचा बाबा ओरडायला लागला
तरी मी काही बोललो नाही
सॉरी म्हणून तिथून निघून आलो

======

आज सकाळपासून धोधो पडतोय
आणि नेहमीप्रमाणे ओडीन ने त्याच्या ठरलेल्या वेळी बाहेर फिरायला न्यायचा हट्ट सुरू केला
एरवी आम्ही पाऊस असला तर घरातच खेळतबसतो पण आज म्हणलं चल आणि रेनकोट घालून आम्ही गेलो ट्रॅक वर
इतक्या पावसात फिरायला येणारे आम्हीच दोघे येडे
तयामुळे एरवी माणसांनी फुललेला ट्रॅक आज अक्षरशः सुनसान होता
ओड्या इतका खुष झाला की निवांत त्याला बागडायला मिळत होत
मग पावसाने चिंब होणं पण त्याला चालत होत
या भूभाऊंची बाहेर हिंडण्याची इच्छाशक्ती अजब आहे

======

आज ओडीन ने एका पोराचा सिक्रेट बाहेर काढलं
ग्राउंड वर काही मुलं खेळत होती, ओडीन गेल्यावर सगळे जण खेळले त्याच्याशी पण हा एकाच्या मागेमागे लागला, तो पळायला लागला तर ओडिन पण मागे, सोडेच ना
मी कसातरी जाऊन त्याला धरलं
म्हणलं असं का करतोय ??
मग त्या पोराला म्हणलं खिशात काही खायला आहे बिस्कीट वगैर
आधी काही बोलला नाही मग हळूच खिशातून बिस्किटे काढली
तोवर बाकीची पोरं आली म्हणे एकटा एकटा खातोय का रे
आणि सगळ्यानी पटापट संपवून टाकली
मी म्हणलं ओड्या तो पोरगा लै शिव्या देणार बघ तूला आता

========

ओडीन च्या वासावरून शोधण्यावरून पोराने भारी खेळ सुरू केलाय
लपाछपी चा
पूर्वी एकाने ओडीन ला पकडून ठेवायचं आणि पोरगा लपला की सोडायचं, तो वासावरून अर्ध्या मिनिटात शोधून काढायचा
मग पोराला लक्षात आले की वासावरून शोधतो मग आता तो पळत वरच्या खोलीत जातो आणि मग परत खाली येऊन वेगळीकडे लपतो
हा वेडा वास घेत घेत आधी वरच्या खोलीत जातो मग खाली येतो तोवर याने जागा बदललेली असते
असला तासन्तास खेळ चालतो
मग आता तो शेजारच्या कॉलनीत जातो मुलांसोबत खेळायला
सगळे लपतात इकडे तिकडे आणि हा एकेक करून शोधून काढतो
आणि येड्या वर सारखंच राज्य असतं तरी कळत नाही
उलट आपल्याला खेळायला घेतात, सगळे हाक मारतात एवढं अटेंशन मिळतंय याने तुडुंब खुश असतो
चेहऱ्यावरचे भाव तेव्हा बघण्यासारखे असतात
निरागस समाधान तोंडभर पसरलेलं असत

======

मी काम करत असेन तर येतो
चुळबुळत बसून राहतो समोर
मग त्याला मानेवर, गळ्याला थोडं खाजवलं, काय म्हणतोस, कंटाळा आलाय का तुला, माझं काम झालं की खेळू काय आपण एवढं म्हणलं की समाधान होतं मग जाऊन लोळत पडतो
अर्थात नेहमीच नाही, अगदी बोर झाला असेल तर मग पंजा हातावर ठेऊन आता बास चा इशारा देतो, तरीही नाही ऐकलं तर मग मांडीवर चढून गाल चाट, हात चाट
ढकललं तरी परत येतो
मग थोडा वेळ काम बाजूला ठेऊन अटेंशन द्यावं लागतं, बॉल खेळणे, बेली रब असलं केलं की परत कामाला जायची परवानगी मिळते

====

मांजर आणि भुभु चे काय वैर असते कळत नही
ओडीन ला मांजर दिसले की तो कंट्रोल होतच नाही
त्यात आमच्या घराच्या कंपाउंड च्या भिंतीवर एक मांजर येऊन बसत
हा जाऊन तारस्वरात भुंकत बसतो आणि ती पण असली डॅम्बिस की इतक्या वर तो येऊ शकणार नाही हे माहिती असल्याने निवांत कायमहिती कोणावर भुंकतोय असा चेहरा करून अंग चाटत बसते
इकडे ओड्या चा संतापाने जळून पापड झालेला असतो
एकदाच ती मांजर अवघड प्रसंगात सापडली
पुणेकर असल्याने ओड्या दुपारी मस्त तंगड्या वर करून झोपलेला असतो
ही वेळ साधून ती दबक्या पावलाने किचन मध्ये घुसली
किंचित भांड्याचा आवाज झाला आणि ओड्या तिरासारखा धावला
तिने त्याला झुकांडी दिली आणि हॉल मध्ये आली आणि गडबडली
एरवी जे मागच्या अंगणाचे दार उघड असायचं ते मी जस्ट बंद केलं होतं आणि ओड्या भुंकत आत का गेलो ते बघायला जात होतो
मांजर आम्हाला दोघांना ओलांडून हॉल मध्ये आली पण बाहेर पडायला मार्ग नव्हता
तिथेच सोफ्यावर बाबा झोपले होते ती त्यांना ओलांडून खिडकीकडे झेपावली आणि ओड्या तिच्यापाठोपाठ पण तो वजन राखून असल्याने त्याला झेप जमलीच नाही आणि तो बदकन बाबांच्या पोटावर पडला
ते दचकून जागे झाले
तोवर मांजर घरभर वेड्यासारखं पळत होत आणि ओड्या मागोमाग
अक्षरशः टॉम आणि ते बुलडॉग चा सिन
नशिबाने पटकन सुचलं आणि मी मागचा दरवाजा उघडला
मांजर सुसाट पळालं बाहेर
आणि ओड्या मी कसा शूरबीर असल्याच्या अविर्भावात शेपटी हलवत आला
धिंगाणा नुसता
मी तर नंतर गडाबडा लोळलो हसून हसून त्या प्रसंगानंतर
आणि बाबा एकदम सिरीयस, म्हणे मांजराला पळायला जागा मिळाली नसती तर उलटून हल्ला केला असता त्याने नेमकं माझ्यावर.
म्हणलं त्याला तुम्ही दिसलाच नव्हता, त्याचं पूर्ण लक्ष ओड्या वर होतं
त्यालाच फिस्करून चावला असतं किंवा ओरबाडल असतं
त्यालाही एक धडा मिळाला असता चांगला
त्याचा तर इतका राग आहे मांजरावर की दिवसा रात्री कधीही म्हणलं, ओड्या मांजर आलं
की जातो मागच्या अंगणात आणि भुंकून येतो
म्हणलं दर वेळी कसं याला मांजर दिसतं म्हणून पाठोपाठ गेलो एकदा तर मांजर कुठंही नव्हतं पण हा हिरो ते नेहमी जिथं बसतं तिथे बघून भुंकून आला
म्हणलं की कुठली पद्धत लेका निषेध व्यक्त करायची

====

टीव्ही सुद्धा बघत नाही
त्याच्यासाठी म्हणून डॉग चे व्हीडिओ लावले तरी ढिम्म
आवाज आला तर बाहेर जाऊन बघून येतो कोण भुंकतोय
त्याला किती वेळा दाखवलं टीव्ही वर चे भुभु भुंकतंय तरी तो मान्यच करत नाही
एकदा तर तो टीव्हीच्या मागे जाऊन बघत होता भुभु कुठं लपलंय ते

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

‘Are you the same person I dropped off to LAX airport’? >> Lol
हो ना, किती म्हटले तरी आम्हालाही चाट च पडायला झालं डीजे अन माउईचं गूळपिठ बघून Happy तिच्यासोबत जायचा चान्स मिळाला असता तर गेलाही असता असं वाटलं.

वाह कसलं भारी
माऊव्या आहेच गोंडस बाळ
मिश्किलपणा आणि क्यूट पणा अगदी ओसंडून वाहतो

मलाही आवडेल त्याला भेटायला

दिपंजली आता भारतात याल तर ओडीन ला पण भेटा म्हणजे तुमची मोठ्या भुभुज ची पण भीती जाईल Happy

आशूचँप
नक्की !
भीती गेली आहे ऑलरेडी, परवाच एका ७० पाउंड जायंट डॉगने माझ्याशी खेळताना किसेस देण्याच्या नावाखाली ऑलमोस्ट खान्द्याला धरून पाडलेच मला तरी भ्या नाही वाटली Biggrin
क्युटच असतात सगळ्या कुत्रांच्या डोळ्यातले भाव Happy
तुमचा ओडिन भारी फोटोजेनिक पोझर आहे !

भारिच की
माउई लाडोबा गोडोबा आहे.

माउइ फारच स्मार्ट आहे तसा. मी कॅट-पर्सन आहे हे ओळखल्यासारखा जरा फटकुनच वागत होता माझ्याशी Biggrin त्याला या बाईवर विश्वास ठेवावा की नाही हे जरा नक्की होत नव्हतं. आधी भुंकला, मग जरा माझ्या आजूबाजुला घिरट्या घातल्या. जरा वेळानं डिज्जेच्या मांडीवर येऊन झोपला तेव्हा मी शेजारीच बसले होते. मग हळूच डोकं माझ्या मांडीवर ठेवलंय न ठेवलंय असा येऊन पहुडला तिथे Biggrin पाचच मिनिटात त्याला काय सुचलं, उठूनच गेला एकदम. फार गोड धांदल चालली होती त्याची.

डिजे मस्त प्रतिसाद Happy सिंडरेला, तुमच्या सगळ्यांचं वाचून माउइला भेटावं, त्याचे खुप लाड करावे असं वाटतंय. ओडिनला पण. ओडिनला कधीतरी तरी भेटीनच आणि निरु च्या टारझन ला पण. मी प्रेमात आहे त्यांच्या.

मस्तच लिहिलंय दीपांजली. हे प्राणी असतातच असे. त्यांच्याकडे दोन मिनिटं पाहिलं तरी जीव लावतात आणि वेडं करतात.

IMG_0247.jpeg
हा वेडू पाहा ना. आयुष्यात पहिल्यांदाच त्यानं पाणी पाहिलं. निओला पाण्यात जाणं काही खास आवडत नाही. त्याला कदाचित वाटतं की त्याची सुंदर फर खराब होईल की काय. पण ब्लू आधी पाण्यात पडला आणि मग आपोआप पोहू लागला. त्याच्या पायामुळे आम्ही सगळेच चिंतेत की आता ह्याला पोहता येईल की नाही. तो आपल्याच नादात दूरदूर पोहत जाऊ लागला आणि आमचे प्राण कंठाशी आले. तो मात्र मजेत छान चक्कर मारून आला तळ्यात.

आज बरेच दिवसांनी जुन्या ग्राउंडवर गेलो. तिथे बाकी भुभ्यासोबत नवी सहा पिल्ले दिसली
भटक्या भूभूंची. मी त्यांना बघायला जवळ गेलो तर पळून गेली आणि ओड्याला बघून ठणाणा कोकलत राहीली वॉव वॉव. तो ग्राऊंडवर आल्याच्या आनंदात बागडत होता इतके तिकडे त्यामुळे त्याने अजिबात दखल घेतली नाही. पण त्याला म्हणलं जा जरा तुझ्याजवळ येतात का बघ.

कसेतरी करून त्याला ढकलला त्यांच्याकडे, आधी त्याचा आकार बघून पिल्ले बुजली पण लवकरच याच्यापासून आपल्याला काही इजा नाही हे लक्षात आले, आणी मग जी धीट होती ती ओळख पाळख करुन घ्यायला पुढे आली. मला मात्र शेवटपर्यंत त्यांनी जवळ येऊ दिले नाही. मी जवळ गेलो की धूम पळून जायची. मनुष्यप्राण्यावर विश्वास ठेऊ नये हे फार लवकरच समजलेलं त्यांना

थँक्स सगळ्यांना Happy
माउवी गमती जमती कंटिन्युड..
एरवी मी त्याच्या दृष्टिने वायफळ गोष्टीत (टि.व्ही. पहाणे, गप्पा मारणे ) वेळ घालवताना दिसले कि हा सतत पंजा मारून खेळायला बोलवायचा, कधीकधी तर पाय चाटायला लागायचा पण किचनमधे काही करत असले तर मात्र मुकाट्याने पेशन्स ठेऊन शान्तपणे वाट बघायचा , कधीच अधेअधे नाही करायचा !
मी तिथे असताना आर्यकला (मैत्रेयीच्या मोठ्या मुलाला) आवडतात म्हणून ब्रेकफास्टला गरम गरम फुलके करायचे, त्याच्याशी तूपसाखर हा आर्यकचा बेबी असल्यापासूनचा आवडता ब्रेकफास्ट, ट्रॅडिशन स्टिल कंटिन्युज..
आता माउवी त्यात अ‍ॅड झालाय, आर्यक चे फुलके झाले कि टम्म फुगलेला फुलका त्याला तुकडे करून खायला द्यायचे तेंव्हा त्याच्या डोळ्यातली कृतज्ञता/प्रेम हे अत्यंत प्राइसलेस !
मी फक्त २ आठवडे होते तरी त्याला पॅटर्न पाठ होता, सकाळी मी कॉफी करायला किचनमधे गेले कि हा आधीच माझ्या डायनिंग टेबलच्या चेअर च्या बाजुची चेअर पकडून तिथे जाऊन बसायचा , मग त्याला काहीतरी खाऊ देईपर्यंत लाडात येणे, पाप्या घेणे , नाहीतर क्युट डॉगी फेस करत बसायचा , मग काय मावशी देणारच !
लंच नंतर पाच बोटांना थोडं दही लाऊन त्याला चाटायला देणार हेही माहित असायचं, बसायचा तिथेच !
कितीही गाढ झोपेत असला तरी किचनमधे कोणी बिस्किटांचा ड्रॉव्॑र उघडला किंवा ब्रेड ग्रिल करायला टोस्टरमधे टाकल्याचा आवाज आला कि हे महाराज ताडकन उठून किचनमधे !

माव्यावर काही गाणी पण केली होती मी भोंडल्याच्या गाण्यांच विडंबन Proud
(मैत्रेयीची मुलं मला ‘पिची’ म्हणतात )
हे माव्या स्पेशल साँगः

माउवी घालतो लोळण
आली पिची ही धावून
काय रे मागतोस माव्या तुला देते मी आणून
पिची मला टेडी दे आणून
त्याचा कापुस दे काढून
असल रे कसल वागणं तुझ जगाच्या वेगळं
माउवी घालतो लोळण ||
पिची मला हेअरबँड दे आणून
त्याचं खेळणं दे करून
असलं रे कसलं वागणं तुझं जगाच्या वेगळं
माउवी घालतो लोळण ||
पिची मला कॅप दे आणून
त्याचं फॅब्रिक दे फाडून
असल रे कसल वागणं तुझं जगाच्या वेगळं
माउवी घालतो लोळण ||
पिची मला सॉक्स दे आणून
त्याची लोकर दे उसवून
असल रे कसलं वागणं तुझं जगाच्या वेगळं
माउवी घालतो लोळण , आली पिची ही धाऊन !
(इच्छुकांसाठी ओरिजनल भोंडल्याचे पारंपारेक गाणे https://youtu.be/0ITrRfTMezo )

आर्यक इतका वैतागला या गाण्यांना कि वरून ओरडायचा, कॅन यु जस्ट स्टॉप सिंगिंग Biggrin
माव्या पेशन्ट्ली ऐकायचा गाणी आणि नंतर एक पापी देऊन टाकायचा, पण बहुदा त्यालाही तेच म्हणायचं असेल “कॅन यु जस्ट स्टॉप सिंगिंग“ Biggrin

अग्गं कसलं गोड लिहिल्यंस डिजे...
खरंच कमिटमेंट्साठी रेडी असतो तर भुभूच घेतलं असतं. इथे वाचून तर अगदीच घ्यावंस वाटतं.

सायो भारी जोक हां Lol

ओडिन तर काय चॉकलेट हिरोच आहे.

पार्वती तुमचे पण पेट्स मस्त एकदम.

दीपांजली, मस्त गाणी केलीत तुम्ही. काय मजा आली वाचून. आमची पण गाणी सुरु असतात सतत. त्यापैकी हे एक सदाबहार गीत..

शेपटी शेपटी शेपटी
कोणाची हलते शेपटी?
आई बाहेरून आली
की ब्लू ची हलते शेपटी
शेपटी शेपटी शेपटी
कोणाची हलते शेपटी?
चिकन पानात पडलं
की ब्लू ची हलते शेपटी
शेपटी शेपटी शेपटी
कोणाची हलते शेपटी?
बाबानं आवाज दिला
की निओची हलते शेपटी

This is endless….

माझें घरी आल्यावर जेव्हा स्वागत होते तेव्हा गायचे गाणे.

ओमेरा बच्चा बदन का कच्चा

छोटा छोटा बच्चा होई. होई हे मोठ्याने ओर डून.

आता सध्या ताई घरातू न मूव्ह आउट झालेली आहे पण हपिसला जाताना बाय स्वीटी बाय दिदी. च म्हणते.
रोज तिच्या साठी नेटफ्लिक्स वर वाइल्ड वाइल्ड कंत्री लावतो. ते तीन साडेतीन भाग चालते.

Lol मस्त गाणी सगळ्यांची. डिजे भारी लिहिलंयस. माउइपण तुला मिस करत असेल.
पार्वती तुमचा निओचा पोहण्याचा किस्सा मस्त.

अमा, तुमचं गाणं आम्ही सर्वांनी म्हणून पाहिलं. पण ऑडिओ क्लिप लावल्यास खरं कसं गायचं ते सर्वांनाच कळेल. प्लीज.. डकवा ना.

DJ.. दोन्ही पोस्ट फार आवडल्या.. गोड आहे माउई
गाणी धमाल Lol मी तालासुरात वाचलं ते Proud

आमच्या ओडूबाळाने चांगलाच उद्योग करून घेतलाय. त्याला रात्री पॉटी करायला गेटच्या बाहेर झाडापाशी सोडले आणि मी नुसती चक्कर मारत होतो. आणि तो फिरत फिरत थोडा लांब गेला. तेवढ्यात एक टू व्हिलर पास झाली आणि काही कळायच्या आत ओड्या सुसाट तिच्या मागे धावला. मी इकडून ओरडतोय ओडीन थांब थांब तर नाहीच. मी फुल्ल स्पीडने मागे पळत गेलो, तर बरेच पुढे ती गाडी थांबलेली होती (नशिब). त्यांना कळेना हा का पाठलाग करतोय. मी कसातरी धापा टाकत पोचलो तर शेपटी हलवत माझ्याकडे आला. मग कळलं, त्या गाडीवरच्या मागच्या माणसाचा आणि माझा शर्ट पांढऱ्या रंगाचा होता. त्यामुळे महाशय तंद्रीत असताना ओझरती गाडी दिसली असणार आणि मीच गाडीवर बसून गेलो असेन असा विचार करत तो गाडीच्या मागे धावत सुटला. ते थांबले नसते तर अवघडच होते. म्हणलं जरा इकडे तिकडे बघशील का नाही, का आपलं जायचं बोंबलत.

बर इतक्याने भागले नाही, त्याला परत घेऊन येत होतोत तर लंगडायला लागला. काय झालं म्हणून उजेडात धरला पाय तर पावलाच्या गादीला टवका उडाला होता मोठा, थोडं रक्तपण येत होतं. काय रे ओड्या, म्हणत त्याला उचलून आणला घरी. व्हेट ना फोन केला, नशिबाने ते उशीर होऊनही होते क्लिनिकला. गाडीवर घालून त्याला दाखवून आणलं, ते म्हणे इथे स्टिचेस घालता नाही येणार, आपोप जखम बरी होईल. त्याला जास्त विश्रांती द्या आणि पेन किलर देतो ती दोन तीन दिवस जेवणातून घेऊ दे.

मग घरी आणला, स्प्रे मारू देइना, मग कापसाला अंटीसेप्टिक लावून अलगद पूसून काढलं आणि दादूची जुनी चड्डी कापून त्याचेच मेक शिफ्ट बँडेज केलं.

आता झाले याला दोन तीन दिवस, आता हिंडू फिरू लागलाय. म्हणून आज थोडावेळ बाहेर नेलं तर इतका उड्या मारून बागडायला लागला की मलाच भिती वाटली. पकडला आणि घेऊन आलो कसातरी घरी. अजून पूर्ण भरून नाही आलेली जखम.

अरे बाप रे! मोठाच उद्योग झाला! स्केअरी एपिसोड. बिचारा ओडिन!! नशीब ती गाडी थांबली, नाहीतर किती अवघड झालं असतं! आता बरा आहे वाचून बरं वाटलं.

हो ना, मी त्यांनाच थँक यू म्हणून आलो, म्हणलं घाबरून जोरात पळवत राहीला असता गाडी कुत्रा मागे लागलाय म्हणून तर काय झालं असतं देव जाणे. त्याला असे का वाटलं असावं की मी गाडीवर बसलो असेन हेच कळत नाहीय. आणि नशिबाने ते मेन रोड कडून आतल्या बाजूला गेले, उलट झालं असतं तर Sad

Pages